Sunday, April 23, 2017

आत्मघातकी राजकारण

ops eps के लिए चित्र परिणाम

लोकशाहीत जनतेला खुप महत्व असते आणि म्हणूनच जनमानसात तुमचे काय स्थान आहे, त्यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळेच जनमानसात आपली प्रतिमा जपून राजकारण करावे लागत असते. जयललिता किंवा तत्सम व्यक्तीगत प्रतिष्ठेवर राजकारणात पुढे आलेल्या व्यक्तींना यातून सुटका असते. सवलत मिळते. कारण लोक त्यांची देवासारखी पूजा करत असतात. म्हणूनच मग त्यांच्या लोकप्रियते्वर स्वार झालेले त्यांचे निकटवर्तियही खुप मस्ती दाखवत असतात. लोक अशा मस्तवालांनाही खुप सहन करतात. कारण जोवर अशा देवपणाला पोहोचलेल्यांची कृपादृष्टी त्या निकटार्तियांवर असते, तोवर लोकही त्यांच्या नाकर्तेपणाला माफ़ करतात. पण ज्या क्षणी अशी कृपादृष्टी जेव्हा हटते, तेव्हा त्याच निकटवर्तियांची महत्ताही संपुष्टात आलेली असते. मात्र सत्तेची वा प्रभूत्व गाजवण्याची सवय लागलेल्या अशा लोकांना, त्या नशेतून बाहेर पडायला खुप वेळ लागत असतो. याचे कारण कृपादृष्टीमुळे सत्ता वा प्रभूत्व आपण भोगले याचे भान सुटलेले असते. देवपण संपादन केलेल्या व्यक्तीच्या सान्निध्यामुळे आपल्याला महत्व आहे, हे विसरल्याचा तो परिणाम असतो. दुसरीकडे अशा संघटना, पंथ वा राजकीय पक्षात व्यक्तीकेंद्री कामकाज चालते. सहाजिकच त्याच महतीवर काम चालत असल्याने, त्यामध्ये अन्य कोणी पर्याय म्हणूनही उभा राहू शकत नसतो. प्रामुख्याने अशा राजकीय पक्षांचे स्वरूप एकखांबी तंबूप्रमाणे असते आणि तोच खांब कोसळला, मग तंबूच कोसळू लागतो. बाकी कुठला खांब त्याला तोलून धरू शकत नसतो. आज तशीच काहीशी अवस्था तामिळनाडूत दिर्घकाळ राजकीय प्रभूत्व गाजवलेल्या अण्णा द्रमुक पक्षाची झाली आहे. जयललितांनी आपल्या बळावर तोलून धरलेला हा पक्ष, अकस्मात पत्त्याचा बंगल्या सारखा ढासळू लागला आहे. हातात सत्ता असतानाही नेतृत्वहीन झालेल्या पक्षाची वाताहत होत चालली आहे.

