Thursday, January 5, 2017

मनसे आणि दिलसे

raj thackeray के लिए चित्र परिणाम

दिर्घकाळानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात राजकीय भूमिका मांडली आहे. मध्यंतरी त्यांनी नोटाबंदी वा शिवस्मारकाच्या निमीत्तानेही आपले मतप्रदर्शन केलेले होते. पण त्याची फ़ारशी दखल घेतली गेलेली नव्हती. आताही त्यांच्या ताज्या वक्तव्यांवर कुठे ठळक प्रतिक्रीया उमटलेल्या नाहीत. पण म्हणूनच त्यांनी जागरुकपणे काही करण्याची गरज आहे. आठ वर्षापुर्वी मोठा राजकीय प्रभाव मतदानावर पाडत आखाड्यात उतरलेल्या त्यांच्या पक्षाची आजकाल फ़ारशी कोणी दखलही घेत नाही, ही बाब त्यांच्यासाठीच चिंतनीय आहे. गेल्या लोकसभा आणि पाठोपाठ विधानसभेत मनसेने दारूण पराभवाचा सामना केलेला असल्याने, त्या वादळातून सावरण्याची गरज आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला कायम सुबत्तेचे वा यशाचे दिवस नसतात. त्यामुळेच मनसेच्या अपयशामुळे तो पक्ष संपला, असे मानायचे कारण नाही. राखेतूनही असे अनेक राककीय पक्ष पुन्हा उभे राहिले आहेत आणि त्यांनी मोठे यश मिळवून दाखवलेले आहे. म्हणूनच मनसेला भविष्य नाही, असे कोणी म्हणू शकत नाही. पण असे नव्याने उभारी घेतलेले पक्ष, केवळ नशिबाने वा परिस्थितीमुळे नव्याने उभे राहिले असेही इतिहास सांगत नाही. त्या त्या पक्षांनी डागडुजी व प्रयास केले आणि त्यांना पोषक स्थिती निर्माण होताच उंच झेप घेतली असेच घडलेले दिसेल. गेल्या दोन वर्षात त्या दिशेने राज ठाकरे यांनी काही विशेष प्रयास केल्याचे कुठे दिसले नाही. आता तर दहा मोठ्या महापालिका व जिल्हा तालुका निवडणूका होऊ घातल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राज यांची वक्यव्ये प्रभाव पाडणारी दिसत नाहीत. ती अन्य पक्षांच्याच भूमिका व टिकांचा केलेला पुनरुच्चार वाटतो. मायावती, ममता वा राहुल, केजरीवाल यांच्या शब्दांची फ़क्त पुनरुक्ती आहे. त्यात कुठे राज ठाकरे डोकावताना दिसत नाही.

नाही म्हणायला पाकिस्तानी कलावंतांच्या भारतीय चित्रपटातील भूमिकांविषयी राजनी उचललेला मुद्दा निर्णायक महत्वाचा होता. पण त्यावर इतरांनी गदारोळ केल्यावर मनसे बाजूला पडली आणि तोच मुद्दा लढवण्यात मनसे तोकडी पडली होती. उरी येथील जिहादी घातपाती हल्ल्याने भारतीयांच्या मनातला प्रक्षोभ उसळला होता. तेव्हा पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून तात्काळ निघून जावे आणि त्याच्या अभिनयाचा समावेश असलेल्या कलाकृतींना इथे ठाम विरोध केला जाईल, ही घोषणा सर्वात प्रथम मनसेने केलेली होती. मग तिला देशव्यापी प्रतिसाद मिळालेला होता. खरे तर ही शिवसेनेची कायमची भूमिका वा पवित्रा राहिलेला आहे. पण मोदी व भाजपाला डिवचण्यात रमलेल्या शिवसेनेला त्याचे स्मरण राहिले नाही आणि तो मुद्दा आयता मनसेच्या हाती आलेला होता. त्यातही मनसेला प्रोत्साहन दिल्याप्रमाणे चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमीत्ताने मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना सामावून घेतले होते. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेल्या निर्माता दिग्दर्शक करण जोहर व राज ठाकरे यांच्यात समोरासमोर चर्चा घडवून आणली गेली. तेव्हा शिवसेनेला डिव़चण्यासाठीच हा खेळ झाल्याचा आरोप चालला होता. कारण कुठलेही असो, मनसेला यातून प्राधान्य मिळाले होते आणि त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा कुठलाही प्रयत्न झाला नाही. बाकी काही नाही तरी लोकभावनेला हात घालणारी भूमिका योग्य क्षणी राजनी घेतली होती आणि त्याला देशभर प्रतिसादही मिळाला होता. तोच धागा पकडून विविध राजकीय समस्यांवर आक्रमक पवित्रा घेण्याची तीच वेळ होती. पाक कलाकार धरून अनेक विषयात आपला ठसा उमटवण्याची ती अपुर्व संधी मनसेला आलेली होती. पण ती हातून निसटू देण्यात आली. त्या उदासिनतेने हा तरूणांचा पक्ष पराभूत मानसिकतेमध्ये गेला काय, अशीच शंका आली.

लोकसभा पराभवानंतर मनसेला कमालीची मरगळ आलेली होती. या पक्षाचा कोणी खासदार निवडून येईल अशी कोणाचीच अपेक्षा नव्हती. पण पाच वर्षापुर्वी दाखवला तितकाही प्रभाव मनसेला यावेळी दाखवता आला नाही आणि अनेक सहकारी व नेत्यांच्याही मनात राजच्या नेतृत्वाविषयी आशंका निर्माण झाल्या. नेता हा नुसता आक्रमक असून चालत नाही, तर हाताशी असलेल्या तुटपुंज्या साधनांनिशी किती यशस्वी झुंज देतो, यावर त्याच्या सहकार्‍यांच्या निष्ठा अवलंबून असतात. राज ठाकरे तिथे कमी पडू लागल्याची ती चाहुल होती. म्हणूनच लोकसभेपासून विधानसभेपर्यंत अनेक सहकारी कार्यकर्ते पक्षातून पांगू लागले होते. ते खरे आव्हान होते. त्यालाच धाडसाने सामोरे जाऊन नवे सहकारी घेऊन हातघाईची लढाई करण्यात नेतृत्वाची कसोटी लागत असते. त्यात आपणच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होत असल्याचा दावा राजनी केला होता. पण प्रत्यक्ष मतदानाचे दिवस जवळ येईपर्यंत राजनी पाऊल मागे घेतले आणि आणखी एका अपयशाची निश्चीती केली. विधानसभेतील पराभव तसा अपेक्षीतच होता. कारण मोदी लाटेचा इतका प्रभाव होता, की युती मोडूनही भाजपाला अधिक यश मिळाले होते आणि शिवसेनेकडेही स्वबळावर लढताना चांगल्या मतांची टक्केवारी वाढलेली होती. राष्ट्रवादी व कॉग्रेस दुबळे होऊन गेलेले होते. या तुलनेत मनसेचा धुव्वा उडाला हे खरे असले तरी, राज्यात तीन टक्केच्या आसपास मते ही नगण्य गोष्ट अजिबात नाही. शिवसेना, भाजपा यांचे आरंभीच्या काळातील भांडवल बघितले, तर तितकेच म्हणजे दोनचार टक्के मतांचेच होते. म्हणजेच मनसे हा आज बस्तान ठोकून बसलेला प्रादेशिक पक्ष असल्याची ग्वाही गेल्या विधानसभेने दिलेली होती. त्यात पाच वर्षापुर्वीचा भपका व आमदारांची संख्या नसली, तरी पक्षाला स्थान असल्याचा तो पुरावा होता. पण पुढल्या दोन वर्षात काय वाटचाल मनसेने केली? त्याचे उत्तर नकारार्थी आहे.

लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेत आपल्याला मिळालेले अपयश आणि आरंभीच्या मतांतील झालेली घट; याचे आत्मपरिक्षण करून नव्याने पक्ष उभारणीला प्राधान्य देण्याची गरज होती. संघटनात्मक फ़ेरफ़ार करून त्यात नव्याने जान फ़ुंकण्याचे प्रयत्न आवश्यक होते. पण तसे होण्याऐवजी अनेक जुने सहकारी राज ठाकरेंना सोडून जाताना दिसले. पराभूत पक्षाला अनेकजण सोडून जातात. इंदिराजींना व बाळासाहेबांनाही अनेक ज्येष्ठ सहकारी सोडून गेलेले आहेत. पण जाणार्‍यांसाठी रडत हे दोन्ही नेते बसले नाहीत. त्यांनी नव्या पिढीच्या तरूणात नेतृत्वगुण विकसित करून पक्षाला नवी पालवी फ़ोडून दाखवली होती. तशा कुठल्याही हालचाली मनसेमध्ये होताना दिसल्या नाहीत. जाणारे जात राहिले आणि त्यांच्या जागी नव्या नेमणूकाही होत राहिल्या. पण पाक कलाकारांचा विषय सोडल्यास मनसेने गेल्या दोन वर्षात राजकीय पटलावर कुठल्याही विषयाला आवाज दिलेला दिसला नाही. कुठल्याही महत्वपुर्ण आघाडीवर मनसे काही करताना दिसली नाही. विविध विषय येत गेले, त्यावर अध्यक्ष प्रतिक्रीया देत होते आणि कुठल्याही वृत्तपत्राच्या टिप्पणीसारखे मतप्रदर्शन होत राहिले. पण विषय वा प्रसंगाला सामोरे जाणारी कुठलीही संघटनात्मक कृती मनसेने केली, असे दिसल नाही. हे राजकीय पक्षाचे स्वरूप नसते. पक्षाचा जिवंतपणा त्याच्या नित्यनेमाने उमटणार्‍या प्रतिक्रीयेतून जाणवत असतो. त्या आघाडीवर मनसे शांत होती. रझा अकादमीच्या मुंबईतील हिंसक मोर्चानंतर ते आव्हान स्विकारणारा हाच पक्ष, पाच वर्षांनी नुसत्या बोलक्या प्रतिक्रीया देणारा बोलघेवडा होऊन गेला. त्याचे हे स्वरूप शेकाप, जनता दल वा अन्य कुठल्या जुन्या कालबाह्य पक्षासारखे असेल, तर त्याला कुठला मतदार प्रतिसाद देईल? आताही पुण्यातली पत्रकार परिषद पक्षाला त्यातून बाहेर काढणारी नाही. म्हणूनच वाटते मनसेने ‘दिलसे’ काही करणे गरजेचे आहे. तरच त्या पक्षाला भवितव्य असेल.

No comments:

Post a Comment