Tuesday, December 6, 2016

इतिहासाची पुनरावृत्ती

Image result for jayalalitha

इतिहासापासून समाज काहीही शिकत नाही म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, असे म्हणतात. तामिळनाडूचे राजकारण त्याच मार्गाने चालले आहे. काही महिने झाले, त्या राज्याच्या मुख्यमंत्री जयललिता अकस्मात आजारी पडल्या आणि त्यांना ज्या आजाराची बाधा झालेली होती, त्याच्या उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मग त्यांचा आजार कुठला? त्या शुद्धीत तरी आहेत काय? त्यांच्या नावावर कोण खरा कारभार करतो आहे? त्यांची प्रकृती खरेच किती गंभीर आहे यावरून वादळ उठलेले होते. एका बाजूला त्यांचे भक्त अनुयायी त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना पूजापाठ करीत होते. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री करुणानिधी त्याच बाबतीत अनेक शंका काढून राजकारण खेळत होते. रुग्णालयातील डॉक्टर्स वा आण्णाद्रमुकच्या नेत्यांकडून आलेल्या खुलाश्यावर शंका घेतल्या जात होत्या आणि कोर्टापर्यंत मजल गेली होती. कारण निकटवर्तियांपलिकडे पक्षाबाहेरच्या कोणालाही अम्मांना भेटू दिले जात नव्हते. हा अज्ञातवास त्यांच्याच इच्छेने चालला होता, की कायम एकांतवास जगणार्‍या अम्मांच्या जवळच्या लोकांनी त्यांना बंदिस्त करून मनमानी चालविलेली होती? अशा अनेक शंका रास्त होत्या आणि त्याचे खुलासे होत नव्हते. पण मध्यंतरी अन्य राजकीय विषय आले आणि हंगामी नेता पुढे केला गेल्याने, अम्मांच्या प्रकृतीचा विषय मागे पडला. दरम्यान नोटाबंदीने संपुर्ण देश ढवळून निघत असताना, अम्मांचा विषय सर्वांच्याच विस्मृतीत गेला. गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती सुधारल्याच्या व त्या नियमित श्वासोच्छवास घेऊ लागल्याची बातमी आली होती. इतक्यात रविवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि झपाट्याने चित्र बदलत गेले. खरे तर त्यातच त्यांनी इहलोकीची यात्रा संपवलेली असावी. पण तशी रितसर घोषणा झालेली नव्हती. हा सगळा प्रकार इतिहासाची पुनरावृत्ती होती.

अण्णाद्रमुक हा द्रमुकमधून फ़ुटून निघालेला पक्ष आहे. अण्णादुराई यांच्या लोकशाही पक्षात रामचंद्रन या लोकप्रिय अभिनेत्याचे प्रस्थ वाढले आणि एकेदिवशी त्यानेच बाजूला होऊन नवा पक्ष काढला. त्याला राजकीय वारसा मिळावा, म्हणून अण्णादुराई यांचे नाव जोडलेले होते. रातोरात त्यांनी आपल्या चहाते मंडळांच्या महासंघाचे नव्या पक्षसंघटनेत रुपांतर केले आणि द्रमुकला आव्हान उभे राहिले. दिर्घकाळ लढत देऊन कॉग्रेसला पराभूत करणार्‍या द्रमुकला, आता समान विचारांच्या पक्षाचेच नवे आव्हान उभे राहिले होते. आणिबाणीनंतर तामिळनाडूत पुनरागमन करीत द्रमुकला संपवण्यासाठी इंदिराजींनी अण्णाद्रमुकशी आघाडी केली. त्याचा लाभ उठवून रामचंद्रन यांनी सत्ता बळकावली आणि पुढल्या काळात त्यांची व्यक्तीपुजा म्हणजेच तामिळी राजकारण होऊन गेले. एकदा आपले बस्तान बसवल्यानंतर रामचंद्रन यांनी आपली रुपेरी पडद्यावरची नायिका जयललिता यांना आग्रह करून राजकारणात आणले आणि वारस असल्याप्रमाणेच पेश केलेले होते. त्यामुळे त्यांच्याच पक्षातल्या प्रस्थापित राजकारण्यात चलबिचल माजली होती. पण कोणी त्यांच्या निर्णयाला आव्हान देऊ शकत नव्हते. जयललिता राज्यसभेच्या खासदार झाल्या आणि पक्षाच्या प्रचारप्रमुख म्हणून काम करू लागल्या. मग अल्पावधीतच रामचंद्रन यांची प्रकृती ढासळली. त्यांना याच अपोलो रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तेव्हा जयललितांना आपल्या या नेत्याला भेटताही आलेले नव्हते. पक्षातल्या अन्य बुजुर्ग नेत्यांनी इस्पितळाचा ताबा घेतला आणि तिकडे जयललितांना फ़िरकूही दिले नव्हते. पुढे रामचंद्रन यांच्या मृत्यूची घोषणा झाल्यावरही जयललितांना अंत्ययात्रेतूनही हुसकून लावले गेले. विधवा जानकीअम्मा यांना मुख्यमंत्रीपदी बसवून, त्या ज्येष्ठ नेत्यांनी कारभार चालविला होता. तर जयललितांनी त्यांना आव्हान देत फ़ुटीर पक्षाची स्थापना केलेली होती.

