Thursday, January 19, 2017

शाब्बास झायरा वसीम

zaira mufti के लिए चित्र परिणाम
आमिर खानच्या अलिकडेच गाजलेल्या ‘दंगल’ चित्रपटातील एक तरूण अभिनेत्री झायरा वसीम हिचे तिच्या राज्यात कौतुक झाल्यास नवल नाही. कालपरवा पुण्याच्या एकदिवसीय सामन्यात पुण्याच्याच केदार जाधव या तरूणाने संकटात असलेल्या भारतीय संघाला गर्तेतून खेचून बाहेर आणताना केलेली फ़टकेबाजी त्याच्याच कुटुंबाला नव्हेतर प्रत्येक पुणेकराला अभिमानास्पद वाटणे स्वाभाविक आहे. उद्या त्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावून पाठ थोपटली तर कोणाला नवल वाटणार नाही. किंवा खुद्द केदारच मुख्यमंत्री वा थेट अमिताभला भेटायला गेल्यास त्याची तिथेही पाठ थोपटलीच जाईल. अशा मान्यवरांना कर्तबगार व्यक्ती आपल्याला भेटायला आल्यास आनंदच होत असतो. त्याच्यावर राजकीय नेते वा मान्यवर मंडळी स्तुतीसुमने उधळत असतात. कारण कर्तबगार व्यक्तींमुळे सामान्य नागरिकांसमोर आदर्श उभे केले जात असतात. सामान्य माणूस आपल्या आयुष्यात अनेक संकटे वा समस्यांना भिडलेला असतो. त्यात अनेकदा निराशा पदरी येत असते. त्यातून बाहेर पडून जीवनाला सावरण्यासाठी काही उत्तेजनाची वा प्रेरणेची त्याला गरज भासत असते. त्यासाठी कुणीतरी केलेला पराक्रम हा आदर्श म्हणून समोर आला तरच प्रेरणा मिळत असते. आदर्श त्याला म्हणतात. अनेकदा असे पराक्रम विक्रम करणारी माणसे वयाने लहान असतात आणि आपण आदर्श असल्याचेही त्यांना ठाऊक नसते. म्हणूनच तेच आदर्श असल्याचे कोणी तरी सांगावेही लागत असते. ‘दंगल’ चित्रपटात अप्रतिम अभिनय कोवळ्या वयात सादर करणारी झायरा म्हणूनच उध्वस्त निराश काश्मिरी लोकांसाठी एक उत्तम आदर्श असू शकते. कारण सततची हिंसा व घातपात विस्कळीत जीवन यांनी गांजलेल्या काश्मिरी लोकांच्या आयुष्यातला आशावाद संपून गेलेला आहे. त्याला आशेचा किरण म्हणून झायराकडे बघता येईल.

आमिरखान आपल्या कथाप्रधान व बोधप्रद चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याने हरयाणा राज्यातील अशीच एक सत्यकथा पडद्यावर आणली आहे. ज्या हरयाणाची ओळख बालिकांचा आईच्या गर्भातच गळा घोटला जातो, अशी झालेली आहे, त्याच हरयाणात आपल्या चार मुलींना पुरूषाच्या स्पर्धेत आणून उभ्या करणारा धाडसी पिता ही त्या कथेतली प्रेरणा आहे. हरयाणामध्ये कुस्तीच्या स्पर्धा पारंपारीक खेळ आहे. अशा राज्यात पित्याने मुलगी झाली तर तिला कुस्तीगीर बनवण्याचा चंग बांधला आणि भोवतालच्या पुरुषप्रधान व्यवस्थेला आव्हान देऊन मुलींना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीगीर बनवले. त्याची कथा आमिरने सादर केलेली आहे. त्यामध्ये अभिनय ही सोपी गोष्ट नसल्याने अभिनय करू शकतील अशा मुलींचा समावेश आमिरने केला. त्यामध्ये एक अभिनेत्री झायरा आहे. ती हरीयाणवी नाही, तर काश्मिरी तरूणी आहे. काश्मिर गेली दोनतीन दशके हिंसा व घातपातामध्ये होरपळून निघालेला आहे. शाळा, कामधंदा वा कुठलाही व्यवहार नित्यनेमाने व्यवस्थित चाललेला नाही. सतत जीवनात व्यत्यय व सतत रक्तपाताचा सामना तिथल्या सर्वांना करावा लागतो. झायराचा जन्म तिथेच व तशाच अवस्थेत झालेला आहे. आयुष्यात कुठली आशा नाही व कशाची शाश्वती नाही. अशा वातावरणात जन्म घेतल्यापासून त्या बालिकेने कसले स्वप्न रंगवलेले असेल? अभिनय करावा किंवा आपल्या गुणवत्तेने नाव कमवावे, असे स्वप्नही बघायचे धाडस करण्याइतका भीषण भोवताल असताना तिने अभिनयाचा प्रयत्न केला आणि आमिरसारख्या निर्मात्याच्या नजरेत ती भरली तर तिचे प्रयास सोपे नसतात. तिच्या अभिनयाइतकीच तिच्या आशावादाला दाद द्यायला हवी. भारतात व जगात आपल्या अभिनयाचे प्रदर्शन मांडून काश्मिरचा जो एक भयाण चेहरा जगासमोर आहे, तो पुसण्याला धाडसच म्हणायला नको काय?

