Thursday, October 5, 2017

पाक तेरे टुकडे होंगे

sindh baloch map के लिए चित्र परिणाम

दीड वर्षापुर्वी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशाचा शत्रू अफ़जल गुरू याच्या स्मरणार्थ योजलेल्या एका समारंभात देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या होत्या. त्यानंतर मोठे काहूर माजले होते. कारण या घोषणात ‘भारत तेरे टुकडे होंगे, इन्शा अल्ला इन्शा अल्ला’ असाही गजर झालेला होता. त्यासाठी विद्यार्थी संघटनेचा तात्कालीन अध्यक्ष कन्हैयाकुमार याच्यासह चारजणंना पोलिसांनी अटकही केली होती व त्यांना कोर्टात हजर करताना वकीलांनीही मारहाण केल्याचे प्रकार घडले होते. त्यांच्या समर्थनासाठी तथाकथित पुरोगामी पुढे आले होते. त्यानंतरच्या सोळासतरा महिन्यात देशातील पुरोगाम्यांचा देशद्रोही मुखवटा प्रत्येक दिवशी गळून पडत गेला आहे आणि आता तर त्यांचा पोशिंदा मानल्या जाणार्‍या पाकिस्तानवरही गंडांतर येऊ घातले आहे. कारण आजवर ज्या पाकिस्तानला अमेरिका पाठीशी घालत होती, त्याच अमेरिकेची वक्रदृष्टी पाकिस्तानकडे वळली असून, जगातल्या अनेक प्रगत देशांना पाकिस्तान हे संकट वाटू लागलेले आहे. परिणामी ते संकट भारताला संपवण्याची गरज उरलेली नाही. तर भारताची ही डोकेदुखी संपवण्याची कामगिरी जगातल्या अशा महाशक्तींनाच पार पाडावी लागणार आहे. किंबहूना त्यासाठी एक सविस्तर योजना तयार असून लौकरच पाकिस्तानचे तुकडे होतील, अशी भविष्यवाणी निवृत्त लेफ़्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी केली आहे. नगर येथील एका समारंभात भाषण करताना त्यांनी त्याची ग्वाही दिलेली आहे. अर्थात कुठलाही भारतीय निवृत्त सेनापती अशी भाषा अधूनमधून वापरत असतो. त्यामुळे अनेकांना शेकटकर यांची भाषा नेहमीची वाटेल. पण ती नेहमीची भाषा नाही आणि शेकटकर हे नेहमी माध्यमात झळकणार्‍या निवृत्त सेनापतींपैकी एक नाहीत. ही बाब विसरता कामा नये. ते अतिशय मोजूनमापून बोलणारे व अत्यंत अनुभवी असे मितभाषी निवृत्त अधिकारी आहेत.

पाकिस्तान इतक्या कोंडीत सापडला असूनही त्याला आपली स्थिती सुधारणे आता शक्य राहिलेले नाही. कारण बोलूनचालून पाकिस्तान हे अराजक झालेले आहे. तिथे नेमका कोण सत्ता राबवतो व कुठला अधिकार कोणाच्या हाती आहे, ते स्थानिक राज्यकर्त्यांनाही सांगता येणार नाही. तसे नसते तर पाकच्या राष्ट्रसंघातील राजदूत मलिहा लोदी यांनी बेतालपणे गाझा पट्टीतला फ़ोटो राष्ट्रसंघाच्या सुरक्षा बैठकीत फ़डकावून आपल्याच देशाचे नाक कापून घेतले नसते. मलिहा लोदी ह्या पाकिस्तान सरकारच्या प्रतिनिधी नसून लष्कराच्या लाडक्या राजदूत आहेत. त्यामुळे पाक नागरी सरकारला विचारल्याशिवाय त्या वाटेल ती विधाने करीत असतात आणि पाकसेना म्हणेल तशी कृती करीत असतात. तेच पाकिस्तानच्या अंतर्गत बाबतीत झालेले आहे. एका बाजूला सेनापती व लष्कर, पाक राज्यकर्त्यांना विचारत नाही किंवा कुठल्या बाबतीत दाद देत नाही. तर दुसरीकडे पाकिस्तानात आजवर पोसलेले जिहादी दहशतवादी राज्यकर्त्यांनाच आव्हान देत असतात. त्यामुळे अमेरिकेसह चीनसारख्या मित्र देशांनाही पाकिस्तानशी जुळवून घेणे दिवसेदिवस अवघड होऊन गेलेले आहे. त्यातून अमेरिकेने अंग काढून घेण्याचा धाडसी पवित्रा घेतलेला असला, तरी चीनला मात्र तडकाफ़डकी पाकिस्तानला झटकून टाकण्याची स्थिती नाही. कारण मागल्या पाचसहा वर्षात चीनने अब्जावधी डॉलर्सची पाकिस्तानात गुंतवणूक केलेली आहे. त्यावर पाणी सोडण्याइतकी श्रीमंती चीनपाशी आजही नाही. म्हणूनच शक्य तितके पाकिस्तानशी जुळवून घेणे व आपल्याला आवश्यक असतील, त्या गोष्टी पाकच्या गळ्यात घालण्यावर चीनला जमवून घ्यावे लागते आहे. जगातल्या बहुतांश प्रगत राष्ट्रांना भेडसावणारा जिहादी दहशतवाद पाकिस्तानातूनच खेळवला जातो, हेही लपून राहिलेले नाही. त्यामुळेच पाकिस्तान ही जगाची डोकेदुखी झालेली आहे.

यावरचा उपाय म्हणजे पाकिस्तानला पुरता नेस्तनाबूत करणे इतकाच असू असू शकतो. त्यासाठी पाकिस्तानला युद्धात ओढून कोणी हा विषय संपवू शकत नाही. तसे केल्यास राष्ट्रवाद त्याला एकत्र आणू शकेल. त्यापेक्षा पाकिस्तानातील विविध प्रादेशिक अस्मितांना खतपाणी घालूनच त्या देशाला आतल्या आत खिळखिळा करून टाकण्याची रणनिती अधिक प्रभावी ठरू शकणार आहे. त्यात पाकिस्तानी समजले जाणारे सिंधी, पंजाबी, पख्तुनी, बलुची वा निर्वासित म्हणून फ़ाळणी नंतर पाकमध्ये जाऊन वसलेले लोक, यांच्यातल्या वैमनस्याला खतपाणी घालणे हा एक प्रभावी मार्ग असू शकतो. त्याला आतूनही चांगला प्रतिसाद मिळू शकतो. स्वातंत्र्योत्तर सत्तर वर्षात पाकिस्तानमध्ये कायम पंजाबी मुस्लिमांचेच वर्चस्व राहिलेले आहे. सत्तेपासून लष्करापर्यंत कुठल्याही उच्चस्थानी व अधिकाराचे केंद्रीकरण झालेल्या पदावर फ़क्त पंजाबी मुठभर उच्चवर्गाची वर्णी लागत असते. त्यात सिंधी, बलुची वा मोहाजिर, पख्तुनी अशा कुणी घुसायचा प्रयत्न केला तरी हाणून पाडला जातो. त्यातून प्रादेशिक अस्मितांची गळचेपी झालेली आहे. संसदेपासून प्रशासनापर्यंत अधिक लोकसंख्येच्या बळावर सर्व सत्ता पंजाबी उच्चभ्रू वर्गाच्या हाती केंद्रीत झालेली आहे. त्याच्या विरुद्ध मोठी नाराजी असून, त्याला योग्य खतपाणी घातले गेल्यास पाकिस्तानमध्ये मोठा उत्पात आतूनच घडवला जाऊ शकतो. किंबहूना गतवर्षी लालकिल्ला येथून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशाच एका विषयाला तोंड फ़ोडले होते. बलुची समाजावरील अन्यायाला तोंड फ़ोडण्याचे काम केले होते. त्यानंतर पाकिस्तान उगाच खवळला नव्हता. जगातील मोठ्या देशांकडे पाकचे तुकडे करण्याची योजना तयार असल्याने शेकटकर त्याच आधारे सांगत आहेत. त्यांच्या शब्दाला इतक्यासाठी महत्व आहे, की त्यांनी लष्करी गुप्तचर विभागातच मोठी कामगिरी बजावलेली आहे.

भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागात शेकटकर दिर्घकाळ कार्यरत होते आणि असा विभाग केवळ शत्रूची माहिती मिळवत नसतो. स्वदेशाच्या सुरक्षेसाठी शत्रूदेश व अन्य जागतिक घडामोडीतील भारतीय सुरक्षेच्या संदर्भातील भविष्यकालीन योजना व रणनितीचे आराखडेही हाच विभाग तयार करत असतो. त्याविषयी अन्य मित्र देश काय करीत आहेत, त्यांच्याशी देवाणघेवाण सुद्धा होत असते. अशाच विभागात काम केलेले असल्याने शेकटकर जी योजना बोलून दाखवतात, ती वावडी असूच शकत नाही. कारण सिंध व बलुची प्रांत वेगळे तोडले जाऊ शकतात, इथपर्यंत त्यांनी खुलासा केलेला आहे. अमेरिका वा पाश्चात्य देशातील अनेक अभ्यासगट यासारख्या योजना कल्पना व त्यातून सिद्ध होणारे हेतू यांचा सातत्याने उहापोह करीत असतात. अनेक प्रकारचे आराखडे त्या संदर्भात तयार असतात. त्यालाही पर्यायी आराखडे सज्ज ठेवलेले असतात. ऐनवेळी गरजेनुसार त्यांची निवड व कारवाई सुरू होत असते. त्याचा तपशील जाहिर होत नाही वा घोषित केला जात नाही. अशी प्यादी मोहरे हलवले जातात, की योग्य स्थिती आपोआप उदयाला येत असते. मुशर्रफ़ परागंदा आहेत आणि शरीफ़ सत्तेतून बाहेर फ़ेकले गेले आहेत. पाकिस्तानला कोणी देशव्यापी प्रभाव टाकू शकेल असा नेता उरलेला नाही. एकमुखी सत्ता व निर्णय घेण्याची कुवत असलेला नेता पाकिस्तानात शिल्लक नसताना, त्याची राष्ट्रीय एकात्मता जपायला कोण पुढे येणार आहे? ते लष्करी नेतॄत्वाचे काम नाही. त्यामुळेच पाकिस्तान जगात एकाकी पडणे व तिथे अस्मितेच्या नावाखाली यादवी माजणे, त्याला आत्मघाताच्या मार्गाने घेऊन जाऊ शकते. पाकिस्तानचे तुकडे होण्यासाठी अत्यंत पोषक स्थिती सध्या आहे. त्यामुळेच तशा कारस्थानी योजनेला प्रगत देशातले चाणक्य चालना देतील अशी शक्यता दाट आहे आणि शेकटकरांनी तोच तर इशारा दिलेला आहे.

7 comments:

  1. भाउ तुमची सगळी भाकिते खरी झालित. हेही होवो.

    ReplyDelete
  2. त्यापेक्षा परिणामकारक काम भारतात, घरभेद्यांच्या बाबतीत होणार आहे. फेब्रुवारीच्या काळात किंवा, काही महीने आधी

    ReplyDelete
  3. असे झाल्यास ते फार औत्सुक्याचे असेल .

    ReplyDelete
  4. काही पाकिस्तानी कुटनीतीज्ञही ती शक्यता जाहीर बोलून दाखवीत आहेत. भले ते भविष्य सदृश का असेनात.

    ReplyDelete
  5. Bhau , tumche lekh vyasang far motha ahe , pan ya lekhat waprlela Pakistancha nakasha asa ka ahe? , Jyat Gilgit, Bltistan ani Azad kashmir dakhvale ahe ? Apan asa nakasha dakhavu laglo tar yacha arth kay ghyaycha ?
    Mla khatri ahe ki tumhi uprokt naksha badaltal .
    Kay tukade vayche te hou dya pan Gilgit Baltistan POK tri aplech ahet

    ReplyDelete