Friday, June 16, 2017

कोण हा मिरवैज फ़ारुख?

Image result for mirwaiz maulvi farooq

हुर्रीयतच्या एका नेत्याने पाकिस्तानच्या इंग्लंडवरील विजयानंतर पाक संघाला शुभेच्छा दिल्यावरून कल्लोळ सुरू झाला आहे. वास्तविक त्यात नवे काहीच नाही. ज्यांनी आपले पाकप्रेम नेहमीच जगजाहिर केलेले आहे, त्यांनी भारताच्या कुठल्याही नामुष्कीनंतर फ़टाके वाजवले, किंवा पाकच्या यशासाठी बधाई दिली, तर त्यात चकीत होण्यासारखे काहीही नसते. पण आपल्याकडल्या माध्यमांना अशा गोष्टींचा गाजावाजा करण्याचा एक छंद लागला आहे. मग असे झाले, की तात्काळ त्या पाकप्रेमीनाही बोलण्याची संधी मिळत असते. त्यातून त्यांना व त्यांच्या भूमिकेला वारेमाप प्रसिद्धीही मिळत असते. किंबहूना त्या कोणा मिरवैज फ़ारुखच्या तशा विधानाची माध्यमांनी दखलही घेण्याची गरज नाही. दारुडा बरळला वा कुठल्या चिखलात जाऊन लोळला, ही बातमी नसते. त्यात लोकांना नव्याने सांगण्यासारखे काहीही नसते. कुत्रा माणसाला चावला ही कधी बातमी मानली जात नाही. म्हणून तर मिरवैज फ़ारूख याने पाकिस्तानला शुभेच्छा दिल्या, तर ती बातमी होऊ शकत नाही. उलट त्याने कधी भारतीय संघाला यशासाठी अभिनंदन केले तरच ती बातमी होऊ शकते. पण भारतीयांचे दुर्दैव असे, की इथे अतिशहाणेच शहाणे म्हणून वावरत असतात आणि अशा अफ़डतूस गोष्टींचा उगाच बागूलबुवा केला जात असतो. म्हणून मग यामागे काही ठराविक पुर्वयोजना असावी अशीही शंका येते. म्हणजे असे, की मिरवैजसारखे लोक मुद्दाम असे काही बोलणार वा सांगणार आणि ठराविक पत्रकारांनी त्यावरून गदारोळ माजवायचा. मग सगळेच त्यावरून ओरडा सुरू करतात. त्यामुळे मग अशा पाकप्रेमी नाकर्त्यांना जगासमोर आपली भूमिका नव्याने मांडण्याची आणखी एक संधी मिळत असते. त्याचा वेगळा लाभ त्यांना मिळत असतो. कधी पत्रकार वा माध्यमांनी त्याचा वेगळा विचार केला आहे काय?

मिरवैज फ़ारुख वा सय्यद अलिशहा गिलानी यांच्यापासून सुधींद्र कुलकर्णी वा मणिशंकर अय्यर यांना फ़ारसे कोणी इतर बाबतीत विचारत नाही. पण अशा गदारोळात त्यांच्यावर कॅमेरा रोखला जातो आणि त्यांचे मत विचारले जात असते. त्यांना तशीच संधी हवी असते. ती संधी त्यांनी मागितली तर कोणी देणार नाही. पण वादाचाच विषय झाला, मग दुसरी बाजू म्हणून माध्यमांना या पाकप्रेमीना संधी द्यावी लागते. पण जेव्हा अशा शब्दांचा वा आशयाचा सातत्याने मारा समान्य प्रेक्षक वाचकावर होत असतो, तेव्हा त्या बाबतीत सामान्य भारतीयाचे मन बधीर होत असते. म्हणजे असे, की भले अशा लोकांचे शब्द वा त्यातला आशय देशद्रोहाचा असेल. तरीही जर त्यांच्याविरोधात कायदा काही करू शकत नसेल, तर सामान्य भारतीयांच्याही भावना व धारणा त्या विषयात बोथट होत जातात. आपल्या देशाची कोणीही कशीही निंदा करावी, आपल्या राष्ट्रवादाची कोणीही कितीही विटंबना करावी, त्याला कायदा बिर्बंध घालू शकत नाही, म्हणजेच अशी विटंबना रास्त वा कायदेशीर असल्याचा समज निर्माण होत असतो. त्यातून आपल्या राष्ट्रप्रेम वा राष्ट्रवाद याविषयी लोकांच्या असलेल्या संवेदना अधिक बधीर होत जातात. अशा भावना बोथट होण्यातून देशद्रोहाला अधिक प्रोत्साहन मिळत असते. देशद्रोही अधिक शिरजोर होत असतात. म्हणूनच मिरवैज फ़ारुख असे काही बोलला असेल, तर त्याला प्रसिद्धी देयापेक्षा त्याकडे साफ़ डोळेझाक करण्यातच शहाणपणा असतो. पण तितकीही बुद्धी आजच्या माध्यमात व पत्रकारांत राहिलेली नसावी. अन्यथा कुणा एका फ़डतूस काश्मिरी नेत्याच्या अशा बोलण्यावरून वादळ निर्माण करण्यात आले नसते. कोण भुंकला वा कशासाठी भुंकला, त्याचाही विचार न करता गल्लीतले सर्व कुत्रे बेताल भुंकत सुटतात, तशी आज माध्यमांची दुर्दशा होऊन गेलेली आहे. आपल्या व्यवसायाचे गांभिर्य वा त्याचा जनमानसावर होणारा विपरीत परिणाम, याचेही भान कुणाला उरलेले नाही.

मुंबईत कुणा पाकिस्तानी मंत्र्याच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याच्या निमीत्ताने सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केलेला होता. त्यांच्या तोंडाला काळे फ़ासले होते. तेव्हा आपले तोंड साफ़ही न करता कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेतली. आपल्या तोंडाला लागलेले काळे हा माणुस मिरवत राहिला. त्यामागचा त्याचा हेतू कधी कोणी लक्षात घेतला काय? आपल्याला मोठा सन्मान मिळाला, अशा थाटात कुलकर्णी तेव्हा काळे मिरवत राहिले होते. कारण त्यातून त्यांना अधिक प्रसिद्धी मिळत होती आणि तितकी आपली पाकप्रेमी भूमिका अधिक लोकांना सांगण्याची संधी मिळत होती. त्यातून अधिकाधिक खळबळ माजवण्याची संधी माध्यमांना मिळाली. पण अखेरीस त्यातून काय साधले गेले? अशी माणसे मुददाम लोकभावनेला डिवचत असतात. त्यातून त्यांना काही हेतू साध्य करायचे असतात. पाकिस्तानला अशा रितीने अधिक मदत मिळत असते. किंबहूना म्हणूनच पाकिस्तानने मागल्या काही वर्षात भारतामध्ये घुसखोर घातपाती पाठवण्याइतकीच मेहनत भारतविरोधी बुद्धीमंत जोपासण्यात घालवली आहे. कुठल्याही देशात बुद्धीभेद करणार्‍यांकडून देशाच्या सुरक्षेला सर्वात मोठा धोका असतो. कारण सैनिक वा फ़ौजा ह्या जनतेच्या भावनात्मक पाठींब्यावर पराक्रम करीत असतात. त्यांच्या त्याच भावनांचे खच्चीकरण झाले, मग सैन्याला जोशाने लढता येत नाही. लढाई ही भावनांच्या आहारी जाऊन होत असते. हत्यार वा स्फ़ोटके ही त्यातली निर्जीव साधने असतात. अभिमान स्वाभिमान ही युद्धामागची खरी चालना व प्रेरणा असते. तीच प्रेरणा मारून टाकली, मग हत्यारे व शस्त्रसाधने निकामी होऊन जातात. म्हणूनच भारतात पाकिस्तानने सर्वात मोठी गुंतवणुक बुद्धीभेद करणार्‍यांमध्ये केलेली आहे. त्यात हुर्रीयतचे लोक जसे सहभागी आहेत, तितकेच इथले पाकप्रेमीही सहभागी आहेत.

या लोकांचे शब्द काळजीपुर्वक दुर्लक्षित केले, तरच पाकचा त्यात पराभव केला जाऊ शकेल. पाकिस्तानातही भारताविषयी आस्था असलेले शेकड्यांनी लोक आहेत. पण त्या बलुची वा पश्तुनी लोकांना पाकिस्तानच्या कुठल्याही माध्यमात प्रसिद्धी मिळत नाही. कितीही स्फ़ोटक वा डिवचणारे विधान पाकिस्तानी नागरिकाने केले, म्हणून तिथली माध्यमे निषेधासाठीही त्यांचा गदारोळ होऊ देत नाहीत. कारण तसे केल्यास तिथल्या पाकविरोधी प्रवृत्तीला खतपाणी घातले जाते, याचे भान त्यांना आहे. परंतु भारतीय शहाण्यांना त्याचे अजिबात भान उरलेले नाही. खरे सांगायचे तर हा मिरवैज फ़ारुख वा गिलानी यांना चार काश्मिरी लोकही ओळखत वा वि़चारत नाहीत. पण सतत त्यांना माध्यमातून प्रसिद्धी मिळत राहिल्याने त्यांना जग ओळखू लागलेले आहे. कन्हैयाकुमार माध्यमांनी डोक्यावर घेतला आणि गुजरातचा हार्दिक पटेल तसाच मोठा झाला. जेव्हा मध्यमे पाठ फ़िरवतात, तेव्हा केजरीवालही नामोहरम होऊन जातो. प्रत्येक निवडणूकीत ओवायसी मार खातो आणि हुर्रीयतवाले तर मतदानाला सामोरे जाण्याचीही हिंमत करीत नाहीत. मग त्यांना माध्यमांच्या पलिकडे काय स्थान आहे? हे असे लोक माध्यमांनी उभे केलेले बागुलबुवाच नाहीत काय? मग अशा बातम्या झळकवण्यातून इथली माध्यमे व पत्रकार पाकिस्तानला सहाय्य करीत नाहीत काय? जगातली प्रत्येक गोष्ट ओरडून सांगण्याची गरज नसते. त्याचे काय परिणाम संभवतात, त्याचा विचार करण्याचे भान राहिले नाही, मग पत्रकारिता व अफ़वाबाजी त्यातला फ़रक धूसर होत जातो. परिणामी माध्यमेच अनवधानाने मिरवैज वा पाकिस्तानच्या हातातली खेळणी होऊन जातात. खळबळ माजवण्याच्या नादात आपण काय करीत आहोत, त्याचेही भान सुटल्याचा हा पुरावा आहे. अर्थात शहाण्याला शब्दाचा मार म्हणतात. नसतील, त्यांच्याविषयी काय बोलावे?

1 comment:

  1. जिंदगी मौत न बन जाये
    संभालो यारो
    खो रहा चैनो अमन
    मुश्किलो मे है वतन
    एक तरफ प्यार है
    चाहत है वफादारी है
    एक तरफ देश मे
    धोका है , गद्दारी है

    देशातील सद्य स्थिती वर सरफरोश चित्रपटातिल हे गाणे तंतोतंत लागु पडते.

    ReplyDelete