Sunday, April 9, 2017

हिंदू व्होटबॅन्क तयार होतेय

Image result for yogi adityanath photos

भाजपाने उत्तरप्रदेश निवडणूकीत लोकसभा असो किंवा विधानसभा असो, एकही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले नाही, म्हणून खुप गाजावाजा झालेला होता. तसेच उत्तरप्रदेशचे प्रभारी सरचिटणिस म्हणून तिकडे पोहोचलेले अमित शहांनी अयोध्येला भेट दिली, म्हणजे रामजन्मभूमी हाच भाजपाचा अजेंडा असल्याचा गवगवा पत्रकार माध्यमांनी केला होता. पुरोगामी पक्षांनी तो उचलून धरला. मुस्लिम मतांसाठी मुस्लिम नेत्यांनी व पुरोगामी पक्षांनी त्याचे काहुर माजवले. पण प्रत्यक्षात भाजपाचा कोणी नेता वा मोदींनी आपल्या प्रचारात कुठेही धर्म किंवा मंदिराचा विषय आणलेला नव्हता. याचा अर्थ या दोघांसह भाजपाचा तो अजेंडाच नाही, असे होऊ शकत नाही. त्या पक्षाने मंदिराविषयीची आस्था कधी लपवलेली नाही. पण ते काम अन्य पुरोगामी पक्ष करणार असतील, तर त्यात आपल्या शक्तीचा व्यय करण्याची भाजपाला गरज नव्हती. आपली शक्ती मग मोदी-शहांनी ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणेच्या भोवती केंद्रित केली आणि हिंदूत्वाचा प्रचार पुरोगामी मंडळींकडे सोपवला. त्यामुळेच एकट्या उत्तरप्रदेशात भाजपाला ७३ जागा जिंकणे शक्य झाले. त्यात आपण कुठे चुकलो नाही, याचे आत्मपरिक्षण तथाकथित पुरोगाम्यांनी केले नाही. म्हणूनच नंतर विधानसभेतही आपली रणनिती बदलण्याची भाजपाला गरज भासली नाही. त्यांनी आधी पुरोगामी पक्षांचा अजेंडा निश्चीत केला आणि नंतरच भाजपाला सत्तेपर्यंत घेऊन जाण्याची रणनिती तयार केली. दोन्ही वेळा मोदी-शहा आपल्या डावपेचात यशस्वी झाले. त्याचे सर्वात मोठे श्रेय पुरोगामी मंडळींना जाते. आता त्याच पुरोगामी कष्टकर्‍यांना या जोडगोळीने भारताला हिंदूराष्ट्र बनवण्याच्या कामाला जुंपले आहे. त्यासाठीची हिंदू व्होटबॅन्क उभारण्याचे काम आता जोमाने पुरोगामी पक्ष व नेत्यांनी सुरू केले आहे. जे रा. स्व. संघाला पाऊणशे वर्षात साधले नाही, ते पुरोगाम्यांनी चार वर्षात करून दाखवले आहे.

