Tuesday, March 28, 2017

कोणाची काय औकात?

Image result for goon MP

शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रविंद्र गायकवाड यांनी काय केले वा काय करायला नको होते, याला फ़ारसा अर्थ नाही. कारण रोजच्या रोज विविध वाहिन्या व माध्यमातून उठणारे वादळ, अधिक गोंधळ माजवणारे आहे. त्यात खरेखोटे तपासण्याची कुठलीही सोय राहिलेली नाही. मात्र या गदारोळामुळे माध्यमांना कुमार केतकर यांनी दोन दशकांपुर्वी केलेला एक हितोपदेश आठवला. १५ नोव्हेंबर १९९६ रोजी (महाराष्ट्र टाईम्सचे संपादक असताना लिहीलेल्या) ‘हितोपदेश’ या अग्रलेखात केतकर म्हणतात, ‘सर्वसाधारणपणे फ़क्त राजकारणी भ्रष्टाचारी असतो आणि इतर व्यवसाय तुलनेत अधिक पवित्र असतात असा अनेकांचा समज असतो. न्यायालये, वकील मंडळी, पत्रकार, लेखक-कवि-नाटककार, कलावंत, विचारवंत, नोकरशहा, उद्योगपती, लष्करी अधिकारी, असे समाजातील अनेक गट राजकीय व्यक्तीला खलनायक ठरवण्याच्या खटपटीत असतात.’… ‘सध्या तरी भारतात न्यायालयीन शुचिर्भूततेचा इतका दरारा तयार झाला आहे की, जामिन नाकारला जाणे याचा अर्थ गुन्हा सिद्ध झाला आहे, असा समज करून दिला जात आहे. त्याचप्रमाणे वृत्तपत्रांनी एखाद्या संस्थेला वा व्यक्तीला लक्ष्य केले की, त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत, असेही मानण्य़ाची प्रथा पडली आहे. “शोध पत्रकारिता” हा या व्यवसायातील शहाजोगपणाचा नमूना ठरू पहात आहे. पत्रकारांनी व्यवस्थेवर अंकुश ठेवावयास हवा, परंतु पत्रकारितेवर तो कोण ठेवणार? अजून तरी प्रेस कौन्सिल, न्यायालये किंवा पत्रकारांच्या संस्था याबाबत कोणतेही मापदंड निर्माण करू शकलेले नाहीत’. रविंद्र गायकवाड प्रकरण काय आहे, त्याचा इतका नेमका खुलासा अन्यत्र कुठेही सापडणार नाही. खुद्द गायकवाड वा शिवसेनाही इतके तंतोतंत स्पष्टीकरण देऊ शकणार नाही. कारण माध्यमांनी आता गायकवाड यांना गुन्हेगार ठरवलेले आहे.

केतकरांनी हा अग्रलेख लिहीला, तेव्हा भारतात उपग्रह वाहिन्यांचे पेव फ़ुटलेले नव्हते. एखाददुसरी वाहिनी नव्याने आपला संसार थाटत होती आणि वृत्तवाहिन्यांचा जमाना आलेलाही नव्हता. पण येऊ घातलेल्या नव्या युगाची चाहुल तेव्हा लागलेला संपादक, म्हणून आपण केतकरांना श्रेय देऊ शकतो. माध्यमे किती कांगावखोर व भंपक होऊन जातील, त्याची रुपरेखाच त्यांनी या अग्रलेखातून मांडली होती. आता तर आपल्याला माध्यमांनी चालवलेले खटले व कुणालाही आयुष्यातून उठवण्यासाठी केलेली सुपारीबाजी, अंगवळणी पडलेली आहे. म्हणूनच गायकवाड यांनी एअर इंडीयाच्या विमानात नेमके काय गैरवर्तन केले, त्याच्या तपशीलात जाण्याची अजिबात गरज नाही. कारण तशी कुठलीही मोकळीक माध्यमांनी तुमच्या आमच्यासाठी शिल्लक ठेवलेली नाही. एकूणच दोनतीन दिवस चाललेला गदारोळ बघता, एअर इंडियाचे जे कोणी कर्मचारी आहे, ते अतिशय विनम्र व गरीब बिचारे असून, त्यांना मस्तवाल शिवसेना खासदाराने अकारण गंमत म्हणून मारले वा शिवीगाळ केलेली आहे. तेव्हा तिथे काय घडले हे तपासण्याची अजिबात आवश्यकता नाही. आपला गुन्हा काय ते गायकवाड किंवा अन्य कोणी त्यांच्या सहकार्‍यांनी विचारण्याची हिंमतही करू नये. निमूटपणे माफ़ी मागितली पाहिजे. मागणार नसतील तर तमाम संसद सदस्यही तितकेच गुन्हेगार आहेत. कारण ते महत्वपुर्ण व्यक्ती म्हणून माजोरीपणा करत आहेत आणि तो कुठल्याही लोकशाहीत खपवून घेतला जाणार नाही. जाताही कामा नये. असा निर्वाळा भारतातील सर्वोच्च न्यायसंस्था असलेल्या माध्यमांनी दिलेला आहे. सवाल इतकाच आहे, की हा खासदार अशा कांगाव्याला शरण जायला तयार नाही. त्याचा पक्ष त्याला माफ़ी मागायला सांगत नाही आणि अन्य पक्षांचे खासदारही त्याच्याच प्रतिष्ठेला सावरून घ्यायला सरबराई करीत आहेत.

