Monday, May 15, 2017

अण्णांचा साक्षात्कार

anna at rajghat के लिए चित्र परिणाम

आपली आता कोणालाही गरज उरली नाही असे निराशाजनक विधान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेले आहे. खरे तर हा त्यांचा जुना अनुभव आहे. त्यांच्यासारख्या सामान्य माणसाला अनेकांनी आजवर आपापल्या राजकीय स्वार्थासाठी व अजेंडा पुढे रेटण्यासाठी सातत्याने वापरले आहे. त्यातून अण्णा विषण्ण झाले असतील तर चुकीचे नाही. कारण त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे. केजरीवाल किंवा अन्य काहीजणांकडे अण्णांचा रोख आहे. लोकपाल आंदोलनाने अण्णांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. २०११ या वर्षात अण्णांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. पण खरेच ती अण्णांची लोकप्रियता होती की प्रसिद्धी माध्यमांनी उभा केलेला तो देखावा होता? लोकपालच कशाला? अण्णा भ्रष्टाचार निर्मूलनाच्या संघर्षात पाव शतकापुर्वी उतरले, तेव्हा तरी अण्णांची खरी महत्ता किती होती आणि प्रसिद्धी माध्यमांनी त्यांचा बागुलबुवा किती केला होता? कधीतरी अण्णांनी त्याचा गंभीरपणे विचार केला होता काय? आज कोणाला मुख्यमंत्रीपद मिळाले वा कोणी राज्यपाल झाला आणि आपल्याला सर्वजण विसरून गेले, अशी खंत अण्णांनी व्यक्त केली आहे. आपल्या पदरात काही न पडल्याचे दु:ख आहे, की दुर्लक्षित झाल्याचे वैषम्य आहे? केजरीवाल यांनी अत्यंत चतूराईने अण्णांचा आपल्या राजकीय डावपेचात वापर करून घेतला आणि गरज संपल्यावर अण्णांकडे पाठ फ़िरवली. हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. पण असे होणार नाही अशी अण्णांना कशामुळे खात्री होती? त्यापुर्वीही असेच झालेले नव्हते का? नगर जिल्ह्यातील एका आडबाजूच्या खेड्यातले अण्णा लोकांसमोर कशामुळे आले? अण्णा आपलाच हा जुना इतिहास विसरून गेले आहेत काय? पाव शतकापुर्वी अण्णा प्रसिद्धीच्या झोतात कशामुळे आले होते आणि नंतर कशामुळे दुर्लक्षित झाले होते?

१९९४ सालात अण्णांनी महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार विरोधातली मोहिम छेडली होती. तेव्हा त्यांच्या भोवती गोपिनाथ मुंडे घोटाळत होते आणि अण्णांनी शरद पवार यांच्या विरोधात तोफ़ा डागलेल्या होत्या. तेव्हा पवार विरोधी राजकारणात अण्णांचा खुबीने वापर झाला होता. अण्णांनी प्रसिद्धीच्या हव्यासापायी आपला असा वापर होऊ दिला नव्हता, असे खुद्द अण्णा तरी ठामपणे सांगू शकतील काय? आपल्या गावात चांगली विकासाची कामे करणे व त्यात लोकांचा सहभाग घडवून दाखवणे, यासाठी अण्णांकडे लोकांचे लक्ष गेलेले होते. त्याचा गवगवा झाला आणि सरकारनेही त्यांच्या महात्म्याचा लाभ उठवण्यासाठी जलसंधारण वा आदर्श गाव समित्या काढून, त्यात अण्णांना गुंतवले होते. त्याला आता पाव शतकाचा कालावधी उलटून गेला आहे. त्यानंतर राज्यात किती गावे आदर्श झाली व कोणत्या जलसंधारण कार्यक्रमाला यश मिळाले आहे? सरकारी समितीचा प्रमुख म्हणून अण्णांनी कधी त्याचा हिशोब दिला होता काय? पुढल्या काळात आंध्राचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही अण्णांना त्या राज्यात शेतकरी कल्याणासाठी आमंत्रित केले होते. पण राळेगण सिद्धी गावाची गोष्ट सोडल्यास, अन्य कुठल्या आणि किती गावात अण्णांच्या प्रयत्नामुळे विकासाची गंगा येऊ शकली? त्याचा हिशोब जनतेसमोर मांडण्याची अण्णांना कधीही गरज कशाला वाटू नय? पुढल्या काळात महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि शिवसेना भाजपा युतीच्या सरकार विरोधात अण्णांना हत्याराप्रमाणे वापरले गेलेले नव्हते काय? तात्कालीन संपादक व पत्रकारांचा मोठा गट, युतीविरोधी राजकारणात अण्णांचा मुक्तपणे वापर करत होता. तो राजकीय वापर अण्णांनी होऊ दिला नव्हता काय? अण्णांना महात्मा होण्याचा हव्यास असल्यामुळेच चतुर राजकारण्यांनी व त्यांच्या हस्तकांनी अण्णांना सातत्याने वापरलेले आहे. गरज संपल्यावर फ़ेकून दिलेले आहे.

