Tuesday, January 2, 2018

पुरोहित आणि कुलभूषण

aiyar manmohan के लिए इमेज परिणाम

गेल्या आठाड्यात अनेक महत्वाच्या घटना घडल्या. त्यात पाकिस्तानी कब्जात असलेल्या कुलभूषण जाधवच्या आई व पत्नीला पाकच्या अधिकार्‍यांनी दिलेली वाईट वागणूक हा जसा विषय आहे, तसाच कर्नल पुरोहित यांच्यावरून दहशतवादाचा कलंक पुसला जाण्याचाही विषय आहे. दोन्ही विषय पुरोगामी जगतावर चांगलेच शेकलेले आहेत. कारण जितक्या उत्साहात इथले पुरोगामी जिहाद व इस्लामी दहशतवादाचे समर्थन करण्यासाठी माणूसकीचा मुखवटा पांघरतात, तितका उत्साह त्यांच्यापैकी कोणी कुलभूषणच्या आई पत्नीच्या छळाविषयी दाखवला नाही. खरे तर अशा लोकांकडून तशी अपेक्षा बाळगणेही गैरलागू आहे. पण योगायोग असा, की त्याच दरम्यान मागली नऊ वर्षे देशात माजवल्या गेलेल्या पुरोगामी कारस्थानाचा मुखवटाही फ़ाडला गेला. हिंदू दहशतवाद म्हणून गेली नऊ वर्षे पुरोहित व काही लोकांना गजाआड डांबलेले होते आणि कसल्याही पुराव्याशिवाय त्याचाच अखंड डंका पिटला जात होता. ते थोतांड खरे सिद्ध करण्यासाठी कायद्याशी व न्यायाशीही पोरखेळ खेळला गेला होता. त्याचे पितळ उघडे पडले आहे. कारण पुरोहित व अन्य आरोपींच्या विरोधातला दहशतवाद व मोक्का, असे दोन्ही आरोप सत्र न्यायालयाने झटकून टाकलेले आहेत. मग इस्लामी दहशतवादाला तोंड देण्य़ासाठी तयार करण्यात आलेले हिंदू दहशतीचे हत्यार गमावलेल्यांनी रडगाणे सुरू केले तर नवल नव्हते. अर्थात त्यांची भाजपा वा संघाच्या विरोधात कारस्थानी नाटके नवी नाहीत. पण त्यात त्यांनी पुरोहित सारख्या एका देशप्रेमी लष्करी अधिकार्‍याला गोवून, त्याचा अनन्वीत छळ केला. सरकारची यंत्रणा वापरून पोलिस व अन्य अधिकारात या कुशल अधिकार्‍याचा अमानुष छळ करण्यात आला होता. जे लोक देशद्रोही कारवाया शोधून त्याचा बंदोबस्त करण्यात गुंतलेल्या भारतीय सैन्याधिकार्‍याला खच्ची करण्यासाठी इतके कष्ट घेतात, ते कुलभूषणसाठी दोन अश्रू कशाला ढाळतील?