केवळ नेता वा लोकप्रतिनिधी असल्याने कुणाला मोठा अधिकार वा निरंकुश स्वातंत्र्य मिळत नाही, असा यातला युक्तीवाद आहे. लोकशाहीत सर्व समान असतात, यात शंकाच नाही. त्यातून राजकीय नेता वा लोकप्रतिनिधी म्हणूनही खास वागणुक मिळण्याचे कारण नाही. पण तशी वागणूक पत्रकार व माध्यमातील लोकांना मात्र मिळाली पाहिजे. कुठेही घुसून नेत्यांचा शिकारी कुत्र्याप्रमाणे पाठलाग करून, त्याला हैराण करण्याचा अधिकार माध्यमांना व त्यांच्या कॅमेराला कोणी दिला आहे? एखाद्या व्यक्तीला कोणाशी बोलायचे नसेल वा प्रश्नाचे उत्तर द्यायचे नसेल, तरी त्याला पाठलाग करून हैराण करण्याला काय म्हणतात? संथपणे आपल्या मार्गाने जाणारा कोणी माणूस असेल, तर त्याला प्रश्नांच्या भडीमाराने हैराण करण्याला गुंडगिरी नाही, तर दुसरे काय म्हणतात? त्याने नकार दिल्यावरही माईक वा कॅमेरा घेऊन घुसखोरी करणे, दादागिरी नाही काय? ते अविष्कार स्वातंत्र्य कसे असू शकते? एखाद्या मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध छेडणे आणि अन्य कुणा नामवंत व्यक्तीला अकारण डिवचणारे प्रश्न विचारून हैराण करणे, यात नेमका कुठला गुणात्मक फ़रक असतो? त्यातही दादागिरी आलीच ना? घटनेने दिलेली स्वातंत्र्ये अन्य कुणाच्या स्वातंत्र्यावर वा जगण्यावर गदा आणण्याची मुभा देत नाहीत. याचे भान किती पत्रकार ठेवतात? आणि त्यातही अनेकजण राजरोस ब्लॅकमेलचा उद्योग करतात. त्यांचे पुरावे समोर आणले जातात, तेव्हा एकजुटीने अशा बदमाशीच्या समर्थनाला उभे ठाकतात, त्यांनाही पत्रकार म्हणतात. आज गायकवाड यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करतात, त्यापैकी कितीजणांनी अशाप्रसंगी आपल्या व्यवसायबंधू वा सहकार्‍याला जाब विचारला आहे? तेव्हा हे प्रश्नकर्ते आपला धर्म-संस्कृती गुंडाळून टोळीला साजेसे वागतात ना? मग गायकावाड यांच्या मदतीना अनेक पक्षाचे सदस्य धावले तर गैर ते काय?

