Tuesday, May 16, 2017

गुजरात कॉग्रेसला घरघर


modi vaghela के लिए चित्र परिणाम
उत्तरप्रदेश विधानसभेसह उत्तराखंडात सपाटून मार खाल्यावर अकस्मात कॉग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी जनतेच्या नजरेतून अंतर्धान पावले आहेत. विधानसभा निवडणूक काळात कुठल्याही लहानसहान बाबतीत तात्काळ हजेरी लावणारे राहुल गांधी, अलिकडे फ़ारसे कुठल्या कार्यक्रमात दिसले नाहीत. दिल्लीच्या पालिका निवडणूकांकडे तर त्यांनी ढुंकून पाहिले नाही. तिथे पक्षात बेबंदशाही माजलेली असताना व अनेक नेते पक्षाला रामराम ठोकत असतानाही, राहुलना त्यात लक्ष घालावेसे वाटलेले नाही. बरखा सिंग नावाच्या एका महिला नेत्याने राहुलच्या निवासस्थानी तिकीट वाटपात गोंधळ झाल्यामुळे दाद मागण्यासाठी महिलांचा मोर्चा आणलेला होता. त्यांनाही भेट देण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले नाही. त्यामुळे वैतागलेल्या बरखा सिंग यांनी कॉग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. इतरही नेते पक्ष सोडून गेले. पण राहुल गांधींना काही पाझर फ़ुटला नाही. अशा राहुल गांधींनी आता येऊ घातलेल्या अनेक विधानसभाच्या निवडणूकांची तयारी चालवली असल्याच्या बातम्या आहेत. त्यात हिमाचल प्रदेश, कर्नाटक व गुजरात अशा काही महत्वाच्या राज्यांचा समावेश आहे. त्यात गुजरात वगळता अन्य दोन राज्यात कॉग्रेसपाशी सत्ता आहे आणि त्याही गमावण्य़ाची तयारी राहुल करीत आहेत किंवा काय, अशी अनेक कॉग्रेस नेत्यांना शंका येऊ लागली आहे. कारण राहुलनी आता त्या अनेक राज्यात संघटनात्मक फ़ेरबदल करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली मतदाराला सामोरे न जाण्याची नवी रणनिती आखलेली आहे. तर गुजरातमध्येही नवे चेहरे पुढे आणण्याचा विचार केला आहे. अशा स्थितीत कॉग्रेसचे भवितव्य काय असेल? कारण गुजरातमधून येणार्‍या बातम्या विपरीत शक्यतांची चिन्हे दाखवित आहेत. पक्षात तिथे मोठी फ़ुट पडण्य़ाच्या बातम्या धक्कादायक आहेत.

दोन दशकांपुर्वी गुजरातमध्ये नरेंद्र मोदींचे नावही ऐकायला मिळत नव्हते. तिथे केशूभाई पटेल व शंकरसिंग वाघेला अशा दोन दिग्गज नेत्यांमध्ये हमरातुमरी रंगलेली होती. त्यात मोदी ढवळाढवळ करतात, असाही आरोप झाला होता. म्हणून मोदींना गुजरातमधून बाहेर काढून दिल्लीतील संघटनात्मक कामाची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. भाजपाचा गुजरातमध्ये पाया घालण्यासाठी मोदी व वाघेला अशा दोन तरूणांनी आपली उमे़द खर्ची घातली होती. पण १९९५ सालात भाजपाला स्वबळावर तिथे बहूमत मिळाल्यानंतर मात्र सत्तासंघर्ष उफ़ाळून आला होता. मुख्यमंत्री पदावर डोळा ठेवून असलेल्या शंकरसिंग वाघेलांना तशी संधी मिळाली नाही. म्हणून त्यांनी पक्षात गटबाजी सुरू केली आणि बहूमत मिळूनही वारंवार भाजपा स्थीर सरकार स्थापन करू शकला नाही. एकदा वाघेलांनी केशूभाईंना धडा शिकवण्यासाठी गटबाजीचे नाटक रंगवले, तर नंतर पक्षाच्या आमदारात फ़ुट पाडून वेगळी चुल मांडली. कॉग्रेसच्या मदतीने काही काळ मुख्यमंत्रीपदही उपभोगले आणि पुढल्याच निवडणूकीत पुन्हा भाजपाने बहूमत संपादन केल्यावर वाघेलांचा विषय निकालात निघाला होता. पण त्यांचा राज्यात दबदबा होता आणि कॉग्रेसपाशी कोणी नाव घेण्यासारखा नेता उरलेला नव्हता. म्हणूनच कॉग्रेसने वाघेलांना उधारीवर पक्षात आणून त्याच्याकडेच सुत्रे सोपवली. त्यातच नरेंद्र मोदींचा निवडणुकीच्या राजकारणात उदय झाला. केशूभाईंना वाघेला गेल्यावरही कारभार चालवता आला नाही आणि अन्य प्रतिस्पर्धी निर्माण झाले. तेव्हा राज्याच्या स्पर्धेत नसलेला कोणी तटस्थ नेता पुढे करण्याचा निर्णय झाला आणि नरेंद्र मोदी अकस्मात गुजरातचे मुख्यमंत्री झाले. साधा आमदार वा नगरसेवक असाही अनुभव गाठीशी नसलेला हा नेता, थेट मुख्यमंत्री झाला. उलट वीस वर्षात महत्वाकांक्षी वाघेला कुठल्या कुठे फ़ेकले गेले आहेत?

