Sunday, June 11, 2017

त्या अणुयुद्धाचे पुढे काय झाले?

pak nuclear war के लिए चित्र परिणाम

भारत-पाक यांच्यात जरा काही फ़ुस्स झाले तरी युद्ध आपल्याला परवडणारे नाही, अशी पोपटपंची नेहमी सुरू व्हायची. अगदी कारगिल युद्धाचा प्रसंग ओढवला, तेव्हाही पाकला धडा शिकवण्याची भाषा कोणी वापरली, तर भारतातलेच शहाणे त्याला गप्प करायचे. कारण आता पुर्वीसारखी स्थिती राहिलेली नाही, असा त्यामागचा युक्तीवाद होता. पुर्वीसारखी म्हणजे पारंपारिक युद्धाची स्थिती. त्यात कोणाकडे किती सैनिकी बळ आहे, किंवा युद्धसाहित्य किती जास्त आहे, त्यावर युद्धातील यशापयशाचे गणित मांडले जायचे. पण अणुबॉम्ब व अण्वस्त्रांच्या उदयानंतर पारंपारिक युद्धाचा विषय वेगळ्या पद्धतीने मांडला जाऊ लागला. एका अणूबॉम्बने शत्रू देशाचे कंबरडे मोडता येते, हे नागासाकी हिरोशिमा घटनांनी सिद्ध केले. पण त्याला आता पाऊणशे वर्षाचा कालावधी होत आला आहे. त्यानंतर त्याच्याही कित्येकपटीने अधिक विध्वंसक अण्वस्त्रे निर्माण झाली आहेत आणि आपल्या घरात बसून नुसते बटन दाबले, तरी अशा बॉम्बचे स्फ़ोट हवे तिथे घडवता येत असतात. तशी सज्जता पाक व भारतापाशी असल्याने, त्यांच्यात युद्ध भडकले तर त्याचे रुपांतर अणुयुद्धात होऊ शकते. अणुयुद्ध म्हणजे साक्षात विनाशाला आमंत्रण! शिवाय असे युद्ध भडकले तर त्याची मर्यादा त्याच दोन देशापुरती राहू शकत नाही. त्याचा प्रभाव आसपासच्या देशांवरही पडणार असल्याने अणुयुद्ध कोणालाच नको असते. तेही योग्यच आहे. पण इतके असूनही जगाच्या कानाकोपर्‍यात कुठे ना कुठे पारंपारिक युद्धाच्या सावल्या कायम पडलेल्या असतात आणि तशा लढाया अखंड चालू आहेत. कुठेही त्यात खंड पडलेला नाही. मग भारत-पाक यांच्यात अणुयुद्धाची भिती घालण्याचे कारण काय? या दोन शेजार्‍यात युद्धाला तोंड लागले, तर ते अणुयुद्धच असणार, ही कल्पना आलीच कुठून? दहापंधरा वर्षे ती कल्पना खुप बोलली गेली. पण आजकाल ती भाषा फ़ारशी ऐकू येत नाही.

तसे बघितले तर आज दोन देशातील संबंध खुपच विकोपास गेलेले आहेत आणि सीमेवर सतत गोळीबार व तोफ़ांचा गडगडाट अखंड चालू आहे. दोन्हीपैकी एकानेही तशी युद्धाची घोषणा केलेली नाही. पण प्रत्यक्षात युद्धजन्य स्थितीत दोन्ही देश आमनेसामने उभे आहेत. त्यापैकी पाकिस्तानने आपले काम सेनेवर न सोपवता जिहादी नावाच्या हंगामी भुरट्या सैनिकांना पुढे केलेले आहे. तर भारताचे सैन्य अशा हल्ल्यांना उत्तर देते आहे. थोडक्यात भारतासाठी युद्धच चालू आहे, तर पाकिस्तान युद्ध नसून काश्मिरमुक्तीची लढाई स्थानिक लढत असल्याचे नाटक रंगवित आहे. पण त्यातही पाकिस्तानला त्यांच्या प्रदेशात जाऊन उत्तर देण्याचा धोरणात्मक निर्णय भारत सरकारने घेतलेला नाही. क्वचित प्रसंगी अतिरेक झाल्यास तशी कृती होतेही. पण त्याला सर्जिकल स्ट्राईक असे नाव दिले जाते. थोडक्यात प्रासंगिक उत्तर असे त्याचे स्वरूप आहे. कारण भारताने युद्धाचा पवित्रा घेण्याचा नुसता विचार केला, तरी पाकिस्तानपेक्षाही भारतातले अनेक शहाणे आपल्याच सरकार व नागरिकांना अणुयुद्धाची भिती घालत राहिलेले आहेत. काही प्रमाणात जागतिक समुदायानेही तेच केलेले आहे. कारगिल युद्धाच्या वेळी पाकने भारतीय प्रदेशात घुसखोरी केली होती व त्याला हाकलून लावण्यासाठी ते युद्ध झाले होते. पण त्यातही कुठे पाकप्रदेशात अतिक्रमण होणार नाही, याची काळजी वाजपेयी सरकारने घेतली होती. तेव्हाही पाकला दम देऊन अमेरिकन अध्यक्ष क्लिंटन यांनी पाक सेनेला माघार घेण्यास भाग पाडालेले होते. त्यालाही अणुयुद्धाची जागतिक भितीच कारणीभूत झाली होती. मात्र गेल्या दिडदोन वर्षात भारत-पाक संबंध बिघडत असताना कोणीही अणुयुद्धाची भिती घालताना दिसत नाही. हा नवा बदल आहे. जगातले कोणी वा भारतातले कोणीही, दोन्ही देश अणुसज्ज असल्याचा दावा करून शांततेचे आवाहन करताना दिसत नाहीत. ही काय भानगड आहे?