लोकसभेचे निकाल लागण्यापर्यंत एक सिद्धांत देशातले बहुतेक राजकीय पंडित अगत्याने मांडत होते. मुस्लिम समाजाला दूर ठेवून भारताची सत्ता कुठलाही पक्ष मिळवू शकत नाही. याच्यामागे मुस्लिम ही व्होटबॅन्क असल्याचा एक सिद्धांत कायम राहिलेला आहे. मुस्लिम एकगठ्ठा मतदान करतात, हे आता राजकीय अभ्यासकांच्या मनात इतके बिंबले आहे, की तसे होत नसेल, तरी त्याच भूमिकेतून विवेचन होत असते. काहीसे तथ्य त्यात आहे. कारण मुस्लिमांच्या मनात दिर्घकाळ भाजपा म्हणजे हिंदूत्ववादी पक्ष आणि तो सत्तेत आल्यास हिंदूराष्ट्र होऊन मुस्लिमांची सार्वजनिक कत्तल होईल, असे भरवले गेले होते. पण वास्तवात गुजरात दंगलीने त्या गृहीताचा बुरखाच फ़ाडून टाकला. पहिल्या पाच वर्षात मोदींना सैतान रंगवून देशभरच्या पुरोगामी राजकारणाने मुस्लिमांची मते मिळवली. पण हळुहळू गुजरातचे वास्तव सर्वांच्या समोर येत गेले. गुजरातमध्ये २००२ नंतर कुठली दंगल झाली नाही, की मुस्लिमांना तिथे कुठला त्रास झाला नाही. ते सत्य दडपून ज्या भयावह कथा रंगवल्या जात होत्या, त्याला गुजरातमध्ये जाऊन येणार्‍यांच्या कथनातून छेद मिळत होता. म्हणूनच गुजरात दंगलीला बारा वर्षे पु्र्ण झाल्यावर देशाच्या कानाकोप‍र्‍या मोदींची लोकप्रियता वाढलीच. पण अगदी मुस्लिम समाजातही फ़ेरविचार सुरू झालेला होता. एका बाजूला असे होत असताना, अकारण हिंदू दहशतवादाचे काहुर माजवल्याने हिंदू समाजातही पुरोगामी बेतालपणाविषयी फ़ेरविचार सुरू झाला होता. कारण मध्यंतरीच्या अतिरेकाने मुस्लिम समाज पुरोगाम्यांपासून दुरावत होता आणि त्याला आपल्याच जवळ राखण्यासाठी पुरोगामी मंडळी मुल्लामौलवी व जिहादींच्या अधिकाधिक आहारी गेली. याचा एकत्रित परिणाम म्हणून एकीकडे मुस्लिम व्होटबॅन्क दिवाळखोर होत गेली आणि प्रतिक्रीया म्हणून हिंदू व्होट्बॅक उदयास येत गेली.

२०१२ सालात उत्तरप्रदेश विधानसभेत विविध पक्षाचे ६८ मुस्लिम आमदार निवडून आले आणि सहसा इतके मुस्लिम तिथे कधीच निवडून आलेले नव्हते. ही बाब नंतर विविध जातीपातीच्या राजकारणात विखुरलेल्या हिंदू समाजाला खटकलेली होती. त्यातूनच हिंदू म्हणून पक्षीय मतभेद बाजूला राखण्याच्या मानसिकतेला खतपाणी मिळत गेले. भाजपाने त्याला खतपाणी घातले नव्हते. पण त्या राज्यातील वा अन्यत्र मुस्लिमांना मिळणारे झुकते माप, हिंदूंपैकी अनेकांना खटकू लागले होते. त्याचा विचार सुरू झाला होता. अशावेळी आपल्या हिंदू असण्याविषयी ठामपणे उभा राहिलेला भाजपा, एकमेव हिंदूंचा पक्ष बनत गेला आणि क्रमाक्रमाने हिंदू समाज त्याच्याकडे आकर्षित होत गेला. विद्यापीठातील वा काश्मिरातील पाकिस्तानवादी घोषणा किंवा भारतविरोधी डरकाळ्यांना पुरोगाम्यांनी राजरोस पाठींबा देण्यातून अधिकाधिक हिंदू विचलीत होत गेला. पर्यायाने राष्ट्रवादी असलेल्या भाजपाकडे झुकत गेला. आपल्या चतुर शब्दातून व भाषणातून मोदींनी जिहादी, राष्ट्रद्रोही व पुरोगामी अशांची इतकी बेमालूम सांगड घातली, की पुरोगामी मंडळी, त्याचा इन्कारही करण्याच्या स्थितीत राहिली नाहीत. परिणामी राष्ट्रवादी म्हणजे हिंदू म्हणजे भाजपा; असे समिकरण पुरोगाम्यांनीच लोकांना निर्माण करून दिले. भारत नावाचा खंडप्राय देश अखंड व सुरक्षित राखायचा असेल, तर त्याला धोका पुरोगाम्यांपासून असल्याचे त्यांनीच प्रत्यक्ष कृतीतून दाखवण्याचे काम हाती घेतले. भाजपा वा संघ विरोध टोकाला घेऊन जाताना आपण प्रत्येक देशप्रेमी व्यक्तीला भाजपाच्या गोटात ढकलतोय, याचेही भान यापैकी कोणाला राहिले नाही. मोदींना हिंदूत्ववादी भाषणे देण्याची गरज नव्हती. कारण पुरोगाम्यांनी स्वत:ला पाकिस्तानवादी ठरवुन घेण्याची जणू स्पर्धाच आरंभली होती. त्याचा प्रारंभिक परिणाम लोकसभेत दिसला आणि विधानसभेत व्यापक परिणाम समोर आला आहे.

