Saturday, December 17, 2016

कॉग्रेससाठी अच्छे दिन

rahul cartoon के लिए चित्र परिणाम

गेल्या महिनाभरात नोटाबंदीने राहुल गांधी फ़ॉर्मात आहेत आणि आता त्यांनी पक्ष संघटनेवर मांड ठोकली, असेही म्हणायला हरकत नाही. नेमक्या अशा स्थितीत पक्षाची जनमानसात काय पत आहे, त्याचाही अंदाज असणे आवश्यक आहे. तर तसा अंदाज कॉग्रेसने घेतल्याची बातमी रेडीफ़ या माध्यमाने दिली आहे. पक्षाने एका संस्थेकडून मतचाचणी करून घेतली असता, देशात कॉग्रेसचे वारे वाहू लागल्याचे दिसते. चाचणीनुसार उद्याच मतदान झाले, तर कॉग्रेसला दोनशेहून अधिक जागा मिळू शकतील असे म्हटले आहे. अशी माहिती हाती आल्यावर राहुलनी आक्रमक पवित्रा घेतल्यास नवल नाही. त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या आठवडाभरातल्या वर्तनामध्ये पडलेले असावे. पत्रकार परिषद घेण्यापासून अनेक बाबतीत राहुलनी थेट पक्षाचे नेतृत्व स्विकारलेले आहे. महिनाभरात त्यांनी पक्षाच्या विविध बैठकांमध्ये अध्यक्षताही पत्करलेली होती. शुक्रवारी तर दोन्ही सभागृहातील व प्रादेशिक कॉग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांचे शिष्टमंडळ घेऊन राहुल पंतप्रधानांना निवेदन द्यायला गेलेले होते. म्हणजेच आता राहुल कॉग्रेसचे व देशाचे नेतृत्व करायला सिद्ध झालेले आहेत. त्यांच्यातला उत्साह अनेकांना शंकास्पद वाटत असला, तरी त्यामागची प्रेरणा अशाच चाचणीच्या निष्कर्षातून आलेली असावी. कारण लोकसभेच्या दोनशेहून अधिक जागा म्हणजे भाजपासह मोदींना संपवून पुन्हा देशात कॉग्रेसचे सरकारच येण्याची हमी होय. दोनशे जागा कॉग्रेसला मिळणार असतील, तर भाजपाची घसरगुंडी शंभराच्याही खाली होणार हे उघड आहे. कारण अन्य पक्षांनाही जागा मिळणे आवश्यक आहे आणि सभागृहाच्या जागा वाढू शकत नाहीत. म्हणूनच मोदी संपणार आणि राहुलयुग अवतरणार, असे मानायला हरकत नसावी. मात्र पक्षांतर्गत माहितीसाठी अशी चाचणी केली असल्याने, त्याची जाहिर वाच्यता बाहेर झालेली नाही.

