Wednesday, January 18, 2017

‘सायकल’वरचे तेलगू नाटक

mulayam cycle cartoon के लिए चित्र परिणाम

समाजवादी पक्षातील फ़ाटाफ़ुटीवर निवडणूक आयोगाने दिलेला निकाल तसा नवा नाही. किंबहूना सायकल हे चिन्हच भारतीय निवडणूकांमध्ये सतत वादाचा विषय होऊन गेले, असे म्हणायला हरकत नाही. म्हणजे या चिन्हासाठी आयोगाला जितक्या वेळा माथेफ़ोड करावी लागली, तितकी अन्य कुठल्या पक्ष वा चिन्हासाठी झालेली नसेल. आताही उत्तरप्रदेशात पितापुत्राचा संघर्ष झाल्यावर मुलायमची अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यासाठी अखिलेशने वेगळे अधिवेशन आयोजित करून पद्धतशीर मोर्चेबांधणी केली होती. तो केवळ योगायोग नव्हता. यापुर्वी आयोगाने फ़ाटाफ़ुटीत कुठल्या गटाला कशाच्या आधारे मान्यता व चिन्ह बहाल केले, त्याचा अभ्यास करून मगच पुत्राने एक एक पाऊल उचललेले असावे. अशा वादात ज्या बाजूला सर्वाधिक वा बहुसंख्य लोकप्रतिनिधी व पक्षाच्या कार्यकारीणीचे सदस्य असतात, त्यालाच खरा पक्ष म्हणून मान्यता दिली जाते, असा इतिहास आहे. पण योगायोग असा, की ज्या सायकल चिन्हासाठी अखिलेशने कंबर कसली होती. तिच्यासाठी दोन दशकापुर्वी दक्षिणेतील आंध्रप्रदेश या एकत्रित राज्यामध्ये असेच नाट्य रंगलेले होते. मात्र तिथे पित्याच्या विरोधात पुत्र उभा ठाकलेला नव्हता, तर जावयाने बंडाचा झेंडा हातात घेतला होता. १९९४ सालात तेलगू सुपरस्टार एन. टी. रामाराव यांच्या नेतृत्वाखाली तेलगू देसम पक्षाने पुन्हा बहूमत मिळवले. किंबहूना सामान्य मतदाराला उघड आमिष दाखवून मते मिळाणारी ती पहिली निवडणूक असावी. एक रुपया किलो तांदूळ देण्याच्या आश्वासनाने रामाराव यांना प्रचंड बहूमत मिळालेले होते. तेव्हा त्यांच्या आयुष्यात एक नवी नायिका आलेली होती. लक्ष्मीपार्वती नावाची ही महिला खरेतर एका कार्यकर्त्याची पत्नी होती. पण नेत्याशी इतकी सलगी झाली, की रामाराव यांनी उतारवयात तिच्याशी विवाह केला. तिथून त्या ‘राज’घराण्यातला बेबनाव सुरू झाला.

ही नवी आई मुख्यमंत्री रामाराव यांच्या प्रौढ विवाहित मुलांना मान्य नव्हती आणि तिने तर राजकारणाची सुत्रेच हाती घेतलेली होती. त्यामुळे क्रमाक्रमाने कुटुंबामध्ये बेबनाव वाढत गेला आणि मुले-मुली वा कुटुंबालाही रामाराव यांच्याशी संपर्क साधणे अशक्य होऊन गेले. मात्र त्यातला धुरंधर राजकारणी होता चंद्राबाबु नायडू. सासरा राजकारणात येण्यापुर्वीच नायडू कॉग्रेसच्या सरकारमध्ये मंत्रीपद उपभोगलेले होते आणि सासर्‍याने नवा पक्ष स्थापन करून सत्ता मिळवल्यानंतर नायडू तेलगू देसममध्ये दाखल झाले. पण दहा वर्षांनी रामाराव यांना दुसर्‍यांदा सत्ता मिळाली, तेव्हा नवी नायिका लक्ष्मीपार्वती नाटकात दाखल झालेली होती. तेव्हा कुटुंबातील बेबनावाचे नेतृत्व करायला जावई नायडूंच्या इतका कोणी बिलंदर राजकारणी पक्षात व कुटुंबात नव्हता. त्यांनीच अतिशय गुप्तपणे सासर्‍याला सत्ताभ्रष्ट करण्याचा डाव योजला होता. नव्या नायिकेच्या जाचाने कंटाळलेले नेते कार्यकर्तेही त्यात सहभागी होत गेले. पुर्ण जमवाजमव होईपर्यंत त्याचा बोलबाला झाला नाही. मग एकेदिवशी त्या नायिकेच्या विरोधात आवाज उठू लागला आणि तिला हटवण्याची मागणी पुढे येत गेली. एका बाजूला नेते कार्यकर्ते नाराजी दाखवू लागले; तर दुसरीकडे कुटुंबातील सदस्यही विरोधात उभे ठाकले. रामाराव उतारवयात प्रेमाने भारावलेले असल्याने ते नव्या नायिकेला अंतर देऊ शकले नाहीत आणि एक एक करून नातलग व कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावत गेले. अखेर त्याची परिणती त्यांनाच पक्षाध्यक्ष व मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या निर्णयापर्यंत गेली. या बंडाचे नेतृत्व करणार्‍या जावई नायडूंना प्रथम मुख्यमंत्री व नंतर पक्षाध्यक्ष करण्यापर्यंत ही लढाई झाली. रामाराव यांचा त्यातच अंत झाला आणि त्यांच्या निष्ठावंतांनी लक्ष्मीपार्वती यांना पुढे करून, रामाराव यांच्या गटाला टिकवण्याची कसरत केलेली होती. तेव्हाही पक्षचिन्हाचा वाद निवडणूक आयोगात जाऊन पोहोचला होता.

