Wednesday, August 9, 2017

गुजरातचे नाट्य

sonia ahmed patel के लिए चित्र परिणाम

मंगळवारी गुजरात विधानसभेत राज्यसभेचे मतदान संपल्यानंतर खरे राजकीय नाट्य रंगलेले होते. तसा आधीच्या दोन आठवड्यापासून या नाट्याला आरंभ झालेला होता. बिहारचे सत्तांतर आणि राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणूकांत बाजी मारल्याने भाजपा जोरात होता आणि प्रत्येकजण पक्षाध्यक्ष अमित शहांचे कौतुक करत होता. अशा स्थितीत गुजरातचे राजकारण रंगलेले होते. आजवर तिथे लागोपाठ चारवेळा अहमद पटेल निवडून आलेले होते आणि आताही त्यांना सहज जिंकता येईल, इतकी मते कॉग्रेसच्या गोटात होती. म्हणूनच चिंतेचे काही कारण नव्हते. मात्र विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना राज्य पक्षात धुसफ़ुस रंगलेली होती. त्याची पहिली झलक राष्ट्रपती निवडणूकीत ११ मते कोविंद यांना जाऊन मिळालेली होती. पण आपल्या सवयीप्रमाणे कॉग्रेसश्रेष्ठी गाफ़ील होते आणि शंकरसिंह वाघेला काही गडबड करतील, अशी कोणाची अपेक्षा नव्हती. अशा वेळी वाघेलांनी पक्षाला रामराम ठोकून बंडाचा झेंडा हाती घेतला होता. राज्यसभेच्या लढाईत आमदार हेच बिनीचे शिलेदार असतात, याचीही फ़िकीर कॉग्रेसश्रेष्ठींनी केली नाही, म्हणून पुढले नाटक रंगलेले होते. सुदैवाने अहमद पटेल यांच्यासारखा मुरब्बी नेताच लढतीमध्ये असल्याने त्याने यातूनही वाट काढण्याचा प्रयास केला. दुसरे सुदैव म्हणजे यापासून राहुल गांधींना पक्षाने पुर्णपणे बाजूला ठेवलेले होते. उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या मुहूर्तावर पक्षाच्या सहा आमदारांनी कॉग्रेस सोडली, तेव्हा पटेल यांनी पुढला धोका ओळखला होता आणि विनाविलंब त्यांनी उरलेसुरले आमदार पळवून गुजरात बाहेर नेले. त्यामुळेच मतदानाच्या दिवशी निदान ४४ आमदार पक्षात शिल्लक राहिलेले होते. अन्यथा भाजपाचे चाणक्य अमित शहांनी पटेलांना परतीचा आहेर दिल्यातच जमा होता, असे म्हणायला हरकत नाही.

ही निवडणूक इतकी अटीतटीची का झाली, तेही थोडे समजून घेतले पाहिजे. अमित शहांची यशोगाथा आज लोक बोलत असतात. पण आठदहा वर्षापुर्वी याच गुजरातची सत्ता हातात असताना त्यांच्यासह नरेंद्र मोदींची वरात अहमद पटेल यांनी दिल्लीची सत्ता वापरून काढलेली होती. त्यात इशरत जहान व सोहराबुद्दीन यांच्या चकमकीचे निमीत्त करून अनेक आरोप झाले होते. समाजसेवी संस्था व सीबीआयला हाताशी धरून अहमद पटेल यांनी शहा-मोदींना चक्क आरोपीच्या पिंजर्‍यात बंद केलेले होते. मुख्यमंत्री असतानाही मोदी यांची एसआयटी पथकाकडून सलग आठ तास जबानी व तपासणी झालेली होती. याखेरीज या चकमकीच्या वेळी गुजरातचे गृहमंत्री असलेले अमित शहा यांच्याच आदेशावरून हा कत्तली झाल्याचा आरोप ठेवून, त्यांना अटक करण्यात आलेली होती. त्यांच्याशिवाय अनेक वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांनाही त्यात गुन्हेगार ठरवून गजाआड ढकलण्यात आलेले होते. त्या संपुर्ण छळसत्राचा पडद्यामागचा सुत्रधार सोनियांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल होते, हे केव्हाच लपून राहिलेले नव्हते. सत्तेची मस्ती आ्ज मोदी-शहांना चढल्याचा वा ते साम दाम दंड भेद वापरत असल्याचा सरसकट आरोप होतो. पण आठदहा वर्षापुर्वी दिल्लीतली सत्ता हाती असताना सोनियांच्या आडोश्याने अहमद पटेल यापेक्षा काहीही वेगळे करीत नव्हते. त्यांनी मोदी-शहांना सूडभावनेने संपवण्यासाठी नवनवी कुभांडे रचून सत्ता त्यासाठी राबवलेली होती. त्या सर्व आरोपातून अखेरीस सुप्रिम कोर्टानेच मोदी-शहा यांना निर्दोष मुक्त केलेले आहे. त्यामुळे त्यात दुखावलेले शहा किंवा मोदी यांनी साध्या राजकारणात सत्तेचा वापर करून पटेलांची कोंडी केल्यास क्षम्य मानता येईल. पण मुद्दा इतकाच, की आज अमित शहा राज्यसभेच्या मतदानाचे निमीत्त शोधून पटेलांना संपवायला निघाले असतील, तर त्याला परतीचाच आहेर मानावा लागेल.

सत्तेच्या बळावर भंपक समाजसेवींना पुढे करून व कायदेशीर व्यवस्था वापरून अमित शहांचा काटा काढण्याचा खेळ पटेलांनीही केलेला होता. आज त्या़ची परतफ़ेड शहा करायला निघाले होते. कारण आज सत्ता गमावलेले अहमद पटेल दुबळे झालेले आहेत. पण जसे तेव्हा पटेल मस्तीत असल्याने फ़सत गेले होते, तशीच काहीशी शहांची मस्ती या निकालाने उतरवली आहे. पहिली गोष्ट म्हणजे या एका जागेने भाजपाचे काही मोठे कल्याण होणार नव्हते. पण सोनियांचा निकटवर्ति म्हणून पटेलांचा पराभव हा मोठा डाव ठरला असता. म्हणून शहांनी ही खेळी केलेली असावी. मात्र तसे करताना शहांनी आपल्या जमेच्या बाजूच तेवढ्या विचारात घेतल्या. शत्रू कितीही दुबळा असला, म्हणून त्याला निकामी समजण्यात धोका असतो. शहांनी तोच धोका पत्करला. जेव्हा पराभवाची ठाम शक्यता असते, तेव्हा शत्रूला गमावण्यासारखे काही शिल्लक उरत नाही आणि तो सर्वस्व पणाला लावून आखाड्यात उतरतो. त्याच्यावर तशी पाळी आणणे, ही मोठी चुक असते. शहांनी वा भाजपाने गुजरातमध्ये तीच चुक केली असे आता म्हणता येईल. शंकरसिंह वाघेला नाराज असल्याचा फ़ायदा घेऊन अहमद पटेल यांना राज्यसभेत पाणी पाजण्याचा डाव त्यामुळेच शिजला. परंतु असे डाव यशस्वी करण्यासाठी कमालीची गुप्तता व सावधानता बाळगावी लागते. भाजपाचे यश दुसर्‍या पसंतीच्या मतमोजणीवर अवलंबून होते. किंवा सोपेही होते. पण अधिक साहसी पवित्रा घेऊन पटेल यांना पहिल्याच फ़ेरीत बाद करण्याचे डाव खेळले गेले आणि तीच चुक भाजपाला महागात पडलेली आहे. सहा आमदारांचे राजिनामे कॉग्रेसला सावध करणारे ठरले आणि तिथून पटेल यांना धोका जाणवला होता. अशा किंवा फ़ुटणार्‍या आमदारांविषयी पटेलांना गाफ़ील राखले असते, तर सहजासहजी त्यांना पराभूत करता आले असते. पण भाजपाचा अति आत्मविश्वास त्यांना महागात पडला.

काहीही असो, दिर्घकाळानंतर कॉग्रेसने खरी झूंज दिलेली असेल, तर त्याचे स्वागत करायला हवे. लोकसभेतील दारूण पराभवानंतर मागल्या तीन वर्षात प्रथमच कॉग्रेस आव्हान द्यायला उभी राहिल्यासारखी मंगळवारी दिसली. आपण निमूट पराभव मान्य करत नसल्याची पटेल वा त्यांच्या सहकार्‍यांनी दिलेली ही साक्ष, त्यांच्या पक्षाला अजून भवितव्य असल्याची खूण आहे. संसदेत गोंधळ घालण्यापेक्षा कॉग्रेसने अशीच जिद्द बाहेर दाखवून नव्याने झुंजायचे ठरवले, तर भाजपाला इतके सहजगत्या यश मिळताना दिसणार नाही. अशीच तत्परता बिहारच्या विषयात दाखवून पटेल वा कॉग्रेसने लालूंची समजूत काढली असती, तर नितीशकुमार यांना महागठबंधन मोडून भाजपाच्या गोटात दाखल होण्याचा मार्ग रोखला गेला असता. शहा-मोदींना शह मिळालेला दिसला असता. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूकातही आधीपासून विरोधकांना विश्वासात घेऊन हालचाली केल्या असत्या, तर रामनाथ कोविंद यांना भाजपा सहज निवडून आणू शकला नसता. काहीही असो, देरसे आ्ये दुरूस्त आये म्हणतात, तसा कॉग्रेस पक्ष नव्याने आपल्या्ला स्पर्धात्मक राजकारणात सावरणार असेल, तर वाईट नाही. अहमद पटेल यांच्या झुंजीने त्याची चुणूक दाखवली आहे. मात्र त्यातून धडा घेण्याची तयारी असायला हवी. ही सुद्धा विचारसरणीची लढाई नव्हती, तर विजय संपादन करण्याची झुंज होती. विजय होतो, तेव्हाच विचारसरणीचे महत्व असते. पराभूतांच्या वैचारिक पोपटपंचीला कोणी किंमत देत नसतो. जितक्या लौकर कॉग्रेस नेत्यांच्या हे लक्षात येईल, तितक्या लौकर त्या पक्षाला सावरता येईल. नाहीतर पटेल यांच्या विजयाची काडी बुडत्याला आशा दाखवू शकेल, पण आधार म्हणून बुडण्यापासून वाचवू शकणार नाही. हातपाय हलवावे लागतील. प्रयास करावाच लागेल. कारण नुसता चमत्कार घडण्य़ाची अपेक्षा बाळगून कुणाला सतत यशस्वी होता येत नाही.

7 comments:

  1. एक प्रकारे गुजरातमध्ये भाजप अहमद पटेलांना रोखू शकली नाही हे बरंच झालं, कारण त्यामुळे भाजपवर सतत घोडेबाजाराचे आरोप झाले असते. शिवाय आता ते बेसावध राहणार नाहीत. विधानसभा निवडणुकीची जोमाने तयारी करतील.

    ReplyDelete
  2. २ मतदारांनी मतपत्रिका पक्षश्रेष्ठींना न दाखविता, मतपेटीत टाकले असते, तरी ही १ ल्याच फेरीत पटेल यांचा पराभव झाला असता. असो. कोर्टात दाद मागण्याचा मार्ग अजूनही शिल्लक आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. ही समजून उमजून खेळलेली खेळी वाटते
      पटेल हरणे जसे फायद्याचे तसेच ते जिंकणेही शहांच्या पथ्यावर पडणारे असेल (ही माझी समजूत आहे हं)


      बाकी भाऊ सर्वज्ञ आहेतच

      Delete
    2. हो असेच वाटते आहे एकंदर पाहता
      अमित शहाना जर जिंकायचेच असते तर 'full proof ' योजना असती इतके साधे कच्चे दुवे ठेवले नसते किंवा पटेलांनी उलट डाव टाकला म्हणावे लागेल
      पण अमित शहा साधारणतः 'plan B ' तयार ठेवतात अशा योजनेत

      Delete