Thursday, August 10, 2017

जनता दल (विमुक्त)

nitish sharad yadav के लिए चित्र परिणाम

नितीशकुमार यांचे निकटवर्ति असलेले राज्यसभेतील जदयुचे नेते शरद यादव यांनी प्रथमच आपल्या पक्षाध्यक्ष व मुख्यमंत्र्याच्या कृतीविरुद्ध मतप्रदर्शन केलेले आहे. थोडक्यात आता त्या पक्षात नव्याने फ़ुट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे बघितले तर जनता दल म्हणजे पुर्वाश्रमीचे समाजवादी आहेत. १९७७ सालापुर्वी ज्यांना राजकारणात समाजवादी म्हणून ओळखले जात होते, त्यांनी आणिबाणीनंतर स्थापन झालेल्या जनता पक्षात विलीन होताना आपल्या समाजवादी पक्षाचे विसर्जन केले होते. पण त्यापुर्वी तीन दशकात ह्या मुळच्या समाजवादी पक्षाचे वारंवार तुकडे पडत राहिलेले होते. जनता पक्षाची स्थापना होण्यापुर्वी किंवा आणिबाणी लागण्यापुर्वी अल्पकाळ पुन्हा असे सर्व समाजवादी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी संयुक्त समाजवादी पक्षाची स्थापना केलेली होती. तरीही त्यापासून उत्तर भारतातील समाजवादी जवळपास अलिप्त होते. त्यांना तेव्हा राजनारायण गट म्हणून ओळखले जात होते. असे समाजवादी लोहियावादी तेव्हा चरणसिंग यांच्या भारतीय लोकदल पक्षात होते. पुढे जनता पक्ष फ़ोडण्यातही त्यांचाच पुढाकार होता. चरणसिंग यांना पंतप्रधान करण्यासाठी अशाच समाजवादी जनता पक्षीयांनी मोरारजी सरकार पाडलेले होते. पुढे उरलासुरला जनता पक्ष एक दशक कसाबसा चालला आणि १९८९ च्या सुमारास विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या नेतृत्वाखाली अनेक पक्ष एकत्र आले, त्यात असे समाजवादी जनता पक्ष व लोकदल म्हणून विसर्जित झाले होते. त्यानंतरही फ़ाटाफ़ूट व विभाजनाचा सिलसिला सुरूच राहिलेला आहे. त्यामुळे आता शरद यादव यांनी वेगळी चुल मांडण्याचा पवित्रा घेतला, तर नवल मानायचे कारण नाही. कुठेही गुण्यागोविंदाने नांदणे वा स्थीरस्थावर होणे, हे मुळच्या समाजवादी वंशजांना शक्य होत नाही. थोडेसे स्थैर्य जरी त्यांच्या आयुष्यात आले, तरी ते बेचैन होऊन जातात.

विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान असताना मुळातच त्यांना नेता निवडल्याने मुळच्या जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर नाराज होते. पुढे लालूंनी बिहारमध्ये अडवाणींची रथयात्रा रोखल्यावर जो पेचप्रसंग निर्माण झाला त्याचा लाभ उठवून चंद्रशेखर यांनी जनता दल फ़ोडून अल्पकालीन पंतप्रधानपद उपभोगून घेतले. तिथून नव्या जनता दल पक्षाच्या फ़ाटाफ़ूटीचा आरंभ झाला. तो अजून थांबताना दिसलेला नाही. आधी त्या पक्षातून चंद्रशेखर बाहेर पडले होते आणि त्यांच्यासोबत राजनारायण यांचा चेला मानले गेलेले मुलायमसिंगही बाहेर पडले. त्यांनी समाजवादी जनता दल असा मुखवटा लावलेला होता. मात्र १९९१ च्या मध्यावधी निवडणूकीत त्यांचा फ़ज्जा उडाला आणि पुढल्या काळात मुलायम यांनी जनता नाव टाकून पुन्हा समाजवादी पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. ते अजून आपल्या समाजवादी नावाला चिकटून कायम राहिले आहेत. मात्र तिथेही आता भाऊबंदकी उफ़ाळून आल्याने अनेक चिरफ़ळ्या उडालेल्या आहेत. दरम्यान सिंग चंद्रशेखर यांनी सोडलेल्या जनता दलातही सतत फ़ाटाफ़ुट होत राहिली आहे. तरीही त्या पक्षाला १९९६ सालात दोनदा पंतप्रधान पदी बसण्याचा सन्मान मिळालेला होता. तसे बघितले तर हे जनता दल केवळ बिहार व कर्नाटक या दोनच राज्यात शिल्लक राहिलेले होते. त्यात दक्षिणेतील नेतृत्व देवेगौडा करीत होते आणि उत्तरेतील नेतृत्व बिहारमध्ये जॉर्ज फ़र्नांडीस करीत होते. कर्पुरी ठाकूर यांच्यानंतर बिहारमध्ये फ़र्नांडीस यांच्या जोडीला लालूप्रसादांचा उदय झालेला होता. मात्र त्या दोघांमध्ये फ़ारसे पटत नव्हते. आज जसे लालू-नितीश यांच्यात खटके उडालेले आहेत, तेच १९९३ सालातही उडालेले होते आणि म्हणूनच फ़र्नांडीस यांना गाशा गुंडाळून वेगळी चुल मांडावी लागलेली होती. पण तेव्हा त्यांच्यासोबत रामविलास पासवान वा शरद यादव आलेले नव्हते. केवळ नितीश यांनी फ़र्नांडीसांना साथ दिलेली होती.

देवेगौडा पंतप्रधान झाले त्याच्या आधीपासूनच नितीश-फ़र्नांडीस जनता दलातून बाहेर पडून त्यांनी समता पार्टीची स्थापना केलेली होती. आपले अस्तित्व टिकवण्याच्या लालूविरोधी लढाईत त्यांनी आधी नक्षलवादी गटांनाही सोबत घेऊन बघितले. त्याचा उपयोग झाला नाही तेव्हा थेट भाजपा गोटात दाखल होण्याचा धोकाही पत्करला होता. १९९६ च्या निवडणूका झाल्या तेव्हा पासवान, शरद यादव लालूंसह जनता दलातच होते. पण लौकरच त्यांच्यातही खटके उडाले आणि लालूंनी सत्ता सोडायची वेळ आल्यावर पत्नीलाच मुख्यमंत्रीपदी बसवल्याने यादव पासवान खवळले. विवाद सुरू झाला तेव्हा लालूच जनता दलाचे अध्यक्ष होते. त्यांनी पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रीय जनता दल नावावी वेगळी चुल मांडली. दोन वर्षाचा कालावधी उलटण्यापुर्वीच यादव पासवान यांचा धीर सुटला आणि त्यांनी देवेगौडांना सोडून नितीश-फ़र्नांडीस यांच्याशी जुळते घेतले. त्यामुळे त्यांचे जनता दल व फ़र्नांडीस यांच्या समता पक्षाचा विलय होऊन आजचे जनता दल (संयुक्त) नावाचा पक्ष जन्माला आला. मात्र तो दिर्घकाळ टिकून राहू शकला नाही. त्यातून बाजूला होऊन पासवान यांनी आपला लोकजनशक्ती पार्टी नावाचा वेगळा पक्ष स्थापन केला. असे या समाजवादी जनता दलीय मंडळींचे फ़ुटणे-एकत्र येणे सातत्याने चालूच राहिलेले आहे. किंबहूना एकत्र येण्यासाठी मुळात फ़ुटणे व वेगळे असणे भाग असते. म्हणून की काय हे नेते सतत फ़ाटाफ़ूट करीत असतात, अशी शंकाही घ्यायला जागा आहे. समजा नितीशना सोडले नाही तर शरद यादव लालूंच्या गोटात कसे दाखल होऊ शकतील? लालूंना सोडले नसते, तर पासवान यांना मोदींच्या गोटात कसे दाखल होता आले असते? सहाजिकच फ़ुटण्यासाठी एकत्र यायचे वा एकत्र येण्यासाठी फ़ाटाफ़ूट करत रहायचे, हा जणू समाजवादी जनता दलीय स्वभावधर्म होऊन गेलेला आहे. शरद यादव त्यानुसारच चाललेले आहेत.

भटक्या जाती जमातींना विमुक्त असेही म्हटले जाते. जुने समाजवादी वा नवे जनता दलीय तसेच राजकीय विमुक्त स्वभावाचे असतात. त्यांना कधी तत्वाचा उमाळा येईल आणि कधी जबाबादारीसाठी तडजोड करणे योग्य वाटेल, याची कोणी हमी देऊ शकत नाही. जुन्या चुका कबुल करणे आणि नव्या चुका करण्यासाठी कंबर कसून सज्ज होणे, ह्याला अशा लोकांचे धोरण म्हणता येईल. लोकसभा निवडणूकीपुर्वी शरद यादव एनडीए सोडायला नाराज होते. पण नितीश यांच्यामागे त्यांची फ़रफ़ट झाली होती. कारण तेव्हा यादव एनडीए आघाडीचे निमंत्रक होते आणि त्यांनी कुठलीही तक्रार केलेली नव्हती. पण नितीशनी निर्णय घेतला आणि यादव यांनी त्याला मान्यता दिली होती. आताही नेमके उलट वागताना त्यांच्या वैचारिक भूमिकेची गोची होऊन गेलेली आहे. म्हणूनच त्यांनी त्याविषयी बोलायचे अनेक दिवस टाळलेले होते. पण आता त्यांनी निश्चय केलेला दिसतो. पक्षाचे कोणी त्यांच्या सोबत येण्याची शक्यता नाही. त्या पक्षाला केवळ बिहारपुरतीच मान्यता असल्याने आता शरद यादव यांना वेगळी चुल या वयात मांडणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना लालूंच्या पक्षात सहभागी होता येईल. त्यांना भाजप सोबत जाण्याचा नितीशचा निर्णय अमान्य असेल तर राज्यभर दौरा करण्याचे नाटक काय कामाचे? त्यांनी थेट विरोध करून बाहेर पडावे किंवा वेगळा तंबू थाटावा. अशा गडबडीत केंद्रात मंत्रीपद मिळवण्याची ही धडपड चालली आहे? मागल्या लोकसभेत त्यांचा भाजपा विरोधात लढताना मतदारानेच पराभव केलेला आहे. त्यामुळे आता जनतेमध्ये जाऊन ते कसला कानोसा घेण्याच्या वल्गना करीत आहेत? चार दशकाहून अधिक काळ असली नाटके बघून लोक कंटाळलेले आहेत. तेव्हा तत्वाच्या गप्पा वा विचारसरणीची लढाई, हे शब्द पोकळ होऊन गेलेत. निवृत्तीच्या वयात तरी पोरकटपणा थांबवायला काय हरकत आहे?

1 comment: