Sunday, January 8, 2017

शिवसेना: मुंबईकराची गरज

Image result for shivsena shakha

मुंबईतली शिवसेना हा वेगळा विषय आहे. शिवसेनेच्या स्थापनेला आता अर्धशतकाचा काळ होऊन गेला असून, त्या पाच दशकात अन्य कुठल्या संघटनेला वा पक्षाला सेनेच्या बुरूजांना धक्का लावता आलेला नाही. त्यामुळेच महापालिका पातळीवरच्या मतदानात सेनेची तुलना अन्य मतदानाशी करून चालत नाही. १९६८ सालात प्रथमच सेनेने महापालिका निवडणूका लढवल्या आणि दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष होण्यापर्यंत मजल मारली. तेव्हा मुंबईत समाजवादी, कम्युनिस्ट वा संपुर्ण महाराष्ट्र समिती असे बिगर कॉग्रेसी पक्ष प्रबळ होते. पण त्यांचा राजकीय अवकाश पालिकेपुरता तरी सेनेने सहज व्यापला होता. पुढल्या काळात शिवसेना राजकारणात आली, तरी तिला त्या मतांचा उपयोग करून विधानसभा वा लोकसभेत यश मिळवता आलेले नव्हते. १९६८, १९७३ वा १९७८ अशा तीन पालिका मतदानात सेनेला पालिकेत चांगले यश मिळत राहिले. त्यातच सेनेचे मुंबईतील वेगळेपण अधोरेखित होते. शिवसेना हा मुंबईतला एकमेव पक्ष असा होता, की ज्याने गल्लीबोळात शाखा उघडल्या आणि दिवसरात्र केव्हाही लोकांना बारीकसारीक गोष्टीसाठी तिथे धाव घेण्याची सुविधा उभी केली. आरंभी किरकोळ नागरी सेवा, अडचणींसाठी शाखेत येणारे नागरिक, पुढल्या काळात रुग्णवाहिका, रक्त पुरवठा अशा इतरही कामासाठी येऊ लागले. नंतरच्या काळात शिवसेनेची शाखा ही मराठीपणा विसरून मुंबईकरांचे आश्रयस्थान होऊन गेली. आज अशी स्थिती आहे, की मुंबईत कुठल्या गल्लीत पोलिस ठाणे नसले तरी चालेल; पण शिवसेनेची शाखा असावी लागते. ही बाब अनेकांना चमत्कारीक वाटेल, पण ते सत्य आहे आणि त्याच्या अनुभवातून मराठीच नव्हेतर अमराठी मुंबईकरही जात असतात. मराठीला प्राधान्य असले तरी मुंबईकर हा सेनेसाठी कायम जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. त्यामुळेच पालिकेत सेनेचे कायम वर्चस्व राहू शकले.

१९८५ पर्यंत सेनेचे महापौर झाले वा विविध समित्यांची अधिकारपदेही सेनेला मिळालेली होती. पण कधी सेनेला बहूमताने सत्ता मिळाली नाही. १९८३च्या गिरणीसंपाने सेनेचा बालेकिल्ला हादरला होता. राजीव लाटेतही तिथून डॉ. दत्ता सामंत निवडून आले आणि नंतर त्यांचे तीन आमदारही निवडून आले. तेव्हा तर सेनेचा मुंबईवरला प्रभाव संपला, असेच मानले जात होते. पण तीन महिन्यांनी झालेल्या पालिका मतदानात सेनेने सर्वांना थक्क करून टाकले. कारण त्यात सेनेने प्रथमच बहूमताचे दार ठोठावले होते. राजीव लाटेवर स्वार झालेली कॉग्रेस आणि गिरणी संपावर स्वार झालेले दत्ता सामंत; अशा दोघांना धुळ चारत शिवसेना पालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आली. तेव्हापासून पालिका हा सेनेचा अभेद्य किल्ला होऊन गेला. त्याला अपवाद होता १९९२ सालचा. तेव्हा मुंबईतही विधानसभेत यश मिळवून आपले वर्चस्व सिद्ध करणार्‍या सेनेने विधानसभेप्रमाणेच पालिकाही भाजपाशी युती करून लढवायचा बेत केला होता. पण आजच्याप्रमाणेच कुवतीपेक्षा अधिक जागांवर भाजपाने दावा केला आणि युती होऊ शकली नाही. परिणामी भाजपाने अधिक उमेदवार उभे केले आणि सेनेला अपशकून केला. अपशकून एवढ्यासाठी म्हणायचे, की तेव्हा भाजपाचे दहाबाराही नगरसेवक नव्हते आणि युतीत भाजपा चौपटीहून अधिक जागा मागत होता. उलट तेव्हा कॉग्रेसने रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाशी युती करून संयुक्तपणे प्रथमच निवडणूक लढवली. परिणामी सेनेच्या हातून पालिका निसटली. तरीही सेनेचे भरपूर नगरसेवक निवडून आलेले होते आणि भाजपाने अधिकाधिक अनामत रकमा गमवण्याचा विक्रम साजरा केला होता. मात्र तो अपवाद करता सेनेने सतत मुंबई पालिका आपल्या कब्जात ठेवलेली आहे. त्याचे खरे कारण शहरभर पसरलेल्या क्रियाशील गजबजलेल्या शाखा इतकेच आहे.

गल्लीबोळात चाळी झोपडीत वास्तव्य करणार्‍या गांजलेल्या मुंबईकराला शिवसेनेची शाखा हा मोठा आधार झालेला आहे. देशातील कायदे वा त्याची अंमलबजावणी योग्य रितीने होत असती, तर या शाखांना इतके महत्व आलेच नसते. जे काम पालिकेच्या वा सरकारी कार्यालयात जाऊन सहजगत्या होऊ शकते, त्यासाठी येणार्‍या अडचणी ही सेनेच्या कामाची जमेची बाजू आहे. नागरी सेवा किंवा सुविधांमध्ये असलेल्या अडचणी दूर करायच्या, तर सेनेच्या शाखेत लोकांना धाव घ्यावी लागते. कुठल्या पोराला पोलिसांनी पकडून नेले किंवा शाळेत प्रवेशापासून काही गडबड होत असेल, तिथे धिंगाणा घालण्यासाठी शिवसेनेची फ़ौज सदैव तैनात असते. ही मुंबईत सेनेची जमेची बाजू आहे. अनेकांनी त्याची झुंडशाही अशी संभावना केलेली आहे. पण त्या झुंडशाहीमुळे सामान्य मुंबईकराला भेडसावणार्‍या अनेक समस्यांचा तात्काळ निचरा होऊन जातो, हा लोकांचा अनुभव आहे. शिवसैनिकांची अरेरावी वा गुंडगिरी, धिंगाणा हा नेहमी टिकेचा विषय झालेला आहे. पण त्यातूनच सेनेचा दबदबा तयार झाला आणि त्याच ओळखीमुळे शाखाप्रमुख वा नगरसेवक म्हणजे धाक, अशी एक समजूत तयार झाली. असा शाखाप्रमुख वा नगरसेवक कुठल्या नागरिकाची समस्या घेऊन सरकार दरबारी जातो, त्याची तात्काळ दखल घेतली जाते. मध्यंतरी आपल्या पक्षाच्या चिंतन शिबीरात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याचा दाखला दिला होता. सरकार असून पोलिस ठाणे वा सरकारी कचेरीत आपल्या पदाधिकार्‍याला कोणी दाद देत नाही. पण सेनेचा शाखाप्रमुख गेल्यास तात्काळ हालचाली होतात. म्हणून संघटना सेनेसारखी असायला हवी, असे पवार उगाच म्हणालेले नव्हते. मुंबईतली शिवसेना अशी आहे आणि म्हणूनच ती केवळ मराठी अस्मितेचा पक्ष नसते. तर मुंबईकराची ती एक गरज बनलेली आहे. त्याचा लाभ तिला पालिका मतदानात मिळतो.

शाखेचे वेगळेपण तिच्या गजबजलेपणात आहे. शाखाप्रमुख जिथे नित्यनेमाने उपलब्ध असतो, ती शिवसेनेची शाखा असते. पण जिथे नगरसेवक असतो, तिथे अशी गजबज अधिक व सातत्यपुर्ण असते. सहाजिकच गजबजलेली शाखा हवी असेल, तर तिथला नगरसेवक शिवसेनेचा असावा लागतो. अनेक भागात अमराठी लोकसंख्या असूनही म्हणून शिवसेनेचा नगरसेवक निवडून येताना दिसेल. वांद्रे पुर्व येथून आमदार झालेले बाळा सावंत ह्यांनी आसपासच्या परिसरात काम वाढवले आणि त्यांना बेहरामपाड्यातल्या मुस्लिमांच्या मतांवर विधानसभेत मुसंडी मारणे शक्य झाले होते. अशा अनेक शाखा दिसतील, जिथे सेनेचे हिंदूत्व विसरून बुरख्यातल्या मुस्लिम महिला वा टोपीधारी मुस्मिल रहिवासीही कामासाठी जमलेले असतात. हा सेनेचा मुंबईतला वेगळेपणा आहे. त्यानेच मुंबईची महापालिका निवडणूक वेगळी झाली आहे. तिथे राजकारणाच्या भूमिका व विचार बाजूला पडतात आणि मतदाराला गल्लीतल्या सुविधांना प्राधान्य देणे भाग होऊन जाते. शिवसेना हा राजकीय पक्ष आणि लहान गल्लीतली शिवसेना संघटना, यात मुंबईकर मतदार सुक्ष्म फ़रक करत असतो. त्यामुळेच पालिका मतदानात शिवसेना कायम शिरजोर राहिलेली आहे. सर्व खासदार व बहुतांश आमदार निवडून आणणार्‍या पक्षालाही शिवसेनेच्या या कर्तबगारीला मागे टाकणे शक्य झालेले नाही. म्हणूनच स्वबळावर मुंबई पालिका जिंकण्याचा भाजपाचा प्रयास कितपत यशस्वी होतो, ते बघावे लागणार आहे. तो अपेशी झाला, तर दुष्परिणाम भविष्यात भाजपालाच भोगावे लागतील. कारण स्वबळावर सेनेने मुंबई पालिका जिंकली, तर भविष्यात अन्य कुठल्याही मतदानात युतीची गरज सेनेला उरणार नाही. सहाजिकच युती हा विषय कायमचा निकालात काढला जाईल. त्याची दुसरी बाजू अशी, की कॉग्रेसची जागा भाजपा व्यापत जाईल. म्हणजे तोटा कॉग्रेसचा होईल.

No comments:

Post a Comment