Thursday, January 19, 2017

नवी दिल्ली तिवारी

Image result for tiwari amit shah

कुठलाही माणूस निर्दोष नसतो. त्याच्यातही काही त्रुटी वा दोष असतातच. त्यामुळेच माणसाकडून चुका होतच असतात. भाजपाचे अध्यक्ष अमित शहाही माणूस आहेत आणि म्हणूनच त्यांनी पक्षाध्यक्ष म्हणून काम करताना काही निर्णय चुकीचे घेतले असतील, तर त्यांना फ़ासावर लटकावण्याचे काही कारण नाही. पण तीच तीच चुक माणूस बेधडक करू लागला, तर त्याला माफ़ करता येत नाही. राहुल गांधी यांनी तशाच चुका सातत्याने करीत शतायुषी पक्षाचा बोजवारा उडवला आहे आणि त्याचीच किंमत त्या राष्ट्रीय पक्षाला आज मोजावी लागत आहे. खरे तर अन्य लोकांच्या चुका बघून माणूस धडा शिकत असतो. पण राहुलना आपल्याच चुका मान्य नसतील, तर त्यात सुधारणा शक्य नसते व त्याच त्याच चुका सातत्याने होत असतात. पण त्यांना चुका कोणी दाखवू शकत नाही आणि चुका दाखवणार्‍याला कॉग्रेसमध्ये स्थान नाही. काहीशी तशीच स्थिती आता भाजपाचीही होऊ लागलेली दिसते. अन्यथा उत्तरप्रदेश व उत्तराखंड अशा दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नारायण दत्त तिवारी, यांचे शहा यांनी भाजपात स्वागत केलेच नसते. सध्या उत्तरखंड राज्यात विधानसभा निवडणूका होऊ घातल्या आहेत आणि तिवारी त्याच राज्यातले निवृत राजकारणी आहेत. आधीच त्या राज्यातल्या अनेकजणांना गंगाजल शिंपडून अमित शहांनी पवित्र करून घेतलेले आहेच. त्यात आता तिवारी यांची भर पडली आहे. हे वयोवृद्ध गृहस्थ भाजपात येऊन कोणता चमत्कार घडवू शकतात, ते अमिश शहाच जाणोत. असाच प्रयोग त्यांनी दिल्ली व बिहारमध्ये केलेला होता आणि त्याच्या परिणामी भाजपाला त्या दोन्ही राज्यात सपाटून मार खावा लागलेला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती शहा यांना उत्तरप्रदेश व उत्तराखंडात घडवायची असेल, तर गोष्ट वेगळी. अन्यथा तिवारी यांचे भाजपात स्वागत करण्याचे कारण लक्षात येत नाही.

बिहारमध्ये जीतन मांझी नावाचे एक विनोदी गृहस्थ आहेत. लोकसभेतील पराभवानंतर नितीशकुमार यांनी प्रायश्चीत्त घेण्याचे नाटक करताना, आपण महादलित किंवा अतिपिछड्यांचे तारणहार असल्याचे दाखवण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा देऊन मांझी यांना नेतेपदी बसवले होते. त्यामागचा हेतू साफ़ होता. मांझी यांच्यापाशी कुठलीही राजकीय कुवत नसल्याने, ते कळसुत्री बाहुल्याप्रमाणे नितीशच्या तालावर नाचतील, अशी अपेक्षा होती. पण मुख्यमंत्री होताच मांझी यांना आपण स्वयंभू नेता आल्याचा साक्षात्कार झाला आणि ते विविध बाबतीत आपली मते स्वतंत्रपणे व्यक्त करू लागले. काही महिन्यातच त्यांनी नितिशना झुगारून लावल्यावर त्यांना बाजूला करण्याचा कठोर निर्णय नितीशना घ्यावा लागला होता. तर सुखासुखी बाजूला होण्यापेक्षा मांझी यांनी बहूमत आपल्याच पाठीशी असल्याचा दावा केलेला होता. अमित शहा त्यांच्यावर खुश झाले आणि त्यांना वेगळा पक्ष काढून भाजपाच्या आघाडीत आणण्याची खेळी झाली. मात्र त्याचा तसूभरही लाभ भाजपाला मिळाला नाही. उलट त्यामुळे लालू-नितीश यांच्यासह कॉग्रेसचे महागठबंधन उभे रहाण्यास हातभार लागला. त्यातून भाजपाचा भयंकर दारूण पराभव बिहारमध्ये झालेला होता. अर्थात त्यात नवे काहीच नव्हते. ती मुळातच दिल्लीची पुनरावृत्ती होती. कारण दिल्लीतही शहा यांनी मिळेल त्या अन्य पक्षातल्या नेते आमदारांना भाजपात आणून विधानसभेतले बहूमत खिशात घालण्याचा खेळ केलेला होता. त्याला विटलेल्या मतदाराने केजरीवाल यांच्यासारख्या बेभरवशी नेत्याला व त्याच्या पक्षाला भरभरून मते दिली. कारण अमित शहांच्या भाजपापेक्षा कुठलाही पक्ष बरा; अशी लोकांची धारणा झालेली होती. त्यानंतर आसाम वा अन्यत्र निदान असला खेळ झाला नाही आणि भाजपा सावरला होता. आता ताज्या राजकारणात शहांना त्याच जुन्या खेळाची उबळ आलेली दिसते.