बहूतांश आमदार खासदार नायडू यांच्या बाजूने उभे राहिले आणि कार्यकर्ते प्रतिनिधीही त्याच बाजूला झुकल्याने तेलगू देसमच्या नायडू गटाला आयोगाने खराखुरा पक्ष म्हणून मान्यता दिलेली होती. सहाजिकच लक्ष्मीपार्वती यांची कोंडी झाली. त्यांना १९९६ च्या निवडणूकीत सिंह हे चिन्ह घेऊन लढावे लागले. पण मतदाराला रामारावांचे सायकल चिन्हच लक्षात असल्याने नायडू विजयी झाले आणि त्या नव्या नायिकेने राजकारणाचा संन्यास घेतला. रामाराव आधीच मरण पावलेले होते. नंतरच्या काळात नायडू यांच्याच नावाने तेलगू देसम ओळखला जाऊ लागला. मजेची गोष्ट अशी की रामाराव असोत की मुलायम असोत, तेच ज्या पक्षाचे संस्थापक होते, त्याच पक्षाचे निवडणूक चिन्ह त्यांच्या आप्तस्वकीयांनी बंड केल्यावर संस्थापकांनी गमावलेले आहे. एका जागी जावयाने सासर्‍याला हरवले, तर दुसरीकडे पुत्रानेच पित्याचा पराभव केला आहे. पण म्हणून सायकल चिन्हाची गोष्ट तिथेच संपत नाही. तामिळनाडूतही सायकल चिन्हाने असाच इतिहास घडवला आहे. नायडूंनी बंड पुकारले, त्याच कालखंडात आंध्रनजिकच्या तामिळनाडू राज्यातही धडधाकट असलेल्या कॉग्रेस पक्षात बंडखोरी झालेली होती. जयललिता यांचे आव्हान द्रमुक पेलू शकत नव्हता आणि त्याच जयललिताशी नरसिंहराव यांनी लोकसभा मतदानात युती केल्याने स्थानिक बलदंड नेते जी. के. मुपनार यांनी बंड पुकारले होते. त्यांनी तामिळ मनिला कॉग्रेस नावाचा नवा प्रादेशिक पक्ष स्थापन करून आयोगाकडे नोंदणी केली. त्यालाही तेव्हा सायकल चिन्ह देण्यात आलेले होते. द्रमुकशी युती करून त्यांनी वाट्याला आलेल्या जागाही जिंकल्या होत्या. मात्र मुपनार फ़ारकाळ जगले नाहीत आणि त्यांच्यानंतर पुत्र वासन यांनी सोनियांच्या कारकिर्दीत पित्याचा प्रादेशिक पक्ष अखिल भारतीय कॉग्रेसमध्ये विलीन करून टाकला. सहाजिकच सायकल चिन्ह गोठवले गेले.

गेल्या लोकसभा निवडणूकीत मुपनारपुत्र वासन यांनी कॉग्रेसला रामराम ठोकून पुन्हा जुन्या पक्षाचा नवा तंबू ठोकला. तामिळ मनिला कॉग्रेसच्या जुन्या चिन्हावर निवडणूका लढवण्याचा त्यांचा मनसुबा मात्र यशस्वी होऊ शकला नाही. कारण पुन्हा या पक्षाला सायकल चिन्ह देण्यास आयोगाने साफ़ नकार दिला. अनेक राज्यात विविध पक्षांना तेच चिन्ह दिलेले असल्याने तामिळनाडूत त्यावर आणखी एका पक्षाला दावा करता येणार नाही, असा खुलासा देऊन आयोगाने वासन यांची मागणी फ़ेटाळून लावली. आजही उत्तरप्रदेश वा उत्तराखंड अशा काही राज्यात समाजवादी पक्षाला हे चिन्ह मिळालेले असले, तरी संपुर्ण देशात ते त्याच पक्षासाठी राखीव नाही. तेलंगणा व आंध्रप्रदेशात तेच चिन्ह तेलगू देसम पक्षासाठी राखीव आहे. तर उत्तरप्रदेश, बिहार व उत्तराखंडात त्यावर समाजवादी पक्षाचा अधिकार अबाधित आहे. केरळात केरळ कॉग्रेस पक्षाचे ते राखीव चिन्ह आहे. तर जम्मू काश्मीरच्या पॅन्थर्स पार्टी व मणिपूरमध्ये पिपल्स पार्टीला ते बहाल केलेले आहे. पण योगायोग असा, की कुठल्याही राज्यात हे चिन्ह घेतलेल्या पक्षातच सतत विवाद व भांडणे झालेली आहेत. पक्षात उभी फ़ुट पडलेला व चिन्हावरून वाद झालेला हा इतिहास मोठा मनोरंजक आहे. हा सगळा इतिहास अभ्यासूनच मुलायमपुत्र अखिलेशने आपली प्रत्येक चाल खेळलेली असावी काय, अशी म्हणूनच शंका येते. कारण राजकीय अभ्यासकांना कुठल्याही एका समाजवादी गटाला आयोग चिन्ह बहाल करील, अशी अपेक्षा नव्हती. किंबहूना अखिलेश गटालाही खात्री वाटत नव्हती. म्हणूनच त्यांनी मोटरसायकल चिन्ह, पर्याय म्हणून स्विकारण्याची सज्जताही राखलेली होती. पण अखेरीस त्यांचा दावा मान्य झाला आणि सायकल त्यांच्या वाट्याला आली. सायकलवरचे हे जुने तेलगू नाटक हिंदीत लखनौमध्ये सादर झाले, असेही म्हणायला हरकत नाही.

1 comment: