Tuesday, January 16, 2018

फ़डणवीस ‘चालले’?

fadnavis helicopter के लिए इमेज परिणाम

वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ सलग मुख्यमंत्रीपद भूषवलेले नेते आहेत. पंधरा सोळा वर्षे त्यांनी हे पद भूषवले. मात्र इंदिरा गांधींचा जमाना सुरू झाला आणि स्थानिक वा प्रादेशिक नेत्यांना कॉग्रेसमध्ये किंमत राहिली नाही. त्यानंतर नाईक यांची सद्दी संपलेली होती. इंदिराजींनी प्रादेशिक नेत्यांना छळण्यासाठी दुय्यम दर्जाच्या व कुठलाही स्थानिक पाठींबा नसलेल्या व्यक्तींना पक्षात मोठेपण देऊन यशस्वी नेत्यांचे पाय ओढण्याचे राजकारण सुरू केले होते. तेव्हा त्यांच्याच कृपेने बॅ. रजनी पटेल हे मुंबई कॉग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांचा आडोसा करून बहुतांश अमराठी इंग्रजी पत्रकार नाईक यांच्यावर शरसंधान करीत असत. १९७० नंतर नाईक लौकरच मुख्यमंत्री पदावरून जाणार, अशा बातम्या दर आठवड्यात इंग्रजी वर्तमानपत्रात झळकायच्या. ‘नाईक इज गोईंग’ हे शीर्षक इतके गाजलेले होते, की एकदा एका जाहिर कार्यक्रमात खुद्द रजनी पटेल यांनीच त्याची खिल्ली उडवलेली होती. नाईक व पटेल एकत्र व्यासपीठावर होते आणि भाषण करताना पटेल म्हणले, येस नाईक इज गोइंग, बट गोईंग स्ट्रॉंग! त्यामुळे श्रोत्यांमध्ये हंशा पिकला होता. सांगायचा मुद्दा इतकाच, की राजकीय सनसनाटी माजवण्यासाठी अशा बातम्या पेरणे वा त्यातून खळबळ माजवणे नवे नाही. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्याविषयी अशा बातम्या पहिल्या दिवसांपासून येत राहिल्या आहेत. त्यांचे पद व सरकार किती टिकणार, याची शंका शपथविधीपासून घेतली गेलेली आहे. अधूनमधून त्यांच्या जागी नवा कोणी येणार अशाही वावड्या उडत राहिल्या आहेत. रोजच्या रोज युतीत असून शिवसेना पाठींबा काढून घेणार असल्याच्या धमक्याही देत असते. पण फ़डणवीस सरकार काही पडण्याची चिन्हे नाहीत. उलट फ़डणवीस ज्या हेलिकॉप्टरमध्ये बसतात, ती विमाने मात्र पडत असतात. हा काय योगायोग आहे?

अलिकडेच रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका असल्याचे भविष्य वर्तवलेले आहे. त्याच्या दुसर्‍याच दिवशी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना घेऊन जाणार्‍या हेलिकॉप्टरला अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली होती. अधूनमधून अशा बातम्या नित्यनेमाने येत असतात. बहुधा देशातील फ़डणवीस हा एकमेव नेता असा असावा, ज्याला इतक्या प्रसंगी हेलिकॉप्टर अपघात झालेत. पण त्यांना साधी जखमही झाल्याची बातमी नाही. अनेकदा असे अपघात हा अपशकून मानला जातो. पण असे किरकोळ अपघात हा मुख्यमंत्र्यांसाठी शुभशकून झालेला दिसतो. सुरक्षित मानल्या जाणार्‍या त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होतात. पण कायम असुरक्षित असलेले त्यांचे सरकार मात्र, विनासायास चाललेले आहे. बाहेर वावड्या उडाणार्‍यांची गोष्ट सोडून द्या. त्यांच्या संयुक्त सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने तर पहिल्या दिवसापासून त्यांच्यावर झोड उठवलेली आहे. त्यामुळेच हे सरकार अधिक काळ टिकणार नसल्याची भाकिते सातत्याने होत राहिलेली आहेत. पण कुठलाही राजकीय पेचप्रसंग उदभवला तरी अपघातातून सहज सुखरूप निसटावे, तसे फ़डणवीस सरकार त्यातून बाहेर पडलेले दिसते आहे. मग शरसंधान कोण व कुठे करतोय, त्याच्या नेमबाजीच्या गुणवत्तेविषयी शंका येणे स्वाभाविक आहे. हे लोक राजकीय शरसंधान करतात आणि त्यांचे शाब्दिक बाण हेलिकॉप्टरला जखमी करतात काय? तसे असेल तर याला आधुनिक रॉकेट सायन्स म्हणावे लागेल. त्याचा उपयोग राजकारणात करण्यापेक्षा सीमापार वा युद्धभूमीवर करणे उपयुक्त ठरेल. म्हणजे त्या तशा शब्दांचा उपयोग पाकिस्तान व जिहादींचा विरोधात करून काश्मिर वा अन्यत्र शांतता प्रस्थापित करता येऊ शकेल. अफ़गाणिस्तानात हिंसा माजवणार्‍या तालिबानांना वेसण घालण्यासाठी अमेरिकाही ते तंत्रज्ञान विकत घेईल.

फ़डणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन आता तीन वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. त्यांच्या पाठीशी स्वपक्षाचे पुर्ण बहूमत नसतानाही त्यांनी सरकार स्थापन केले होते आणि नंतर शिवसेनेला सोबत घेऊन बहुमताचे गणित साधलेले आहे. त्या तडजोडीविषयी शिवसेनेचे नेतृत्व अजिबात खुश नसल्याने सतत आपल्या मुखपत्रातून सेनेने फ़डणवीस यांच्यावर शरसंधान चालविलेले असते. सरकारच्या जवळपास प्रत्येक निर्णयावर सेनेच्या तोफ़ा डागल्या जात असतात. प्रसंगी आमचे मंत्री राजिनामे खिशात ठेवून फ़िरत असल्याचेही इशारे दिले जात असतात. सहाजिकच विरोधात बसलेले राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षाचे नेते आज ना उद्या सेना सत्तेतून बाहेर पडणार, अशा आशाळभूत अपेक्षेने प्रतिक्षा करीत असतात. पण तीन वर्षे उलटून गेल्यावरही फ़डणवीस या नवख्या अननुभवी मुख्यमंत्र्याने आपले सरकार टिकवले आहे. त्यांना घेऊन जाणार्‍या हेलिकॉप्टरला अपघात होत असले तरी कुठल्याही शासकीय निर्णयाला वा धोरणाला अपघात होऊ शकलेला नाही. उलट मध्यंतरी झालेल्या निवडणूकात प्रचाराची धुरा खांद्यावर घेऊन फ़डणवीस यांनी पक्षाला एकहाती विजय संपादन करून दिलेला आहे. महापालिका, जिल्हा परिषदा किंवा तत्सम निवडणूकात फ़डणवीस यांनी दिल्लीच्या मदतीची अपेक्षा बाळगली नाही. पक्षात व विरोधकातही त्यांना कोणी आव्हान उभे करू शकलेला नाही. या तरूण मुख्यमंत्र्याची शक्ती कुठून आलेली आहे व येते, त्याचे नवल वाटते. कुठल्याही क्षणी कोसळणार असलेले सरकार सलग तीन वर्षे निर्वेधपणे चालवणे, म्हणूनच नवलाईची गोष्ट आहे. त्यामुळेच वसंतराव नाईक यांच्या काळातील बातम्या आठवल्या. कारण जाता जाता फ़डणवीसही अधिक शक्तीमान नेता म्हणून उदयास आलेले आहेत. त्यांनी पक्षातले आव्हान संपवले आहेच, पण विरोधकांनाही नामोहरम करून टाकलेले आहे.

फ़डणवीस यांचा कारभार खुपच उत्तम आहे असा दावा कोणी करू शकणार नाही. तशी ग्वाही देशातल्या कुठल्याही मुख्यमंत्र्याविषयी देता येणार नाही. यापुर्वीच्या कोणा मुख्यमंत्र्याविषयी तसे कोणी म्हणू शकलेला नाही. कारण कोट्यवधी जनतेतील प्रत्येकाला सुखीसमाधानी करू शकणे कोणालाही शक्य नाही. एका कुटुंबातल्या प्रमुखाला सुद्धा घरातल्या चारपाच माणसांना एकाचवेळी समाधानी करणारा निर्णय घेता येत नाही. मग राज्याचा प्रमुख बारा कोटी जनतेला समाधानी करणे अशक्य आहे. काही केले तरी थोडेफ़ार लोक नाराज असतात आणि विरोधातले लोक नेह्मी नकारार्थीच प्रतिक्रीया देत असतात. हे तत्व स्विकारले तर निर्धास्तपणे कारभार करता येत असतो. पण त्याचीच आणखी एक बाजू अशी, की ज्या सत्तापदावर माणुस बसलेला असतो, ते कायमस्वरूपी नसल्याचे भान राखले, तर अधिक टिकणे सोपे होऊन जात असते. आपल्या पाठीशी बहूमत नाही आणि सोबत घेतलेला मित्रपक्ष सतत तक्रार करतो, तेव्हा आपले सिंहासन हंगामी असल्याची जाणिव अपरिहार्य असते. फ़डणवीस यांना म्हणूनच पहिल्या दिवसापासून आपले पद कधीही जाऊ शकते, याचीच खात्री आहे. सहाजिकच ते पद वा सत्ता टिकवण्यापेक्षा शक्य तितके काम मिळालेल्या वेळेत उरकण्याकडे त्यांचा कल राहिलेला आहे. उपलब्ध साधने व अधिकाराच्या मर्यादेत राहून निरपेक्ष वृत्तीने त्यांनी सत्ता संभाळली आहे. सत्ता जाण्याचे भय नसेल, तर मग कोण विरोधात गुपचुप कारस्थाने करतो, त्याची फ़िकीर बाळगण्याचे कारण नाही. हीच या मुख्यमंत्र्याची शक्ती बनुन गेली आहे. त्यामुळे फ़डणवीस कधी जाणार, असे प्रश्न विचारणार्‍यांनाच त्यांच्या सरकारच्या भक्कम असण्याचा अनुभव उजाडणार्‍या प्रत्येक दिवशी येत असतो. त्यामुळे ‘फ़डणवीस चालले’ हे वाक्य अपुर्ण ठरले असून, ‘फ़डणवीस मजबूत होत चालले’ हे राजकीय वास्तव बनलेले आहे.

2 comments:

  1. Ji ji mhanu kathin avhane asatat CM mhnun ti sudaivane devendrajina pahilya 3 varshtach pelavi lagli va ti tyani pelali pan tymule te ata jast majboot zalet

    ReplyDelete
  2. साहजिकच त्यांच्या पक्षातील जेष्ठ नेत्यांचे कट-कारस्थान आणि मित्र पक्षाच्या पोकळ धमक्या आणि त्यांची काम करण्याची वृत्ती त्यांना आणखी मजबूत राजकारणी बनवून गेली..

    ReplyDelete