Tuesday, January 10, 2017

वेड्या बहिणीची वेडी रे ‘माया’

mayawati anand kumar के लिए चित्र परिणाम

उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा बहन मायावती, यांनी नोटाबंदीच्या झाल्यावर पक्षाच्या खात्यात शंभर कोटीहून अधिक रक्कम जमा केली होती. त्यांच्या या रोख रकमेविषयी विचारणा झाल्यावर त्याचा सविस्तर खुलासा होऊ शकला नव्हता. पण ‘दलितकी बेटी’ म्हणून बहनजींनी तात्काळ एक भक्कम मुखवटा आपल्या चेहर्‍यावर चढवला होता. योगायोगाने तेव्हाच त्यांच्या भावानेही आपल्या बॅन्क खात्यामध्ये काही कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केलेल्या होत्या. त्याही बाबतीत उडवाउडवी झालेली होती. मजेची गोष्ट अशी होती, की नोटाबंदीची घोषणा होण्याच्या दोन दिवस आधी भाजपाच्या बंगाल शाखेने एक कोटी रुपयांची रोकड खात्यात जमा केली, म्हणून तमाम विरोधकांनी कल्लोळ केला होता. पण बहनजींच्या पक्ष खात्यात शंभर कोटी जमा झाल्यावर त्याच विरोधकांची दातखिळी बसलेली होती. आता एका इंग्रजी वाहिनीने मायावती यांचा भाऊ आनंदकुमार याच्या पैशाचे ‘मायाजाल’ उलगडले आहे. त्यात दहा वर्षापुर्वी अवघ्या सात कोटीचा मालक असलेला हा बहनजीचा भाऊ; पुढल्या सात वर्षात दोनशेपटीने कसा श्रीमंत झाला, त्याची सगळी कुंडली आलेली आहे. २००७ सालात बहुजन समाज पक्षाला उत्तरप्रदेश विधानसभेत बहूमत मिळाले आणि मायावती राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. तेव्हा त्यांच्या लाडक्या भावाची मालमत्ता सात कोटी रुपये इतकी होती. पण बहन मायावती मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या आणि भावाची अपेक्षेच्याही पलिकडे भरभराट होत गेली. त्याने अनेक कंपन्या काढल्या, काही विकत घेतल्या आणि अशा कंपन्यांची पुढल्या सात वर्षात अनपेक्षित भरभराट झालेली आहे. त्याच्या उद्योगांना अनेकांनी बिनव्याजी कर्ज देण्यापासून नानाविध चमत्कार घडलेले आहेत. त्यातून मायावतींना ‘बहन’ का म्हणतात, त्याचा उलगडा होतो.

राजकीय पक्षात अनेकांना नेताजी, माताजी वा अम्मा वा साहेब वगैरे म्हणायची फ़ॅशन आहे. पण बसपामध्ये मायावतींना ‘बहनजी’ म्हणायचा दंडक आहे. कुठल्याही चर्चा वा कार्यक्रमात मायावतींचा उल्लेख त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते ‘बहनजी’ असा करतात. त्याचे रहस्य या ताज्या खुलाश्यामुळे होऊ शकलेले आहे. मायावतींचे आपल्या बंधूवर कमालीचे प्रेम किंवा माया आहे. ती बॅन्केच्या खात्यात आणि व्यवहारात दिसतेच. पण आपण आनंदकुमारच्या बहीण आहोत, हेही त्या पक्षाच्या कार्यात सांगत असतात. या बहिणीच्या भावाने सत्तेचा किती वापर माया गोळा करण्यात केला, त्याचे तपशीलच समोर आलेले आहेत. मायावती मुख्यमंत्री झाल्या आणि संसदेत त्यांच्या पक्षाचे भरपूर खासदार निवडून आल्यानंतर भावाचे भाग्य फ़ळफ़ळले. त्याने एकामागून एक कंपन्या व उद्योग सुरू केले. त्यासाठी भांडवल मिळण्यात किंवा त्यातून नफ़ा कमावण्यात त्याला कुठलीही अडचण आली नाही. त्याने कंपनी काढावी आणि इतर अनेक कंपन्यांनी त्याच्या कंपन्यांमध्ये भराभर गुंतवणूक करावी, असा जणू परिपाठच होऊन गेला होता. हातात छदाम नसताना आनंदकुमार एखादी कंपनी सुरू करायचा आणि मुंबईपासून कोलकाता गुवाहाटीपर्यंत देशाच्या कानाकोपर्‍यातल्या अनेक लहानमोठ्या कंपन्या त्यामध्ये गुंतवणूक करायला धावत सुटायच्या. मात्र अशा कंपन्या कुठे आहेत आणि त्यांनी कुठल्या लाभासाठी आनंदकुमारच्या नव्या कंपनीत इतकी मोठी गुंतवणूक केली, त्याचे उत्तर मिळत नाही. कारण ह्या गुंतवणूकदार कंपन्याच कुठे सापडत नाहीत. त्या कंपन्यांचे पत्ते शोधून चौकशी केली, तर तिथे अशा कुठल्या कंपनीचे व्यवहार उलाढाल होत नसल्याचे आढळून आले आहे. थोडक्यात मायावतींच्या भावाने ज्या कंपन्या काढल्या, त्यात गुंतवणूक करणार्‍या कंपन्याच अस्तित्वात नाहीत.

