Saturday, January 14, 2017

खादी, गांधी आणि मोदी

gandhi with child के लिए चित्र परिणाम

खादी ग्रामोद्योग आयोगाच्या दिनदर्शिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरखा चालवतानाचे छायाचित्र बघून अनेक गांधीवाद्यांना नव्याने महात्मा गांधी आठवले आहेत. काही माणसे अशी पक्की भक्त वा भगतगण असतात, की त्यांना कसली भक्ती करतो याच्याशीही कर्तव्य नसते. ती प्रतिमाच्या प्रेमात पडलेली असतात आणि त्याच प्रतिमा म्हणजे प्रेरणा समजून जगत असतात. त्या प्रतिमा किंवा खुणा गडबडल्या, मग त्यांचे जगणे डळमळीत होऊन जाते. गांधी हा विचार असल्याची पोपटपंची आपण त्यांच्याकडून अखंड ऐकत असतो. पण त्यापैकी बहुतेकांना गांधीजी कोण तेही ठाऊक नसते. समाजवादी नावाचा एक पक्ष आहे आणि मुंबईत त्या पक्षाचे अध्यक्ष अबु आझमी म्हणून आहेत. काही वर्षापुर्वी ते असेच पक्षकार्यालयात आलेले असताना तिथे त्यांना एका वृद्ध गृहस्थाच्या फ़ोटोची फ़्रेम मांडून हार घातलेला दिसला. आझमी यांनी अतिशय निरागसपणे एका कार्यकर्त्याला विचारले ‘ये फ़ोटोवाले चाचा कौन है?’ त्याही कार्यकर्त्याला ठाऊक नव्हते म्हणून त्याने तिथेच असलेल्या अन्य कुणाला विचारून उत्तर दिले. ‘ये डॉक्टर राममनोहर लोहियाजी है.’ डॉ. लोहिया हेच समाजवादी विचारवंत त्या पक्षाचे संस्थापक व मार्गदर्शक होते. पण त्याच पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्षाला ते चाचा कोण ते ठाऊक नसते, अशी आजची एकूण राजकीय दुर्दशा आहे. ज्या समाजवादी पक्षाचे मुंबई महाराष्ट्राचे नेतॄत्व आझमी करतात, त्या पक्षाचे अखील भारतीय अध्यक्ष मुलायम सिंग नित्यनेमाने लखनौच्या पक्ष मुख्यालयात लोहियांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आपली कुठलीही राजकीय मोहिम सुरू करीत असतात. मात्र त्यांच्याच एका प्रमुख नेत्याला ‘चाचा’ कोण ते ठाऊक नसतात. आजच्या गांधीवाद्यांची अवस्था किंचीतही वेगळी नाही. त्यांनाही फ़क्त नथूरामने ठार मारलेला गांधी ठाऊक आहे. बाकीचा गांधी कोण हे ठाऊक नसते. त्यांचा गांधी छायाचित्रात वा प्रतिमांत बंदिस्त झालेला असतो.

चरखा चालवणारे मोदी गांधीवाद्यांना गांधींचे अनुयायी वाटत नाहीत. त्यांना कॅलेन्डरच्या छायाचित्रापुरता गांधी हवा असतो. पण गांधी नावाच्या विचाराचा कितीही बोजवारा उडाला, तरी अशा गांधीवाद्यांना काडीमात्र कर्तव्य उरलेले नाही. कारण खादी ग्रामोद्योग वा विविध गांधीवादी संस्था, ह्या आता पोटभरू व्यवस्था होऊन बसल्या आहेत. ठराविक लोकांसाठी गांधी हा पोटपाण्याचा विषय झाला आहे. तर त्यातल्या मान्यवरांसाठी गांधी हा अनुदानाचा विषय झालेला आहे. गांधींचे विचार वा त्यातून मिळणार्‍या प्रेरणा, त्यांच्यासाठी दुय्यम वा निरूपयोगी होऊन गेल्या आहेत. किंबहूना खादी ग्रामोद्योग गांधींनी कशासाठी आरंभला होता, त्याचेही पुरते विस्मरण होऊन गेलेले आहे. खादी वा देशी यंत्र अशी त्यामागची कल्पना होती. ब्रिटीश सत्तेने इथे असलेले व्यावसायिक कौशल्य व उद्योजकता यांना खच्ची करून जो परदेशी व्यापार व उलाढाल निर्माण केली; त्याला शह देण्यासाठी गांधीजी चरखा चालवू लागले. त्यातून त्यांनी स्वदेशी उद्योजकतेला प्राधान्य देण्याची मोहिम छेडलेली होती. परदेशी भांडवल आणि परकीय व्यापाराने देशाचे चालविलेले शोषण, यांना रोखण्याची चळवळ म्हणजे खादी ग्रामोद्योग होता. स्वातंत्र्योत्तर काळात त्या गांधीवादी भूमिकेला तिलांजली दिली गेली आणि त्यावर गदारोळ होऊ नये म्हणून विविध गांधीवादी संस्था उभ्या करून, त्यांना अनुदानावर जगण्याची सवय लावण्यात आली. त्यांना आज गांधीवादी संस्था मानले जाते. गेल्या सत्तर वर्षात कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान उकळून या गांधीवादी संस्थांनी किंवा त्यांच्या चालकांनी आपापली तुंबडी भरून घेतलेली आहे. पण त्याच कालखंडात त्यांनी गांधीविचार वा त्यातून मिळणार्‍या प्रेरणेला समाजात रुजवण्याचा कुठला प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे? या प्रश्नाचे उत्तर कुठलाही गांधीवादी देऊ शकणार नाही.

आता दुसरी बाजू तपासून बघता येईल. गेल्या सहासात वर्षात रामदेवबाबा नावाचा एक योगगुरू आपल्या कर्तबगारीतून देशभरच नव्हेतर जगभर प्रसिद्धी पावला आहे. त्या प्रसिद्धीचा लाभ उठवत त्याने विविध आयुर्वेदिक व स्वदेशी गोष्टींना अफ़ाट बाजार मिळवून दिला आहे. कुठल्याही बहुराष्ट्रीय कंपनीला आव्हान देण्यापर्यंत मजल मारली आहे. आयुर्वेद, देशी खाद्यसंस्कृती वा अन्य अन्नपदार्थ यांचा नवा बाजार उभा करणार्‍या या माणसाने, बहुराष्ट्रीय कंपन्यांना धडकी भरण्याची पाळी आणली. ते कुणाचे उद्दीष्ट होते? गांधींची कल्पना यापेक्षा वेगळी होती काय? स्वातंत्र्योत्तर कालखंडात त्याच गांधीवादी स्वदेशी व स्वावलंबी भूमिकेचा गळा घोटून अधिकाधिक विदेशी कंपन्या व त्यांच्या तंत्रज्ञानाला इथे आमंत्रित कोणी केले? देशी कौशल्य वा गुणवत्तेला गुंडाळण्याचा अट्टाहास झाला आणि त्याला नेहरूवाद नाव देण्यात आले. त्याच आधुनिकतेने गांधीवादाची गऴचेपी केली आणि साधी टाचणीही स्वदेशी कर्तबगारीवर बनवण्याचे कौशल्य इथे निर्माण झाले नाही. येतील त्या परदेशी कंपन्या व त्यांच्या तंत्राची गुलामगिरी पत्करण्यासाठी महात्मा गांधीनी स्वातंत्र्याची चळवळ तळागाळापर्यंत नेलेली होती काय? नेहरूवादाने गांधीवादाची गळचेपी केली आणि परकीय तंत्राने विस्तारलेल्या व्यापार उदीमातून येणार्‍या कर उत्पन्नाचे काही रुपडे, गांधीवादी संस्थांना पोसण्यासाठी फ़ेकले. त्या अनुदानावर जगणार्‍या गांधीवाद्यांनी गांधीविचाराची गळचेपी करण्याला आशीर्वाद देण्यापलिकडे सत्तर वर्षात नेमके काय साध्य केले? उलट कुठल्याही सरकारी अनुदानाशिवाय गांधींचे नावही न घेणार्‍या रामदेव बाबांनी मात्र स्वदेशीचा मंत्र पुढे नेला. तो इतका लोकप्रिय केला की त्याची धडकी परदेशी कंपन्यांना भरली आहे. तर त्या स्वदेशीच्या आग्रही व यशस्वी रामदेव बाबाचा द्वेष व हेटाळणी करण्यात तमाम गांधीवादी आघाडीवर दिसतील. हा आजचा गांधीवाद उरला आहे.

गांधींपासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचे नावही न घेता जो माणुस गांधींच्या मार्गाने जातो, त्याची टिंगलटवाळी करणार्‍यांना आजकाल गांधीवादी म्हणून ओळखले जाते, अशी आजच्या गांधीविचारांची दुर्दशा होऊन बसली आहे. त्यामुळे बाकीचा गांधी गाडून टाकला वा बुडवला तरी चालतो, पण त्याचा फ़ोटो मात्र कॅलेन्डरवर झळकाला पाहिजे. फ़ोटोतला गांधी मोलाचा आहे. बाकीचा गांधीविचार कुठल्या उकिरड्यात फ़ेकून दिला तरी बेहत्तर! हे आजच्या गांधीवादाचे ध्येय बनले आहे. कालपरवा नोटाबंदी गाजली. त्यातली गांधींची प्रेरणा कुणाही गांधीवाद्याला दिसू शकलेली नाही. सव्वाशे कोटींच्या या देशात निदान शंभर कोटी लोक तरी त्या निर्णयाने त्रस्त झाले किंवा त्यांना कष्ट उपसावे लागले. पण पन्नास दिवस त्यातही संयम दाखवणारा प्रत्येक भारतीय गांधींचे अनुकरण करतोय, हे किती गांधीवादी बघू शकले? आपल्या आंदोलनात वा चळवळीत कष्ट सोसून देशहिताला प्राधान्य देण्याची भूमिका, भारतीय जनमानसात कोणी प्रथम रुजवली होती? त्रास सोसून वा कष्ट उपसूनही संयमाने समोर आलेल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचे बाळकडू भारतीयांना कोणी पाजले? त्याचेही नाव महात्मा गांधीच होते. लोकांनी त्याच्या शब्दाखातर लाठ्या सोसल्या बंदूकीच्या गोळ्या छातीवर झेलल्या. पण उलटून प्रतिहल्ला केला नाही. देशहितासाठी त्रास सोसण्याची ती शिकवण पन्नास दिवस सव्वाशे कोटी लोकांना शांत राखू शकली. उलट व्हेनेनझुएला सारखा दहाबारा कोटीचा देश तीन दिवसात नोटाबंदीने दंगलीत होरपळून निघाला. तर भारत हे शिवधनुष्य पेलू शकला. कारण भारतीयाच्या मनात सामावलेला गांधी ओळखणारा पंतप्रधान इथे होता. त्याच मनामनातल्या गांधीच्या भरवश्यावर त्याने इतका मोठा निर्णय घेऊन यशस्वी केला. पण तेव्हाही निव्वळ नावाच्या गांधीवादी लोकांना सव्वाशे कोटी भारतीयातला गांधी ओळखता आला काय?

ही आजच्या गांधीवाद्यांची शोकांतिका आहे. त्यांना खर्‍या गांधीशी, त्याच्या विचारांशी किंवा त्याच्यापासून मिळणार्‍या प्रेरणेशी कसलेली कर्तव्य उरलेले नाही. प्रतिमा, पुतळे किंवा त्यातून मिळणार्‍या अनुदानापुरता गांधी त्यांना हवा असतो. म्हणूनच कॅलेन्डरवरला गांधी गायब झाला, तर त्यांना सुतक लागलेले आहे. सत्तर वर्षाच्या दिर्घ कालखंडात क्रमाक्रमाने गांधीविचार व गांधी नावाची भूमिका नेस्तनाबूत करण्यात आली. त्या गांधी विचारहत्येला त्याला आशीर्वाद देण्यात ज्यांची हयात खर्ची घातली गेली, त्यांना गांधीशी आज काहीही घेणेदेणे राहिलेले नाही. किबहूना आपणच गाडून टाकलेला गांधी पुन्हा लोकांना उमजू लागला, आवडू लागला तर आपण माजवलेल्य गांधी नामे थोतांडाचा बाजार उठेल; अशा भयाने त्यांना पछाडले तर नवल नाही. त्यांची चिंता समजण्यासारखी आहे. गांधी उखडून टाकला तरी हरकत नाही. पण गांधीच्या नावाने मिळणारी अनुदाने व दक्षिणा चालू रहाण्याची हमी मिळाली पाहिजे. गांधीविचाराचे उद्दीष्ट निकालात निघाले म्हणून बिघडत नाही. त्याचा वारसा हक्क म्हणून पोटापाण्याची व्यवस्था चोख असली पाहिजे. गांधींच्या नावाने गळा काढणार्‍यांना आज फ़ोर्ड फ़ौंडेशनच्या पैशावर चळवळी चालवाव्या लागतात. यापेक्षा त्या महात्म्याच्या विचाराची भीषण हत्या दुसरी कुठली असू शकते? स्वातंत्र्याच्या चळवळीचे सर्वात मोठे सुत्र समाजातला सामुहिक व सामाजिक पुरूषार्थ जागवण्याची होती. त्या पुरूषार्थासमोर शस्त्रसज्ज सत्ता हवालदिल होऊन गेली होती. त्याच सामुहिक पुरूषार्थाला आज रामदेव बाबा किंवा नरेंद्र मोदींनी आपली प्रेरणा बनवले आहे आणि त्यातूनच उर्जा मिळवून त्यांनी यश मिळवले आहे. पण त्यातला गांधीविचार बघायचीही शुद्ध आजच्या गांधीवाद्यांना उरलेली नाही. उलट आपण गाडलेला गांधीविचार पुन्हा डोके वर काढताना बघून, त्यांना भयगंडाने पछाडलेले असावे. नाहीतर एका कॅलेन्डरवरून इतका गदारोळ कशाला झाला असता?

2 comments:

  1. दु:ख नक्की कशाच आहे ?
    गांधीजींची छबी (फोटो) नसण्याच की
    मोदींची छबी असण्याच ?

    हिच का ती गांधींची सहिष्णुता ?
    केवळ संभ्रम.

    ReplyDelete
  2. भाऊ जनतेला कळून चूकलय हे कांगी मंबाजी खंभाजी सायकल झाडू कंदील सगळ खोट आहे

    ReplyDelete