सव्वा वर्षापुर्वी जयललितांनी दुसर्‍यांदा त्या पक्षाला सत्तेवर आणले होते आणि एकहाती बहूमत मिळवून दिलेले होते. मात्र दोन दशकाहून अधिक काळात हा पक्ष अम्मा उर्फ़ जयललितांच्या इशार्‍यावर चालला आणि त्यात त्यांच्या अनुपस्थितीतही कोणी पर्यायी नेता उभा राहू शकला नव्हता. अगदी भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तेव्हा अम्मा तुरूंगात जावे लागले होते. त्याही काळात तुरूंगात बसून त्यांनी सत्तेची सुत्रे हाताळली होती. त्यांच्या अपरोक्ष पन्नीरसेल्व्हम या नेत्याने मुख्यमंत्री म्हणून कारभार केला आणि राज्यही चालवले होते. पण हाती इतकी सत्ता येऊनही सेल्व्हम कायम अम्माचा निष्ठावंत दास म्हणून कार्यरत राहिला. ज्या क्षणी अम्माची तुरूंगातून सुटका झाली, त्याक्षणी अम्माच्या इच्छेनुसार या मुख्यमंत्र्याने सत्ता सोडून अम्मासाठी सिंहासन मोकळे करून दिले होते. असे एकदा नव्हेतर दोनदा झाले होते. पण अम्माला पर्याय होण्याची वा आव्हान देण्याची पक्षात कोणाला हिंमत झाली नाही. कारण हा पक्षच एका व्यक्तीच्या लोकप्रियतेवर किंवा प्रतिष्ठेवर उभा राहिला व चालला होता. याच काळात सातत्याने अम्माच्या सोबत राहिलेल्या व जणू जुळी बहिण असल्यासारखा सहवास लाभलेल्या, चिन्नम्मा उर्फ़ शशिकला यांनीही आपले समांतर स्थान निर्माण केले होते. अम्माच्या मनाचे प्रतिबिंब म्हणून लोक शशिकला यांच्याकडे बघत होते आणि अनेकदा शशिकलाची मागणी म्हणजेच अम्माची इच्छा समजूनही लोक वागले होते. सहाजिकच अकस्मात अम्मा आजारी झाल्या आणि पुढला सगाळा कारभार शशिकला आपल्या मनाप्रमाणे हाकत गेल्या. बेशुद्धीत अम्मा पडलेल्या असताना, शशिकलांनीच तिसर्‍या खेपेस पन्नीरसेल्व्हम यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक केली आणि अम्माच्या निधनानंतर अम्माच्या जागी शशिकलांनी स्वत:ची सर्वोच्चपदी नेमणूकही करून घेतली. सर्वकाही ठिकठाक चालले होते.

विविध नेत्यांवर किंवा सहकार्‍यांवर अम्माने नेहमीच महत्वाच्या जबाबदार्‍या सोपवल्या. पण त्यांना दगा देण्याची कोणाला हिंमत झाली नाही. हाती आलेल्या सत्तेच्या बळावर कोणी अम्मासमोर आव्हान म्हणून उभा राहिला नाही. कारण त्यापैकी कोणालाही अम्माची लोकप्रियता लाभणार नव्हती वा मिळवण्याचा आत्मविश्वास नव्हता. अम्माची लोकप्रियता हीच पक्षाची वा त्यातल्या प्रत्येक नेत्याची शक्ती होती. आज ती शक्ती लयास गेलेली आहे. कारण अम्माचे निधन झाले आहे आणि हातात मोठे बहूमत असूनही उरलेल्या कुठल्याही नेत्याला नुसती सत्ता राबवणेही शक्य झालेले नाही. प्रत्येकाची महत्वाकांक्षा मोठी आहे. पण त्यासाठी आवश्यक आत्मविश्वास मात्र कोणाहीपाशी नाही. सहाजिकच अशा खुज्या लोकांना असलेली सत्ता टिकवणे कठीण झाले आहे आणि एकमेकांच्या विरोधात कारस्थाने करून कुरघोड्या करण्यातून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्याचे दुर्दैव ओढवले आहे. त्याची सुरूवात चिन्नम्मा म्हणजे शशिकला यांनी केली. जयललिताच्या निधनानंतर त्यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेतेपदी आपली निवड करून घेतली. कोणीही त्यांना रोखू शकला नाही, की आव्हान देऊ शकला नाही. कारण अम्माच्या कारकिर्दीत कोणालाही मान वर करून बघण्याची सवयही राहिलेली नव्हती. मग समोर कोण आहे ते डोळे उघडून बघण्याचीही गरज कशी असेल? पण शशिकला इतकेच अम्माचे अन्य काहीजण निकटार्तिय होते आणि त्यात तीनदा मुख्यमंत्रीपद उपभोगलेले पन्नीरसेल्व्हम होते. त्यांना संभाळून व विश्वासात घेऊन शशिकलांना वाटचाल करणे अवघड नव्हते. पक्षाची सुत्रे आपल्याच हाती ठेवून सेल्व्हम यांना कळसुत्री बाहुलीप्रमाणे शशिकला वापरू शकल्या असत्या. पण सत्ता हाती असलेला सेल्व्हम आपल्याला दाद देईल की नाही, याची शशिकलांना खात्री नसावी. तिथेच त्यांचा घात झाला. हाच अम्मा व चिन्नम्मा यांच्यातला मोठा फ़रक आहे व होता.

