Wednesday, April 5, 2017

दिवाळखोरीची परिसीमा

kejriwal ads के लिए चित्र परिणाम

जसजशी दिल्लीच्या महापालिकांची निवडणूक जवळ येते आहे, तसतसे केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे घोटाळे अधिक वेगाने चव्हाट्यावर येत आहेत. अर्थात त्यांनी राजकीय कारकिर्दच इतरांवर आरोप व चिखलफ़ेक करून आरंभलेली असल्याने, त्यांच्यावरही असेच आरोप होण्याला पर्याय नव्हता. पाच वर्षापुर्वी केजरीवाल भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे लढवय्ये म्हणून जगासमोर आले. तेव्हा त्यांनी ज्या ज्या गोष्टी बोलून दाखवल्या होत्या, त्यातल्या प्रत्येक गोष्टीला हरताळ फ़ासण्याचा नवा विक्रम त्यांनी प्रस्थापित करून दाखवला आहे. राजकारणात सगळे विरोधाची नाटके करतात, पण पडद्याआड सगळ्यांची मिलीभगत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी नेहमीच केलेला होता. अशा पार्श्वभूमीवर त्यांनी आम आदमी पक्षाची मुहूर्तमेढ रोवली, तेव्हा अनेकांना त्यांच्याविषयी खुप आशाअपेक्षा निर्माण झाल्या होत्या. पण एकदा सत्तेच्या राजकारणाची चटक लागली, त्यानंतर केजरीवाल यांनी जुन्या मुरब्बी राजकारण्यांनाही लाज वाटावी, इतकी बदमाशी करून दाखवलेली आहे. आपल्याला बंगला नको किंवा सरकारची फ़ुकटातली गाडीही नको, असली भाषा करणार्‍या या लोकांनी सरकारी यंत्रणेचा व तिजोरीचा पैसा आपल्या कुठल्याही मतलाबासाठी बेछूट वापरण्यापर्यंत मजल मारून दाखवली. दिल्लीत मुख्यमंत्री होताना ७० पैकी ६७ जागा जिंकल्यावर केजरीवाल यांनी जनतेला काय दिले? तर सर्वाधिक महागडे आमदार दिले. एका फ़टक्यात त्यांनी आमदारांचे वेतन भत्ते पाचपट वाढवून प्रत्येक पाठीराख्याची सोय लावली. त्यांच्या मंत्रीमंडळातील सहापैकी निम्मे म्हणजे तीन मंत्र्यांना अवघ्या दोन वर्षात विविध फ़ौजदारी आरोपामुळे मंत्रीपदे सोडावी लागली आहेत. या मंत्र्यांचे कारनामे बघितले, तर कुठल्याही दाखलेबाज गुन्हेगारालाही लाज वाटेल अशी स्थिती आहे. मात्र असा माणूस मतदान यंत्रात चुक असू नये, म्हणून आग्रही असतो.

पंजाब, गोवा आदी राज्यात आम आदमी पक्ष निवडणुका लढवणार होता, तर तिथे दिल्ली सरकारच्या कामकाजाच्या जाहिराती करून प्रत्यक्षात केजरीवाल यांचा मुखडा झळकवण्यात आला. त्याविषयी सर्वोच्च न्यायालयालाही हस्तक्षेप करावा लागला. त्यातून आपला चेहरा झाकून नुसत्या आवाजाच्या जाहिराती याच माणसाने केल्या व आता त्याच जाहिरातीवर खर्च झालेली रक्कम पक्षाकडून वसुल करण्याचा फ़तवा निघालेला आहे. असे आरोप कॉग्रेस वा भाजपा पक्षावरही झालेले नाहीत. एक मंत्री बालक महिला कल्याणाचे खाते संभाळत होता आणि त्याने साध्या शिधापत्रिकेसाठी महिलेचे शारिरीक शोषण केले. त्याची चित्रफ़ित बनवण्यापर्यंत विकृतीचे प्रदर्शन घडवले. आपण कुणाही गुन्हेगाराला उमेदवारी देणार नाही आणि उमेदवार ठरवताना त्याच्या चारित्र्याचे कठोर परिक्षण केले जाते, अशी ग्वाही केजरीवाल यांनी दिलेली होती. मग त्यातून असे आमदार निवडून कसे आले आणि अशाच नमूनेदार गुन्हेगाराला केजरीवाल यांनी मंत्रीपदी कसे नेमले? कधीतरी या भामट्याने अशा मंत्र्याच्या पापकर्मासाठी माफ़ी तरी मागितली आहे काय? दुसरा मंत्री कायदा खाते संभाळत होता आणि कायद्याची खोटी पदवी दाखवून वकिलीही करीत असल्याचे उजेडात आले. त्याच्यावरही फ़ौजदारी खटला भरला गेला. केजरीवाल यांनी एकदा तरी त्याविषयी जनतेची माफ़ी मागितली आहे काय? काटकसरीच्या व त्यागाच्या गप्पा मारणार्‍या या टोळीने दिल्लीच्या जनतेच्या पैशावर अक्षरश: लूटमार, चैनमौज केलेली आहे. दोन वर्षात दिल्लीला रोगराई व कचर्‍याने ग्रासले असताना, त्यासाठी कुठलेही उपाय योजले नाहीत आणि असा माणुस निवडणूक आयोगाला मतदान यंत्रातील गफ़लतीविषयी जाब विचारतो आहे. बेशरमपणाचीही काही सीमा असते. पण कुठलीही लाजलज्जा नसलेली माणसेच निवडून केजरीवालनी जवळ घेतलेली असावी.

