Saturday, May 27, 2017

राष्ट्रपती निवडणूक

opposition meeting sonia के लिए चित्र परिणाम

मोदी सरकारच्या तीन वर्षाच्या सोहळ्याच्या दिवशीच कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी विरोधकांची एक खास बैठक संसद भवनाच्या एका दालनात बोलावलॊ होती. त्यात नाव घेण्यासारख्या एकट्य़ा ममता बानर्जी उपस्थित होत्या. बाकीचा गोतावळा पराभूतांचा होता. त्यात नुकत्याच उत्तरप्रदेशात मार खाल्लेल्या मायावती होत्या, तसेच अव्वाच्या सव्वा बोलून तोंडाची वाफ़ दवडणारे समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील नेते रामगोपाल यादवही सहभागी झाले होते. त्या दोघांची आजच्या संसदेत व विधानसभेत शक्ती किती उरली आहे? त्याखेरीज डाव्यांची उपस्थिती होती आणि अन्यही काही प्रादेशिक नेत्यांचा समावेश होता. आगामी राष्ट्रपती निवडणूकीचा आपला उमेदवार ठरवण्यासाठी सोनियांनी ही बैठक योजल्याचे सांगितले जात होते. उमेदवार ठरवायला बैठक लागत नाही. विद्यमान राष्ट्रपती प्रणबदा मुखर्जी वा त्यांच्याही आधीच्या प्रतिभा पाटिल, यांना त्या पदाचे उमेदवार सोनियांनीच बनवलेले होते. तेव्हा यापैकी कुठल्याही विरोधी नेत्यांना विश्वासात घेतले नव्हते, किंवा त्यासाठी अशी बैठक बोलावली नव्हती. २००७ सालात सोनियांनी आधी शिवराज पाटिल यांचे नाव निश्चीत केले होते. पण त्यावरून डाव्यांनी काहुर माजवले म्हणून मग ऐनवेळी राजस्थानच्या राज्यपाल प्रतिभा पाटिल यांना दिल्लीला आमंत्रित करण्यात आले. त्यासाठी सोनियांनी कुठल्या बैठका बोलावल्या होत्या? त्यांना तशी गरजही वाटलेली नव्हती. कारण त्यांनी कोणालाही शेंदूर फ़ासला तरी तोच राष्ट्रपती म्हणून निवडून येणार; याची त्यांना खात्री होती. सहाजिकच अशा विविध पक्ष वा नेत्यांच्या बैठकीची त्यांना गरज वाटली नव्हती. पण आज वाटली आहे, कारण आपला उमेदवार निवडून येणार नसल्याचा आत्मविश्वासच सोनियांना आहे. म्हणूनच त्यांनी अशी बैठक घेऊन आपल्या सुपुत्राच्या भवितव्याची सांगड घालण्याचा डाव खेळला आहे.

राष्ट्रपती पदाची निवडणूक ज्या मतदारसंघातून होते, त्याचे मतदार हे खासदार व आमदार असतात. एकूण मतांपैकी अर्धी मते संसद सदस्यांची असतात आणि अर्धी सर्व विधानसभा सदस्यांमध्ये वाटली गेलेली असतात. त्यामुळे सर्व संसद सदस्यांचे मतमूल्य सारखे असले, तरी प्रत्येक विधानसभेनुसार आमदाराने मतमूल्य बदलत असते. अशी एकूण मते १०, ९८, ८८२ इतकी आहेत. त्यांची विभागणी केल्यास आजघडीला ५ लाख २७ हजार ३७१ इतकी मते मोदीप्रणित एनडीए गटाकडे आहेत. तर सोनिया प्रणित युपीए आघाडीकडे अवघी १ लाख ७३ हजार ८४९ मते आहेत. खेरीज ज्यांना युपीएचे मित्र मानले जाते, अशा मोदीविरोधी पक्षांपाशी २ लाख ६० हजार ३९२ मते आहेत. याचा अर्थच युपीएपेक्षाही अधिक मते अन्य मोदी विरोधकांपाशी आहेत. तरीही मोदी विरोधाचा मुद्दा घेऊन त्यांची बेरीज केल्यासही एनडीएच्या जवळपास पोहोचत नाही. दोघांमध्ये लाखाच्या आसपास मतांचा फ़रक उरतो. म्हणजेच मोदी सरकारचे पारडे जड आहे. पण याही क्षणी एनडीएपाशी बहूमत होऊ शकेल इतकी मते नाहीत. साधारण वीस हजार मते भाजपाच्या गोटात कमी आहेत. पण अशा दोन गटांच्या पलिकडे तटस्थ मानावे असेही लाही पक्ष असून त्यांच्यापाशी काही मते आहेत. ही मतसंख्या थोडीथोडकी नाही. त्यात अण्णा द्रमुकचे दोन गट, ओडिशातील बिजू जनता दल, आंध्र तेलंगणातील जगमोहन रेड्डी व चंद्रशेखर राव; अशा चार गटांचा समावेश होतो. त्यांच्या मतांची बेरीज तब्बल १ लाख ३३ हजार ९०७ इतकी आहे. म्हणजेच या तिसर्‍या गटातील २० हजार मते एनडीए आपल्याकडे ओढू शकले तरी मोदींना हवा असलेला राष्ट्रपती सहज निवडून येऊ शकतो. त्यापैकी जगमोहन रेड्डी व अण्णा द्रमुकच्या दोन्ही गटांनी तसा पाठींबा आधीच जाहिर केलेला आहे. सहाजिकच मोदी सरकारला कोणीही उमेदवार सहज निवडून आणणे शक्य आहे.