आज त्यांच्याच हाती गुजरातच्या कॉग्रेसची सुत्रे आहेत. गेली निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढली गेली आणि त्यातही तिसर्‍यांदा भाजपाला निर्णायक बहूमत मिळवून देत, मोदींनी थेट पंतप्रधान पदावर झेप घेतली. खरे तर तेव्हापासूनच वाघेला विचलीत झालेले होते. आता गुजरातमध्ये ते विरोधी नेता आहेत आणि त्यांच्या समोरच राजकारणाचे धडे गिरवणारी मुले सत्तेत आहेत. त्याचे वैषम्य त्यांना वाटत असेल तर नवल नाही. आपली सद्दी संपली, हे मान्य करून मुलाची कुठेतरी व्यवस्था लावण्याच्या व्यथेने त्यांना व्याकुळ केले असावे. बहूधा त्यामुळेच आता त्यांनीही घरवापसीचा विचार केलेला असू शकतो. कारण कॉग्रेस पक्षाला देशात वा गुजरातमध्ये भवितव्य नाही, अशी त्यांनाही खात्री पटलेली असावी. मग उतारवयात झुंजत बसण्यापेक्षा आपल्या पुढल्या पिढीला भाजपात धाडून त्याच्या महत्वाकांक्षेला खतपाणी घालण्याचा त्यांचा विचार असू शकतो. लौकरच वाघेलांनी कॉग्रेस सोडली व त्यांच्या मुलाने भाजपात प्रवेश केला; अशी बातमी झळकू शकते. तशी लक्षणे दिसू लागली आहेत. एका बातमीनुसार वाघेला यांनी ट्वीटर खात्यातून कॉग्रेस व राहुल यांची साथ सोडल्याची बातमी, त्याचा संकेत आहे. येत्या डिसेंबर महिन्यात गुजरात विधानसभेची मुदत संपणार असून, त्याच्या आसपास तिथल्या निवडणूका अपेक्षित आहेत. पण विरोधकांना गाफ़ील ठेवण्यासाठी भाजपा आधीच विधानसभा बरखास्त करून लौकर मतदान उरकण्याच्याही विचारात असल्याच्याही बातम्या आहेत. त्यासाठीच राहुल नव्या मांडणीत गुंतले आहेत. त्यात गुंतून पडण्यापेक्षा वाघेलांनी वेगळा मार्ग चोखाळण्याची तयारी केलेली असावी. याला राहुल प्रभाव म्हणतात. ‘ना मै कुछ करूंगा, ना और किसीको कुछ करने दुंगा’ ही राहुल गांधींची रणनिती झाली आहे. त्यामुळेच एकामागून एक नेतेही कॉग्रेसला रामराम ठोकत आहेत.

सवाल गुजरातचा नाही. बाकी देशात कॉग्रेसला फ़ारशी शक्ती राहिलेली नाही. पण जिथे आजही भाजपा सत्तेत आहे पण विरोधातला प्रमुख पक्ष कॉग्रेसच आहे, तिथे पक्षाला नव्याने आरंभ करणे शक्य आहे. त्यात कर्नाटक गुजरात अशा राज्यांचा समावेश होतो. बाकीच्या प्रांतामध्ये प्रादेशिक पक्षांना तोंड देत भाजपा आपले हातपाय पसरतो आहे. त्याच्याशी झुंज देऊ शकेल, असा दुसरा कुठलाही राष्ट्रीय पक्ष अस्तित्वात नाही. कम्युनिस्ट, राष्ट्रवादी वा बसपा असे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेले आहेत. पण त्यांचा व्याप नामधारी आहे. तांत्रिक कारणास्तव त्यांना राष्ट्रीय मानले जाते. चार राज्यात मान्यता असण्याइतकी मते मिळाली, तर राष्ट्रीय पक्ष मानले जाते. पण कॉग्रेसचे तसे नाही. मुठभर किरकोळ राज्यात कॉग्रेस सत्तेत असेल वा उर्वरीत राज्यात नगण्य पक्ष असेल. पण कॉग्रेस संघटना व ठराविक मतदार प्रत्येक राज्यात याच पक्षापाशी आहे. म्हणूनच भाजपाला राष्ट्रीय आव्हान ठरू शकेल, असा कॉग्रेस वगळून अन्य कुठलाही पक्ष नाही. लहानसहान पक्षांच्या आघाड्या करून सत्ता किरकोळ प्रमाणात मिळवता येईल. पण त्याला राजकीय आव्हान म्हणता येत नाही. लालू-नितीशच्या कृपेने बिहारमध्ये मिळणारी सत्तापदे, किंवा मार्क्सवादी पक्षाच्या मेहरबानीने बंगालमध्ये लाभलेले यश आणि उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षासोबत जाऊनही आलेले अपयश; त्याचाच पुरावा आहे. अशा पक्षात वाघेला किंवा कोणलाच भवितव्य असू शकत नाही. त्यासाठी मुळापासून आरंभ करावा लागेल. निवडणूका आल्यावर थातूरमातूर उपाय योजून काहीही साध्य होणार नाही. वाघेला यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याला ते उमजले असेल, तर त्याने मुलासाठी पक्षांतराचा पवित्रा घेतल्या़स चुक ठरवता येणार नाही. कारण जोवर राहुल सोनियांपासून कॉग्रेस पक्षाची मुक्तता होत नाही, तोवर त्या पक्षाला भवितव्यच उरलेले नाही.

No comments:

Post a Comment