Monday, December 25, 2017

वीरमाता आणि वीरपत्नी

Image result for avantika jadhav kin in pak

गेली दोन वर्ष अधूनमधून कुलभूषण जाधव हा विषय माध्यमात गाजत राहिलेला आहे. कारण २०१६ च्या मार्च महिन्यात पाकिस्तानने कुलभूषण यांना भारतीय हेर म्हणून अटक केल्याची बातमी आलेली होती. त्यावरून अनेक उलटसुलट बातम्या आल्या व चर्चाही होत राहिली. भारत सरकारने ती बातमी बघितल्यावर विनाविलंब कुलभूषणला कायदेशीर मदत देण्यासाठी हालचाली आरंभल्या होत्या. पाकिस्तानातील भारतीय वकीलांना कुलभूषणला भेटण्याची मुभा द्यावी, म्हणून वारंवार पाकला विनंत्या केल्या होत्या. पण त्यापैकी एकाही विनंतीला पाकने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. दरम्यान पाकिस्तानातून येणार्‍या बातम्यातील त्रुटी व फ़ोलपणा उघड होत चालला होता. पाकचे तात्कालीन सुरक्षा सल्लागार व मंत्री परस्परांना खोडून काढणारी विधाने करत होते. अखेरीस वर्षभराने कुलभूषणला लष्करी न्यायालयात दोषी ठरवून फ़ाशी फ़र्मावण्यात आल्याची घोषणा झाली आणि भारत सरकारने आक्रमक पवित्रा घेतला. ही शिक्षा व एकूणच कुलभूषण विरोधातला खटला याला आंतरराष्ट्रीय न्यायालयातच आव्हान दिले. त्यात पाकिस्तानचे नाक कापले गेले. अर्थात बेशरम लोकांना वा देशाला अब्रुच नसेल तर नाक कापले गेल्याने काय फ़रक पडणार होता? म्हणूनच त्यांनी मनमानी चालू ठेवली. पण हळुहळू पाकिस्तानी खोटेपणाचे किल्ले ढासळू लागले होते. म्हणूनच पळवाटा शोधल्या जात होत्या. त्यातूनच मग माणूसकीचे नाटक रंगवण्याची कल्पना पुढे आली आणि कुलभूषणच्या आईला त्याची भेट घेऊ देणार असल्याचे पाकने जाहिर केले. ती भेट सोमवारी पार पडली. त्यात या जन्मदातीने आपण भारताच्या एका शूरवीर सुपुत्राची तितकीच खंबीर वीरमाता असल्याची अवघ्या जगाला साक्ष दिलेली आहे. आज म्हणूनच अवंतिका जाधव यांच्याच कौतुकाचा विषय प्रमुख मानला जायला हवा आहे.

सैतानी राजवटीत व अमानुष संस्कृतीत जगणार्‍या लोकसंख्येच्या देशात फ़ाशी झालेल्या आपल्या पोटच्या गोळयाला भेटायला गेलेल्या या वीरमातेने दाखवलेला संयम व धैर्य खरोखरच कुठल्याही योद्धा वा मुरब्बी मुत्सद्दी माणसालाही थक्क करून सोडणारे होते. भारतीय वाहिन्या भल्या सकाळपासूनच त्या घटनेचे वार्तांकन करीत होत्या आणि कुठून कसा प्रवास पाकिस्तानकडे होत आहे त्याचा तपशील सांगितला जात होता. ओमानमार्गे पाकिस्तानला पोहोचलेल्या माता अवंतिका जाधव आणि पत्नी चेतना यांनी कुठल्याही दबावाखाली नसल्याचा भाव शेवटपर्यंत कायम राखला होता. अशा घटनांमध्ये मुत्सद्दी व मुरब्बी राजकारण्यांनाही भावनांच्या वादळातून धापा लागत असतात. अशा तणावपुर्ण स्थितीत ह्या दोन भारतीय महिला दिसल्या, त्या थेट पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीसमोर. गाडीतून उतरल्यावर त्यांनी दूर गर्दी केलेल्या माध्यमांच्या कॅमेरे व पत्रकारांना नम्रपणे अभिवादन केले आणि शांतपणे त्या इमारतीच्या आत शिरल्या. नंतर बाहेर वाहिन्यांवर बातम्या येत होत्या आणि अकस्मात त्या दोघी सोफ़ावर प्रतिक्षेत असल्याचे छायाचित्र झळकले. काही मिनीटांनी कुलभूषण एका बाजूला व काचेच्या पलिकडे आई व पत्नी असेही छायाचित्र झळकले. जितकी म्हणून छायाचित्रे व चित्रणे प्रक्षेपित झाली, त्यात कुठेही या दोघा महिलांनी आपला तोल ढळल्याचे दिसू दिले नाही, की मनातले काहूर उघड होऊ दिले नाही. पावणे दोन वर्षांनी भेटलेला पुत्र आणि त्याच्या डोक्यावर टांगलेली फ़ाशीची तलवार; ह्या बाबी साध्या नसतात. कितीही मोठ्या खंबीर व्यक्तीच्या मनाचा तोल घालवणार्‍या अशा या गोष्टी आहेत. पण त्याचा लवलेश त्या दोघींनी कुठल्या कॅमेराला टिपू दिला नाही. कुलभूषणने नौदलात काय केले ठाऊक नाही. पण या दोघींनी सोमवारी आपल्या खांद्यावर देशाची अब्रु असल्याचे कर्तव्य मोठ्या निष्ठेने पार पाडले.

भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असल्याचे वचन आपण कित्येक वर्षे ऐकत आलेलो आहोत. पण त्याचा साक्षात अनुभव म्हणजे या दोघा महिलांनी दाखवलेले धैर्य होय. सख्खा मुलगा आणि खंगलेला पती समोर असतानाच त्यांना भारताच्या प्रतिष्ठेची जबाबदारी पार पाडायची होती. ज्या टिव्ही पडद्यावर रोजच्या रोज कुठल्या दंगलीत किंवा मारहाणीत जखमी झालेल्यांचा आक्रोश बघायची आपल्याला सवय लागलेली आहे, त्याच पडद्यावर हे अपुर्व मनोधैर्य किती पत्रकारांना व प्रेक्षकांना बघता आले त्याचा अंदाज नाही. वर्णने व चर्चा कायदेशीर, मुत्सद्देगिरी वा दोन देशातील संबंधांची चालली होती. कुलभूषणची प्रकृती वा मधल्या काचेच्या पडद्यावर विश्लेषण चालू होते. पण दोघी सामान्य घरातल्या असूनही त्यांनी प्रसंगाला ज्या हिंमतीने सामोरे जाऊन दाखवले, ते कुठल्याही मोठ्या युद्धापेक्षा भिन्न नव्हते. आपल्या मनातल्या भावनांचे वादळ किंवा उलघाल त्यांनी किंचीतही उघड होऊ दिली नाही. कुठला कॅमेरा ते टिपू शकलेला नाही. माता पुत्राच्या मधोमध असलेल्या काचेच्या पडद्याची खुप चर्चा झाली. पण या दोघींनी मनातली भावनिक उलथापालथ आणि प्रत्येक क्षण टिपणारे कॅमेरे यांच्यामध्ये आपल्या नितळ चेहर्‍याचा उभा केलेला पडदा किती विश्लेषकांना बघता आला? एकदोन वाहिन्यांवर दोघींच्या देहबोलीतून काही उमजेल म्हणूनही बोलले जात होते. पण त्या इमारतीत जाताना किंवा तिथे भेट उरकून परतल्यानंतर दोघींनी आपला चेहरा इतका निर्विकार ठेवला होता, की त्यातून कुठे वेदना समाधान वा मानसिक कल्लोळाचा मागमूस कोणाला दिसू शकला नाही. अंतर्मन व बाहेरचे विश्व यातकी ही घनघोर लढाई, त्या दोघीच आतल्या आत लढत होत्या. मात्र अखंड चालू असलेल्या कॅमेरांना त्यातला किंचीतही भाग टिपता आलेला नाही. त्या दोघींना कितीही दंडवत घातले तरी त्यांचे गुणगान वा कौतुक होऊ शकणार नाही.

