Sunday, October 8, 2017

टके सेर भाजी , टके सेर खाजा

अंधेर नगरी चौपट राजा के लिए चित्र परिणाम

एक साधूपुरूष होते आणि त्यांचा शिष्यगणही होता. साधूंचा हा गोतावळा भटकंती करीत होता. एखाद्या गावी मोठी वस्ती असली तर अधिक मुक्काम व्हायचा. पण जिथे मुक्काम असे तिथे शिष्यगण आपलेच भोजन शिजवून क्षुधाशांती करीत असत. त्याच्याही जबाबदार्‍या वाटून दिलेल्या असायच्या. त्यापैकी एका शिष्यावर रोज आवश्यक असेल तो शिधा गोळा करून वा बाजारातून खरेदी करून आणण्याची जबाबदारी होती. एका मोठ्या गावात मुक्काम असताना तो बाजारातून आवश्यक सामान घेऊन आला आणि आचार्यांना म्हणाला, हे गाव पृथीतलावरचा स्वर्ग आहे, गुरूजी चकीत होऊन त्याच्याकडे बघत राहिले. तेव्हा त्याने खुलासा केला की, त्या गावामध्ये कुठलीही वस्तु एकाच किंमतीत मिळते. ‘टके सेर भाजी टके सेर खाजा’. गुरूजी हसले आणि उत्तरले, म्हणजे हा स्वर्ग नसुन ही मायानगरी आहे. हा सगळा भुलभुलैया आहे. त्या मोहात सापडलास तर आयुष्याची कधी माती झाली, त्याचाही पत्ता लागणार नाही. अर्थात त्यांचा हा उपदेश शिष्याला पटला नाही. म्हणूनच जेव्हा साधूंचा हा गोतावळा मुक्काम हलवून पुढे जायला निघाला, तेव्हा त्या शिष्याने आचार्यांकडे तिथेच कायम वास्तव्य करण्याची मुभा मागितली. गुरूजी हसले आणि म्हणाले तुलाही अखेर या मायानगरीने मोहात टाकलेच म्हणायचे. पण जेव्हा त्यात फ़सशील, तेव्हा तुला माझे शब्द आठवतील. त्यातून सुटायची इच्छा झालीच तर माझे मनापासून स्मरण कर. मी तुझ्या मुक्तीसाठी तात्काळ अवतीर्ण होईन. शिष्याने खुशीने गुरूजींचा आशीर्वाद घेतला आणि त्याच गावात भिक्षांदेही करीत दिवस कंठू लागला. तिथले जगणे त्याला कमालीचे मानवले. देहयष्टी सुदृढ व गुटगुटीत झालेली होती आणि करायला काही काम नसल्याने तो कमालीचा सुखावला होता. त्याला आचार्यांचा पाठ खोटा व निरर्थक वाटला होता.

काही दिवसांनी तिथल्या एका गावकर्‍याची शेळी कुणाच्या कुंपणाची भिंत कोसळून दबून मेली असल्याचे कानी आले. त्या व्यक्तीने राजाकडे धाव घेतली आणि न्याय मागितला. तिथला राजाही न्यायप्रिय होता. शेळी हकनाक मारली गेली असेल तर तिच्या मालकाला न्याय मिळायलाच हवा, अशी राजाचीही धारणा होती. त्या राजाने आपल्या सेवकांना पाठवून चौकशी केली असता, एका व्यापार्‍याच्या घराच्या कुंपणाची भिंत कोसळून हा अपघात झाल्याचे उघडकीस आले. शिपायांनी तात्काळ त्या व्यापार्‍याला पकडून राजासमोर हजर केले. राजानेही कोसळलेल्या भिंतीसाठी व्यापार्‍याला जाब विचारला. त्यानेही आपला गुन्हा नसल्याचे सांगत भिंत आपलीच असली तरी बांधकाम आपण केले नसल्याचे साफ़ सांगून टाकले. भिंत कच्ची असेल तर मालकाचा दोष कसा असू शकतो? राजालाही खुलासा पटला. त्याने तात्काळ भिंत बांधणार्‍या गवंड्याला हजर करण्याचे आदेश दिले. गवंड्याकडेही घटनेविषयी परिपुर्ण खुलासा होता. त्याने म्हटले भिंतीत कुठला दोष आहे? बांधकाम साहित्य फ़ुसके असेल तर बांधणारा कसा दोषी असू शकतो? माझा काय गुन्हा महाराज? राजाला तेही पटले आणि त्याने भिंतीत वापरलेल्या विटा घडवणार्‍या कुंभाराला उचलून आणायला फ़र्मावले. कुंभार निमूट समोर उभा राहिला आणि त्याने सावध म्हणून आधीच सोबत विटेचा नमूना आणलेला होता. राजासमोर तीच वीट ठेवून कुंभार म्हणाला साहित्य फ़ुसके नाही महाराज! ही वीट त्याच भिंतीतली आहे. जरा तरी फ़ुटली आहे का बघा! राजा आता निरूत्तर झाला. पण त्याला पुढला दुवा कुंभारानेच दिला. विटांचा दोष नाही महाराज, भिंतीतल्या विटा पक्क्या बसण्यासाठी वापरलेला चुना निर्दोष असायला हवा आणि तिथेच गफ़लत झालेली आहे. चुनाभट्टी ज्याची तोच गुन्हेगार आहे महाराज! आता पाळी होती चुनाभट्टी चालवणार्‍याची!

राजाच्या सेवकांनी त्याच्याही मुसक्या बांधून त्याला दरबारात हजर केले आणि त्याच्यापाशी कुठलाही खुलासा नव्हता. तो हाडकुळा जीव चुना आपला असल्याचे नाकारू शकला नाही, की कुठले स्पष्टीकरण देऊ शकला नाही. राजाने शेळी भितींखाली मेल्याचा गुन्हेगार म्हणून त्यालाच फ़ाशी देण्याचा आदेश जारी केला. शेळीचा मारेकरी सापडला म्हणून गावात आनंदीआनंद झाला आणि लोक मोठ्या अपेक्षेने आता फ़ाशीचा महोत्सव बघायच्या प्रतिक्षेला लागले, दिवस ठरला व मुहूर्तही ठरला. गावाच्या चौकात वधस्तंभ उभारण्यात आला आणि त्यावर फ़ाशीचा दोरही लटकू लागला. त्याचा साक्षीदार होण्यासाठी अवघा गाव तिथे लोटला होता., खुद्द राजाही वधस्तंभाच्या समोर दूरवर उच्चस्थानी विराजमान होऊन हा सोहळा न्याहाळत होता. ठरल्याप्रमाणे चुनाभट्टीवाल्या त्या हाडकुळ्या आरोपीला वधस्तंभापाशी आणले गेले आणि तिथे हजर असलेल्या चांडाळाने त्याच्या गळ्याभोवती फ़ास आवळला. पण कितीही वेळ दोर ओढला जाऊनही तो भट्टीवाला काही मरत नव्हता. फ़ासावर लटकूनही त्याला मृत्यू येत नव्हता. फ़ाशी देणारा चांडाळही गोंधळला होता. किती वेळ काही होईना, तेव्हा राजा संतापला व त्याने चौकशी केली. तर चांडाळ म्हणाला या हाडकुळ्य़ाची मान इतकी बारीक आहे, की फ़ास आवळला जाऊनही तो मरत नाही. नुसताच किंचाळत राहिला आहे. त्याला फ़ाशी देणे अशक्य आहे. राजा विचारात पडला. एका गावकर्‍याची बकरी हकनाक मेली आहे तर कोणाला तरी शिक्षा व्हायलाच पाहिजे. नाहीतर आपल्या न्यायाच्या राज्याला तो बट्टा लागेल. तर करावे काय? भट्टीवाल्या आरोपीची मान बारीक असेल तर फ़ाशीचे काय? राजाला एक उत्तम कल्पना सुचली. इथल्या गर्दीत ज्याची मान फ़ासामध्ये फ़िट बसत असेल, त्याला फ़ासावर लटकवा. फ़ाशीचा मुहूर्त टाळला जाता कामा नये. तिथे त्या गर्दीत ‘स्वर्गवासी’ शिष्यही उपस्थित होता.

राजाचा आदेश मिळताच चांडाळाची नजर गर्दीत भिरभिरू लागली. त्या चांडाळाला गर्दीतली माणसे दिसत नव्हती. तो फ़क्त गर्दीतल्या गलेलठ्ठ लोकांकडेच निरखून बघत होता आणि इतक्यात त्याच्या नजरेत आचार्यांचा हा तुंदीलतनू शिष्य भरला. काही महिने ‘टके सेर भाजी टके सेर खाजा’ खाऊन सुखावलेला शिष्य तसा जाडजुड गळ्याचा झालेला होता. त्याचीच मान फ़ासामध्ये फ़िट बसणार असे चांडाळाला वाटले आणि त्याने गर्दीत घुसून त्या सुखावलेल्या शिष्याला उचलून राजासमोर पेश केले. राजाही त्या जाड गळ्याच्या साधूला बघून सुखावला. फ़ाशीचा मुहूर्त साधला जाणार होता. साक्षात फ़ाशीच्या दोराची गाठ समोर बघितली, तेव्हा शिष्याला आपल्या गुरूवर्यांचे स्मरण झाले. त्यांचे शब्द असे खरे ठरतील अशी त्याच्या मनात कधी शंकाही आलेली नव्हती. गळ्यात फ़ासाचा दोर अडकला, त्याक्षणी त्याने गुरूंचा धावा केला आणि क्षणार्धात गुरूजी तिथे अवतीर्ण झाले. गळ्यात फ़ास अडलेल्या शिष्याकडे मंद स्मित करून ते म्हणाले, स्वर्ग अनुभवलाच वत्सा? आता मृत्यूलोकातले सुख उमजले? यातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे, मी म्हणतो तसे कर. त्यांनी शिष्याच्या कानात काही मंत्र सांगितला आणि मग दोघा गुरूशिष्यांमध्ये मोठे भांडण जुंपले. दोघेही फ़ासावर जाण्यासाठी हट्ट धरून बसलेले होते. त्यामुळे कोणाला मरू द्यावे, असा यक्षप्रश्न चांडाळाला पडला होता. त्याने दोघांनाही उचलून राजाच्या समोर पेश केले आणि त्यापैकी कोणाला फ़ाशी द्यावे, अशी विचारणा केली. राजाही बुचकळ्यात पडला होता. दोन माणसे फ़ाशी जायला वा मरायला इतकी उत्सुक असलेली राजाने कधी बघितली नव्हती. त्यामुळे त्याने खुलासा मागितला. त्यासाठीही भांडण जुंपले, तेव्हा राजाने दम देऊन दोघांना गप्प बसवले आणि वयस्कर म्हणून गुरूजींना खुलासा करण्यास फ़र्मावले. त्यांनी काय स्पष्टीकरण दिले?

हा असा मुहूर्त आहे राजा, की याक्षणी जो मरेल त्याच्यासाठी थेट स्वर्गाची दारे देवाने खुली करून ठेवलेली आहेत. म्हणून मलाच फ़ाशी देण्याची त्वरा करावी. मलाच या इहलोकातून मुक्त करावे महाराज. राजा क्षणभर विचारात पडला आणि तडक उठून उभा राहिला. त्या दोघांना बाजूला सारून त्याने चांडाळाला फ़र्मावले, आताच्या आता माझ्या गळ्यात फ़ाशीची दोरी घाल आणि मलाच फ़ाशी देऊन टाक. अवघा गाव अचंबित होऊन वधस्तंभाकडे निघालेली राजाची वरात बघत होता आणि तिकडे लोटलेल्या गर्दीतून मागे पडलेल्या गुरूजींनी शिष्याचा हात धरून त्याला धुम ठोकण्याचा इशारा केला. क्षणभर शिष्यालाही काही उमजले नाही, तर त्याचा हात धरून गुरूजीच पळत सुटले. दोघेही पळत पळत गावाबाहेर सुरक्षित जागी पोहोचले, तेव्हा धापा आवरल्यानंतर आचार्य उत्तरले, मुर्खा स्वर्ग नरक इथेच असतो. माणसानेच स्वर्ग किंवा नरक या कल्पना निर्माण केल्यात. विवेकबुद्धी हाच खरा इश्वर असतो आणि ज्या मनात त्या इश्वराचा वास असतो, तो माणूस भोवतालाचा स्वर्ग करून टाकतो. ज्याला स्वार्थाने ग्रासलेले असते, असा माणूस विवेक हरवून स्वर्गाचाही नरक करत असतो. अशाच लोकांच्या सहवासात राहिले, मग मोह नावाचा राक्षस मनाचा कब्जा घेतो आणि माणसालाच राक्षस बनवून टाकतो. म्हणून तुला तेव्हाच म्हणालो होतो, अशा मोहात पडून या मायानगरीत राहू नकोस. शिष्याचे डोळे उघडले होते आणि तो अधिक वेगाने चालत त्या गावापासून दूर जाण्यासाठी प्रयास करू लागला. हे गाव कुठले? कुठल्या पुस्तकात ही गोष्ट प्रसिद्ध झाली आहे? असले प्रश्न पडू शकतात. त्यासाठी खुप दूर नजर टाकण्याची गरज नाही. आपल्या भोवताली पसरलेली गावे, वस्त्या वा नगरे डोळस नजरेने अभ्यासली तर अशी गावे जागोजागी विखूरलेली दिसतील. असे गावकरी, असे राजे व असे वधस्तंभ प्रत्येक नाक्यावर उभारलेले दिसतील.

बालपणी म्हणजे साठ वर्षापुर्वी आजीकडून ऐकलेली ही गोष्ट आहे. अनेकांनी अशीच कुणाकडून ऐकलेली असेल. पण व्यवहारात अशी मायानगरी वा असे राजे आपल्याला किती ओळखता येतात? ओळखता आले असते, तर आपणही न्यायाच्या मागण्या करीत कशाला गावगन्ना हिंडलो असतो? विषय कर्नाटकातील गौरी लंकेश नावाच्या महिला पत्रकाराच्या हत्याकांडाचा असो, किंवा उत्तरप्रदेशातील बालकांचा इस्पितळातला मृत्यू असो. एल्फ़िन्स्टन स्थानकाच्या पुलावर झालेली चेंगराचेंगरी असो वा हैद्राबादच्या विद्यापीठात कुणा विद्यार्थ्याने केलेली आत्महत्या असो. तिथे कोणाचा दोष वा गुन्हा आहे, त्याचा तपासही कोणाला करावा असे वाटलेले नाही. तपास नको किंवा गुन्हा सिद्ध होण्याचीही गरज नाही. ज्याच्या कोणाच्या गळ्यात फ़ाशीचा दोर फ़िट बस्णार असेल, त्याला विनाविलंब फ़ाशी देण्याचा मुहूर्त साधण्याचा आग्रह सर्वत्र सारखाच दिसेल. अजून एफ़ आय आर कसा दाखल झाला नाही? अजून कोणाला अटक कशाला होत नाही? असे प्रश्न विचारणारे शहाणे ज्या देशात बोकाळलेले असतात, त्या देशात ‘टके सेर भाजी, टके सेर खाजा’च मिळत असला पाहिजे ना? कुणाला कसा दोषी मानावे वा ठरवावे, याचाही विवेक आज कुठे दिसतो काय? गदारोळ उठलेला असतो, कुणाच्या तरी गळ्यात फ़ाशीचा दोर अडकवण्यासाठी! किंबहूना अशा मुहूर्ताला राजाने आपल्या गळ्यात फ़ाशीचा दोर अडकवून घ्यावा यासाठी आग्रह धरण्याला आपण आजकाल न्याय समजू लागलो आहोत. बिचार्‍या शेळीला हकनाक मरावे लागले म्हणून आपण इतके हवालदिल झालेलो असतो, की कुणाला तरी फ़ाशी दिल्याशिवाय न्याय होऊच शकत नाही; अशी आपली एक अंधश्रद्धा बोकाळलेली आहे. ती समस्या निकालात निघण्याशी कोणाला कर्तव्य उरलेले नाही. आज आपल्या देशातली लोकशाही आणि त्या गोष्टीतली चौपट राजाची अंधेरनगरी, यात कितीसा फ़रक उरलेला आहे?

न्यायदान हे आजच्या लोकशाहीत सरकारच्या हाती राहिलेले नाही. सरकार हा न्यायालयात आरोपीला शोधून हजर करू शकते. पण त्याच्यावर साक्षी पुराव्यानिशी गुन्हा सिद्ध करणे सरकारच्या हातातली गोष्ट नाही. ते पुरावे मान्य करून गुन्हेगाराला दोषी व शिक्षापात्र ठरवणेही न्यायालयाच्या अधिकार कक्षेतली गोष्ट आहे. मग यात सरकार काय करते, असा प्रश्न अविवेकी नाही काय? न्यायापेक्षाही न्यायाचा मुहूर्त साधण्य़ाची घाई अन्यायाची जननी असते, इतकाच त्याचा अर्थ आहे. त्यात मग ‘आम्ही सारे’ नामक नाटक आणखी पोरकटपणाची भर घालते. जोपर्यंत विवेकाचा प्रभाव असतो तोपर्यंतच न्यायाचे राज्य असू शकते. एकदा विवेकाचा प्रभाव संपला मग अराजकाचे राज्य सुरू होते. आज आपण ज्याला लोकशाहीत मतस्वातंत्र्य व अविष्कार स्वातंत्र्य म्हणून कल्लोळ करतो, त्याने असा विवेक रसातळाला नेला आहे. त्यामुळे कुठल्याही गंभीर विषय व बाबींचा पोरखेळ होऊन गेला आहे. दहावीस वर्षे एका खटल्याचा निकाल लागत नाही, किंवा त्याची साधी सुनावणीही होत नाही. त्याविषयी कोणाची तक्रार नाही. बिना तपास वा खटला, पुरोहित वा तत्सम लोकांना तुरूंगात सडवत ठेवले जाते. त्याबद्दल कोणाला कसली खंत नसते. पण ज्याच्यावर गुन्हे सिद्ध झाले आहेत, त्यांच्या गळ्यातला फ़ाशीचा दोर बाजूला करण्यासाठी बुद्धीमान लोक व कायदेपंडीत दिवसरात्र एक करतात. त्यांच्या विवेकाचे दिवाळे वाजले त्याविषयी कोणाला फ़िकीर नसते, असा सगळा पोरखेळ होऊन बसला आहे. न्याय व अन्याय ‘टके सेर भाजी टके सेर खाजा’ अशा मोजमापाने आजच्या बाजारात विकायला ठेवलेले आहेत. कशाला कसले ताळतंत्र वा तारतम्य उरलेले नाही. बुद्धीभेदालाच बुद्धीवाद करण्यापर्यंत घसरगुंडी झाली, मग एकविसाव्या शतकातही चौपट राजाची अंधेरनगरी उदयास आली तर नवल कुठले?

