Tuesday, June 13, 2017

अच्छेदिन कोणाचे? कसले?

कुठलीही गोष्ट मोजायला एक परिमाण लागत असते. द्रवपदार्थ असला तर तो लिटर या निकषावर मोजला जातो आणि घनपदार्थ असेल तर ग्राम किलो अशा परिमाणात मोजला जातो. त्यात गल्लत केली, मग समजण्यातही गफ़लत होत असते. दोन भिन्न निकषांची गल्लत करून दिशाभूल होऊ शकते, पण कोणाला त्यातून काही समजावता येत नसते. दोन भिन्न वर्गातल्या गोष्टींविषयी बोलत असताना तुलनात्मक परिमाण वापरणे भाग असते. गरीब शेतकरी आणि श्रीमंत शेतकरी यांची तुलना केल्यास त्यातला गरीब अधिक गरजवंत असतो आणि तुलनेने श्रीमंत अधिक नुकसान सोसत असला, तरी त्याच्यावर आत्महत्येचा वगैरे प्रसंग येत नसतो. म्हणूनच अशा विषयात सरसकट निकष लावून निर्णय घेता येत नसतात. सरकारी यंत्रणेने गरजू व अडल्यानडल्याची मदत करावी, ही अपेक्षा असते. अडचणीतला आणि संकटातला यात फ़रक करावा लागतो. संकटातल्याला प्राधान्य देणे अपरिहार्य असते. पण त्यात राजकारण आले, मग निकष पुसट केले जातात आणि निर्णयाच्या मूळ हेतूचा बोजवारा उडून जातो. लालूप्रसाद यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने त्यांना बिहारचे मुख्यामंत्रीपद सोडावे लागले होते. तेव्हा लालू जनता दलात होते आणि लालुंच्या राजिनाम्याने जनता दलाचे नेते सुखावले होते. पण त्यानंतर आपल्या जागी लालूंनी राजकारणाचा गंध नसलेल्या आपल्याच गृहीणी पत्नीला बसवले आणि त्यांच्याच पक्षाची गाळण उडाली. कारण ही चक्क घराणेशाही होती. आपला भ्रष्टाचाराचा आरोप गुंडाळून लालूंनी महिला सबलीकरणाचे कारण पुढे केले व त्यात आपल्याच इशार्‍यावर नाचणारी कठपुतळी मुख्यमंत्रीपदी बसवली. त्यातून बिहारचा जनता पक्ष दुभंगला होता. यात चांगले काय आणि वाईट काय? तर दोन भिन्न निकषांची व निर्णयाची लालूंनी सराईतपणे गल्लत केलेली होती. अच्छेदिन कुठे असे विचारणारे त्यापेक्षा किंचीतही वेगळे नसतात.

अच्छेदिन म्हणजे चांगले दिवस! आनंदाचे दिवस हे कसे ठरवायचे आणि त्याचे मोजमाप काय असू शकते? अंबानी वा कुणा उद्योगपती व्यक्तीसाठी कुठला मोठा नवा परवाना मिळाला आणि त्याच्या उलाढालीत कोट्यवधी रुपयांची वृद्धी होण्याची शक्यता वाढली; मग त्याला अच्छेदिन आल्यासारखे वाटणे स्वाभाविक असते. तेच कुणा व्यापार भरभराट झालेल्या व्यक्तीचे वा पगारवाढ मिळालेल्या अधिकार्‍याचे असू शकते. अकस्मात वाढलेले अधिकचे उत्पन्न त्यांना चांगले दिवस आल्याचे सांगते. पण सामान्य जनतेची गोष्ट वेगळी असते. आजही देशात ३५-४० टक्के जनता गरीब किंवा दारिद्र्य रेषेच्या खाली जगत असल्याचे मानले जाते. ह्याचा अर्थ प्रतिदिन ज्या व्यक्तीला दोन वेळचे पोटभर वा पोषक अन्न मिळू शकत नाही वा एकवेळ तरी उपास काढावा लागतो; त्याची स्थिती कसाबसा दिवस ढकलण्याची असते. सहाजिकच त्याच्यासाठी उगवणारा प्रत्येक दिवस हे संकटच असते. बुरादिन असतो. म्हणूनच ज्या दिवशी दोन्ही वेळचे पोटभर पोषक अन्न मिळू शकेल, तो अशा गरीबासाठी सुखी वा अच्छा दिन असतो. असे निव्वळ रोजचे पोटभर अन्न मिळू लागले, तर त्याला अच्छे दिन आल्याचे समाधान मिळणार ना? त्याच्यासाठीचे अच्छेदिनाचे परिमाण असे असते. पण सुखी मध्यमवर्गिय वा त्यापेक्षाही धावपळ करणार्‍या कनिष्ठ कष्टाळू वर्गात, रोजच्या पोटपाण्याची तितकी चिंता नसते. म्हणूनच रोजचे पोटभर अन्न ही अशा वर्गासाठी अच्छेदिनाची चाहूल नसते. पण घरात चुल पेटण्याच्या लाकूड फ़ाट्यापेक्षाही गॅसचा सिलेंडर आला व सहजगत्या उपलब्ध होत असेल, तर ती मोठीच सुविधा असते आणि त्या घरातील गृहीणीला अच्छेदिन आल्यासारखे वाटू लागणे स्वाभाविक आहे. कारण चुलीच्या इंधनाची रोजची डोकेदुखी संपुष्टात आलेली असते, हे निकष त्यांच्या जीवनात डोकावून बघितले तरच दिसतात वा उमजू शकतात.

मोदी सरकार आल्यापासून दोन कोटी अशा गरीब कुटुंबांना गॅसची जोडणी मिळाली असून, तितक्या गृहीणींना काट्याकुट्यातून लाकुडफ़ाटा जळण गोळा करणे वा रॉकेल रेशनवर मिळण्याच्या चिंतेतून मुक्त केले आहे. चुलीतून धुमसणार्‍या धुरापासून मुक्त केले आहे. तितक्या म्हणजे दोन कोटी कुटुंबातली गृहीणी समाधानी झालेली असेल, तर तितक्या घरात काही अंशाने अच्छेदिन आलेले असतात. पण त्यापेक्षाही सुखवस्तु वा मध्यमवर्गातल्या हजारो लोकांच्या जीवनात असा कुठलाही पायाभूत वा व्यापक बदल अजून झालेला नाही. त्यांच्या जीवनात गॅसची चुल वा अन्य काही किरकोळ गोष्टी नगण्य असतात. म्हणून तर सव्वा कोटी कुटुंबांनी त्यांना सरकारकडून मिळत असलेले गॅसवरचे अनुदान सोडूनही दिलेले आहे. जे अनुदान त्यांच्यालेखी नगण्य आहे, तेच दोन कोटीहून अधिक गरीबांचाठी वरदान म्हणजे अच्छेदिन ठरलेले आहे. अशा कित्येक लहानमोठ्या योजना तीन वर्षात आल्या किंवा परिणामकारक पद्धतीने राबवलेल्या दिसतील. ज्यामुळे तळागळातील कोट्यावधी लोकांच्या जीवनात मोठा फ़रक पडलेला दिसू शकेल. त्यांच्या जीवनातला फ़रक सुखवस्तुंच्या तुलनेने नगण्य असेल, पण त्याच गरीबाची देशातील लोकसंख्या सुखवस्तुंच्या तुलनेत प्रचंड असते, हेही विसरता कामा नये. सत्तर वर्षात गरीबी हटवण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च झाले आणि शेकड्यांनी योजना आल्या. त्यापैकी किती खरोखर त्या गरीबापर्यंत पोहोचल्या व परिणामकारक झाल्या, यांची तुलना केल्यास अच्छेदिन कुठे आहेत आणि कसले आहेत, त्याचे उत्तर मिळू शकते. पण जे कोणी असे प्रश्न अगत्याने पुढे करतात वा विचारतात, त्यांना गरजू गरीबाचे बुरे दिन वा मध्यमवर्गाचे कष्टाळू सुसह्य जीवन यातले, कुठलेही तारतम्य नाही. म्हणून त्यांना असले प्रश्न पडत असतात. घरी भाजी कोण आणतो तेही ठाऊक नसलेल्या राहूलनी अच्छेदिन कुठे आहेत, विचारणे म्हणूनच हास्यास्पद असते.

राहूल गांधी किंवा तत्सम उच्च जीवनशैलीत जगणार्‍यांना सुट्ट्या पैशाची चणचण किंवा नोटांची टंचाई असल्या गोष्टी वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून कळत असतात. अशी काही समस्या असते व त्यातून लोक त्रस्त होतात म्हणजे काय, याचा अनुभव त्यांना कधीही नसतो. आवडत्या भाजीची जुडी महाग झाली म्हणजे काय? काल त्या जुडीची कींमत किती होती व आज किती चढली, तेही त्यांना भेडसावत नाही. घरात पाणी पोहोचत नाही. इंधनाची समस्या आहे; असल्या गोष्टी त्यांनी ऐकलेल्याही नसतात. कारण अशा गोष्टी उरकण्यासाठी त्यांच्या घरात नोकरचाकरांची रेलचेल असते. त्यांनी शब्द उच्चारावा, वस्तु वा सुविधा हजर असतात. अशा लोकांनी गरीबाला नोटा मिळत नाही म्हणून बॅन्केच्या रांगेत येऊन उभे रहाणे हास्यास्पद असते. बॅन्क वा अन्य कुठल्या तरी रांगेत व्याकुळ होऊन या देशात आजवर लाखो माणसे मरण पावली आहेत. तेव्हा नोटाबंदी नव्हती. पण रांगेत उभे राहून मृत्यू झाल्याचे राजकारण या देशाने कधी बघितले नव्हते. पण ते होऊ शकले, कारण ज्या लोकांच्या जगण्यात कुठलेही बुरेदिन कधीच आले नाहीत; असे लोक अच्छेदिनांची प्रतिक्षा करीत बसलेले आहेत. पण खर्‍याखुर्‍या गरीबाला ज्या समस्या सतत भेडसावत असतात, त्याच्या आयुष्य़ातल्या किती अडचणी दूर झाल्या, त्याचे सुख त्यालाच कळू शकते. म्हणून तर असा गरीब मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मोदींच्या शब्दाखातर त्यांच्या उमेदवार व पक्षाला मते देतो आहे. त्यातून भाजपाला बरे दिवस आलेले दिसतात. उलट अच्छेदिन कुठे आहेत असा सवाल करणार्‍यांना बुरेदिन आलेले निकालातूनच स्पष्ट होते. कारण त्यांना अजून अच्छेदिनाची व्याख्या किंवा व्याप्तीच उमजलेली नाही. ज्याची वेदना असह्य असते त्याला फ़ुंकर किती सुखद असते, त्याचा अर्थ लागू शकतो. अन्यथा जो जखमीच नाही, त्याला फ़ुंकर काय कामाची?

1 comment:

  1. राहुलच नाही तर नेहरू पासुनच असे आहे त्यांना पन गराबी काय हे कुठ माहित होत? त्यांचे कपडे पन परदेशातुन धुवुन येत.सुरूवातच चुकीची होती आणि सत्तर वरशात तेच लोक सत्तेवर होते. आता वेगळ होतय ते झेपेना

    ReplyDelete