अशा लोकांचे भाईबंद पाकिस्तानात बसून कुलभूषणचे अपहरण करतात. त्याच्याकडून खोटेनटे कबुलीजबाब वदवून घेतात आणि त्याच लोकांच्या पैशावर चालणार्‍या कुणा संस्थेने दिलेल्या मेजवान्या आपले पुरोगामी पाकिस्तानात जाऊन झोडत असतात. मग त्यांच्यासाठी पुरोहित व कुलभूषण यात कुठला फ़रक पडतो? भारतीय देशप्रेमी व्यक्ती वा सैनिकाला छळणारे गद्दार देशी आहेत, की पाकिस्तानचे पोलिस आहेत, याच्याशी पुरोगाम्यांना कसला फ़रक पडणार असतो? कुठूनही भारतातील राष्ट्रवाद व देशप्रेम खच्ची होण्याशी मतलब असतो. म्हणून तर त्यांच्यातले कुशल पाकप्रेमी वकील, आपली बुद्धी अफ़जल गुरू वा याकुब मेमनसाठी पणाला लावतात. पण त्यातल्या एकालाही पुरोहित यांच्या छळवादातला अमानुषपणा दिसत नाही, की जाणवत नाही. त्याच्यासाठी न्यायालयात जाऊन दाद मागण्याची इच्छा होत नाही. हा आजचा पुरोगामी चेहरा आहे. त्यांना पुरोहितला न्याय देण्यापेक्षा छळवाद करण्यात धन्यता वाटली असेल, तर त्यांनी कुलभूषणसाठी अश्रू का ढाळवेत? योगायोगही समजून घेण्यासारखा आहे. पाकिस्तानने कुलभूषणवर त्यांच्या देशात घातपात केल्याचा आरोप ठेवला आहे. तो खोटा असल्याचा भारताचा दावा आहे. पण भारतातही असाच आरोप एका सेवेतील भारतीय अधिकार्‍यावर ठेवला गेला. त्याचा तसाच छळ भारतीय तुरूंगात झाला, तेव्हा देशात कोणाची सत्ता होती? पुरोगामी युपीए सत्ता होती ना? जे काही आरोप आज पाकिस्तान कुलभूषण जाधव यांच्यावर करीत आहे, तेच मागल्या नऊ वर्षात इथल्या पुरोगामी सरकार व पुरोगामी पक्षांनी पुरोहितांवर केलेले आहेत. ह्याला निव्वळ योगायोग मानता येत नाही. आताही सत्ता गमावल्यावर मनमोहन सिंग व अन्य पुरोगामी नेते तितक्याच अगत्याने इथे पाकिस्तानी नेते अधिकार्‍यांना मेजवान्या कसल्या देत असतात?

गुजरातच्या निवडणूक प्रचारात अशा मेजवानीचा उल्लेख मोदींनी केला, तर त्यावर हे लोक खवळले होते आणि पुरावे मागत होते. पण तिथे काय शिजवले गेले, त्यावर मौन धारण करून आहेत. आपण दोन देशातील संबंध सुधारण्याच्या बाबतीत चर्चा केली, असे माजी सेनाप्रमुख दीपक कपूर यांनी जाहिरपणे सांगितलेले आहे. पण ज्या घरात ही मेजवानी झाली, त्याचे दोन देशातील संबंधाविषयीचे सुत्र काय आहे? पाकिस्तानने मोदींना भारताच्या सत्तेवरून हटवण्यात कॉग्रेसला मदत करावी, मगच दोन देशातील संबंध सुधारतील, ही मणिशंकर अय्यर यांची जाहिर भूमिका आहे ना? मग त्यांच्याच घरात मेजवानी झाली व पाकिस्तानी मुखंडांना बोलावण्यात आले’; तर तिथे मोदींना संपवण्यापलिकडे कुठली खलबते शिजू शकतात? किंवा आणखी एक शक्यता आहे. पाकिस्तानचे व त्यांच्या इथल्या बगलबच्च्यांचे कारस्थान मागल्या काही महिन्यात पुर्णपणे उधळले गेल्याने डागडुजी करण्यासाठी त्ती मेजवानी योजलेली होती काय? २०१७ च्या मध्यास कुलभूषणला फ़ाशी देण्याचा पाकिस्तानचा डाव आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निकालामुळे उधळला गेला. तसाच इथे कर्नल पुरोहितना संपवण्याचा डावही सुप्रिम कोर्टाने जामिन दिल्यामुळे उध्वस्त झाला. असा दुहेरी फ़टका बसल्याने विचलीत होऊन ही खलबते झालेली असतील काय? आधीच्या दहा वर्षात देशाची अधिकाधिक हानी व नुकसान करीत पाकला शिराजोर करून ठेवण्यापेक्षा या पुरोगामी सत्ताधार्‍यांनी काय केले होते? त्यात पुरोहितांना होरपळावे लागले. ते लष्करात म्हणजे सेनादलाच्या गुप्तचर विभागात काम करत होते आणि म्हणूनच त्यांना पाकचे हस्तक असलेल्या अनेक गद्दारांची नेमकी माहिती मिळालेली असू शकते. म्ह्णूनच त्याना दहशतवादी ठरवुन काटा काढण्याचा डाव खेळला गेला. पाकिस्तानात आता वेगळ्या प्रकारे तोच डाव खेळला आहे आणि त्यात कुलभूषणला छळण्यात आलेले आहे.

जे आरोप कुलभूषणवर पाकिस्तानने केले आहेत, तेच नेमके काम भारतात पुरोहित करत होते आणि त्यांना अमानूष वागणुक देऊन छळणार्‍या सरकारला देशहिताची सत्ता म्हणता येईल काय? असे सरकार मतदाराने साडेतीन वर्षापुर्वी जमिनदोस्त केले, म्हणून त्यातून पुरोहित यांची मुक्तता होऊ शकलेली आहे. मात्र पाकिस्तानातच खितपत पडलेल्या कुलभूषणची अजून सुटका झालेली नाही. पण दोन्ही प्रकरणातला कुटील मेंदू समान निर्णय घेताना दिसेल. दोघांच्या विरोधात खोटे कुभांड रचून न्यायसंस्थांचा वापर त्यांना छळण्यासाठी झालेला आहे. कुठल्याही पुराव्याशिवाय दोघांना दिर्घकाळ सडवण्याचे कारस्थान जसेच्या तसे समान आहे. फ़रक इतकाच आहे. आहे, की कुलभूषणला छळणारी यंत्रणा पाकिस्तानची सरकारी व्यवस्था आहे. इथल्या पुरोगाम्यांनी भारतातही देशभक्त सैनिकाला जगणे अशक्य करून सोडलेले होते. मग प्रश्न असाही पडतो, की युपीएच्या दहा वर्षात भारतातले सरकार कुणाच्या इशार्‍यावर चालत होते? ज्यात इशरत जहानला निर्दोष ठरवण्यासाठी अर्धा डझन ज्येष्ठ पोलिस अधिकार्‍यांना मारेकरी ठरवले गेले. त्यासाठी गृहखात्याच्या महत्वपुर्ण कागदपत्रात खडाखोड व हेराफ़ेरी करण्यात आली. पुरोहितांना विनाचौकशी व विनापुरावा  छळ्ण्यात आले. हे सर्व पाकिस्तानला हवे तसेच होत गेले असेल, तर भारत सरकार मनमोहन, सोनिया वा चिदंबरम चालवत होते, यावर कोणी विश्वास ठेवावा? याकुब व अफ़जल यांना सोडवण्यासाठी आकाशपाताळ एक करणार्‍यांना पुरोहितसाठी पाझर फ़ुटत नाही, त्यांच्या माणूसकीवर कोणी विश्वास ठेवावा? देशात सत्तांतर झाल्यानंतरही छुप्या मेजवान्या उठवून पंतप्रधानाला नीच संबोधण्यापर्यंत मजल जात असेल, तर देश किती पोखरला गेला आहे, त्याचा अंदाजही अंगावर शहारे आणतो. कुलभूषण वा पुरोहितांसारखे सुपुत्र या भूमीत जन्मले म्हणून तो टिकून राहिला म्हणायचे.

1 comment:

  1. Loksatta.com had an article (link below) in which the judge who removed mocca charges observed that Purohit was actively involved in the bombing. Even though Mocca has been removed, he will still face the IPC charges. In short he will still face the criminal chrges. If that’s the case why are you sounding so positive about Purohit.

    https://www.loksatta.com/mumbai-news/2006-malegaon-bombings-for-hindu-nation-1608113/

    ReplyDelete