जयललितांनी दिर्घकाळ आपल्या लोकप्रियतेवर पक्ष चालवला व सत्ताही राबवली. पण ते करताना त्यांनी आपले निष्ठावान निर्माण केले आणि त्यांच्यावर विश्वासही दाखवला होता. सत्ता वा अधिकारपदामुळे कोणी मोठा होत नसतो, तर आपल्या कुवतीवर मोठा होत असतो. त्यामुळेच आपणच वाटलेल्या कितीही मोठ्या पदावर बसलेल्यांची भिती अम्माला वाटली नाही. तुरूंगात पडलेले असतानाही त्या बिनधास्तपणे सहकार्‍याला मुख्यमंत्रीपदी बसवू शकल्या व त्याच्याकडून नंतर अधिकारपद काढून घेऊ शकल्या. तितकी कुवत शशिकला यांच्यापाशी नव्हती. म्हणून सर्वच पदे व अधिकार आपल्याच हाती केंद्रीत करायला शशिकला उतावळ्या झाल्या होत्या. तिथून अण्णाद्रमुकमधला सत्तासंघर्ष सुरू झाला. ज्या सेल्व्हम यांनी दोनदा बिनतक्रार मुख्यमंत्रीपद अम्मासाठी सोडले, त्यांना शशिकलासाठी तेच पद सोडताना बंड करण्याची हिंमत झाली. कारण चिन्नम्मा ही अम्मा नाही व तिच्यात राजकीय आत्मविश्वास नाही, याचीही सेल्व्हम यांना खात्री होती. सहाजिकच त्याही नेत्याला सोबत घेऊन व त्याचेही स्वार्थ संभाळून शशिकला राजकारण खेळू शकल्या असत्या. आज त्या पुन्हा तुरूंगात गेल्या आहेत आणि अम्माच्या निधनानंतर कब्जा मिळवण्याचा हव्यास त्यांनी सरचिटणिस होण्यापर्यंतच मर्यादित ठेवला असता, तर सेल्व्हम यांनीही तुरूंगात जाऊन त्यांनाच मुजराच केला असता. अम्माच्या जागी असल्याप्रमाणे शशिकला तुरूंगातूनही तामिळनाडूवर राज्य करू शकल्या असत्या. चार वर्षे त्यांना अशा रितीने सत्ता व प्रतिष्ठा आपल्या हाती राखता आली असती. पण ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, अशी उक्ती तामिळीत नसावी बहुधा. परिणामी सर्व सुत्रे आपल्या हाती व कुटुंबाकडे केंद्रित करण्याच्या नादात, शशिकलांनी अवघ्या अण्णा द्रमुक पक्षालाच ग्रहण लावून टाकले. गेल्या चार महिन्यात पक्षाला उतरती कळा त्यांच्यामुळेच लागली आहे.