त्यावेळी जयललितांचा कोणी भक्त नव्हता. एकदोन आमदार वगळता त्यांच्या बरोबर कोणी आले नाही. पुढल्याच निवडणूकीत खर्‍या वारसाची कसोटी लागली. त्यात जानकीअम्मा वा त्यांना कठपुतळी बनवणार्‍या नेत्यांना मतदाराला जिंकता आले नाही आणि त्याच्या हाती असलेला अण्णाद्रमुक संपुष्टात आला. जानकी अम्माने  राजकारण सोडून जयललिताला सुत्रे सोपवली. त्या सर्व राजकीय साठमारीत जयललितांनी ठामपणे उभे राहून, आपल्या नेतृत्वाची सत्वपरिक्षा दिलेली होती. जबरदस्त संघर्ष करून त्यांनी राजकारणात आपला पाया घातला. त्या पहिल्या प्रयत्नात मते विभागली गेल्याने त्यांच्या गटाचे २०-२२ आमदार निवडून आले होते आणि त्यांनी विधानसभेत विरोधीनेता हे स्थान संपादन केले होते. पण द्रमुकच्या आमदारांनी विधानसभेतच त्यांच्यावर हल्ला केला व कपडेही फ़ाडले. तेव्हा चवताळलेल्या जयललिता यांनी मुख्यमंत्री होऊनच विधानसभेत येईन, अशी घोषणा केली. काही वर्षातच तसे करूनही दाखवले. तेव्हापासून तामिळनाडूत अम्मायुग सुरू झाले. थोडक्यात आज तिथे जो राजकीय सावळागोंधळ दिसतो आहे, तशीच अवस्था तीस वर्षापुर्वी निर्माण झालेली होती. अम्मांना राजकारणात आणणार्‍या रामचंद्रन यांनी तरी जयललितांना वारस म्हणून जाहिर केलेले होते. तरी रुग्णालयात त्यांची शुद्ध हरपल्यानंतर त्यांच्याच निकटर्तियांनी त्या घोषित वारसाला सत्ता मिळू दिलेली नव्हती. जयललितांनी तर त्याहीपेक्षा मोठा पेचप्रसंग निर्माण करून ठेवला आहे. कारण लोकांपासून व गर्दीपासून अलिप्त राहून राजकारण करणार्‍या अम्मांनी, कधी आपले मन जाहिरपणे कथन केले नाही, की अन्य कुणालाही पर्याय म्हणून समोर आणलेले नव्हते, तुरूंगात जायची वेळ आली, तेव्हाही तिथूनच त्या रिमोट कंट्रोलने राज्याचा कारभार हाकत राहिल्या होत्या. मुख्यमंत्री म्हणून पन्नीरसेल्व्हम यांना नेमूनही ते बाहुलेच राहिल, याची काळजी अम्माने घेतलेली होती.

म्हणूनच आता त्यांच्याही अपेक्षा नसताना अचानक इहलोकीचा अवतार संपवण्याची स्थिती आली, तेव्हा त्यांचा वारसा पुढे चालवण्याची कुठलीही व्यवस्था त्यांनी केलेली नाही. आपल्याला डोईजड होऊ शकेल वा स्वयंभूपणे काही करू शकेल, अशा कुणाही नेत्याला पक्षात त्यांनी स्थान ठेवलेले नसल्याने, त्यांच्या अनुपस्थितीत काय करायचे हे कोणालाही ठाऊक नव्हते. म्हणून आजारपणाने अम्माच बेशुद्धीत गेल्यावर पक्षाची व सरकारी कारभाराची तारांबळ उडाली. त्यात थातुरमातूर व्यवस्था करण्यात आली, इतक्यात अम्मांनी इथला मुक्कामच आटोपला आणि अण्णाद्रमुकचे भवितव्य अधांतरी झाले आहे. जे कोणी मुठभर नेते थोडा अधिकार गाजवू शकतात वा स्वत: काही निर्णय घेण्याची कुवत बाळगतात, अशा खुज्या लोकांच्या महत्वाकांक्षांना आता तो पक्ष बळी पडण्याची वेळ आलेली आहे. त्यात दिर्घकाळ सखीप्रमाणे अम्माच्याच सोबत राहिलेल्या शशिकला व हंगामी मुख्यमंत्री पन्नीरसेल्व्हम यांचा समवेश आहे. तितकेच लोकसभेतले पक्षाचे नेते व उपसभापती तंबीदुराई महत्वाकांक्षी आहेत. या तीन नेत्यांमध्ये पुढला सत्तासंघर्ष व्हायचा आहे. यातल्या शशिकला अम्माच्या सर्वाधिक निकटवर्तिय आहेत. कारण त्यांचा अम्माशी सतत सहवास होता. सेल्व्हम हेच दोनदा मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि तंबीदुराई सातत्याने दिल्लीची आघाडी संभाळलेले जुने नेते आहेत. यापैकी शशिकला यांनी आजवर कुठलेही राजकीय वा सत्तेचे पद उपभोगलेले नाही. तरीही पक्ष संघटनेच्या घडामोडी व निर्णयात त्यांचा सतत वावर राहिलेला आहे. अनेक निर्णयात त्याच सहभागी राहिलेल्या आहेत. पण पक्षावर त्या कितपत हुकूमत राखू शकतील, याविषयी शंका आहे. ज्या पद्धतीने अम्मानी ठामपणा दाखवून तीस वर्षापुर्वीच संपणार्‍या अण्णाद्रमुकचा जिर्णोद्धार केला, तितकी कुवत यापैकी कुठला नेता दाखवू शकणार आहे? म्हणूनच जे काही घडते आहे, ती तशीच्या तशी इतिहासाची पुनरावृत्तीच म्हणायला हवी.

1 comment: