Sunday, June 25, 2017

नितीश नावाचा भूकंप

nitish sonia के लिए चित्र परिणाम

सोमवारी भाजपाने आपला राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहिर केला, त्याने अजून प्रत्यक्षात अर्जही दाखल केलेला नाही. इतक्यातच महागठबंधन म्हणून मोर्चेबांधणी करणार्‍यांच्या बुडाखाली सुरूंग उडाला आहे. त्याचे खापर अर्थातच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या माथी फ़ोडले जाईल यात शंका नाही. पण नितीशकुमार इथपर्यंत कसे पोहोचले, त्याकडेही बघणे अगत्याचे आहे. राजकारणाची वा त्यातही नेत्यांची बांधिलकी मानणार्‍यांना त्यांच्या चुका कधी दिसत नसतात आणि दिसल्या तरी त्या मान्य करायच्या नसतात. म्हणूनच मग अशा चुकांची किंमत मोजण्याची पाळी आली, मग नेत्यापेक्षाही त्याच्या स्तुतीपाठकांची तारांबळ उडत असते. लोकसभेच्या निवडणूकीपुर्वी नितीश यांनी भाजपाची साथ सोडली होती आणि त्याची किंमत त्यांच्या इतकीच पक्षालाही मोजावी लागली होती. अखेरीस त्यांना आपली प्रतिमा व सत्ता जपण्यासाठी लालूंना शरण जावे लागले होते. पुरोगामीत्वाच्या नावाखाली त्याचा कितीही गौरव करण्यात आला, तरी प्रत्यक्षात आपली व्यक्तीगत प्रतिष्ठा धुळीस मिळते आहे; याचे भान नितीशना होते. म्हणूनच लालूंच्या मदतीने सत्ता संपादन केल्यापासून नितीश पुन्हा एनडीएमध्ये जाण्याचा रस्ता शोधू लागले होते. त्याचे कारणही खुद्द लालूप्रसादच होते. पहिली गोष्ट म्हणजे मोदी विरोधातील नितीशच्या अगतिकतेचा लालूंनी हवा तितका गैरफ़ायदा घेण्याला मर्यादा राहिली नाही. आपल्या दोन मुलांना मंत्रीमंडळात घ्यायला लालूंनी संख्याबळावर भाग पाडले आणि लालूंचे गुंड अनुयायी पुढल्या काळात बेताल होत गेले. त्यामुळेच पुरोगामीत्वाची झिंग उतरून नितीश पर्याय शोधू लागले होते. पण पर्याय सन्मानपुर्ण असावा लागतो. किंवा किमान लालूंना लगाम लावणारा तरी पर्याय हवा होता. तो पर्याय शोधण्याची पाळी नितीशवर ज्यांनी आणली, त्यांनी आता नितीश इथपर्यंत आलेले आहेत.

बिहार विधानसभेत मुख्यमंत्री रहाण्यासाठी नितीशना महागठबंधनाची गरज आहे. पण लालू व कॉग्रेसने साथ सोडल्यास भाजपाच्याही मदतीने नितीश मुख्यमंत्री पदावर कायम राहू शकतात. भाजपाची साथ सोडल्यावर जर लालू पाठींबा देऊ शकतात, तर लालूंची साथ सोडल्यावर भाजपाही नितीशना साथ देऊ शकतो. हे गणित डोक्यात आल्यापासून नितीशनी भाजपाविषयी आस्था दाखवण्यातून लालूंना लगाम लावलेला आहे. त्यामुळे नितीशना मुख्यमंत्रीपद गमावण्याचे भय उरलेले नाही. कारण प्रसंगी लालू विरोधात नितीशना पाठींबा देण्याचे सुतोवाच भाजपा नेत्यांनी करून ठेवलेले आहे. मग त्या समजूतीला खतपाणी घालण्याचे राजकारण नितीश मागले वर्षभर खेळत राहिलेले आहेत. त्यांनी तसे अनेक संकेत वारंवार दिलेले आहेत. त्यातून सत्तेत टिकण्यासाठी आपण नव्हेतर लालूच लाचार असल्याची स्थिती निर्माण करून ठेवलेली आहे. कोणाला आठवत नसेल तर नोटाबंदीचा काळ आठवा. बाकी तमाम पुरोगामी पक्षांनी मोदी विरोधात झोड उठवलेली असताना, नितीशनी नोटाबंदीचे जबर समर्थन केलेले होते. लालू रस्त्यावर आणि त्यांचे सहकारी नितीश नोटाबंदीच्या बाजूने बोलत होते. त्याच दरम्यान एका सार्वजनिक समारंभासाठी पंतप्रधान पाटण्याला आले असताना, त्या मंचावरून मोदींनी नितीशच्या दारूबंदीचे कौतुक करून महागठबंधन सैल करण्याला हातभार लावला होता. अशारितीने वेळोवेळी नितीश लालूंना हुलकावण्या देत राहिले आहेत आणि त्याच काळात लालूंच्या कुटुंबाच्या भानगडी केंद्राने चव्हाट्यावर आणण्याचा सपाटा लावलेला आहे. ही पार्श्वभूमी बघितली तर नितीश कुठे बघून वाटचाल करीत आहेत, त्याचा अंदाज येऊ शकत होता. पण लालूंनी तिकडे बघितले नाही की कॉग्रेस अध्यक्षा सोनियांनी त्याची दखल घेतली नाही. परिणामी आता ऐन राष्ट्रपती निवडणूकीत नितीशनी त्या दोघांना तोंडघशी पाडलेले आहे.