मोदींनी ज्यासाठी किंचितही श्रम घेतलेले नाहीत, इतकी झकास हिंदू व्होटबॅन्क पुरोगाम्यांनी मोदींना आयती बनवून दिलेली आहे. तीन वर्षे केंद्रातील सरकार चालवताना मोदींनी कुठलाही धार्मिक भेदभाव केला नाही, की मुस्लिम विरोधात चकार शब्द उच्चारला नाही. म्हणूनच मुस्लिमातही चलबिचल सुरू झाली आहे. त्यात पुन्हा एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिली नसतानाही भाजपा इतके प्रचंड बहूमत उत्तरप्रदेशात मिळू शकल्याने मुस्लिम व्होटबॅन्क असल्याच्या भ्रमातून मुस्लिमांना बाहेर पडण्याची गरज भासू लागली आहे. कारण दहा टक्के असो की वीस टक्के असो, त्यांच्या मतांचा प्रभाव नगण्य असल्याचेच निकालांनी सिद्ध केले आहे. किंबहूना या निकालांनी मुस्लिमांपेक्षाही प्रभावी अशी हिंदू व्होटबॅन्क मोदींना यश मिळवून देत असल्याचे दिसून आलेले आहे. अजून कोणी राजकीय पंडित तसे बोलू शकलेला नसला, तरी मुस्लिमात त्यामुळेच चलबिचल सुरू झाली आहे. अशीच राजकीय वाटचाल सुरू राहिली, तर हिंदू व्होटबॅन्क मोदींना संसदेत अफ़ाट बहूमत मिळवून देऊ शकेल आणि त्यानंतर घटनात्मक मार्गानेही भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यात कुठली अडचण शिल्लक उरणार नाही. हे अनेक जाणत्या मुस्लिमांच्याही लक्षात आलेले असावे. त्यामुळेच आता असे काही मुस्लिम घटक पुरोगामीत्वाला झुगारून भारतीय राष्ट्रवादाकडे झुकू लागले आहेत. त्याची पहिली प्रचिती शिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या बैठकीत आलेली आहे. एका बाजूला गोमांस व तिहेरी तलाकविषयी पुरोगामी अश्रू ढाळत असताना, शिया धार्मिक नेत्यांनी त्याच तथाकथित हिंदूत्वाच्या अजेंड्याचे ठराव करून समर्थन केलेले आहे. भारतात असे सहसा झालेले नाही. हा चमत्कार मोदींनी घडवला असे अनेकजणांना वाटेल. पण त्याचे खरे श्रेय पुरोगामी अतिरेकी मुर्खपणाला द्यावे लागेल. कारण चमत्कार हिंदू व्होटबॅन्केने घडवला व त्याचे निर्माते पुरोगामी लोक आहेत.

