Wednesday, December 21, 2016

उथळ पाण्याचा खळखळाट

india won test series के लिए चित्र परिणाम

शेवटचा चेंडू खेळला जाईपर्यंत भाकित करू नये, असे क्रिकेटच्या बाबतीत बोलले जाते. म्हणजे असे निदान पुर्वीचे क्रिकेट समालोचक म्हणायचे. आजकाल जगातल्या प्रत्येक बाबतीतले समालोचक भाष्यकार म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फ़ार अशा पातळीवर आलेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपण्यापुर्वीच पाच दिवस खेळल्या जाणार्‍या कसोटीचेही भाकित करणार्‍यांचा आज सुकाळ झालेला आहे. दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांची भाषा व भाकिते सतत बदलत असतात. सामना खेळला जाईपर्यंत व प्रत्येक चेंडू खेळला जाईपर्यंत थांबायला त्यांच्यापाशी सवड नसते. हेच सर्व क्षेत्रात झालेले आहे. घटना घडण्यापुर्वीच त्याची बातमी करण्याच्या घाईने सर्वांनाच पछाडले आहे. म्हणूनच तर इंग्लंड विरुद्ध भारत, यांच्यातल्या पाच कसोटी मालिकेचे भाकित पहिल्या दिवशी वा पहिल्या सामन्यानंतर करणारे तमाम जाणते पुरते तोंडघशी पडले आहेत. राजकोट येथे पहिला सामना याच दोन संघात झाला. त्याआधी न्युझिलंडला धुणार्‍या विराट कोहलीच्या संघाचे गोडवे गाणारे समालोचक इंग्लंड भारतापुढे सफ़ाचाट होईल अशी अपेक्षा व्यक्त करीत होते. पण पहिल्याच दिवशी विकेट संभाळून इंग्लिश फ़लंदाजांची चांगली धावसंख्या उभी केली, तेव्हा समालोचकांना भारत पराभवाच्या छायेत गेल्याचे भास होऊ लागले. मग पहिल्या डावात इंग्लंडला बढत मिळाल्यावर त्यांना भारताच्या पराभवाची स्वप्नेही पडू लागली होती. अखेरच्या दिवशी भारताला पराभव टाळण्यासाठी कसरत करावी लागली, तेव्हा बहुतेकांनी विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लावलेले होते. काहींनी त्याच्याही पुढे मजल मारून आपल्याच गल्लीतले शेर किंवा हवी तशी खेळपट्टी बनवून सामने जिंकण्यातली लबाडी दाखवण्याचा प्रयास केलेला होता. आज पाच कसोटींची मालिका कोहलीच्या संघाने ४-० अशा फ़रकाने जिंकल्यावर, त्यांनाच आपले भाकित आठवते तरी काय?

आज विराट कोहली, त्याचा खेळ व त्याच्या नेतृत्वाचे गोडवे सर्व माध्यमातून गायले जात आहेत. एकटा विराट नव्हेतर भारतीय संघातल्या गोलंदाज, फ़लंदाज आणि त्यांच्या पराक्रमाचे कौतुक प्रत्येकजण करतो आहे. पण कसोटी मालिका सुरू झाली व पहिला राजकोटचा सामना संपला. तेव्हा त्यापैकी कितीजणांना विराट कोहली वा त्याच्या संघाचे कर्तृत्व मान्य होते? त्यापैकी एकाला तरी भारतीय संघातील, खेळाडूंमधील गुणवत्तेची किंचीत तरी माहिती होती काय? हाच संघ मालिका जिंकण्याची शक्यता त्यापैकी एका समालोचकाला वाटलेली होती काय? उलट तेव्हा तर पहिल्या दिवसापासून भारतीय संघ मालिका गमावण्याच्या छायेत असल्याचीच भाकिते करण्यात प्रत्येकजण गर्क होता. मात्र आज कोहलीच्या संघाने जबरदस्त धाडसी खेळ करून मालिका कशी जिंकली, ते समालोचकांनाच फ़क्त कळले असल्याच्या थाटात वर्णने व कौतुके चालली आहेत. कदाचित आपण ही मालिका कशामुळे जिंकली वा आपल्या सवंगडी खेळाडूंमध्ये कोणते कौशल्य आहे; तेही विराटला ठाऊक नसेल इतके याच समालोचकांना माहिती असावे, असेच कोणाला वाटेल. ही भारतीय वा जागतिक समालोचन वा विश्लेषणाची आजकाल झालेली शोकांतिका आहे. मग क्षेत्र राजकारणाचे असो, अर्थकारण वा समाजकारणाचे असो; किंवा खेळाचे असो. प्रत्येक क्षेत्रातल्या जाणत्या अभ्यासक विश्लेषकांची अब्रु चव्हाट्यावर येताना दिसते अहे. त्यांच्या अंदाजाच्या ठिकर्‍या उडवून अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप निवडून येतात आणि त्याच जाणत्यांना खात्री असलेल्या हिलरी क्लिंटनचा धुव्वा उडतो. युरोपभर तसेच बदलाचे वारे वहात असतात आणि इथे नोटाबंदीने लोकांच्या रागाचे लक्ष्य झालेल्या भाजपाला अनेक राज्याच्या स्थानिक निवडणूकीत लोक अधिक मते देऊन निवडून आणतात. तिथे राजकोटनंतर बुडीत निघालेला विराटचा संघ मालिका ४-० फ़रकाने जिंकतो.