ज्या कंपनीचे ही मतचाचणी केली, ती दिल्ली नजिकच्या नॉयडा येथील असून, फ़ोनद्वारे जनमनाचा कानोसा घेण्यात आल्याचे म्हटले जाते. ही आकडेवारी बघितल्यावर एकूणच कॉग्रेस पक्षाला उत्साह आलेला असून, २०१९ पर्यंत अशीच लाट उसळत ठेवली, तर कॉग्रेस ३०० पर्यंत मजल मारू शकेल, असेही पक्षातील जाणत्यांचे मत आहे. म्हणून असेल, सर्वच नेते राहुलच्या मागे एकवटले आहेत आणि बाकीच्या सहकारी वा मित्रपक्षांची त्यांना पर्वा वाटत नसावी. शुक्रवारीच राहुल यांनी पंतप्रधानांची भेट घेतली, तेव्हा अन्य पक्षांना सोबत घेण्याची त्यांना गरज वाटली नाही. मात्र राष्ट्रपतींना भेटायला जाताना सर्व पक्ष सोबत आले नाहीत. समाजवादी, राष्ट्रवादी, बसपा किंवा डाव्या पक्षांनीही कॉग्रेसला साथ दिली नाही. तेवढ्यापुरते राहुलला बाजूला सारले गेले, तेव्हा खुद्द सोनियाच सर्व पक्षांचे नेतृत्व करायला समोर आल्या होत्या. ती एक गोष्ट सोडली तर राहुलनी आता पक्षावर मांड ठोकली आहे. अडीच वर्षात तीनशेचा पल्ला गाठण्याचा त्यांचा निर्धार पक्का झालेला असावा. सहाजिकच बाकीच्या पक्षांनाही त्याची धडकी भरलेली असणे स्वाभाविक आहे. कारण जेव्हा कॉग्रेसने तीनशेच्या पुढे पल्ला गाठला होता, तेव्हा पुरोगामी डाव्या पक्षांचाही पुरता धुव्वा उडालेला होता. कदाचित त्याच इतिहासाचे स्मरण करून डाव्या इत्यादी पक्षांनी राष्ट्रपती भवनात कॉग्रे्ससोबत जाण्याचे टाळलेले असावे. पण म्हणूनच तो कॉग्रेससाठी शुभसंकेत मानायला हरकत नसावी. किंबहूना तसेच असेल, तर आगामी उत्तरप्रदेश पंजाबमध्ये कॉग्रेस सत्तेत येण्याचीही शक्यता असू शकते. तशी शक्यता नसती तर मायावती वा मुलायम यांनी राहुलची साथ देण्यात कुचराई केलीच नसती. उत्तरप्रदेशच्या त्याच दोन पक्षांनी राहुलपासून चार हात दूर रहाण्याचे बहुधा हेच एकमेव कारण असावे. कारण अशा कॉग्रेस पुनरुज्जीवनाचा सर्वात मोठा धोका, त्याच दोन पक्षांना स्थानिक पातळीवर संभवतो ना?

जेव्हा जेव्हा कॉग्रेसने तीनशेहून अधिक जागा लोकसभेत जिंकल्या, तेव्हा उत्तरप्रदेशच्या जवळपास सर्वच जागा त्याच पक्षाला मिळून गेल्या होत्या. आताही भाजपाला तीनशे नाही पण २८२ जागा जिंकताना उत्तरप्रदेशात ७३ जागा जिंकाव्या लागल्या होत्याच. सहाजिकच २०१९ मध्ये राहुलना तीनशेचा पल्ला गाठायचा असेल, तर त्याच उत्तरप्रदेशात ६० पेक्षा तरी अधिक जागा जिंकायला हव्यात. इतक्या जागा त्या सर्वात मोठ्या राज्यात जिंकायच्या, तर त्याची सुरूवात तीन महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा मतदानापासूनच करावी लागणार ना? लोकसभेच्या दोनशे जागा देशभरातून कॉग्रेस उद्याच मतदान झाल्यावर जिंकू शकणार असेल, तर तीन महिन्यांनी व्हायच्या मतदानात उत्तरप्रदेशात विधानसभेच्या दोनशे जागा कॉग्रेसला मिळण्यात कुठलीही अडचण असू शकत नाही. ४०३ जागांच्या विधानसभेत दोनशेचा पल्ला म्हणजे राज्याची सत्ता असते. त्यामुळे पक्षाने घेतलेली मतचाचणी योग्य असेल, तर आगामी तीन महिन्यात उत्तरप्रदेशात कॉग्रेसचा मुख्यमत्री राहुलच बसवतील हे मान्य करायला हवे. तेही अशक्य नाही. दोनच महिन्यांपुर्वी राहुलनी सहा आठवड्यांची किसानयात्रा केलेली होती आणि त्यात शेतकर्‍यांनी त्यांच्याकडे केलेल्या मागण्या त्यांनी शुक्रवारी पंतप्रधानांना सादरही केलेल्या आहेत. ही राहुलची घोडदौड व आक्रमकता बघूनच, मुलायम मायावतींना घाम फ़ुटलेला असावा. म्हणून त्यांनी सावधपणे राहुल व कॉग्रेसपासून दुरावा सुरू केलेला असावा. हे राहुलचे २००९ पासूनचे स्वप्न होते. तेव्हाच्या लोकसभेत पक्षाला अनपेक्षितरित्या २१ जागा मिळाल्या आणि तीन महिने उत्तरप्रदेशात राहुल मुक्काम ठोकून होते. त्यांनी मायावती सरकारच्या विरोधात काहुर माजवले होते. त्यामुळे २०१२ च्या विधानसभा मतदानात स्वबळावर सत्ता मिळवू; अशी ग्वाही दिग्वीजयसिंग देत होते. आजच्यापेक्षा तो उत्साह तीळभर कमी नव्हता.

