Sunday, January 22, 2017

मानला तर कायदा

kashmir unrest के लिए चित्र परिणाम

Nothing is more destructive of respect for the government and the law of the land than passing laws which cannot be enforced. - Albert Einstein

काही महिन्यांपुर्वी काश्मिरात बुर्‍हान वाणी नावाच्या एका जिहादीचा चकमकीत मृत्यू झालेला होता. त्यानंतर त्याला हुतात्मा ठरवून जो उच्छाद त्या राज्यात मांडला गेला, त्यातून बाहेर पडताना स्थानिक व केंद्र सरकारच्या नाकी दम आला होता. कारण पोलिसच नव्हेतर निमलष्करी दलाच्या सैनिकांना, जवळपास प्रत्येक गावात तैनात करावे लागले होते आणि त्यांच्यावरही दंगेखोर हल्ला करीत होते. त्यांना बंदूका रोखूनही थांबवणे अशक्य झाले. त्यामागे पाकिस्तानचा हात होता, वगैरे आरोप झाले आहेत. पण तरीही हजारो लोक रस्त्यावर येतात आणि पोलिसांनाही दाद देत नाहीत, तेव्हा वेगळा विचार करण्याची गरज असते. तिथे त्या जमावाला गोळीबार करून पांगवणे अशक्य नव्हते. अशा बेछूट गोळीबार झाला असता, तर विनाविलंब हिंसाचार थांबलाही असता. पण लष्कर वा पोलिसांनी तसे केले असते, तर त्यांनी शांतता प्रस्थापित केली म्हणून कोणी त्यांची पाठ थोपटली नसती. उलट काही कायदेपंडीत व शांततावादी बुद्धीमंत न्यायालयात मानवीसंहाराचा आरोप करीत धावले असते. सहाजिकच हिंसक जमावाला पोलिस रोखू शकत नव्हते, की बंदूकीने गोळीबारही करू शकत नव्हते. अशा स्थितीत हिंसेला आवर घालण्याची जबाबदारी त्या कायद्याच्या अंमलदाराने कशी पार पाडावी? त्याचा खुलासा कुठला कायदा करीत नाही, की त्याच पोलिस अंमलदारांना शहाणपण शिकवणारेही त्याचे मार्गदर्शन करत नाहीत. कारण त्यांना स्थितीचे आकलन नसते, की शब्दाच्या मर्यादा ठाऊक नसतात. कागदावरल्या कायद्याचे गुणगान करीत, हे लोक कायदे बनवतात आणि त्याचे कौतुक सांगत रहातात. त्याच्या अंमलबजावणीतली समस्याही त्यांना ठाऊक नसते. आधुनिक जगातल्या बहुतांश समस्या त्यातूनच समाजाला भेडसावू लागल्या आहेत. प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन नेमक्या त्याच दुखण्यावर बोट ठेवतो.