हा चमत्कार नाही, तर अर्धवटरावांच्या विश्लेषणाचा पोकळपणा आहे. खेळ वा सामना सुरू होण्याच्या आधी कुडमुड्या ज्योतिषाच्या आवेशात भाकिते करण्याचा परिणाम आहे. वास्तवाचे भान सुटल्याचा पडताळा आहे. इंग्लंड विरुद्ध पहिला सामना राजकोट येथे खेळला गेला, तेव्हा भारतीय गोलंदाजीला धुडकावून इंग्लिश फ़लंदाजांनी मोठी धावसंख्या पहिल्या डावातून उभारली होती. त्यानंतर खेळताना त्याची बरोबरी करण्यातही विराट कोहलीचा संघ तोकडा पडला आणि मग भारतीय क्रिकेटचे एकाहून एक दोष सांगण्याची शर्यत समालोचकांमध्ये लागली होती. कारण पहिल्या सामन्याच्या अखेरच्या दिवशी तर भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता. पण किकेट वा अन्य कुठल्याही स्पर्धेत, कुठलाही सामना अखेरचा नसतो. कमीअधिक होतच असते. आणि क्रिकेटमध्ये तर अखेरचा चेंडू पडण्यापर्यंत सावध असावे लागते. मग पहिल्या सामन्यातील तारांबळीवर पाच सामन्यांच्या मालिकेचे भवितव्य घोषित करणे, शुद्ध मुर्खपणाच नाही काय? योगायोग असा, की त्याच कालखंडात भारतामध्ये नोटाबंदीची घोषणा झाली आणि त्यावरही देशातल्या महान अर्थशास्त्रज्ञांनीही अर्थव्यवस्था बुडाल्याचे निर्वाळे दिलेले आहेत. विविध भाकिते केलेली आहेत. देशभरची जनता मोदींना आणि त्यांच्या सरकारला पाडण्यासाठी उतावळी झाल्याचे निष्कर्षही काढलेले आहेत. कसोटी मालिका सुरू असतानाच आपण ही राजकीय भाकिते ऐकलेली आहेत. पण अजून तरी भारताचे आर्थिक दिवाळे वाजल्याचा कुठला पुरावा समोर आलेला नाही. मोदींना धडा शिकवायला उत्सुक असलेल्या जनतेने जागोजागी झालेल्या लहानसहान मतदानात त्यांच्याच पक्षाला अधिक प्रतिसाद दिलेला आहे. मग ती उतावळी जनता कुठे गायब झालेली आहे? क्रिकेट असो की राजकारण; कुठल्याही क्षेत्रातले जाणकार वा विश्लेषक किती निरर्थक भाष्ये व भाकिते करतात, त्याची ही साक्ष आहे.

याचा अर्थ कुठले विश्लेषण करू नये किंवा चुकीचेच असते, असेही नाही. विश्लेषण संपुर्ण अभ्यासानंतर करायचे असते. एखादी घटना घडून जावी लागते. ती घटना घडत असताना अर्धवट माहिती वा अपुर्‍या अनुभवाच्या आधाराने भाकित किंवा विश्लेषण करायचे नसते. नोटाबंदी असो किंवा राजकोटचा पहिला क्रिकेट कसोटी सामना असो, त्याचे विश्लेषण करताना निदान एक सामना तरी पुर्ण व्हायला हवा ना? नोटाबंदीची मुदत पन्नास दिवसांची होती आणि ती पुर्ण होईपर्यंत परिणामांची भाकिते उपयोगाची नसतात. शेन वॉर्न हा जाणता क्रिकेटपटू आहे आणि तोही अशाच घाईमुळे तोंडघशी पडला आहे. पाचव्या कसोटीच्या चौथ्या दिवशी अखेरच्या सत्रात करूण नायर हा नवोदित फ़लंदाज त्रिशतक ठोकण्याच्या टप्प्यात आलेला होता. त्याला तितका वेळ द्यायचा तर इंग्लंडला दुसरा डाव खेळायला भाग पाडण्याचा वेळ घटत होता. पण विराट कोहलीने तितका वेळ करूणला दिला आणि त्याने आयुष्यातला मोठा विक्रम साजरा केला. तो मूल्यवान वेळ वाया गेला, म्हणून भारताने विजय संपादन करण्याची संधी गमावली, असे वॉर्न याने म्हटलेले होते. पण उरलेल्या वेळात विराटच्या सवंगडी गोलंदाजांनी इंग्लिश फ़लंदाजी गुंडाळून विजय खेचून आणला. इथे विराटने आपल्या सवंगड्यांवर दाखवलेला विश्वास करूणने खरा केला, तितकाच गोलंदाजांनी केला, हे लक्षात घेतले पाहिजे. जे काही विराट करत होता, ते त्यालाच ठाऊक होते. वॉर्नला वा इतर शहाण्यांना माहिती नसेल, तर निकाल लागण्यापर्यंत थांबण्याची गरज होती. पण तितकाही संयम त्यांना दाखवता आला नाही. हे फ़क्त क्रिकेटच्या समालोचकांकडून घडत नाही. आजकाल विश्लेषण वा समालोचन म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फ़ार; असाच जागतिक अनुभव येत आहे. नोटाबंदीची मुदत संपल्यावर महिनाभरात काय घडते, त्याची प्रतिक्षा म्हणूनच मोलाची ठरेल. पण लक्षात कोण घेतो?

3 comments:

  1. Mala asa watat bhai Ki shivseneni gujrati marwadi Jain yanna tikita dyawya....कारण काही हि केले तरी भैया बिहारी सेनेला मत देनार नाहीं।

    भाऊ आपण माझा blog at sangnaremana.blogspot.com वाचावा व मला मार्ग दर्शन करावे ही विनम्र विनंती।

    ReplyDelete