आधीच उत्तराखंडामध्ये बडतर्फ़ कॉग्रेस आमदारांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यालाही हरकत नाही. कारण त्यापैकी अनेकांनी आपली आमदारकॊ धोक्यात घालून भाजपाशी एक वर्षापुर्वीच हातमिळवणी केलेली होती. पण ज्यांनी भाजपाच्या डावपेचात अखेरच्या क्षणी दगाबाजी करून कॉग्रेसमध्ये राहिले आणि हरीश रावत सरकारला वाचवण्याचा प्रयास केला; असेही दोन मंत्री आता भाजपात आलेत. त्यांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे. अशा रितीने पक्षाचा विस्तार होणार असेल तर कॉग्रेसमुक्त भारत होण्यापेक्षा कॉग्रेसयुक्त भाजपा होत जाणार आहे. तेही एकवेळ समजू शकते. पण नारायण दत्त तिवारी यांची ख्याती तरी भाजपाने तपासून बघितली आहे काय? महाराष्ट्रात शिवसेनेशी पालिकेत युती करण्यासाठी जो भाजपा पारदर्शकतेचा आग्रह धरतो आहे; त्याने तिवारी यांच्यात कुठली पारदर्शकता बघितली आहे? राज्यपाल असताना त्यांनी राजभवनात वारांगना आणल्याचा गाजावाजा झाला आणि त्यांना परावरून हाकलण्याची वेळ आलेली होती. कॉग्रेसनेही त्यांना अशा महत्वाच्या पदावरून हाकलण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्यांच्या गुलछबू वर्तनाने मान खाली घालण्याची पाळी त्या पक्षावर आलेली होती. प्रकरण तिथे संपत नाही. एका महिलेशी त्यांचे विवाहबाह्य संबंध होते आणि तिच्या पुत्राने कोर्टात जाऊन पित्यावर दावा केला. जेव्हा डीएनए तपासाची नौबत आली, तेव्हा या महोदयांनी त्याच तरूणाशी गळाभेट करून त्याला पुत्र म्हणून मान्य केले. आज त्यालाच घेऊन हे महाशय भाजपात दाखल झाले. शहांनी त्यांचे स्वागत केले असेल, तर भाजपाची प्रतिष्ठा किती शिल्लक राहिली असा प्रश्न पडतो. कोणी वाहिनी वा पत्रकाराने विचारले नाही, तरी सामान्य लोकांच्या मनात असे प्रश्न असतात आणि त्याचे उत्तर लोक मतदानातून देत असतात. जसे दिल्लीत मिळाले.

आज तिवारी नव्वदी पार केलेले आहेत आणि त्यांनी तिकीटाची अपेक्षा नक्कीच केलेली नसेल. पण त्यांच्या पुत्राला भाजपाने आगामी निवडणूकीत उमेदवारी द्यावी अशीच त्यांची अपेक्षा असणार. विशी पार करण्यापर्यंत ज्या तरूणाच्या पितृत्वाचा दावा हे महाशय फ़ेटाळून लावत होते, त्याचा त्यांनी केलेला स्विकार हिंदी चित्रपटाला साजेसा नक्कीच आहे. पण राजकारणात व सार्वजनिक जीवनात असल्या गोष्टींना प्रतिष्ठा नसते. आपल्या उमेदीच्या काळात तिवारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री असतानाही जास्त वेळ दिल्लीत असायचे. त्यामुळे इंग्रजीत त्यांचे एनडी हे नाव नारायण दत्त असूनही, त्यांना नवी दिल्ली तिवारी संबोधले जात होते. कुठलेही कर्तृत्व नसलेला हा माणूस १९९१ नंतर अर्जुन सिंग यांच्यासोबत सोनियांनी कॉग्रेस अध्यक्ष होण्यासाठी उपोषण करायला १० जनपथच्या दारात बसलेला होता. ते शक्य झाले नाही, तेव्हा नरसिंहराव यांच्या विरोधात बंड करून त्या दोघांनी वेगळी कॉग्रेसही स्थापन केलेली होती. तिवारी त्या पक्षाचे अध्यक्षही झालेले होते. अशी लांच्छनास्पद पार्श्वभूमी असलेल्या माणसाचे भाजपा पक्षाध्यक्ष आपल्या मुख्यालयात स्वागत करीत असेल, तर भाजपाला कसले डोहाळे लागलेत असा प्रश्न पडतो. त्याच्या येण्याने पक्षाची चार मतेही वाढण्याची शक्यता नाही. पण असलेल्या सदिच्छा मात्र भाजपा गमावू शकतो. अशा स्त्रीलंपट व बाहेरख्याली इसमाला पक्षात आणण्याचे प्रयोजनही लक्षात येत नाही. मांझीमुळे बिहारमध्ये कसला लाभ झाला नाही. तसाच तिवारी भाजपाची नाव किनार्‍याला लावण्याची अजिबात शक्यता नाही. सवाल इतकाच की आपली नाव गटांगळ्या खातेय, असे भाजपाच्या पक्षाध्यक्षाला मतदानापुर्वीच वाटते आहे काय? नसेल तर असल्या मर्कटलिला करण्यामागचे कारण काय असू शकते? तिवारींच्या नागडेपणालाच अमित शका पारदर्शकता समजतात काय? अशा चुकीला कोणी माफ़ करू शकत नाही.

1 comment:

  1. अमित शहांचा पाय गाळात...

    ReplyDelete