ही गोष्ट थोडी समजून घेतली तर तामिळनाडूमध्ये जालीकटू नामक बैलखेळावरून उठलेले वादळ लक्षात येऊ शकते. भारतामध्ये काही वर्षापुर्वी प्राणिप्रेमी लोकांच्या आग्रहाखातर एक कायदा करण्यात आला. माणसाचेच जगावर राज्य असले तरी करोडो अन्य सजीव या पृथ्वीतलावर आहेत आणि त्यांच्याशी मानवाने अन्याय्य वर्तन करू नये, अशी अपेक्षा चुकीची मानता येणार नाही. कारण नैसर्गिक रचनेमध्ये प्रत्येक प्राणीमात्राचे अस्तित्व, अगत्याचे व उपयुक्त असते. त्यातून निसर्गाचा समतोल राखला जात असतो. आपल्या सोयीसाठी अन्य कुठल्या जीवमात्राचे निर्दालन करायला गेल्यास, अवघ्या निसर्गाचा समतोल बिघडून पृथ्वीतलावर माणसालाही सुखनैव जगणे अशक्य होऊन जाईल. ही त्यामागची संकल्पना आहे. पण असा समतोल संभाळताना गेल्या काही हजार वर्षात मानवाने आपले सामुहिक व सामाजिक जीवन सुटसुटीत वा सुसह्य बनवण्यासाठी काही निसर्गबाह्य वाटणार्‍या गोष्टी केलेल्या असतील, तर त्यांना अपवाद म्हणून स्विकारून पुढे जावे लागेल. डोंगरात बोगदे-भुयारे खोदून काढणे किंवा नदी समुद्रावर मोठमोठे पुल उभारून केलेल्या रचनाही निसर्गातला मानवी हस्तक्षेपच असतो. एका प्राण्याला खाऊन दुसरा प्राणी जगत असतो, तोही निसर्गाच्या रचनेचा एक भाग असतो. सहाजिकच प्राणीप्रेम असो किंवा निसर्गप्रेम असो, त्यालाही काही सीमा असते. त्याचे भान सुटले, मग सुखनैव चाललेल्या मानवी जीवनात नवनव्या कृत्रीम समस्या निर्माण होत असतात. गेल्या काही वर्षात प्राणीप्रेमी, कायदाप्रेमी वा खरे सांगायचे तर शब्दप्रेमी लोकांनी; अशा रितीने अवघ्या समाजालाच ओलिस ठेवण्याचा सपाटा लावला आहे. आधी कायदा करायचा आणि मग त्यातल्या एकेक शब्दाचा आधार घेऊन, समाजजीवनातील सुरळितपणालाच सुरूंग लावायचा, अशी काहीशी स्थिती उदभवली आहे. तामिळनाडूतील जालिकटू उद्रेक त्याचाच दाखला आहे.

शेकडो वर्ष जालिकटू हा खेळ तामिळनाडूत पोंगल सणाच्या निमीत्ताने खेळला जात असतो. देशात अन्यत्र मकरसंक्रांत साजरी होते, त्याच दरम्यान द्रविडीयन भागामध्ये पोंगल साजरा होतो. त्यावेळी पैदाशीचे जे राखलेले बैल वा वळू असतात, त्यांच्या मस्तवाल शक्तीला मानवाने आव्हान देण्याचा हा खेळ आहे. हे मोकाट मस्तवाल बैल मैदानात सोडले जातात आणि त्याला मिठी मारून वा डिवचून अंगावर घेण्याचा हा धाडसी वा जीवावर बेतणारा खेळ आहे. त्यात अनेकदा खेळाडूचा बळी जाऊ शकतो, जातही असतो. प्रतिवर्षी त्यात जखमी होणार्‍या वा मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या किरकोळ नक्कीच नाही. पण तरीही लोक त्यात उत्साहाने भाग घेतात आणि जीवावर उदार होणारे खेळाडूही प्रत्येक पिढीत निर्माण होत आलेले आहेत. कालबाह्य परंपरा म्हणून त्याची हेटाळणी करण्याने काही लोकांना आपण फ़ारच पुढारलेले किंवा शहाणे असल्याचा भास होत असतो. त्यामुळेच अशा खेळांना घातक वा अमानुष ठरवून विरोध केला जातो. पण केवळ प्राणीमात्रावर दया म्हणून किंवा मानवी जीवला धोका म्हणून त्यावर बंदी घालायची असेल, तर अन्य कुठल्याही बाबतीत तसाच धोका असल्यावर प्रतिबंध घालायला नको काय? रेल्वे विमानाचे अपघात होतात. उंच इमारती कोसळून डझनावारी निरपराध गाडले मारले जातात. म्हणून वाहतुक साधने वा उंच इमारतींनाच प्रतिबंध करायचा काय? मोठ्या सभा सोहळे वा यात्राजत्राही चेंगराचेंगरीने मृत्यूचे तांडव करताना दिसलेल्या आहेत. त्यावर प्रतिबंध किती घालायचे? माणसाचा मांसाहार चालण्यासाठीही जनावरांची सरसकट कत्तल होत असते. या प्रत्येकावर निर्बंध का नाही आणायचे? तर तिथे अपवाद केला जातो. तसाच जालिकटू वा तत्सम पारंपारीक खेळ हा अपवाद असतो. ही साधी बाब लक्षात घेतली तर असे विवाद निर्माण होणार नाहीत. किंबहूना त्याला न्यायालयातूनच आळा घातला गेला पाहिजे.

न्यायालयाने गैरलागू गोष्टींना आळा घालावा ही अपेक्षा आहे. त्यात केवळ जालिकटू वा तत्सम धाडसी खेळांचीच मर्यादा कशाला? याकुब मेमन वा अफ़जल गुरू अशा घातपात्यांनी शेकडो लोकांच्या जीवाशी खेळ केलेला आहे. त्यांच्यावरील तसे आरोपही पुराव्यानिशी सिद्ध झालेले आहेत. तरीही त्यांना न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा वा फ़ाशी कमी करण्यासाठी जी धावपळ केली जाते, त्याची बाजू संयमाने ऐकून घेतली जाते. अशी बाजू नेमकी काय असते? ज्यांच्यापासून सामान्य नागरिकांच्या जीवाला कायम धोका आहे, ती मानवरूपी श्वापदे जीवंत ठेवावीत आणि त्यांना बंदोबस्तातूनही निसटून जाण्याची संधी दिली जावी, अशीच ही मागणी नाही काय? मौलाना अझर मसूद हा असाच इसम तुरूंगात खितपत पडलेला होता आणि त्याच्यावरच्या खटला वेळेस पुर्ण झाला नाही. मग एकेदिवशी त्याच्या अन्य सहकार्‍यांनी भारतीय प्रवासी विमान पळवून त्यातल्या सव्वाशे प्रवाश्यांना ओलिस ठेवले. एकाला ठार मारले आणि बदल्यात अझरला मुक्त करणे भाग पाडले. आज तोच अझर घातपाती संघटना चालवून आणखी शेकडो निरपराध भारतीयांचे बळी घेतो आहे. अशा इसमाला जेव्हा अटक झाली, तेव्हाच पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले असते; तर त्याच्या सुटकेसाठी विमानाचे अपहरण झाले नसते, की त्यात मारल्या गेलेल्या प्रवाश्यांचे जीवन संपले नसते. त्याला कोण जबाबदार आहे? ज्या कायद्याने अशा दहशतवादी व्यक्तीलाही न्यायाचा अधिकार बहाल केला आहे आणि त्याचा आधार घेऊन जे काही मुठभर शहाणे अशा श्वापदांच्या ‘अधिकारा’साठी आपली बुद्धी पणाला लावतात, त्यांनीच हा मृत्यूच्या तांडवाचा खेळ पुरस्कारलेला नाही काय? जालीकटूपेक्षा अशा जिहादी श्वापदांनी कित्येकपटीने निरपराधांचा बळी घेतला आहे. हजारो सैनिक पोलिस त्यांच्याकडून मारले गेले आहेत. तो एक पोरखेळ व कालबाह्य परंपराच झालेली नाही काय?

