Tuesday, June 20, 2017

‘ग्यानी’ आणि अज्ञानी

gyani zail singh के लिए चित्र परिणाम

कोण हे रामनाथ कोविंद? सोमवारी भाजपाने आपला राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहिर झाल्यावर अनेकांना असा प्रश्न पडला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी व त्यांच्या पक्षाने तर आपण ह्या माणसाला ओळखतही नसल्याचा निर्वाळा देत, त्याला कसा पाठींबा द्यायचा, असाही प्रतिप्रश्न केला आहे. त्यातून त्यांना सुचवायचे काय आहे? राष्ट्रपती हा संपुर्ण देशाला ठाऊक असलेला वा लोकांमध्ये उजळ प्रतिमा असलेली व्यक्ती असावा, असेच त्यातून सुचवायचे नाही काय? तसेच असेल तर अशा अनेक नेत्यांनी वा त्यांच्या पक्षाने कधी व कोणती माणसे त्याच निकषावर तपासून राष्ट्रपती पदासाठी पुढे केली होती? त्रिदीब चौधरी हे कोण होते? त्यांनी कोणत्या पक्षाचे राजकारण केले व त्यांना राष्ट्रपतीच्या निवडणूकीला कोणी उभे केले होते? याचे उत्तर आजच्या कोणा संपादकाला तरी देता येईल काय? एच. आर. खन्ना नावाचे गृहस्थ कोणत्या व्यवसायात होते आणि त्यांनी कोणाच्या विरोधात कुठल्या निवडणूका लढवल्या होत्या? हुमायुन कबीर नावाचे गृहस्थ काय करायचे? अशा अनेक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील. पण तसे उलटे प्रश्न विचारले जात नाहीत? म्हणून कोविंद कोण, असे बेधडक विचारले जात असते. पण असे विचारणार्‍या शहाण्यांना देखील आजवरचे राष्ट्रपती कोण होते, किंवा ज्यांना उमेदवार करण्यात आले, त्यांची पात्रता लायकी काय होती, त्याविषयी शून्य ज्ञान असते. पण हीच तर भारतीय शहाणपणाची शोकांतिका होऊन गेली आहे. समर्था घरीचे श्वान, यापेक्षाही लायकी नसलेल्या किती लोकांची आजवर तिथे वर्णी पावली गेली आहे? तो विषय म्हणून तर या निमीत्ताने चर्चेला येणे आवश्यक नाही काय? आज यातले ज्ञान पाजळणार्‍यांना राष्ट्रपती भवनात पाच वर्षे काढणार्‍या ‘ग्यानी’ झैलसिंगांची गुणवत्ता अशा वेळी कशी आठवत नाही? ते सांगायची बुद्धी कशाला होत नाही?

१९८० सालात जनता पार्टीचा धुव्वा उडवून इंदिराजींची नवी कॉग्रेस पुन्हा मोठ्या बहूमताने सत्तेत आलेली होती. १९६९ सालात राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीने कॉग्रेस पक्षात पहिली दुफ़ळी झाली. १९७८ सालात पुन्हा विभाजन झाले, तेव्हा संसदेतील कॉग्रेसचे नेता यशवंतराव चव्हाण होते. त्यांनी व पक्षाध्यक्ष ब्रम्हानंद रेड्डी यांनीच इंदिरा गांधींना पक्ष फ़ोडण्याची वेळ आणली. तेव्हापासून कॉग्रेसच्या शेवटी कंसाता ‘आय’ हा शब्द चिकटला. त्याच कॉग्रेसला १९८० सालात प्रचंड बहूमत मिळाले आणि नंतर जेव्हा राष्ट्रपती पदाची निवडणूक आली, तेव्हा गृहमंत्री असलेल्या ग्यानी झैलसिंग यांची इंदिराजींनी त्या पदासाठी निवड केली होती. त्यांची अशी कुठली महान पात्रता वा गुणवत्ता होती? कॉग्रेस पक्षाने त्यांना इतक्या मोठ्या पदावर उमेदवार म्हणून पुढे केलेले होते? खुद्द झैलसिंग यांनीच निवडून आल्यावर ‘इंडिया टुडे’ पाक्षिकाला दिलेल्या मुलाखतीत, आपल्या त्या गुणवत्तेचा खुलासा केला होता. ती पात्रता नेहरू गांधी खानदानावर असलेली अढळ निष्ठा इतकीच होती. यात आजकालच्या निष्ठावंत कॉग्रेसजनांची पात्रताही क्षुल्लक मानावी लागते. झैलसिंग यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी महत्वाकांक्षा त्या मुलाखतीत कथन केली होती. नेहरू खानदानाच्या घरात आपल्याला झाडू मारण्यासाठी नेमले तरी तो आपला सन्मानच असेल, असे राष्ट्रपती झाल्यानंतर या गृहस्थांनी सांगितले होते. मोदींनी आजवर ज्यांना कुठलीही उमेदवारी वा नेमणूक दिली, त्यापैकी कोणी निदान इतकी उदात्त व महान महत्वाकांक्षा वा पात्रता सांगितलेली नाही. पण आजचे कॉग्रेसवाले किंवा त्यांचे दक्षिणापात्र शहाणे, झैलसिंग यांना ओळखतच नसल्यासारखे कोविंद कोण, असले प्रश्न विचारत आहेत. अर्थात पुढल्या काळात झैलसिंग यांनाही राष्ट्रपती असताना झाडू मारण्याचा प्रसंग नेहरू खानदानाच्या वारसाने आणलाच होता.

राजीव गांधी पंतप्रधान होते आणि त्यांच्या पाठीशी प्रचंड बहूमत होते. म्हणून त्यांनी सुप्रिम कोर्टाचा शहाबानु निर्णय फ़िरवणारा कायदाही करून दाखवला होताच. पण त्याच राजीव गांधींनी देशाचा राष्ट्रपती किती बेअक्कल असू शकतो, त्याचा घटनात्मक दाखलाही निर्माण करून ठेवला आहे. नेहरू खानदानाच्या घरी झाडू मारणेही अभिमानास्पद मानलेल्या झैलसिंगांनी ते दिव्य करून दाखवले होते. त्या कालखंडात खलिस्तानचा दहशतवाद पंजाबला भयभीत करून सोडत होता आणि अकाली दलाने विधानसभा निवडणूका लढवण्याची हिंमतही केलेली नव्हती. अशा काळात अकालींचा एक गट संत लोंगोवाल यांच्या नेतृत्वाखाली वेगळा झाला व त्याने राजीव गांधी यांच्याशी शांतता करार केला होता. त्याच करारानुसार पुढल्या काळात कॉग्रेसच्या पाठींब्याने पंजाबमध्ये संयुक्त सरकार सत्तेत आलेले होते. त्याचे मुख्यमंत्री होते सुरजितसिंग बर्नाला. त्यांची पकड प्रशासनावर नव्हती आणि नित्यनेमाने धुमाकुळ चालू होता. एके दिवशी खुद्द लोंगोवाल यांचाच खलिस्तानी दहशतवाद्यांनी मुडदा पाडला होता. अशा कालखंडात संसदेचे अधिवेशन आले आणि त्याचीही सुरूवात राष्ट्रपतींच्या भाषणानेच झालेली होती. त्या भाषणाचा मसुदा सरकार बनवते आणि राष्ट्रपती नुसते वाचन करतात. अशा भाषणात पंजाबच्या कायदा सुव्यवस्थेचे कौतुक करणारे शब्द घातलेले होते. ग्यानी झैलसिंग यांनी त्याबद्दल आक्षेप घेतला होता. राष्ट्रपती आपल्या संसदेतील अभिभाषणात देशातील एकाच राज्याचे वा राज्य सरकारचे कौतुक करू शकत नाही. किंबहूना त्यामुळे अन्य राज्यात कायदा सुव्यवस्था अयोग्य असल्याचा अर्थ लावला जाऊ शकेल. म्हणून तेवढे वाक्य व संदर्भ वगळावा, असा आग्रह झैलसिंग यांनी धरला होता. पण मंत्रीमंडळाने भाषण संमत केले आहे आणि ते वाचावेच लागेल, म्हणत राजीव गांधींनी राष्ट्रपतींची मागणी धुडकावून लावली होती.