ही गोष्ट सोनिया किंवा त्यांनी आमंत्रित केलेल्या विरोधी नेत्यांना ठाऊक नाही, असे अजिबात नाही. त्यांना आपण या निवडणूकीत मोदी वा एनडीएला रोखू शकतो असे अजिबात वाटलेले नाही. पण त्याबाबतीत थोडी खळबळ उडवून देण्याचा खेळ चालू आहे. त्यांना खरेच अशा बाबतीत मोदींना शह द्यायचा असता, तर या लोकांनी आता अशा बैठका बोलावून चर्चा करण्यापेक्षा मागल्या तीन वर्षात विविध विधानसभांच्या निवडणूका झाल्या, तेव्हापासूनच तशी रणनिती राबवायला हवी होती. मागल्या तीन वर्षात झालेल्या प्रत्येक विधानसभा मतदानात या विरोधकांचे लक्ष केवळ स्थानिक सत्ता वा जागा जिंकण्यावर केंद्रीत झालेले होते. तर मोदीप्रणित भाजपा त्याकडे राज्यसभा व राष्ट्रपती निवडणूका जिंकण्याची तयारी म्हणून बघत होता. राज्यसभेचे सदस्य विधानसभेतून निवडून येतात आणि आमदारही राष्ट्रपती निवडणूकीत महत्वाचा मतदार असतो. याचे भान राखूनच मोदी व अमित शहा प्रत्येक विधानसभा लढवत गेले होते. देशातील सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेश आहे आणि तिथल्या आमदाराचे या निवडणूकीतले मतमूल्य सर्वाधिक आहे. म्हणूनच तिथे ३०० च्या पार पल्ला मारणे, मोदींना अगत्याचे वाटलेले होते. त्यांनी तो पल्ला गाठला तिथेच राष्ट्रपती निवडणूक सोपी होऊन गेलेली होती. त्यात मोदींनी मायावती व मुलायम यांची मते कमी करून घेतली. अनेक राज्यात कॉग्रेसला पराभूत करतानाही राष्ट्रपती निवडणुकीत युपीए मतांची संख्या घटवत नेलेली होती. तेव्हा सोनिया किंवा आज त्यांनी जमवलेला गोतावळा झोपा काढीत होता. आता हातातून मतांची संख्या गेल्यावर त्यांना बैठकीत बसून आकडेमोड करावी लागते आहे. पण कितीही वेळा नोटा मोजल्या, म्हणून त्यांची संख्या वाढत नसते. कष्ट करून उत्पन्न वाढवूनच नोटा अधिक होत असता्त. असे कष्ट करायची इच्छा नसलेल्यांनी कितीही बैठका घेतल्या, म्हणून काय फ़रक पडणार असतो?

लोकसभाच नव्हेतर त्यानंतर प्रत्येक विधानसभा लढताना मोदींनी प्रचार केला आणि अमित शहांनी मेहनत घेतली. आताही सोनिया राहुलसह सर्व पक्ष उत्तरप्रदेशच्या निकालात गर्क असताना, दोन महिन्यापुर्वीच मोदी शहांनी राष्ट्रपती निवडणूकीची रणनिती आखण्याचे काम हाती घेतले होते. तर कॉग्रेससहित विरोधकांचा गोतावळा मतदान यंत्रातील गफ़लतीचे नाटक रंगवण्यात रमलेला होता. राष्ट्रपती निवडणूक दारात येऊन उभी राहिली, तेव्हा यांना जाग आलेली आहे. पण तोपर्यंत वेळ निघून गेली आहे. हे लोक आपापल्या मतांच्या बेरजा करण्यात डोकी फ़ोडून घेत असताना, अण्णाद्रमुक वा जगमोहन रेड्डी यांनी मोदींच्या उमेदवाराला पाठींबाही देऊन टाकला आहे. मात्र मोदींनी अजून उमेदवार ठरायचा आहे. किती मोठा विरोधाभास आहे बघा. मोदींनी अजून उमेदवार ठरवलेला नाही, पण त्यासाठी मिळवायच्या मतांची बेगमी आधीच केली आहे. उलट त्यांच्या विरोधकांना मतांची फ़िकीर नाही, ते उमेदवार ठरवायला आता इतक्या उशिरा जमा झालेले आहेत. याचा अर्थ त्यांनी विरोध करू नये, असा अजिबात होत नाही. विरोध करताना तो परिणामकारक असावा आणि त्याचा प्रभाव एकूण राजकीय स्थितीवर पडावा, अशी अपेक्षा असते. तिथे विरोधकांच्या प्रत्येक खेळीचा विपरीत परिणाम होतो आणि लाभ उलट मोदींना मिळतो, असे सलग तीनचार वर्षे बघायला मिळते आहे. मोदी जितके मोठे वा यशस्वी होताना दिसतात, तितके ते खरेच मोठे नाहीत. त्यांच्या यशाचा मोठा हिस्सा त्यांना विरोधकांच्या मुर्खपणातून आयता मिळत असतो. विरोधक मोदींना अपशकून करायला जाताना स्वत:लाच अपशकून करून घेतात आणि मोदींसाठी तो शुभशकून होतो, हेच वारंवार सिद्ध झालेले आहे. कारण मोदींना विसरून आपली स्वतंत्र राजनिती वा धोरणांचा विचारही विरोधकांच्या मनाला शिवत नाही. विरोधी राजकारणाचा केंद्रबिंदूच मोदी होऊन बसले आहेत.

No comments:

Post a Comment