यापुर्वी सर्बजीत ह्या एका भारतीय कैद्याला छळ करून पाकिस्तानी तुरूंगात ठार मारले गेले. अशा अनेक कहाण्या आपल्या समोर आलेल्या आहेत. खेरीज असल्या आरोपाखाली काय छळयातना होतात, ते आपण ऐकून आहोत. कुलभूषण त्या सर्व यमयातना सोसून अजुन टिकलेला आहे. पण तो सैनिक आहे आणि शूरवीर आहे. बचेंगे तो और भी लडेंगे, असा इतिहास लिहीणार्‍या दत्ताजी शिंदेचा तो वंशज वारस आहे. अशा सुपुत्राला भेटायला गेलेली त्याची जन्मदाती व पत्नी तितक्याच धैर्याने व पराक्रमाने भारलेल्या असतील, अशी कोणी कल्पना तरी केलेली होती काय? त्या पुत्राला वा पतीला जवळ जाऊन हात लावून स्पर्श करण्याचीही मुभा नाकारलेली होती. म्हणजेच इतके प्रयास करूनही पाकिस्तानने पुन्हा हलकटपणाच केलेला होता. त्यातली निराशा किती भेदक आहे? इथे आपण ते दृष्य वाहिन्यांवर बघून चिडलेलो होतो, तर त्या माता पत्नीच्या मनाचा किती कडेलोट झालेला असेल? पण त्यांनी त्याचा लवलेश कॅमेराला पकडू दिला नाही. जितक्या ताठ मानेने त्या इमारतीत शिरल्या होत्या, तितक्याच आत्मविश्वासाने त्यांनी बाहेर आल्यावर परिस्थितीला शोभेसे वर्तन करून दाखवले. त्यातले शौर्य बघायला कॅमेरा उपयोगाचा नसतो, तर आत्मियतेची नजर हवी असते. ती भेट एका आरोपी कैदी पुत्राला भेटण्यापुरती नव्हती, तर जगासमोर भारतीय माता व पत्नीच्या पुरूषार्थाची साक्ष देणारी भेट होती. इतके तर दोघींना नक्कीच कोणी शिकवलेले, पढवलेले नसेल. भारत सरकारच्या अधिकार्‍यांनी त्यांना मर्यादा समजावलेल्या असतील. पण परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य व स्वभाव तर त्यांचा आपला उपजत होता ना? म्हणून त्यांनाच आज अभिवादन करणे अगत्याचे आहे. कुलभूषणसाठी भारत सरकार लढते आणि त्या लढाईतला हा एक मोक्याचा टप्पा होता. त्यात वीरमाता व वीरपत्नी असल्याची दोघींनी दिलेली साक्ष म्हणूनच सव्वाशे कोटी भारतीयांना नतमस्तक करणारी आहे.

22 comments:

  1. वीरमाता व वीरपत्नी यांना सव्वाशे कोटी भारतीयांच्या वतीने माझे विनम्र अभिवादन

    ReplyDelete
  2. "जितक्या ताठ मानेने त्या इमारतीत शिरल्या होत्या, तितक्याच आत्मविश्वासाने त्यांनी बाहेर आल्यावर परिस्थितीला शोभेसे वर्तन करून दाखवले. त्यातले शौर्य बघायला कॅमेरा उपयोगाचा नसतो, तर आत्मियतेची नजर हवी असते."
    ---- Bulls Eye

    ReplyDelete
  3. त्या दोघींना शतशः नमस्कार

    ReplyDelete
  4. सत्य आहे. हे करणे सोपे नाही. IC ८१४ च्या वेळी लोकांनी जे तमाशे केले होते त्यांना हे दाखवायला हवे. अर्थात ते आजही तेच करतील म्हणा.

    ReplyDelete
  5. वीरमाता व वीरपत्नी यांना विनम्र अभिवादन .

    ReplyDelete
  6. दोनों वीर माताओं को शत शत नमन, भाऊ आपका भी नमन

    ReplyDelete
  7. वीरमाता आणि वीरपत्नी यांना विनम्र अभिवादन

    ReplyDelete
  8. You are the only person who has written on this no other newspaper wants to say on this which shows the mentality of our media in general and marathi newspaper in particular

    ReplyDelete
  9. विनम्र अभिवादन

    ReplyDelete
  10. Doghina abhwadan.Bhau You are great..lai bhari

    ReplyDelete
  11. भाऊ पकड्याना धडा शिकवणारा एकमेव आशास्थान म्हणजे आपला वाघ नरेंद्रभाई, पकड्यां चे दिवस भरत आलेत हे निश्चित

    ReplyDelete
  12. ऱाजाध्यक्ष यानी IC 814 ची करून दिलेली आठवण योग्यच आहे.अतिरेक्यांच्या बदल्यात कुटुंबियाना सोडवून घेण्यासाठी हंगामा करणारे आज सरकारला दोष देत आहेत.ते चित्र आणि हे चित्र पाहील्यावर कुलभुषण यांची आई व पत्नी यांच्या धैर्याला त्रिवार वंदन!!!!🙏🙏🙏

    ReplyDelete
  13. अप्रतिम विश्लेशन.

    ReplyDelete
  14. कल्पनातित धैर्य आणि आत्मविश्वास....i am sharing this on Facebook....More and more people should read this.

    ReplyDelete
  15. एका बाजूला काचेचा पडदा व मात्रुभाषा आणी संस्स्करावर बंदी तर दूसरीकडे संयमाची पराकाष्ठा आणी संतुलन हे दोन देशातील वर्तणुकीतले अंतर ह्या दोघींनी जगासमोर मांडले. त्यामुळे त्यांचे कितीही कौतुक केले तरी ते अपूर्णच राहील ह्यात शंका नाही. --- एका सामान्य नागरिकांचे अभिवादन व मनःपूर्वक धन्यवाद. भारत माता की जय! !

    ReplyDelete