मग अण्णांचे आजचे दु:ख कसले आहे? आपल्याला इतरांप्रमाणे कुठले लाभ मिळाले नाही याची खंत आहे, की आपल्याच खांद्यावर बसून पुढे आलेल्यांना आजसुद्धा प्रसिद्धी मिळते आणि आपण पुन्हा राळेगण सिद्धीच्या कोपर्‍यात येऊन पडलोय, याची वेदना त्यांना सतावते आहे? प्रसिद्धीचा हव्यास त्यांना असे बोलायला भाग पाडतो आहे काय? कारण अधूनमधून अण्णांना प्रसिद्धी मिळते, तीही केवळ केजरीवाल याच्यासारख्या नाकर्त्या शिष्याविषयी नाराजी व्यक्त करण्यापुरती. मग तेवढी संधी साधून अण्णाही आपण संपलेलो नसल्याची ग्वाही देऊन हौस भागवून घेतात. सगळे लोकपाल विसरून गेलेत आणि आपण पुन्हा ते आंदोलन छेडणार असल्याचे अण्णा अगत्याने सांगत असतात. तशा गर्जना करून आता तीन वर्षाहून अधिक काळ उलटून गेलेला आहे. पण अण्णा त्या दिशेने एकही पाऊल टाकू शकलेले नाहीत. कारण त्यांना प्रसिद्धीच्या लाटेवर घेऊन जाणारा कोणी अन्य केजरीवाल नव्याने भेटलेला नाही. जे कोणी आज अण्णांच्या अवतीभवती घोटाळत असतात, ते अण्णांच्याच प्रकाशात स्वत:वर प्रसिद्धीचा एखादा झोत पाडून घेण्य़ासाठी जमलेले असतात. केजरीवाल यांची बाजू घेण्याचे कारण नाही. पण त्यांनी अण्णांना दिल्लीच्या मंचावर नेऊन मोठे व्यासपीठ दिलेले होते. आपल्याशिवाय अण्णा दिल्लीतही स्वयंभू होऊ नयेत, अशी काळजी या शिष्याने घेतलेली होती. त्याची प्रचिती त्याने गुरूला नंतर आणून दिलेली होती. केजरीवालपेक्षा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी किती साध्या आहेत, असे सांगून अण्णांनी रामलिला मैदानावर संयुक्त सभा योजलेली होती. पण ममताजी अपेक्षित गर्दी जमवू शकल्या नाहीत. म्हणून अण्णा तिकडे फ़िरकले नव्हते आणि ममता तोंडघशी पडल्या होत्या. दिल्लीत अण्णांच्या छायाचित्रामुळे गर्दी जमत नाही, तर केजरीवाल गर्दी जमा करू शकतो, हे शिष्याने त्यातून सिद्ध केले नव्हते का?

मुद्दा असा, की अण्णांनी ममताला पुढे करून रामलिला मैदानावर सभा घेतली, तेव्हा कोणी कोणाचा वापर केला होता? पुढल्या काळात ममताने कधी अण्णांकडे ढुंकून बघितले नाही. केजरीवाल आणि टोळी अजून अण्णांच्या विरोधात बोलत नाही. पण वेळ आल्यास तेही घडू शकेल. कारण लोकपाल आंदोलन हा देखावा असला, तरी सामान्य माणसाच्या भावनेला हात घालणारी कल्पना होती. अण्णा वा केजरीवाल यांच्यापेक्षाही सामान्य लोकांच्या भावना त्यात गुंतलेल्या होत्या. मुंबईत अण्णांच्या उपोषणाला प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा गाशा गुंडाळून अण्णांनी लोकांकडे पाठ फ़िरवली होती. तीन दिवसात उपोषण संपले होते. त्यामुळे महात्म्याचा आव किती आणावा आणि कोणावर किती शिंतोडे उडवावे, याच्याही मर्यादा अण्णांनी राखायला हव्यात. झाकली मूठ सव्वा लाखाची असते. अण्णांचे राळेगण सिद्धीतले काम मोठेच आहे. पण त्यापलिकडे त्यांनी केलेली उपोषणे व आंदोलने प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार झालेली होती आणि त्यांचा जमिनीवर कुठलाही पाय नव्हता. म्हणूनच त्यात आपापले स्वार्थ साधण्यासाठीच लोक जमा झालेले होते. त्यात इतरांचे लाभ झाले असतील. पण अण्णांचा कुठलाही तोटा झालेला नाही. त्यांनाही राष्ट्रीय पातळीवर मोठी प्रसिद्धी मिळालेली आहे आणि त्यासाठी अण्णांनीही इतराचा कुशलतेने वापर केलेला आहे. आज केजरीवालमुळे अण्णांची आठवण लोकांना होते. पण त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्याबद्दल अण्णांनी कधी कुठे उपोषण केल्याची बातमी कानी आली नाही. पवार वा ठाकरे यांच्या भ्रष्टाचारासाठी उपोषणाचा गाजवाजा करणार्‍या अण्णांचा शिष्यच, आज आरोपांच्या घेर्‍यात सापडला आहे. जंतरमंतर येथे जाऊन धरणे वा उपोषणाचे हत्यार अण्णांनी उपसले असते, तर त्यांच्या महात्म्यावर लोकांचा अधिकच विश्वास बसला असता. पण अजून तरी अण्णांना तितके धारिष्ट्य झालेले नाही. कारण केजरीवाल याच्यासारखे व्यवस्थापन व गर्दी-प्रसिद्धीची सोय उभारू शकणारा कोणी त्यांना दिल्लीत भेटलेला नसावा. मग असे दु:ख व्यक्त करण्यापलिकडे त्यांच्या हाती उरतेच काय?

2 comments:

  1. अण्णांनी धाडसाने कपिल शर्मा या माजी मंत्र्याला दिल्लीत साथ केली तर कपिलच्या कार्यक्रमास बळ येईल शिवाय अण्णांचे लायसेन्सही रिन्यू होईल. ����

    ReplyDelete
    Replies
    1. कपिल शर्मा की मिश्रा ?

      Delete