Monday, March 20, 2017

उत्तरप्रदेशातील ‘प्रश्न’

muslim women voted BJP के लिए चित्र परिणाम

उत्तरप्रदेशच्या निकालानंतर अनेकांची झोप उडाली आहे. कोणी मतदान यंत्रावर शंका घेतो आहे, तर कोणी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करतो आहे. आपल्याला मतदाराने नाकारले तर कशाला नाकारले; त्याचे आत्मपरिक्षण करण्याची सुबुद्धी मात्र यापैकी एकालाही सुचलेली नाही. अशा रितीने कांगवा केल्याने भले आपल्या पराभवावर फ़ुंकर घातली जाईल. पण म्हणून मतदार तुमच्याकडे परतणार नाही. त्यापेक्षा झालेल्या चुका सुधारून नव्याने आपल्या पक्षाचा पाया विस्तारण्याला आरंभ करण्यात शहाणपणा असतो. पण तो विषय वेगळा आहे. त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा सगळेच विसरून गेलेत. निकाल लागल्यापासून वा त्याच्याही आधीपासून भाजपाने उत्तरप्रदेशात कुणाही मुस्लिमाला उमेदवारी दिली नाही, याची चर्चा होती. निकाल लागून भाजपाने अफ़ाट यश मिळवल्यानंतरही तोच मुद्दा विश्लेषकांनी भाजपाच्या प्रवक्त्यांना टोचून विचारलेला होता. पण निकालाचा मुस्लिम प्रतिनिधीत्वाच्या दृष्टीने कोणीच विचारही केलेला दिसत नाही. भाजपाला इतके मोठे यश मिळाले, पण त्यात कोणीही मुस्लिम नसल्याने भाजपाच्या सरकारमध्ये मुस्लिम मंत्री असणार वा नाही, याचीही चर्चा झाली. पण मुस्लिमांचे विधानसभेत प्रतिनिधीत्व किती घटले, याचा तपशील कोणीही दिलेला नाही. चर्चेतून समोर आलेले मुद्दे असे, की उत्तरप्रदेशात मुस्लिमांची संख्या १९ टक्के असून त्यांना भाजपाने उमेदवारी दिली नाही. हे अर्थातच भाजपाला खिजवण्यासाठी केलेले विधान असते. पण मुस्लिमांनी भाजपाला मते देऊच नयेत, याविषयी मात्र सर्वांचे एकमत असते. ज्या पक्षाला मुस्लिम मतेच देणार नाहीत वा देऊच नयेत, त्या पक्षाने मुस्लिमांना उमेदवारी कशाला द्यावी? कधीतरी याही प्रश्नाचे उत्तर चर्चा करणार्‍यांनी शोधायला नको काय? निवडणूका जिंकण्यासाठी लढवल्या जात असतील, तर यापेक्षा अन्य काय होऊ शकते?

मागल्या विधानसभेत उत्तरप्रदेश विधानसभेत मुस्लिम आमदारांची संख्या ४०३ मध्ये ६८ इतकी होती. आजवरच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने त्या विधानसभेत मुस्लिमांना इतके प्रचंड प्रतिनिधीत्व कधीच मिळालेले नव्हते. भाजपा वगळता बहुतेक पक्षांनी मुस्लिम व्होटबॅन्केचा लाभ मिळावा म्हणून सातत्याने मुस्लिम उमेदवारांना सढळहस्ते उमेदवारी दिलेली आहे. भाजपा हा त्याला अपवाद राहिलेला आहे. यामागची मिमांसा अशी, की मुस्लिम गठ्ठा मतदान करतात आणि म्हणूनच जो कोणी मुस्लिमांना झुकते माप देईल, तोच अधिक संख्येने निवडून येऊ शकतो. सहाजिकच मुस्लिमांना झुकते माप देणार नाही, त्याने भारतात बहूमत संपादन करून सत्ता मिळवण्याचे स्वप्नही बघू नये. हा आजवरचे गृहीत राहिलेले आहे. अगदी चार वर्षापुर्वी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले, तेव्हा इतकाच सवाल विचारून भाजपला खिजवले जात होते. कारण मोदी नेता म्हटल्यावर देशातला प्रत्येक मुस्लिम भाजपाला मत देणारच नाही, याची प्रत्येक पुरोगामी अभ्यासक व पत्रकाराला जणू खात्रीच होती. पण त्याचीच एक दुसरी बाजू अशी, की हिंदू मतदार मात्र गठ्ठा मतदान करीत नाही. हिंदू व्होटबॅन्क नावाचे काही अस्तित्वात असू शकत नाही. नेमक्या त्याच गृहीताला मोदींनी लोकसभेत तडा दिला होता. पण सत्याकडे डोळसपणे बघितले, तर त्या व्यक्तीला पुरोगामी पत्रकारिता वा वैचारीक क्षेत्रात हद्दपार केले जाते. म्हणूनच मुस्लिम मतदार वा व्होटबॅन्क नावाचे थोतांड दिर्घकाळ राजकारणाला भेडसावत राहिले होते. मोदींनी मागल्या लोकसभा मतदानात त्यालाच पुसून टाकले आणि आता ताज्या निकालातून त्यांनी हिंदू व्होटबॅन्क नावाची संकल्पना साकारून दाखवली आहे. उत्तरप्रदेशच्या ताज्या निकालांनी मुस्लिम व्होटबॅन्क दिवाळखोरीत घालवली असून, हिंदू व्होटबॅन्क तेजीत आणली आहे. त्याचा प्रत्येकाला विचार करावा लागणार आहे.