आता अकस्मात आणखी एक प्रकरण समोर आले आहे. आपल्या बेताल आरोपासाठीच केजरीवाल ख्यातनाम आहेत. आधी त्यांच्याच पक्षाचे संस्थापक सदस्य प्रशांत भूषण सोबत असल्याने, अशा आरोपाचा बेतालपणा करताना केजरीवालना फ़िकीर नसायची. त्यात कुठली कायदेशीर बाधा आली, मग भूषण कोर्टात उभे राहून केजरीवाल यांचा बचाव मांडत होते. नितीन गडकरी यांच्या विरोधातल्या बेताल आरोपासाठी खटला भरला गेला, तेव्हा केजरीवाल यांच्या विरोधात समन्स निघाले होते. त्यात हजेरी लावली नाही म्हणून त्यांच्या विरोधात कोर्टाने वॉरन्ट काढले होते. त्यावेळी हजेरी लावली तरी जामिन घेण्यास त्यांनी नकार दिला. कायदा धाब्यावर बसवून कोर्टावरही दबाव आणण्याचा पोरकटपणा त्यांनी करून बघितला. भ्रष्टाचाराचे आरोप गडकरींवर असल्याने कोर्टाने त्यांच्याकडून जामीन घ्यावा, अशी या महाशयांची मागणी होती. म्हणजे आपल्या आरोपांना सिद्ध करण्याची जबाबदारी घ्यायची नाही आणि त्याचे पुरावे कोर्टाने मागितले तर कांगावा करायचा, हा खेळ जुनाच आहे. अखेरीस कोर्टाने जामिनाअभावी कोठडीत बसायची वेळ आणल्यावर अक्कल ठिकाणी आली होती. प्रशांत भूषण यांच्यासारखा बुद्धीमान वकीलही काही करू शकला नाही. पण आपल्या त्या पापाची किंमत भूषण यांना लौकरच मोजावी लागली. कारण एकेदिवशी तोच कांगावखोरपणा भूषण व योगेंद्र यादव यांच्यावरही उलटला आणि पक्षाच्या बैठकीतून त्याच दोघा ज्येष्ठ सहकार्‍यांवर जीव मुठीत धरून पळ काढण्याची वेळ आली. अर्थात केजरीवाल यांचे पक्षात काही नुकसान झाले नाही. पण आता इतके दिवस उलटल्यावर त्यांना भूषण सोबत नसल्याची झळ लागलेली आहे. गडकरी यांच्याप्रमाणेच भाजपाचे दुसरे मंत्री अरूण जेटली यांच्यावरही केजरीवालनी बेताल आरोप केले होते व त्यांनीही कोर्टाचे दार ठोठावल्याने नामवंत वकीलाची उणिव केजरीवालना नव्या अडचणीत घेऊन गेली.

केजरीवाल यांच्या कुठल्याही आरोपात तथ्य नसते आणि आरोपाची राळ उडवून देत प्रसिद्धी मिळवणे, हा त्यांचा छंद झालेला आहे. म्हणूनच त्यांनी दिल्लीच्या क्रिकेट संस्थेच्या आडोशाने जेटली यांच्यावर बेताल आरोप केलेले होते. त्यांच्यावर बदनामीचा खटला जेटलींनी भरला आहे. कोर्टात नुसते आरोप नव्हेतर युक्तीवाद व पुरावे आवश्यक असतात. तिथे टोलवाटोलवी चालत नाही. म्हणूनच केजरीवाल यांना कुणी जाणता वकील करणे भाग होते. त्यांनी जेटलींवर डुख धरून बसलेल्या राम जेठमलानी यांना आपली बाजू मांडण्यासाठी विनंती केली. त्यातही काही गैर नाही. पण केजरीवालना कुठलेही नियम सभ्यता संकेत मान्य नाहीत. म्हणूनच त्यांनी आपल्यावर व्यक्तीगत असलेल्या खटल्याचा खर्च सरकारच्या माथी मारण्याचा नवा विक्रम करून दाखवला आहे. मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असला म्हणून त्याचा सगळाच खर्च सरकारी तिजोरीतून भरला जात नाही. सरकारचे कर्तव्य पार पाडले जात असताना काही घडले असल्यास, त्याचा खर्च सरकार उचलते. पण जेटली यांच्यावर व्यक्तीगत स्वरूपाचे बेताल आरोप, हे सरकारी काम नव्हे किंवा सरकारी धोरण नव्हे. म्हणूनच त्यासाठी केजरीवाल यांच्यावर भरलेला खटला व्यक्तीगत आहे आणि त्यासाठी खर्च होणारा पैसा सरकारने कशाला भरावा? पण केजरीवालनी त्या खटल्यातील वकीलाचे बिल सरकारला पाठवले आहे. जेठमलानी एक दिवस कोर्टात उभे रहाण्यासाठी बत्तीस लाख रुपये वसुल करतात आणि ती किंमत सरकार म्हणजे दिल्लीच्या जनतेने मोजावी, अशी केजरीवाल यांची अपेक्षा आहे. बदल्यात दिल्ली कचर्‍यात सडते आहे. रोगांनी ग्रासलेली आहे. त्यासाठी सरकारकडे पैसा नाही. पण केजरीवाल यांच्या बेताल बडबडीचा बचाव मांडायला मात्र दिल्ली सरकारने कोट्यवधी रुपये खर्चायचे आहेत. याला बेशरमपणा व दिवाळखोरीची परिसीमा नाहीतर दुसरे काय म्हणायचे?

No comments:

Post a Comment