पण एक नवी प्रवॄत्ती समोर आलेली आहे. आपल्या हातात माध्यमे आहेत आणि प्रसारसाधने आहेत, म्हणून कोणाही नामवंत वा ख्यातनाम व्यक्तीला बदनाम करून टाकण्याच्या मोहिमा राजरोस राबवल्या जात असतात. गायकवाड हा त्याचाच बळी आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्याचे ढोल मोठ्याने पिटले जात आहेत आणि अटक कधी होणार असा सवाल केला जात आहे. पण अशाच स्थितीत एखादा पत्रकार वा माध्यमकर्मी गुन्ह्यात सापडतो, तेव्हा हीच माध्यमे कसे मौन धारण करून बसतात? तेव्हा कोण महान असतो? मागे काही वर्षापुर्वी खोट्या बातम्या दिल्या म्हणून एका उद्योगपतीने एका वाहिनीच्या संपादकाला स्टिंग करून गोत्यात आणलेले होते. त्याच्या अटकेनंतर किती व कोणत्या वाहिन्यांनी त्याच्यावरील आरोपाचा उहापोह केला होता? कंपनीकडून शंभर कोटी रुपयांची जाहिरातीच्या स्वरूपात खंडणी मागितल्याचा त्याच्यावर आरोप होता. तेव्हा माध्यमातले टोळीबाज एका शब्दाने त्यावर बोलायला राजी नव्हते. चार ओळींचा ओझरता उल्लेख करून चिडीचुप झाले होते. आपल्यातला असला मग त्याचे पापही पुण्य असते आणि आपल्यातला नसेल तर त्याच्या पुण्यकर्मालाही पाप ठरवण्याचा कांगावा आजकाल सार्वत्रिक झाला आहे. जसे पत्रकार आपल्यातल्या बदमाशाला पाठीशी घालतात, तसेच राजकीय नेते आपल्यातल्या कुणा बहकलेल्याच्या समर्थनाला उभे राहिले, तर जाब कोणी विचारावा? त्यासाठी हवा असलेला नैतिक अधिकार आज पत्रकारांनी गमावला आहे. गायकवाड या खासदाराचे वर्तन नक्कीच अशोभनीय आहे. पण अनेक बाबतीत पत्रकार संपादकांचेही वर्तन तितकेच आक्षेपार्ह असते आणि तेव्हा सर्व पुण्यात्मे मूग गिळून गप्प बसतात. सगळीकडेच टोळीबाजी झाली आहे. कोणी कोणाकडे बोट दाखवायचे? मल्ल्या उगाच नाही म्हणाला, ‘औकातमध्ये रहा!’

3 comments:

  1. भाऊ,एअर इंडिया चा स्टाफ मस्तीचा आहेच परंतु रविंद्र गायकवाड हेही सरळ नाहीत मोदींच्या जोरावर निवडुन आलेली व्यक्ती नाही तर यांची पात्रता डॅा पद्मसिंह पाटील यांना पाडायची आहे का?? पण हे असल काही तरी वागुन शिवसेनेची अब्रु काढतायत एकजण ओवेसीला मारल्याच सांगतोय मी केजरीवाल किंवा राहुल प्रमाणे सर्जिकल स्ट्राईक सारख नाही पण ओवेसी मारखाताना आनंद मिळवण्यासाठी पुरावे मागिन आहेत का??? ,यावर सेनेकडुन काय प्रतिक्रिया नाही???

    ReplyDelete
  2. या संदर्भात रामराव आदिकांची आठवण होते. hanoverfairच्या एका प्रसंगाने त्यांची राजकीय कारकीर्द एवढी डागाळली की, राजकीय कारकीर्दीच्या पुढच्या सगळ्या पायर्या ढासळून गेल्या...

    ReplyDelete
  3. भाऊ ,
    त्या अधिकाऱ्याची भाषा मात्र जगजाहीर केली गेली नाही. खासदाराला तो असे बोलत असेल तर सामान्य माणसाला काय किंमत देत असेल
    सामान्यपणे असा अनुभव आपल्याला पण येतो जिथे संघटना असते किंवा अधिकार असतो ...हा शिवसेनेचा खासदार आहे म्हणून त्याची हात उचलायची हिम्मत झाली एवढ़ेच. मी काही मारझोडीचे समर्थन करत नाही पण अधिकाऱ्याचे काम त्याने नीट केले का हे कुठे सांगितले नाही ना
    आणि ह्या साठी सर्व companies एकत्र पणे ठराव करतात हे अतीच दिसते आहे त्यांनी पण त्वरित त्यांचा त्यांचा न्यायनिवाडा केलाच की मग त्यावर कोणी बोट उचलले का ?

    ReplyDelete