मागल्या विधानसभेत सर्वाधिक संख्येने ६८ मुस्लिम आमदार उत्तरप्रदेशात निवडून आलेले होते. कारण प्रत्येक पुरोगामी पक्षाने अधिकाधिक मुस्लिमांना उमेदवारी दिली होती. मात्र त्याच संख्येने हिंदू समाजाच्या विविध घटकात अस्वस्थता पसरली होती. त्याला अप्रत्यक्ष खतपाणी घालून मोदी-शहा जोडीने उत्तरप्रदेशात चमत्कार घडवला व लोकसभेत भाजपाला ८० पैकी ७३ जागा मिळाल्या. त्यात एकही मुस्लिम निवडून येऊ शकला नाही. ज्या पुरोगामी पक्षांनी मुस्लिमांनाही मोठ्या संख्येने उमेदवारी दिलेली होती, त्यांचाही कोणी मुस्लिम लोकसभेपर्यंत पोहोचू शकला नाही. ही सुरूवात होती. पण त्याचा बारकाईने अभ्यास करण्य़ाचा कोणीही प्रयास केला नाही. म्हणूनच मग पुन्हा विधानसभेतही मुस्लिम मते मक्तेदारीने मिळवण्याचीच झुंबड उडाली होती. समाजवादी, कॉग्रेस व बसपाने अधिकाधिक मुस्लिमांना उमेदवारी दिलेली होती. मुस्लिम मतेही कमीअधिक प्रमाणात त्याच पक्षात विभागली गेली. पण तसे करताना या सर्वच पक्षांनी १९ टक्के वगळता उरलेल्या ८१ टक्के बिगर मुस्लिम मतांची फ़िकीर केली नाही. त्याच मतदारांच्या प्रतिनिधीत्वाकडे ढुंकून बघण्याची त्यांना गरज वाटली नाही. अशा सर्व समाजघटकांची पर्वा एकट्या भाजपाला होती व त्यानेच अशा सर्व घटकांना समावून घेण्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिलेले होते. त्या प्रत्येक बिगर मुस्लिम मतदाराने भाजपाला प्रतिसाद दिला. तितका या घटकांचा प्रतिसाद अन्य पुरोगामी पक्षांना मिळाला नाही. परिणाम स्पष्ट बोलके आहेत. पण मुस्लिमांची नुसती वाचाळ काळजी करणार्‍या कोणाचेही त्या परिणामांकडे अजून लक्ष गेलेले नाही. मागल्या विधानसभेत ६८ आमदार असलेल्या मुस्लिमांचे किती प्रतिनिधी आज नव्या विधानसभेत जिंकून येऊ शकले आहेत? त्यांची संख्या वा प्रतिनिधीत्व किती नगण्य झाले आहे? त्याचा कुठलाही तपशील समोर येऊ शकलेला नाही.

४०३ सदस्यांच्या विधानसभेत ३२५ जागा भाजपाने जिंकलेल्या आहेत आणि त्या पक्षाने एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिलेली नसल्याने, त्या ३२५ मध्ये एकही मुस्लिम आमदार असण्याची शक्यता म्हणूनच नाही. मग मुस्लिम आमदार कुठल्या गटात शोधायचा? ४०३ मधून ३२५ वजा केले असता उरते ७८ इतकी संख्या उरते. म्हणजे भाजपा वगळून उर्वरीत पक्षांना केवळ ७८ आमदार निवडून आणता आलेले आहेत. सहाजिकच त्यांनी ज्या मुस्लिमांना उमेदवारी दिली, त्यातूनच जे कोणी यशस्वी होऊ शकले, तितकेच मुस्लिम प्रतिनिधी आजच्या विधानसभेत आमदार म्हणून दिसू शकतील. अर्थात या ७८ पैकी ६८ आमदार मुस्लिम असण्याची शक्यता नाही. ७८ च्या निम्मे म्हणजे ३९ आमदार मुस्लिम असतील काय? मला तरी अजून तितकी नेमकी आकडेवारी मिळालेली नाही. पण अंदाजे २५-३० पेक्षा कमीच संख्या असणार यात शंका नाही. ज्या समाजघटकाची संख्या १९ टक्के आहे. त्यांचे चारशेपैकी निदान पन्नाससाठ तरी आमदार असायला हरकत नाही. पण पुरोगामी राजकारणाच्या लांगुलचालनी राजकारणाने मुस्लिमांनाच किती झळ सोसावी लागली, त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. मुस्लिमांनी भाजपाला मते देऊ नयेत आणि मुस्लिम ही पुरोगामी व्होटबॅन्क असल्याच्या फ़सव्या गृहीताने केलेले हे मुस्लिमांचे भयंकर नुकसान आहे. कर्तबगार वा जिंकू शकणारे हुशार मुस्लिम एव्हाना भाजपात दाखल झाले असते, तर त्यांनाच उमेदवारी देण्याइतका आत्मविश्वास भाजपामध्ये आला असता. मग मुस्लिमांची संख्या इतकी खंगली नसती. पण पुरोगामी थोतांडाने मुस्लिमांचे प्रतिनिधीत्व कमालीचे रोडावून टाकले आहे. तेच लोकसभेत झाले होते आणि आता विधानसभेत झाले आहे. म्हणूनच विधानसभेचे ताजे निकाल हा पुरोगामी पक्षच नव्हेतर मुस्लिमांसमोरचा सर्वात गंभीर प्रश्न झाला आहे. पण त्याविषयी कोणी बोलतानाही दिसलेला नाही.

No comments:

Post a Comment