काश्मिर म्हणजे जिहाद, घातपत, रक्तपात, हिंसाचार, जनजीवन उध्वस्त! अशीच आज या पृथ्वीतलावरील स्वर्गाची ओळख झालेली नाही काय? तिथे लोक केवळ दगडफ़ेक करतात. कुठेही घातपात करतात. पोलिस आणि दंगलखोरांचा सामना जिथे कायम रंगलेला असतो असा भयंकर नरक म्हणजे काश्मिर अशी त्या प्रदेशाची आज जगाला ओळख आहे. अशा काश्मिरात सुंदर अभिनय करू शकणारे कलावंत निपजतात. तिथेही गायकी वा क्रिडापटू जन्म घेतात. त्यांनाही अभिनय येतो आणि जीवन सुंदर बनवू शकणारी कलाकारी अजून काश्मिरात फ़ुलते याची साक्ष झायराने आपल्या त्या अभिनयातून दिलेली आहे. अशी एक कन्या देशात नावाजली गेल्यास तिचे कौतुक तिथल्या मुख्यमंत्र्यांनी करायचे नाही, तर दुसर्‍या कोणी करायचे? तर त्याच कारणास्तव झायरा महबुबा मुफ़्ती यांना जाऊन भेटली आणि त्यांनीही तिचे अकुतुक करताना काश्मिरी तरूण पिढीसाठी झायरा आदर्श असल्याचे उद्गार काढले, तर बिघडले काय? पण त्याच भेटीचा फ़ोटो प्रदर्शित झाला आणि स्वत:ला काश्मिती अस्मितेचे म्होरके समजणार्‍या दिवाळखोरांनी लगेच झायरा विरोधात मोहिम सुरू केली, काश्मिरात कायद्याचे राज्य व शांतता निर्माण करू बघणार्‍या मुफ़्ती यांना झायराने भेटणे म्हणजे काही भयंकर पाप केल्याच्या प्रतिक्रीया सोशल मीडियातून उमटल्या. अशा प्रतिकुल प्रतिसादाची झायराने अपेक्षाही केलेली नव्हती. तुला लाज वाटली पाहिजे. तू काय केले आहेस? अशा प्रतिक्रिया उमटल्या, त्याचे कारण काश्मिरात शांतता प्रस्थापित करणे हे अनेकांना पाप वाटते. त्या स्वर्गरुपी राज्याचा नरक केलेला आहे त्याचे स्वरूप बदलण्याला हे लोक पाप समजतात. त्यामुळेच त्यांनी या अभिनेत्रीला इतक्या शिव्याशाप दिले की तिने जाहिरपणे क्षमायाचना करून आपल्याला कोणी आदर्श मानू नये असे निवेदन केले.

काय जमाना आला आहे बघा. जगात हिंसा व अमानुषपणाचे भयंकर प्रदर्शन मांडणार्‍या आयसिस संघटनेचे झेंडे कौतुकाने काश्मिरात मिरवले फ़डकवले जातात. त्याचा निषेध कधी या लोकांनी केला नाही. बुर्‍हान वाणीसारख्या कृरकर्म्याने कित्येक निरपराधांची हत्या केली, तर त्याच्या बलिदानाचे कौतुक करण्यासाठी हजारो लोक जमा होतात. त्या हिंसेची वा रक्तपाताची त्यांना लाज वाटत नाही. उलट तोच आदर्श असल्यासारखी भाषा वापरली जाते. त्यांना झायराच्या उत्तम अभिनयाचे वा कलागुणांची लाज वाटली तर स्वाभाविकच आहे. पण मुद्दा अशा हैवानांचा नाही, त्या बुर्‍हान वाणीला हुतात्मा ठरवणार्‍या दिवाळखोरांना चुचकारायला जाणार्‍या निर्बुद्धांची दया येते. कारण त्यापैकी कोणी अजून झायराच्या समर्थनाला पुढे आलेला नाही, नेहरू विद्यापीठात भारतविरोधी घोषणा देण्याच्या अविष्कार स्वातंत्र्यासाठी धावत जाणार्‍याना आज झायराच्या अभिनय स्वातंत्र्य किंवा कुणालाही भेटण्याच्या स्वातंत्र्याची महत्ता तथाकथित अफ़जल ब्रिगेडला गरज वाटलेली नाही. कन्हैयाला पोलिसांनी पकडल्याने विचलीत झालेल्यापैकी कोणी झायराच्या हक्कासाठी हिरीरीने पुढे आला नाही. काश्मिरच्या एका युवतीने आपल्या अभिनय गुणांचे प्रदर्शन मांडून काश्मिरची शांततामय प्रतिमा जगासमोर मांडली, तर तिच्या हक्कासाठी कोणी पुरोगामी स्वातंत्र्यसैनिक पुढे येत नाही. ही खरेतर शरमेची गोष्ट आहे. महबुबा मुफ़्ती यांनी काय चुकीचे शब्द वापरले? काश्मिरींसाठी आदर्श कुठले असावेत? हिंसा माजवणारा बुर्‍हान वाणी आणि संसदेवर घातपाती हल्ला करणारा अफ़जल गुरू की झायरा वसीम? याविषयी त्या मुलीला शरणागत व्हावे लागते ही तथाकथित पुरोगामी अफ़जल ब्रिगेडसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. झायराने माफ़ी मागून माघार घेताना पुरोगामी शहाण्यांचा आदर्श कोण, त्याचीही साक्ष देऊन टाकली आहे. शाब्बास झायरा वसीम!

2 comments:

  1. एक नंबर
    आता हि स्टोरीलाईन पकडून कोणतरी पिक्चर काढेल.

    ReplyDelete
  2. भाऊ मी कुठल्याही फालतु माणसांचे चित्रपट बघत नाही या मुलीने नंतर आतंकवादाला समर्थनीय पोस्ट केल्याचे कळते यावर आपले मत काय ??

    ReplyDelete