कदाचित तेव्हा दिग्वीजय यांच्या सहवासात अधिक राहिल्याने राहुल खुप जपून बोलत होते आणि बेताल बोलण्याची जबाबदारी त्यांनी डीग्गीराजांवर सोपवलेली होती. ती चुक त्यांनी यावेळी सुधारलेली आहे. हल्ली दिग्वीजय यांच्यापासून राहुल चार हात दूर आहेत, किंवा त्यांना कटाक्षाने दूर ठेवत आहेत. आजकाल गुलाम नबी आझाद किंवा खरगे ज्योतिरादित्य अशा तजेलदार नेत्यांच्या सहवासात राहुल असतात. अधिकाधिक आक्रमक वक्तव्ये व विधाने करण्याचा सपाटा त्यांनी लावलेलाच आहे. किसानयात्रेत त्यांनी खाटांची लयलूट केलेली होतीच. भूकंप म्हणजे काय ते भाजपाला त्यातूनच समजणार आहे. कदाचित ह्या चाचणीचे निष्कर्षच पंतप्रधान मोदींना भयभीत करणारे असावेत. म्हणूनच त्यांनी संसदेत वा लोकसभेत बोलायचे सोडून दडी मारलेली असण्याची दाट शक्यता आहे. राहुल गांधी यांच्यापाशी मोदींना भयभीत करण्यासारखे काय गुपित आहे, त्याचा उलगडा या चाचणीच्या निष्कर्षाने होऊ शकतो. पण राहुल लोकसभेच्या बाहेर बोलायला तयार नाहीत आणि आता संसदेचे आगामी अधिवेशन मार्च महिन्यात होणार. म्हणजे तोपर्यंत आपल्याला गुपित कळू शकणार नाही. पण दरम्यान उत्तरप्रदेशच्या विधानसभांचे पडघम वाजू लागतील आणि तिथेही विविध वाहिन्या मतचाचण्या घेऊन हे गुपित उघड करतीलच. मुलायम मायावतीच कॉग्रेसपासून चार हात दूर गेल्या असतील, तर मोदींनी घाबरूनच राहिलेले बरे ना? काहीही असो, राहुलचा आजकालचा आवेश, अविर्भाव किंवा आक्रमकता बघितली, तर विजयीवीर त्यातूनच प्रकट होतो. २०१९च्या विजयाची नांदी म्हणूनच उत्तरप्रदेशात होण्याची दाट शक्यता दिसते आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदींनी आपल्या उरलेल्या कार्यकाळात नवे काही करण्यापेक्षा बारामतीला जाऊन, नवे धडे घेण्यासाठी साहेबांचे बोट पकडण्याची नव्याने तयारी सुरू केलेली बरी नाही का?

3 comments:

 1. हा हा हा हा हा!!!!

  ReplyDelete
 2. सगळ्यानाच जोडे भाऊ ???

  ReplyDelete
 3. गांधीकुलोत्पन्न, "तरूण, तडफदार, झुंजार, प्रामाणिक, द्रष्ट्या इ. इ." नेत्याचं स्वागत करायला सवासो करोड जनता आसुलेली आहे. भारत वा आशिया खंडच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
  जगाला मार्ग दाखवायलाच चि. राहुलचा जन्म गांधी घराण्यात झाला आहे.
  चि. राहुल, आगे बढो।
  चमचे तुम्हारे साथ है।
  काँग्रेस व विशेषत: राहुल करीता ही " करा किंवा मरा" (do or die) अशी परिस्थिति आहे.
  पर्यायी नेतृत्व म्हणून प्रियांकाला आणण्याची मागणी पक्षातूनच होत आहे.
  दुसरीकडे ममता व केजरीवाल यांनी स्पर्धा चालू केली आहे. म्हणून राहुलला आक्रमक होणे गरजेचे झाले.

  ReplyDelete