Saturday, April 22, 2017

ज्यांचा डाव त्यांनाच पेच

sasikala के लिए चित्र परिणाम

तामिळनाडू पुन्हा राजकीय आवर्तामध्ये सापडला आहे. जयललिता यांच्या जागी आपल्याला स्थानापन्न करून घेण्यासाठी त्यांच्या दिर्घकालीन सखी शशिकला यांनी केलेल्या डावामुळे, त्या स्वत:च अधिकाधिक पेचात सापडत चालल्या आहेत. जयललितांची मालमत्ता हडपण्यात त्या यशस्वी झाल्या होत्याच. पण त्यानंतर अण्णाद्रमुक पक्षावर आपले प्रभूत्व सिद्ध करण्यातही त्या यशस्वी झाल्या होत्या. जयललिता व शशिकला यांच्यावर समान भ्रष्टचाराचा खटला चालू होता आणि त्यासाठी त्या दोघींना एकाचवेळी तुरूंगात जावे लागलेले होते. अशा दोन्ही प्रसंगी शशिकला अम्माच्या सोबत तुरूंगात होत्या आणि अम्माला मुख्यमंत्रीपद सोडावे लागलेले होते. त्यांनी पर्याय म्हणून आपल्या नावाने कारभार करू शकणारा पन्नीरसेल्व्हम याला निवडले होते. दोन्ही प्रसंग निवळले तेव्हा सेल्व्हम यांनी कुठलेही आढेवेढे न घेता सत्तेची खुर्ची सोडली होती आणि अम्माला सिंहासन मोकळे करून दिलेले होते. सहाजिकच त्यांच्या निष्ठेविषयी शंका घ्यायला कुठेही जागा नव्हती. जितकी निष्ठा या नेत्याने अम्मा जयललिताच्या बाबतीत दाखवली, तितकीच त्याने चिन्नम्मा म्हणजे जयललितांच्या सखी असलेल्या शशिकलाच्याही नाबतीत दाखवली होती. दिड वर्षापुर्वी जयललितांनी दुसर्‍यांदा पक्षाला बहूमतासह सत्तेत आणले. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली आणि त्या आजारातून उठत नाहीत, असे दिसल्यावर पुन्हा तिसर्‍यांदा त्याच सेल्व्हम यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक अम्माने नव्हेतर शशिकलांनीच केलेली होती. बेशुद्धीतल्या अम्माने नव्हेतर चिन्नम्मानेच ही निवड केली, हे कुणालाही कळत होते. सेल्व्हम यांनी त्यात दिलेली साथ लपून राहिलेली नाही. म्हणूनच शशिकला यांनी पुढल्या कालखंडात त्याच नेत्या्ला हाताशी धरून राजकारण वा डावपेच खेळले असते, तरी काम सोपे झाले असते. इतका कामसू व निष्ठावान अन्य सहकारी त्यांना दुसरा मिळाला नसता. पण तसे होणे नव्हते.

तुरूंगातूनही सत्तेवर हुकूमत ठेवण्याची कुवत जयललितांमध्ये होती. कारण त्यांच्यात दांडगा आत्मविश्वास होता. आपल्या सहकार्‍यांवर त्यांची पक्की हुकूमत होती. तसे चिन्नमाचे नव्हते. त्यांच्यापाशी अम्माचे अधिकार आले तरी तितका आत्मविश्वास येऊ शकला नव्हता. म्हणूनच लौकरात लौकर चिन्नम्माने सर्व सत्ता आपल्या हाती केंद्रित करण्यावर भर दिला. त्यातून त्या आपल्यासाठीच समस्या निर्माण करत गेल्या. अम्माच्या निधनानंतर सेल्व्हम यांच्याच पुढाकाराने चिन्नम्माची पक्षाच्या सर्वोच्च नेत्या म्हणून सरचिटणिसपदी निवड झाली. पण त्यांच्यावरील खटला सुप्रिम कोर्टात होता आणि त्याचा निकाल जवळ आलेला होता. अशावेळी तो निकाल लागण्यापर्यंत कळ काढली असती, तर पक्ष एकसंघ राहून नेतृत्वाला कुठले आव्हान उभे राहिले नसते. पण कुटील माणसे लबाडी करताना आपल्यासाठीच संकटे ओढवून आणतात. तेच शशिकला यांनी केले. नसलेले आव्हान त्यांनी सेल्व्हम यांना दुखावून निर्माण केले. पक्षाची सुत्रे हाती आल्यावर त्यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची घाई केली. ती खटकणारी होती. पक्षाची सत्ता वापरून त्यांनी सेल्व्हम यांचा राजिनामा घेतला आणि आपलीच निवडही करून घेतली. मात्र दुखावलेल्या सेल्व्हम यांनी त्यालाच आव्हान देण्याचा निर्णय घेतला. एकेरात्री अम्माच्या समाधीवर जाऊन सेल्व्हम यांनी आपल्याला अम्माच्या आत्म्याने बंडाची प्रेरणा दिल्याचे नाटक रंगवले आणि अम्माप्रेमी जनमानसात शंकेचे बीज पेरले गेले. पक्षात व आमदारात फ़ुट पडली असताना, सर्वांना कोंडवाड्यात टाकून शशिकलांनी मनमानी केली आणि ती चालूनही गेली. मात्र राज्यपालांनी शशिकलांना शपथ देऊन सत्तेवर बसवले नाही. दरम्यान सुप्रिम कोर्टाचा निर्णय येऊन त्यांना तुरूंगात जावे लागले. तेव्हा आपल्या अनुपस्थितीत सत्ता राबवण्यासाठी त्यांनी पलानीस्वामी या नेत्याला वारस नेमले आणि पक्षाची सुत्रे दिनाकरन या भाच्याकडे सोपवली. तोच डाव आता उलटला आहे.