खरेतर ज्या दिवशी प्रथमच राष्ट्रपती निवडणूकीचा विचार करायला विरोधकांची पहिली बैठक बोलावण्यात आली, तिथे नितीश गैरहजर राहिले. पण दुसर्‍याच दिवशी ते पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या एका भोजन समारंभाला दिल्लीत मुद्दाम आलेले होते. यातली गोम समजून घेतली पाहिजे. तेव्हाच्या गैरहजेरी विषयी विचारले असता नितीशचे सहकारी म्हणाले होते, विरोधी पक्षांची बैठक बोलावण्याची कल्पनाच नितीशनी सोनियांना सुचवलेली होती. याचा अर्थ असा, की खुप आधी नितीशनी त्यासाठी हालचाली केल्या होत्या. पण सोनियांनी त्याची गंभीर दखल घेतली नाही वा दिरंगाई केली. त्यामुळे नितीश नाराज असावेत. त्यांनी वेगळा विचार आधीच सुरू केलेला असावा. आज आपल्याला संसदे्त पुरेसे बळ नाही आणि पुर्वीची शक्ती पक्षात नाही, याचे भान सोनियांना असते; तरी त्यांनी अशा मित्रपक्षांना वेळोवेळी विश्वासात घेण्याला प्राधान्य दिले असते. पण राहुल असोत की सोनिया, त्यांना कॉग्रेसी नेत्यांच्या लाचारीची सवय झाली आहे. सहाजिकच अन्य मित्रपक्षाच्या नेत्यांनीही अगतिक होऊन आपल्या दारी यावे, अशा अहंकारात हे कॉग्रेसश्रेष्ठी वागत जगत असतात. त्यामुळे अधिकाधिक मोदीविरोधी पक्ष व नेते कॉग्रेसपासून दुरावत गेलेले आहेत. मग महागठबंधन व्हायचे कसे? उत्तरप्रदेशात समाजवादी कॉग्रेस युतीची घोषणा करण्याचे निश्चीत झाले असताना, राहुल तिकडे फ़िरकले नाहीत. मग संतापलेल्या अखिलेश यादव यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादीच घोषित करून टाकलेली होती. आपला पक्ष नगण्य झाला असल्याचे भान सोनिया राहुलना नसल्याचा हा परिणाम आहे. म्हणून नवे कोणी त्यांच्या घोळक्यात यायला तयार नाही आणि असलेलेही टिकवण्याची कुवत या मायलेकरात नाही. अशा स्थितीत मोदी मात्र एकेक विरोधकाला चुचकारण्यात कसूर करत नाहीत. नितीश हे त्याचे झणझणित उदाहरण आहे.

नितीश हा महागठबंधन आघाडीचा भावी पंतप्रधान चेहरा म्हणून बोलले जात होते. त्यानेच राष्ट्रपती निवडणूकीत भाजपाला कौल दिला असेल, तर पुढे व्हायचे कसे? राष्ट्रपती निवडणूक मोदींना शह देण्याचे राजकारण नव्हते, तर तो मुहूर्त साधून विरोधातील महागठबंधन अधिक मजबूत करण्याचा डाव खेळण्याला महत्व होते. त्यात अधिक पक्षांना सहभागी करून घेण्याचे राजकारण होण्याला प्राधान्य होते. तसे त्यात मायावती व मुलायम यांच्याही पक्षाने हजेरी लावली होती. पण पुढे काहीच झाले नाही आणि आता तर त्यापैकीच अनेकजण भाजपा उमेदवाराला समर्थन देऊन मोकळे होत आहेत. त्यामुळे ही निवडणूक भाजपा उमेदवाराने अर्ज दाखल करण्यापुर्वीच जिंकली आहे. पण त्याचा विजय होण्य़ापुर्वीच २०१९च्या लोकसभेसाठी महागठबंधन नामक रणनितीला अपशकून झाला आहे. त्यातला सर्वसंमत होऊ शकेल असा अत्यंत समतोल मानला जाणारा नेताच दुरावला आहे. आता त्याच्यावर दुगाण्या झाडल्या गेल्या, तरी तो भाजपाच्या अधिक जवळ जाण्याचे भय आहे. पर्यायाने बिहारमधील आघाडीचा कौतुकाचा प्रयोगच संपुष्टात येण्याचा धोका, २०१९ साठी बडी आघाडी बनवण्याचे स्वप्न रंगवणार्‍यांना भेडसावू लागला आहे. अतिशय धुर्तपणाने राजकारण खेळत असल्याचा आव मोदी विरोधक वाहिन्यांच्या कॅमेरासमोर आणत असतात. पण त्यांच्या प्रत्येक धुर्त खेळीने मोदी अधिक मजबूत होतात आणि यांच्या राजकीय खेळाला लाजिरवाणा पराभव बघावा लागतो आहे. नितीश यांच्या पाठींब्या खेरीजही भाजपाचा उमेदवार सहज जिंकू शकत होता. पण नितीशच्या या निर्णयाने २०१९ सालच्या सार्वत्रिक निवडणूकीचे समिकरण विस्कटून टाकलेले आहे. नवी आघाडी उभारली जाणे दुर राहिले. असलेली मोदी विरोधातील आघाडीही पुढल्या संसदीय अधिवेशनात कितपत टिकून राहिल, इतकी दुरावस्था पुरोगामी राजकारणाची होऊन गेली आहे.

No comments:

Post a Comment