कायदा आहे म्हणून त्याच्या प्रत्येक शब्दाला पवित्र मानून अंमलाचा आग्रह धरणे हा अतिरेक असतो. शिवाय ज्या कायद्याचा अंमल करणेही असाध्य असते, त्याचाच हट्ट धरणे वा असे कायदे संमत करणे; हीच कायद्याच्या राज्याची सर्वात मोठी अवहेलना असते. आताही जालिकटू खेळावरचा निर्बंध झुगारण्यासाठी अवघा तामिळनाडू रस्त्यावर उतरलेला आहे आणि बेभान जमावाला आवर घालणे शासन वा कायद्याला शक्य झालेले नाही. कारण कायद्याच्या हातात लाठी वा बंदूक असली म्हणूनही त्याला मनमानी करता येत नाही. पण हे त्याच कायद्याचा आग्रह धरणार्‍यांना वा त्यातील शब्दाच्या आहारी गेलेल्यांना कोणी समजवायचे? कायदा वा विचार म्हणजे शब्द नसतात. त्या शब्दातून काही आशय व्यक्त केलेला असतो. त्या आशयाला महत्व असते आणि त्यातच अवघ्या मानवी जीवनाला सुसह्य करण्याचे सार सामावले आहे. त्याचे भान सोडले, मग शब्दांची महत्ता वाढते आणि त्यातले सामर्थ्य निपचीत पडते, निकामी होऊन जाते. जालिकटू वादळ वा काश्मिरातील हिंसाचार हा कायद्याचा आशय वा हेतू विसरल्याचा परिणाम आहे. कायद्याचे शब्द निर्जीव असतात आणि त्याची अंमलबजावणी करणार्‍या समर्थ यंत्रणेच्या बळावर कायद्याची महत्ता टिकून असते. आज पोलिस व प्रशासन दुबळे झाले आहे आणि कोणीही उठून त्यांना टिवल्याबावल्या दाखवू शकत असतो. मग त्या कायद्याकडून कुठले निर्बंध यशस्वी होऊ शकत नाहीत, की कायद्याची बूज राखली जाऊ शकत नाही. कारण शहाण्यांनीच प्रशासनाला  व कायद्यातील शब्दांना इतके गुळगुळीत व परिणामशून्य करून टाकले आहे, की कायदा लुळापांगळा होऊन गेला आहे. लाखो करोडो लोक मानतात म्हणून कायदा समर्थ असतो. त्यावर लोकांची जी श्रद्धा वा त्याचा जनमानसातील धाक, म्हणजेच कायद्याचे बळ असते. नुसते छापलेले वा लिहीलेले शब्द म्हणजे कायदा नसतो. तो मोडणारे त्याची विटंबना करीत नसतात. तर त्याचा निरर्थक अत्याग्रह धरणारेच कायद्याचा पुरता बोजवारा उडवित असतात.

2 comments:

  1. These protests can be justified only if they don't involve any damage to the public or private properties. If such incidents happen then it defeats the purpose and gives the reason to others to blame them. That's why, Gandhian movement or Maratha kranti mook morcha may be appreciated

    ReplyDelete
  2. Hi i would like to share a bit more info on this matter...
    its not as simple what it looks like.


    These Hump bulls have important function to breed the hump cows, and these type of games which are traditionally very wisely introduced by the ancestors to motivate the people to pet these bulls and maintained these species. The hump cows, have always been providing the best, natural milk on earth. Hump Cows (Desi Cows) have always been the native cows to India.

    However in 1990, Denmark filed a patent on Hump Cows, and according to that, no country on the planet can breed Hump Cows. This is to ensure that the world is dependent solely on Denmark, for Superior milk. Although, as per the patent India should not breed Hump cows, but India being densely populated with remote villages it is almost impossible to enforce this through a law. The western countries are fully aware of this and are leveraging PETA to get rid of Hump bulls and subsequently hump cows.

    The normal milk which is available in market through out the world is the Jersey cow milk (also known as a1 milk). The Hump cow milk is categorized as a2 milk. The a1 milk is not only inferior in quality but is also one of the primary cause of cancer, this will of course eventually lead to more profits by the pharmaceutical companies by selling medicines on the same.

    I don't think that this is an incident that has started lately but it is a well devised plan for decades together to get rid of all the Desi cows in India and instead have one and a half billion population fill in the pockets of the pharmaceutical companies by drinking jersey cow milk.

    And there is a perception that PETA fights for animal rights but as per PETA guidelines they adopt orphan animals and make an attempt to find them an owner within twenty days, subsequently if they do not find an owner then they are allowed to kill that animal.

    ReplyDelete