पहिल्यांदा त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा राज्यपालांनी कालापव्यय करून निकालात काढला. मग सुप्रिम कोर्टाने त्यांना तुरूंगात धाडले, तर आपला वारस नेमूनही वेळ मारून नेता आली असती. बहुसंख्य आमदारांनी तितकी सोशिकता दाखवलेली होती. पण तरीही आत्मविश्वासाचा अभाव़च होता. म्हणून तर शशिकलांनी तुरूंगामध्ये जाताना पक्षाची सुत्रे हाताळण्यासाठी दिनाकरन या आपल्या भाच्याची उपसचिव म्हणून नेमणूक केली आणि जणू माकडाच्या हाती कोलितच दिले. त्याने जयललितांच्या रिक्त झालेल्या जागी स्वत:लाच उमेदवार करून धिंगाणा घातला. इतक्या बेताल गोष्टी झाल्या, की निवडणूक आयोगाला तिथले मतदानच पुढे ढकलावे लागले. दरम्यान खरा अण्णा द्रमुक गट को्णता ते ठरवण्याचा वाद आयोगापुढे चालू होता, तिथे वरीष्ठ अधिकार्‍यांना कोट्यवधीची लाच देऊन आपल्या बाजूने कौल देण्यासाठी दिनाकरनने लाचखोरीचा मार्ग चोखाळला आणि आता हे सर्वच अंगलट आलेले आहे. त्यामुळे दिनाकरन वा शशिकला पक्षाला यशाकडे घेऊन जाऊ शकतील, असे कोणाला वाटेनासे झाले आहे. किंबहूना असेच होत राहिले तर पक्षाला भवितव्यच नाही, अशी चिंता अनेक आमदार खासदारांना सतावू लागली. त्यामुळेच पक्षात वा शशिकला गटात बंड उफ़ाळून आलेले आहे. सेल्व्हम यांनी त्याचवेळी शशिकला यांना बाजूला करून एकजुटीचा प्रस्ताव दिला आणि बिथरलेल्या आमदारांचा त्याला प्रतिसाद मिळू लागला. एकूण आता चिन्नम्मांना झुगारून लहानसहान नेत्यांमध्ये पक्ष वाचवला पाहिजे, अशी धारणा निर्माण झालेली आहे. त्यामुळेच शशिकलाचे बहुतेक निष्ठावान सेल्व्हम यांच्याशी हातमिळवणी करण्यात पुढे आले आहेत. पर्यायाने त्यांनी शशिकलांना झुगारण्याचे जणू घोषितच केले आहे. याला दुसरा तिसरा कोणीही जबाबदार नसून खुद्द शशिकलांचा उतावळेपणा कारणीभूत झाला आहे.

पहिली गोष्ट म्हणजे चिन्नम्मा वा शशिकला या कुठल्याही निकषावर अम्मा वा जयललिता होऊ शकत नाहीत. पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी लोभ वा आकर्षण अजिबात नाही. जनमानसात त्यांना काडीमात्र स्थान नाही. म्हणूनच कुठलीही निवडणूक पक्षाला जिंकून देण्याची त्यांच्यात क्षमता नाही. अशा मावशीच्या भाच्याने किती दादागिरी करावी? दिनाकरन या माकडाला त्याचेही भान नव्हते की अक्कल नव्हती. अशा माकडाच्या हाती उपसचिव म्हणून शशिकलांनी पक्षाची सुत्रे सोपवली; तिथेच त्यांच्या राजकारणाचा र्‍हास सुरू झाला होता. व्यक्तीकेंद्री पक्षाच्या नेत्याचा अस्त झाला, मग त्याच्या पक्षाचा डोलारा पाडण्यासाठी बाहेरून कोणाला फ़रसे प्रयास करावे लागत नाहीत. आतले कोणीतरी फ़ुसक्या आत्मविश्वासाचे मर्कटलिला करणारे, पक्षाचा वा साम्राज्याचा र्‍हास घडवून आणण्यास पुरेसे असतात. तेच आपल्या कृतीतून त्या देवपण प्राप्त झालेल्या नेत्याच्या शब्दांचा वा उक्तींचा पोरकट सढळ वापर करून त्याची अवहेलना सुरू करतात. त्याच इतिहास घडवणार्‍या व्यक्तीच्या शब्द व उक्तींना हास्यास्पद बनवण्यापर्यंत मर्कटलिला करतात. त्यातून असे पक्ष वा संघटना टवाळीचा विषय होऊन जातो आणि जनमानसातून पक्षाची प्रतिमा मलीन होत जाते. बहूतेक अशा वारसांचे पक्ष म्हणूनच लयास गेलेले दिसतील. हरयाणात चौधती देवीलाल, उत्तरप्रदेशात चौधरी चरणसिंग, पंजाबात अकाली वा उत्तरप्रदेशात मुलायम सिंग यांचे पक्ष कसे व कोणी बुडवले; त्याचा इतिहास आपल्या समोर आहे. पणजोबापासून पित्यापर्यंत असलेला थोर वारसा राहुल गांधींनी कसा मातीमोल केला, त्याचाही इतिहा़स ताजा आहे. शेख अब्दुल्ला ते ओमर अब्दुल्ला किंवा कर्नाटकात देवेगौडा ते कुमारस्वामी अशा कहाण्या नव्या नाहीत. त्यामुळे कर्तृत्वहीन वारसच आपल्या पुर्वजांची प्रतिष्ठा मातीमोल करतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