बिचारे झैलसिंग काय करू शकत होते? घटनात्मक अधिकार त्यांना पंतप्रधानाला धुडकावण्याचा अधिकार देत नव्हते आणि वडिलधारेपणाचा सल्ला नेहरू खानदानाचा वारस धुडकावून लावत होता. बिचार्‍या निष्ठावान झैलसिंग यांनी संसदेच्या संयुक्त बैठकीत ते भाषण वाचले आणि त्यातून पंजाबच्या बर्नाला सरकारचे आगंतुक कौतुक केले होते. पुढे काय व्हावे? इकडे संसदेचे अधिवेशन चालले होते आणि पंजाबची स्थिती दिवसेदिवस ढासळत गेली. अधिवेशन संपण्यापर्यंत स्थिती इतकी विकोपास गेली, की अधिवेशन संपल्याच्या रात्रीच पंजाबचे बर्नाला सरकार राजीव गांधींनी बडतर्फ़ केले. ते बडतर्फ़ करताना काढलेल्या अध्यादेशात कायदा व्यवस्था हाताबाहेर गेली म्हणून ही कारवाई करावी लागली, असे कारण दिलेल्या त्या अध्यादेशावर सही ग्यानी झैलसिंग अशी आहे. म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतींनी बर्नाला सरकारचे उत्तम कायदा व्यवस्था म्हणून कौतुक केले. पण शेवटच्या दिवशी तेच सरकार कायदा राबवता येत नाही, म्हणून बरखास्त करून टाकले. ह्यापेक्षा झैलसिंग यांची कोणती विटंबना असू शकते. ते भले उच्चशिक्षित नसतील. पण किमान प्रशासकीय अनुभव आणि विवेकबुद्धी त्यांच्यापाशी होती. म्हणूनच त्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणातूल बर्नाला सरकारचे कौतुक गाळण्याची मागणी केलेली होती. पण ती फ़ेटाळून लावत इंदिराजींच्या पंतप्रधान सुपुत्राने झैलसिंग यांच्या घराणेनिष्ठेची अशी सत्वपरिक्षा घेतली होती. कॉग्रेस पक्षाच्या लेखी यापेक्षा राष्ट्रपती व राज्यघटनेची अधिक लायकी नसते. आपल्या सोयीनुसार व लहरीनुसार काहीही करण्याची संधी, या घराण्यातील कोणीही कधी सोडली नाही. आज त्याच घराण्याचे वंशज व त्यांचे बगलबच्चे कोविंद कोण, असले बाष्कळ सवाल करतात, तेव्हा जिथे असतील तिथून खुद्द ग्यानी झैलसिंग यांनाही हसू येत असेल ना?

2 comments:

  1. असला इतिहास असलेली काॅंगरेस व त्यांची शाखा डावे मोदीजी नी सगळ्या लोकशाही संस्थाचे खच्चीकरन केले आहे म्हनुन गळे काढतेय.कालच सकाळ पेपर मध्ये लिहिलय की उजव्या लोकाकडे बुद्धीवादी नाहित,हा शुद्ध गुंडपना आहे म्हनजे तुमचे नेहरू वादी विचार तेवढे शहाने बाकी दुसर्या लोकांना अक्कलच नाही.असहिष्णुता पुरोगामी लोकात भरलीय

    ReplyDelete
  2. भाऊ, आपल्या लेखांमधून काँग्रेस किंवा इतर पक्ष ढोंगी आहेत हे कळतं, अनेक जुन्या घटनांबद्दल माहिती ही मिळते. परंतु काही लेखांवरून असं जाणवतं की ज्या चुका इतर पक्षानी केल्या त्याच भाजप ही करत आहे. उदा. रामनाथ कोविंद सुध्दा फार लोकप्रिय वगैरे नाहीत (एक सामान्य नागरिक म्हणून मी तर त्यांचे नावही ऐकले नव्हते) त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आपल्या काही लेखांमधून असे जाणवते की भाजपच्या एखाद्या कृती अथवा निर्णयावर टीका होत असेल तर तशाच कृती काँग्रेस वा अन्य कोणी कशा केल्या होत्या याची उदाहरणे दिली जातात. पण म्हणून भाजपची कृती बरोबर आहे असे नाही ना. एखादा लेख रामनाथ कोविंद यांच्याबद्दल खरीखुरी माहिती देणारा वाचायला मिळाला तर आनंद वाटेल.
    -आपला चाहता वाचक

    ReplyDelete