गौरी लंकेशची हत्या होऊन महिना उलटला आहे आणि पुन्हा एकदा आरोपी म्हणून सनातन संस्थेकडे बोट दाखवण्यापलिकडे कर्नाटक पोलिसांची झेप जाऊ शकलेली नाही. त्यांनी अलिकडे ज्या संशयितांची नावे घेतली आहेत, त्यापैकी सर्वच पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्याकांडानंतर फ़रारी असल्याचे सांगितले जाते. ते सनातनशी संबंधित आहेत आणि त्यांच्या विरोधात मागली दोन अडीच वर्षे पकड वारन्ट जारी आहे. असे आरोपी कर्नाटकात बिनधास्त फ़िरतात आणि गौरी लंकेश यांच्या हत्येची कारस्थाने शिजवतात. त्यांचा पाठलाग करून वेळापत्रक शोधून जागा निश्चीत करतात. पण त्यांना कोणी हटकू शकत नाही. रेड कॉर्नर नोटिसा असलेल्या मारेकर्‍यांना कर्नाटकात इतके मोकाट रान असते काय? की अशा कुठल्याही डाव्या नेता बुद्धीमंतच्या खुनासाठी निश्चीत केलेला फ़ास, सनातनच्या गळ्यात फ़िट बसतो असा काही नियम आहे? साध्वी प्रज्ञा व कर्नल पुरोहित यांच्या अटकेनंतर हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी कुठल्याही मुस्लिम वास्तुपाशी झालेल्या स्फ़ोटाचा आरोपही असाच त्या दोघाच्या गळ्यात बांधला जात नव्हता काय? अजमेर शरीफ़, समझोता एक्सप्रेस वा मक्का मशीदीचे स्फ़ोट खुप आधीच होऊन गेलेले होते आणि तेव्हा अभिनव भारत वा हिंदू दहशतवाद हे शब्द प्रचारातही आलेले नव्हते. तरी या दोघांना त्या जुन्या आरोपात गुंतवले गेले. निकष काय होता? आरोपाचा फ़ास त्यांच्या गळ्यात नेमका बसतो. बाकी काही साक्षीपुरावे किंवा न्यायनिवाड्याची गरज कुठे असते? पुरोहितांना जुन्या आरोपात गुंतवले गेले तर गौरी लंकेशच्या बाबतीत दाभोळकरांपासून सुरू असलेल्या आरोपाचा फ़ास सनातनच्या गळ्यात ढकलला जातो आहे. न्याय किती स्वस्त झाला आहे ना? अंधेर नगरी चौपट राजा, टके सेर भाजी टके सेर खाजा! कधीकाळी मनोरंजक म्हणून सांगितली जाणारी गोष्ट आता बुद्धीवादी लोकशाहीचा मूलाधार झालेली आहे ना?

11 comments:

  1. भाऊ,ही गोष्ट लिहून पन्नास वर्षांपूर्वीच्या बालपणाची आठवण करून दिलीत.धन्यवाद. एकदम नोस्टॅल्जिक.

    ReplyDelete
  2. अगदी समर्पक लिहिलं आहे तुम्ही.. खऱ्या अर्थाने 'विवेकाची'जाणीव जागृती होण्याची गरज आहे!

    ReplyDelete
  3. भाऊ खर सांगतो गोष्टी आम्ही सुद्धा वाचतो परंतु त्या गोष्टींचे आजच्या काळामध्ये असे अप्रतिम आकलन तुम्हाला सोडून अन्य कोणालाच होत नाही

    ReplyDelete
  4. व्वा भाऊ
    आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिलात,
    हि कथा ऐकून होतो
    जगलो आज पहिल्यांदाच
    आभार

    ReplyDelete
  5. एक दिवस फाशीचा दोर , गोष्टीतल्या राजासारखा, पप्पू अडकवून घेईल असे वाटते. गोष्टीतला शेवट तर असाच आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. अच्छा , म्हणजे मोदी पप्पू आहे तर .

      Delete
  6. गौरी लंकेश, कलबुर्गी, पानसरे , दाभोलकर याना तुम्ही शेळीच्या पंगतीत तर नाही बसवले ना? शेळी साठी कदाचित न्याय महत्वाचा नसेल, परंतु वैचारिक लढा लढणारे याना न्याय हवाच अन तो ही योग्य त्या दोषींच्या गळ्यात फास टाकून।

    ReplyDelete
  7. Kharay bhau bhartachi lpkshahi kuthe challi ahe. Far vait vattay

    ReplyDelete
  8. विनय शुक्लाMarch 28, 2018 at 2:11 AM

    डोळ्यात अंजन घालणारा लेख.

    ReplyDelete