मुस्लिम हा जात्याच आक्रमक व धर्मांध असतो, यात शंका नाही. पण म्हणून प्रत्येक मुस्लिम तसाच असतो असेही नाही. मुठभर मुस्लिम तितके धर्मांध व आक्रमक असतात. पण पुरोगाम्यांनी अशाच लोकांना हाताशी धरून एकूण मुस्लिम समाजालाच संशयास्पद करून टाकल्यामुळे, आज हिंदू समाजाच्या मोठ्या लोकसंख्येत आशंका निर्माण झाल्या. त्याची प्रतिक्रीया म्हणून हिंदूत्ववादी पक्षाकडे अधिकाधिक लोकसंख्या वळत गेली. आपल्या आसपासच्या मुस्लिमाविषयी मनात कुठलेही किल्मीष नसून सुद्धा मोठ्या संख्येने हिंदू आपली तटस्थता सोडून हिंदूत्वाकडे वळू लागला आहे. रा. स्व. संघाने हिंदूत्व रुजवण्यासाठी कित्येक दशके प्रयास करूनही त्यांना इतके मोठे यश मिळालेले नव्हते. आज संघालाही हिंदूत्वाचा प्रचार करावा लागत नाही. पुरोगाम्यांनी दुखावलेले वा भयग्रस्त केलेले हिंदू गोळा करत गेल्यानेही संघाचे हिंदूंना संघटित करण्याचे काम सोपे होऊन गेलेले आहे. त्यासाठी वापरलेली मोडस ऑपरेन्डीही किरकोळ आहे. पुरोगाम्यांनी तुटून पडावे, असे मुद्दे त्यांना मोदी वा भाजपाने सातत्याने पुरवलेले आहेत. उत्तरप्रदेश विधानसभा प्रचारात मोदींनी धर्मानुसार पक्षपात होऊ नये, असे बोलताना धर्माचा उल्लेख आला होता. कबरस्तान उभारले जात असेल तर स्मशानाचीही सोय व्हायला हवी. वीजपुरवठा करताना रमझान इतकेच अगत्य दिवाळीच्या वेळीही दाखवले गेले पाहिजे. असे मोदी म्हणाले तेव्हा पक्षपात करण्याची भूमिका त्यांनी मांडली नव्हती, तर समान न्यायाची गरज प्रतिपादन केलेली होती. तर पुरोगाम्यांनी त्यालाच धार्मिक पक्षपात ठरवून कल्लोळ केला. वास्तव काय होते? समाजवादी सरकारच्या कारकिर्दीत हिंदूंना पक्षपाती वागणूक मिळत होती आणि त्यावर मोदींनी न्याय्य मागणी केली होती. त्यावरच पुरोगामी तुटून पडले, तर त्याचा अर्थ काय होतो?

हिंदूंच्या न्यायाची गोष्ट करणेही पुरोगामी राज्यात गुन्हा असतो, असाच अर्थ झाला ना? मोदींनी तसा उघड आरोप केला नाही. पण आपल्यावर पुरोगाम्यांनी त्यासाठी तुटून पडावे, म्हणूनच मोदी असे बोलले होते. त्याला विरोध झाला, मग अशा पक्षपाताच्या अनुभवातून गेलेले हिंदू लोक आपोआप आपल्या बाजूने येतील, याची मोदींना खात्री होती. त्यांनी हिंदू म्हणून मते मागितली नाहीत. पण हिंदूंना न्याय देण्याच्याही पुरोगामी लोक विरोधात असल्याचे सुचित केले आणि पुरोगाम्यांनी आपल्या सेक्युलर प्रतिक्रीयेने मोदींना खरे करून टाखवले. गेल्या दहा वर्षात अशाच प्रकारे मोदींनी पुरोगाम्यांवर हिंदू व्होटबॅन्क उभारण्याचे काम सोपवले आहे आणि निरपेक्षपणे पुरोगामी नेते, पक्ष व विचारवंत, आपले कर्तव्य पार पाडत आहेत. विश्वनाथन नावाचे एक पुरोगामी अभ्यासक विचारवंत आहेत. २०१४ मध्ये मोदींनी लोकसभेत बहूमत संपादन केल्यावर त्यांनीच ही प्रक्रीया कशी चालू आहे, त्याचे संगतवार विवेचन करणारा लेख ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकात लिहीला होता. पण अजून त्यांच्यात सुधारणा झालेली नाही, की अन्य पुरोगामी आपल्या चुका सुधारायला राजी नाहीत. आपल्या कारभारात कोणवरही अन्याय होऊ नये, याची काळजी मोदी कटाक्षाने घेत असतात. हिंदूंवर अन्याय होणार नाही याचीही भाषा बोलत असतात. मुस्लिमांना व्होटबॅन्क म्हणून वापरण्याच्या विरोधात मोदी बोलतात. त्यातूनच तिहेरी तलाकचा विषय पुढे आणला गेला आहे. मुस्लिम स्त्रियांची दुर्दशा हे पुरोगाम्यांचे पाप ठरवण्याची चलाखी त्यांनी चतुराईने समोर आणली आहे. शिया-सुन्नी बेबनाव आणि मुस्लिम महिलांचे दुखणे, मोदींनी आपल्या हिंदू राजकारणाची कवचकुंडले बनवली आहेत. त्यातून परस्पर उभ्या रहाणार्‍या हिंदू व्होटबॅन्केचा राजकीय लाभ त्यांना मिळत चालला आहे. त्याचे भय आता बंगालमध्ये ममतांनाही रामनवमी साजरी करायला भाग पाडते आहे.

संघ वा भाजपा यांच्या द्वेषातून वहावत गेलेल्या पुरोगाम्यांना, आपण कधी राष्ट्रद्रोही वा जिहाद समर्थक झालो, त्याचाही बोध अजून झालेला नाही. आपल्याला विरोध करण्यापेक्षा आपलाही प्यादे मोहर्‍याप्रमाणे मोदी वापर करतात, हे अशा शहाण्य़ांच्या लक्षात येऊ शकलेले नाही. त्यामुळे वेळोवेळी मोदींना टोकाचा विरोध करण्याच्या नादात याच पुरोगाम्यांनी मोदींना हिंदू व्होटबॅन्क उभारून दिली आहे. त्या व्होटबॅन्केचे स्वरूप व त्यातून आलेले निवडणूकीचे निकाल बघून, मुस्लिम समाजातही गडबड सुरू झाली आहे. ज्या व्होटबॅन्केवर पुरोगामी विसंबून असतात, तिची दिवाळखोरी मुस्लिमानाच भेडसावू लागली आहे. आपल्या प्रतिकारात हिंदू व्होटबॅन्क उभी राहिली तर आपल्याला या देशात मुस्लिम म्हणून जगणेही अवघड होईल, हे मुस्लिमांना जाणवू लागलेले संकट आहे. अर्थात अजून हिंदू व्होटबॅन्क १५-२० टक्के मतांची झाली असेल, असे कोणी म्हणू शकत नाही. पण प्रत्येक निवडणूकीतून तिचा प्रभाव वाढताना दिसतो आहे. मध्यप्रदेश वा राजस्थानात एकही मुस्लिम विधानसभेत पोहोचला नव्हता. पण तिथे मुस्लिम लोकसंख्या दहा टक्केपेक्षा कमी आहे. उत्तरप्रदेशात १८-१९ टक्के लोकसंख्या असूनही मुस्लिमांना नगण्य प्रतिनिधीत्व मिळाले आहे. त्यामुळे आता भविष्यात पुरोगामी पक्षांकडे अपेक्षेने बघण्याची स्थिती राहिलेली नाही. त्यामुळेच आपले राजकीय प्रतिनिधीत्व टिकवण्यासाठी मुस्लिमांना भाजपाकडे वळणे भाग होणार आहे. पण दरम्यान मुस्लिम धार्जिणेपणा म्हणजेच पुरोगामीत्व, अशा वेडाचारात भरकटलेल्या पुरोगामी पक्षाचे अस्तित्वही धोक्यात येणार आहे. कारण मुस्लिमांना अन्य कुठल्याही पक्षात स्थान असेल व प्रतिनिधीत्वही मिळू शकेल. पण पुरोगामी विचारवंर व पक्षांचे काय होईल? मुस्लिम व्होटबॅन्क दिवाळखोरीत गेली व हिंदू व्होटबॅन्कच तेजीत येत गेली, तर पुरोगाम्यांचे भवितव्य काय असेल?

2 comments:

  1. भाऊ जी, खूपच सुंदर विश्लेषणात्मक वाचनीय लेख.

    ReplyDelete
  2. भाऊ काँग्रेस ने प्रशांत किशोर वगैरे मंडळींना बाजूला करून तुम्हाला राणांनीतिकार नियुक्त करायला पाहिजे.
    मी देवाजवळ प्रार्थना करतो की तुमचे लेख पुरोगाम्यांनी कधीही वाचू नयेत नाहीतर हे सर्व वाचून त्यांचे डोळे उघडले तर मोदींच्या अडचणी अजून वाढतील.

    ReplyDelete