जयललिता यांच्यावरच विसंबून असलेल्या अण्णाद्रमुकची स्थिती बघितली, तर तो नव्याने अशा स्वरूपात लोकप्रिय झालेल्या पक्षांना इशारा़च आहे. चौधरी चरणसिंग वा देवीलाल यांच्या नंतर त्यांच्या पक्षाची त्यांच्या अभावी वाताहत झाली. कारण त्यांच्या कुवतीचा वारसा अन्य कुणापाशी नव्हता. एमजीआर यांच्यानंतरही तशीच स्थिती अण्णाद्रमुकमध्ये आलेली होती. पण कुटुंबाच्या वारसांनी पक्ष संघटना काबीज केली, तरी त्यांना वारसा पुढे चालवता आला नाही. त्याच पक्षातल्या जयललितांमध्ये तशी कुवत होती. त्यांनी पक्षाला नवी संजिवनी देऊन दाखवली. पण दुसरे नेतृत्व उभे राहू शकले नाही. ममता बानर्जी यांच्या पक्षाची स्थिती त्यापेक्षा किंचीतही वेगळी नाही. आज त्यांच्याच लोकप्रियतेवर बंगालमध्ये तृणमूल पक्ष उभा आहे. उद्या त्यांच्या मागे काय होईल? महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेबांनी आपली हुकूमत दिर्घकाळ गाजवली. पण त्यांच्या नकला करणार्‍यांना ती हुकूमत संभाळतानाच दमछाक होत आहे. कुवत सिद्ध करण्यापुर्वीच त्यांच्या गमजा अशा चालल्या आहेत, की शिवसेनेचे भवितव्य काय, असा प्रश्न आताच विचारला जात आहे. यासंदर्भात एक आठवण इथे सांगितली पाहिजे. आपल्या निर्वाणापुर्वी शिवाजीपार्कच्या दसरा मेळाव्यत रेकॉर्डेड भाषणात साहेब म्हणाले होते, ‘इतकी वर्षे मी तुम्हाला संभाळून घेतले आणि तुम्ही मला संभाळून घेतलेत. यापुढे तुम्ही उद्धव आणि आदित्य यांना संभाळून घ्या.’ याचा अर्थ आपल्या वारसांमध्ये लोकांना संभाळून घेण्याची पात्रता अजून आलेली नाही, हे त्यांनाही जाणवले होते. त्याची प्रचिती गेल्या दोन वर्षात येऊ लागली आहे. कारण सेनेतही आता शशिकला पद्धतीने सत्तेचा खेळ सुरू झाला असून, पक्षाच्या भवितव्याची कोणाला फ़िकीर असल्याचे दिसत नाही. जनमानसातील प्रतिमेची पर्वा कोणाला उरलेली नाही. अशा सर्वांना तामिळनाडूच्या घडामोडी हा इशाराच आहे. अर्थात समजून घेतला तर! नाहीतर आनंदच आहे.

No comments:

Post a Comment