विधानसभेत बहूमत दाखवून किंवा शपथविधी उरकून आपल्या मुठीतले सरकार आणण्यात शशिकलांना यश आलेले असले, तरी त्यांच्या नावाने कारभार चालवणारे वारस तितके प्रभावी वा निष्ठावान नव्हते. त्यात कोणी सेल्व्हम नव्हता. सहाजिकच त्यातल्या भाच्याने दिवाळखोरीची परिसीमा गाठली. त्याने पक्षातल्या नेत्यांवर दादागिरी केलीच. पण वादाचा विषय असताना अम्माच्या रिकाम्या जागी आपलीच उमेदवारी घोषित केली. तिथेच खरी कसोटी लागायची होती. कारण निवडून आलेल्या आमदार वा खासदारांची गोष्ट वेगळी असते. लोकशाहीचा खरा निकष जनमत असतो आणि ती कसोटी आर के नगर या अम्माच्या मतदारसंघात लागायची होती. सहाजिकच तिथे कोण उमेदवार होतो, त्याहीपेक्षा ती जागा जिंकण्याला प्राधान्य होते. जो गट ती जागा जिंकणार तोच अम्माचा खरा वारस, असे जनताच ठरवणार होती. म्हणूनच तिथे शशिकला वा तिच्या भाच्याने व्यक्तीगत प्रतिष्ठा पणाला लावण्यात मुर्खपणा होता. पण तीच चुक त्यांनी केली आणि मग जिंकण्यासाठी पाण्यासारखा पैसा तिथे ओतला. त्याचा गाजावाजा झाला व आयोगाला ती पोटनिवडणूकच रद्द करावी लागली. आयोग व पोलिसच नव्हेतर आयकर विभागानेही धाडी घालून पैशाचा नंगानाच उघडकीस आणला. दुसरी गोष्ट होती पक्षातील दुफ़ळीचा वाद! निवडणूक आयोगाकडे तो वाद सुनावणीला आलेला होता. त्याचा निकाल आपल्याच बाजूने लागावा, म्हणून शशिकलाच्या दिवट्या भाच्याने नको तितका आगावूपणा केला. त्याची लायकी गल्लीतल्या पोलिसाला लाच देऊन पटवण्याची, त्याने आयोगाच्या अधिकार्‍यालाच विकत घेण्याचा मुर्खपणा केला आणि आभाळ कोसळले. तशी लाच देऊ करणार्‍या व्यक्तीला दिल्लीत पोलिसांनी रंगेहाथ पकडले आणि त्याने़च शशिकलाच्या भाचा दिनाकरन याचे नाव घेतले. सहाजिकच आता ही मावशी व भाचा, अण्णाद्रमुकच्या गळ्यातला फ़ास होऊन गेले आहेत.

ह्या घटनेचा बभ्रा झाला आणि दिनाकरनने कितीही हात झटकले, म्हणून विषय संपू शकत नव्हता. दिल्ली पोलिसांनी ज्या इसमाला दिड कोटीची रोख रक्कम घेऊन आलेला पकडले त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होताच. पण त्याच्या कबुलीजबाबामुळे दिनाकरन याच्याही विरोधातला गुन्हा दाखल करणे भाग झाले. दरम्यान मतदारांना लाच वाटल्याच्या गुन्हासाठी आयकर विभागाने आरोग्यमंत्री विजयभास्कर यांच्याही घरावर धाडी घातल्या होत्या आणि तिथे हाती लागलेल्या कागदपत्रामुळे आणखी काही मंत्र्यांसह नेत्यांच्या घरावरही धाडी पडल्या. एकूण परिणाम असा झाला, की सत्तेत असूनही शशिकला गट गुन्हेगारी पिंजर्‍यात येऊन उभा राहिला. प्रामुख्याने ह्या चिन्नम्मा वा दिनाकरनमुळे पक्षाची प्रतिमा काळवंडून गेली होती. त्याचा लाभ उठवित सेल्व्हम गटाने शशिकला टोळीला वगळून पक्षाच्या अन्य नेत्यांनी एकजुट करावी, असा प्रस्ताव पुढे केला आणि बिथरलेल्या शशिकला गटातील मंत्र्यांसह नेत्यांनी त्याचे समर्थन सुरू केले. शशिकलांमुळे बुडायला लागलेल्या जहाजातील बुडत्या नेत्यांना सेल्व्हम यांच्या प्रस्तावाची काडी आधार वाटली, तर नवल नाही. सोमवारी रात्री अनेक आमदार व मंत्र्यांनी एक बैठक घेऊन सेल्व्हम यांच्या प्रस्तावचे स्वागत केले व अण्णाद्रमुक एकजुटीने उभा राखण्य़ाची शपथ घेतली. थोडक्यात आता शशिकला तुरूंगात आहेत आणि त्यांचा दिवटा भाचा कुठल्या नेत्याला वेसण घालू शकत नाही. त्याच्याच गटातल्या कुठल्या नेत्याला सत्ता हाती असूनही आत्मविश्वास उरलेला नाही. त्यामुळेच त्यांनी सेल्व्हम यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. सत्तेची इतकी घाई शशिकलांनी केली नसती आणि सेल्व्हम यांनाच मुख्यमंत्री राहू दिले असते; तर तोच त्यांचा निष्ठावान म्हणून कारभार करत राहिला असता. पक्षातही दुफ़ळी माजली नसती. त्याने अम्माच्या अनुपस्थितीत त्यांच्या नावे राज्य केले, तसेच चिन्नम्माच्या नावानेही केले असते. पण शशिकलांना तरी आत्मविश्वास कुठे होता?

No comments:

Post a Comment