माणसाच्या हाती सत्ता आली, मग काय काय चमत्कार घडू शकतात, त्याचा हा उत्तम दाखला मायावतींनी पेश केला आहे. २००७ ते १०१२ या कालावधीमध्ये मायावती उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या आणि त्याच काळात त्यांनी मोठमोठे प्रकल्प व विकासयोजना हाती घेतल्या. त्यावर सरकारी तिजोरीतून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. त्यातूनही अशा मोठ्या रकमा बाजूला काढल्या गेल्या असणार; हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मग अशा रकमा कोणी चेकने देऊ शकत नाही. तो व्यवहार रोख रकमेने होत असतो आणि खात्यात जमा होणारा पैसा दिखावू बोगस कंपन्यांपार्फ़त फ़िरवला जात असतो. एका मोठ्या कंपनीत हजारो शेकडो लहान कंपन्या गुंतवणूक करतात. त्यांची काही लाख रुपयांची रक्कम बॅन्क खात्यात असते आणि ती मोठ्या कंपनीकडे वळवली जाते. अशा छोट्या कंपन्या फ़क्त कागदावर असतात आणि त्यांचे काम कागदावरच मर्यादित असते. तिथे काही लाख रुपये रोखीत जमा केले जातात आणि तिथून शेअर वा डिबेंचर म्हणून मोठ्या कंपनीत आणले जातात. हे़च इथेही झालेले आहे. आनंदकुमार याच्या कंपनीचे पत्ते सापडतात आणि त्याच्या कंपनीत गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांचा थांगपत्ता लागत नाही. त्यातल्या काही नवीमुंबई वा भाईंदर वा कोलकाता वा अन्यत्र निवासी पत्त्यावर नोंदलेल्या आहेत. तिथे वास्तव्य करणार्‍यांना अशी काही कंपनी असल्याचेही ठाऊक नाही. अशा प्रकारे सात वर्षात आनंदकुमार याच्या कंपन्यांनी सात कोटी रुपयांपासून १३०० कोटीपर्यंत मजल मारली. इतकी मोठी मजल मारताना, त्यांनी नेमका कोणता उद्योग वा कारभार केला, त्याचा कुठलाही तपशील मिळत नाही. याला प्रभूची माया म्हणायचे तर मायावती देव वगैरे काही मानत नाहीत. म्हणूनच त्याला ‘वेड्या बहिणीची वेडी रे माया’ असे़च म्हणावे लागते. मात्र त्याचा खुलासा देण्याची बहनजींना वा त्यांच्या कुणा सहकार्‍याला गरज वाटलेली नाही.

अर्थात हीच मंडळी महिन्याभरापुर्वी पंतप्रधान मोदींचे नाव सहारा वा बिर्ला कंपनीच्या कुठल्या एका कागदावर दिसले, म्हणून त्यांच्याकडे हिरीरीने खुलासा मागत होते. पण त्यातले अनेकजण आज मायावतींना त्यांच्या भावाने घेतलेल्या गगनभरारीचा खुलासा मागण्याविषयी अवाक्षर बोलत नाहीत. उलट त्यातल्या अनेकांनी उत्तरप्रदेश मतदानाच्या तोंडावरच हे प्रकरण कसे बाहेर आले, म्हणून प्रश्न विचारला आहे. त्याचे उत्तर सोपे आहे. ज्या वाहिनीने हे प्रकरण चव्हाट्यावर आणले, त्यांनी त्याला वाचा फ़ोडण्याच्या आधीच पाच वर्षापुर्वी भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी हे प्रकरणच चव्हाट्यावर आणलेले होते. पण त्याची तेव्हाही कोणी दखल घेतली नव्हती. कारण सत्ताधारी युपीएला मायावतींचा लोकसभा व राज्यसभेत पाठींबा हवा होता. म्हणून तर एफ़डीआय प्रस्तावाच्या विरोधात कडाक्याचा विरोध करून दोन्ही सभागृहात मायावतींनी त्याच प्रस्तावाच्या बाजूने मतदानही केलेले होते. तिथे अशा प्रकरणांचे व त्यातील प्रासंगिकतेचे रहस्य उलगडू शकते. तेव्हाच्या सरकारला मायावती सोबत हव्या असल्याने त्यावरची धुळ झटकली गेली नाही. आजच्या सरकारला मायावतींकडून पाठींब्याची अपेक्षा नसल्यानेच, त्यावर कारवाई होऊ शकते. सवाल कारवाईचा नाही तर खुलाशाचा आहे. मोदींकडे खुलासा मागणारे मायावतींच्या बाबतीत असे चिडीचुप कशाला होतात? विरोधी पक्ष आपली विश्वासार्हता का गमावून बसला आहे त्याचेही स्पष्टीकरण यातून मिळू शकते. नोटाबंदीच्य विरोधात विरोधकांनी काहुर माजवूनही सामान्य नागरिक तिकडे त्यामुळेच पाठ फ़िरवतो. सवाल मायावतीच्या एका भावाचा नसून, राजकीय भाऊबंदांचाही आहे. नोटाबंदी आणून अशाच राजकीय भावकीला मोदींनी हात घातला आहे. आज मायावती, वाड्रा-सोनिया त्यात फ़सले आहेत. थोडे दिवस गेल्यावर आणखी अनेकांचे वस्त्रहरण होतच जाणार आहे.

1 comment:

  1. उत्तम! हे सर्व उघड होऊन त्याची तड लागायलाच हवी.उघड होतय पण पुढे काय?
    इथे फक्त भुजबळ आतमधे,कधी जेल कधी हॉस्पिटल.बाकी कृपाशंकर,तटकरे,अजीत वगेरे विपक्षीय तसेच खडसे,पुर्ती वगेरे स्वपक्षीयांच काय? मोडस ऑपरेंडी तीच आहेना ?

    ReplyDelete