भारतापाशी किती अण्वस्त्रे आहेत आणि पाकिस्तानपाशी किती आहेत? त्यातली किती अण्वस्त्रे काय काय नष्ट करू शकतात, याचे कुठलेही वर्णन आजकाल ऐकू येत नाही. थोडक्यात दोन्ही देश अणूसज्ज आहेत आणि त्यातून विनाश ओढवू शकेल, ही भाषा कुठल्या कुठे लुप्त झाली आहे. असे कशाला झाले आहे? पाकिस्तानी नेतेही ती भाषा बोलत नाहीत, की तशी धमकी देत नाहीत. दोन वर्षापुर्वी उल्फ़ा अतिरेक्यांना निकालात काढण्यासाठी भारतीय सेनेने प्रथमच सर्जिकल स्ट्राईकचा अवलंब केला होता. भारतीय जवानांना घातपाताने ठार मारून म्यानमारमध्ये पळालेल्या उल्फ़ा अतिरेक्यांच्या जागा हुडकून त्यांना त्या देशाच्या हद्दीत घुसून भारतीय कमांडोंनी ठार मारले होते. त्यावर म्यानमारने नाराजी व्यक्त करण्यापेक्षा पाकिस्तानातून पहिली नाराजी समोर आली होती. तिथे चालले म्हणून पाक हद्दीत घुसलेले सहन केले जाणार नाही, अशा डरकाळ्या इस्लामाबाद येथून फ़ोडल्या गेल्या होत्या. कारगिलचे पळपुटे सेनापती जनरल परवेझ मुशर्रफ़ यांनी तर पाकिस्तानची अण्वस्त्रे दिवाळीचे फ़टाके नाहीत, अशी वल्गना तेव्हा केलेली होती. इतर अनेक पाक नेत्यांनी व सेनाधिकार्‍यांनी भारतावर अणुहल्ला करण्याही आरोळ्या ठोकल्या होत्या. म्हणजे जेव्हा कुठलाही वादविवाद नव्हता, की काश्मिरच्या नियंत्रण रेषेवर कुठलाही युद्धप्रसंग नव्हता, तेव्हा यांना अणुहल्ल्याची स्वप्ने पडत होती. मग आज प्रत्यक्षात नियंत्रण रेषा पेटलेली असताना त्यापैकी कोणाला आपल्यापाशी असलेला अणुबॉम्ब वापरण्याचे स्मरण कशाला होत नाही? कारण निदान सहाआठ महिने तरी सीमा धुमसते आहे. पण कुणा पाक सेनापती वा नेत्याने अणूयुद्धाचा इशारा दिलेला नाही. दुसरी गोष्ट कुठलाही भारतीय शहाणा वा जागतिक नेत्यांनाही दोन देशातील वाद अणुयुद्धापर्यंत सरकत जाईल, असे वाटत नाही. याचे काय कारण असावे?

त्याचे कारण उघड आहे, पण ते कोणी बोलून दाखवत नाही. मध्यंतरी माजी सेनाप्रमुख जनरल विक्रमसिंग यांनी त्याचा ओझरता उल्लेख एका वाहिनीवर बोलताना केला. दोन देशात युद्धाचा भडका उडाला तर काय होईल? अणुविषयक भारताची निती काय आहे? आपण प्रथम अणुबॉम्बचा वापर करणार नाही, असे भारताने ठरवले आहे, असे मानले जाते. तसा गवगवाही खुप आहे. पण पाकिस्तानचे तसे नाही. मात्र आज पाकिस्तानची जी राजकीय अराजकता आहे, तिथे अतिरेक्यांना आवरणेही त्या देशाच्या सेनेच्या आवाक्यात राहिलेले नाही. सहाजिकच त्या जिहादींपैकी कोणाच्या हाती तिथली अण्वस्त्रे पडली, तर त्याचा पहिला बळी भारत असण्यापेक्षा अमेरिका वा युरोप असू शकेल. कदाचित त्यात इस्त्रायल वा इराणलाही बळी व्हावे लागेल. सहाजिकच त्याची भिती भारतापेक्षाही जगातल्या प्रगत देशांना वा महाशक्तींना अधिक आहे. त्यांनी पाकिस्तानची अण्वस्त्रे पाकच्याच सेना वा सरकारवर विसंबून गोपनीय राहू दिली असतील काय? पाकच्या अणुविषयक धोरण व गोपनीयतेवर भारतापेक्षाही महाशक्ती व प्रगत देशांचे बारीक लक्ष आहे. त्याचा वापर पाक सेनेने करायचा नुसता विचार जरी मनात आणला, तरी त्याची पहिली खबर अमेरिका, रशिया वा चिनला लागलेली असेल. इतका या देशांच्या हेरखात्यांनी पाकिस्तान पोखरून ठेवलेला आहे. त्यांना समजण्यापुर्वी अमेरिकन कमांडो पाकसेनेच्या मुख्यालयाजवळ हल्ला करून ओसामा बिन लादेनचा मुडदा म्हणून पाडू शकले. त्यातून पाकसेनेची कुवत व लायकी जगाला दिसलेली आहे. नुसते पैसे खाणारे भ्रष्ट सेनाधिकारी फ़क्त वल्गना करीत असतात. त्यांनाही आता आपली कुवत कळलेली आहे आणि जगालाही उमजलेली आहे. मग पाकच्या अणुसज्जतेला भारताने घाबरण्याचे कोणते कारण राहिले? आपली सेना अल्पावधीत पाकिस्तानला पारंपारिक युद्धात नेस्तनाबुत करू शकते.

विक्रमसिंग यांना यातली खुप माहिती आहे, कारण तेच भारताचे सेनाप्रमुखही होते. म्हणून तर वाहिनीवर बोलताना त्यांनी पाकच्या अणुसज्जतेची खिल्ली उडवली. तसा कुठलाही धोका नसल्याची हमी दिली. मात्र अनेक गोष्टी गोपनीय असतात व राखाव्या लागतात. म्हणून त्यांनी ठाऊक असलेला तपशील वाहिनीच्या चर्चेत उघड केला नाही. पण त्यांच्या सुचक विधानातून एक गोष्ट स्पष्ट होते, की पालिस्तानपाशी अण्वस्त्रे जरूर आहेत. पण मनात आल्यावर ती वापरण्याच्या परिस्थितीत पाकिस्तान बिलकुल नाही. सहाजिकच भारताने नियंत्रण रेषा व सीमेवर आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पाकची अणुहल्ल्या़ची भाषा कुठल्या कुठे थंडावली आहे. इथल्या पाकमित्रांच्याही भाषेतून अणुयुद्धाचा विषय गायब झाला आहे. कारण दोन्ही देशात युद्ध भडकले तर त्यात अणुबॉम्बचा वापर होणार नाही, याची पुरती काळजी चिन अमेरिकेने आधीच घेतली आहे. हे आता गुपित राहिलेले नाही. म्हणूनच भारतीय आक्रमकतेने पाकसेना व तिथल्या शासनकर्त्यांना अस्वस्थ करून सोडले आहे. त्यांनाही युद्धाचा प्रसंग नको आहे आणि त्यांनीच पोसलेले जिहादी त्यांच्या आवाक्यात राहिलेले नाहीत. शिवाय सतत जिहादींच्या सहवासात राहिलेले पाकचे सामान्य जवान व सैनिक धर्माच्या आहारी गेले असून; त्यांना लष्करी शिस्तीने मर्यादेत राखणेही तिथल्या सेनाधिकार्‍यांना अशक्य होत चालले आहे. राजकीय अस्थिरता, आर्थिक डबघाई, जिहादी अनागोंदी अशा दुष्टचक्रात आज पाकिस्तान इतका रुतून पडला आहे, की भारताने नुसती आक्रमक चाल खेळली, तरी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे त्याचा पोकळ डोलारा कोसळून पडायला काही दिवस लागणार नाहीत. म्हणून अणुयुद्धाची दोन वर्षापुर्वीपर्यंत चाललेली भाषा कुठल्या कुठे लुप्त झाली आहे आणि तांत्रिक, राजनैतिक व जिहादी मार्गाने पाकला भारताशी दोन हात करण्याची नामुष्की आलेली आहे.

1 comment: