Wednesday, January 10, 2018

नॉयडा नावाच्या देवाला नवस

Image result for modi yogi in noida

अंधश्रद्धा ही प्रतिगामी असते असे सरसकट मानले जाते. म्हणून तर तमाम पुरोगामी कुठल्याही अंधश्रद्धा विरोधी आंदोलनात आघाडीवर असतात. अर्थातच अंधश्रद्धा ही फ़क्त प्रतिगामी ठरवलेल्यांनी केलेली कृती म्हणून अंधश्रद्धा मानायची आपल्याकडे पुरोगामी पद्धत आहे. तीच कृती वा तशी श्रद्धाभक्ती कुणा पुरोगामी बिल्ला छातीवर लावणार्‍याने केली, तर तिकडे काणाडोळा करायचा असतो. हा पुरोगामी सिद्धांत आहे. सहाजिकच कोणी मुस्लिम मौलवी किंवा ख्रिश्चन फ़ादरने अंधश्रद्धा निर्माण केलेली असेल, तर त्याविषयी जमाते पुरोगामी मूग गिळून गप्प बसत असतात. हे आता तमाम सामान्य लोकांच्याही लक्षात आलेले आहे. एकवेळ प्रतिगामी अंधश्रद्धा सैल होऊ शकतात. पण पुरोगामी अंधश्रद्धा मोठ्या कडव्या व चिवट असतात. तसे नसते तर मुलायम वा त्यांचा समाजवादी पुत्र अखिलेश यादव, याने त्याच अंधश्रद्धेला कशाला पुरोगामी विजयाचे साकडे घातले असते? कालपरवा अखिलेशने नॉयडा नावाच्या नवसाला पावणार्‍या देवाला मोदी व योगी यांची सत्ता संपुष्टात आणण्याचा पत्रकारांच्या बैठकीच नवस केलेला आहे. मेट्रो रेल्वेच्या उदघाटनासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नॉयडा हा दिल्लीलगतच्या औद्योगिक उत्तरप्रदेशी भागात गेलेले होते. त्यामुळे आता नॉयडाचा देव पावणार अशी अखिलेशला खात्री पटलेली आहे. म्हणून तर त्याची जाहिर वाच्यता करण्याची हिंमत त्याने दाखवलेली आहे. अर्थात नॉयडा नावाचा देव कोण, असा अनेकांना प्रश्न पडेल. तर तो दर्शनाला येणार्‍याला पावणारा देव नसून त्याच्यावरच अवकृपा करणारा देव मानला जातो. प्रामुख्याने हा देव उत्तरप्रदेशचा मुख्यमंत्री असणार्‍या नेत्यावर अवकृपा करतो, अशी पक्की पुरोगामी श्रद्धा आहे. त्याविषयी अनेक दंतकथा व आख्यायिकाही सांगितल्या जात असतात. त्यामुळे अखिलेशने तिथे नवस केलेला आहे.

नॉयडा म्हणजे नवे ओखला औद्योगिक विकास प्राधिकरण होय. दिल्ली हे महानगर एका बाजूने उत्तरप्रदेशला लागलेले आहे. त्यामुळे नजिकच्या परिसरातील लोक दिल्लीला येजा करण्यासाठी दिर्घकाळ वापर करीत राहिले. दिल्लीचा विकास होताना शेजारच्या अनेक राज्यांनी सीमाभागात आपापल्या विकास योजना आखल्या, त्यात या उत्तरप्रदेशी भागाचा समावेश होतो. त्याला छोटे नाव म्हणून नॉयडा असे संबोधले जाते. हा परिसर चार दशकापासून विकसित होत असून त्याचा विस्तार सातत्याने वाढलेला आहे. मात्र तिथे जाऊन लाखो लोकांचे कल्याण झालेले असले, तरी मुख्यमंत्र्यासाठी तो प्रदेश शापित मानला जातो. अर्थात अशा गोष्टी भाकाडकथा असतात, असे प्रत्येक पुरोगाम्याने मानण्याची सक्ती आहे. म्हणूनच कुणी पुरोगामी सेक्युलर त्यावर विश्वास असल्याचे कधी बोलून दाखवत नाही. मात्र त्या शापित प्रदेशात जायचे प्रत्येक पुरोगामी कटाक्षाने टाळत असतो. त्याला २८ वर्षे जुन्या गोष्टी कारणीभूत झाल्या आहेत. ज्या काळात देशाच्या बहुतेक राज्यात कॉग्रेसचे एकछत्री राज्य होते आणि विरोधकांना मूठभरही जागा मिळत नव्हत्या, त्या कालखंडातील त्या गोष्टी आहेत. तेव्हा नॉयडाचा विकास चालू होता आणि उत्तरप्रदेशात कॉग्रेसचे बहुमताचे राज्य होते. राहुल गांधीचे वडील राजीव गांधी वा आजी इंदिराजी यांची इतकी हुकूमत होती, की कपडे बदलावेत इतक्या सहजपणे त्यांच्या इशार्‍यावर राज्यांचे मुख्यमंत्री बदलले जायचे. त्यांच्याच कृपेने तेव्हा उत्तरप्रदेशात नारायण दत्त तिवारी व नंतर वीरबहादूर सिंग मुख्यमंत्री झालेले होते. पण योगायोग असा, की या दोघांनी नॉयडाला कुठल्या कार्यक्रमासाठी भेटी दिल्या आणि काही महिन्यातच त्यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागलेले होते. ह्या घटना एकदोन वर्षातल्या असल्याने तशी एक दंतकथाच तयार झाली की नॉयडाला भेट दिली, मग नेता सत्ता गमावतो.

कुठल्याही पुरोगाम्याला विचारले तर तो अशा समजुतीची हेटाळणी केल्याशिवाय रहाणार नाही. अगदी पत्रकारही पुरोगामी असला तर टिंगलच करील. पण माध्यमात सोकावलेल्या पुरोगामी पत्रकारांनीच ही समजूत घट्ट होण्याला हातभार लावलेला आहे. त्यामुळे नंतरच्या काळात जेव्हा केव्हा कोणा मुख्यमंत्र्याने आपल्या मुदतीपुर्वीच सत्ता गमावली, त्याची शोकांतिका नॉयडाशी जोडणारे युक्तीवाद अगत्याने सांगितले गेले. गेली २८ वर्षे हा मामला असाच चालू आहे. परिणामी नवा मुख्यमंत्री नॉयडाला जाण्याची हिंमत करत नाही. कोणी असल्या मनुवादी मुर्खपणाला आव्हान देण्याची हिंमत करत नाही. राजनाथ सिंग तर प्रतिगामीच होते. पण मुलायमनीही नॉयडाला जायची हिंमत कधी केली नाही आणि मागल्या वर्षापर्यंत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवणार्‍या अखिलेशने तर चुकूनही तिकडे पाऊल टाकले नाही. नॉयडातील कुठल्या विकास योजनेचे उदघाटन वा समारंभ असेल, तर तरूण समाजवादी नेता अखिलेश लखनौमध्ये बसूनच रिमोटने काम उरकून घेत असे. एका कार्यक्रमाच्या निमीत्ताने मायावतींनी एकदा तसे धाडस करून बघितले होते. नॉयडाच्या सीमेपर्यंत त्यांनी फ़ेरफ़टका मारला आणि त्यांनाही सत्ता गमवावी लागली म्हणतात. अशी ही भाकडकथा मागली २८ वर्षे कौतुकाने सांगितली जात असते. इतके कडक पुरोगामी व्रतपालन करूनही गेल्या मार्च महिन्यात अखिलेशची सत्ता जायचे थांबले नाही. त्यामुळे निदान त्याची तरी असली समजूत दूर व्हायला हवी होती ना? पण प्रतिगामींपेक्षा पुरोगाम्यांच्या अंधश्रद्धा अधिक कडव्या असल्याने, व्रतस्थ अखिलेशचा अजून त्या अवकृपेवर पक्का विश्वास आहे. किंबहूना म्हणूनच मेट्रोच्या निमीत्ताने योगी आदित्यनाथ नॉयडाला पोहोचल्यावर अखिलेश कमालीचा सुखावला आहे. त्याचा आनंद गगनातही मावला नाही म्हणून त्याने तो आनंद पत्रकार मित्रांनाही वाटून टाकला.

मोदी व योगी आता नॉयडाला एकत्रित जाऊन आलेले आहेत. आता त्या दोघांना नॉयडाची जागृत शक्ती कळेल, असे अखिलेशने पत्रकार परिषदेत सांगितल्याची बातमी आलेली आहे. किंबहूना दोघेही एकत्रित नॉयडाला गेल्याने तर अखिलेशला आनंदाचे भरतेच आलेले आहे. त्याचा स्वत:चा अनुभव या आख्यायिकेला खोटा पडणारा असला तरी त्याची श्रद्धा किती पक्की आहे ना? नाहीतर प्रतिगामी योगी आदित्यनाथ! सगळ्या देवळांना देवस्थानांना जाऊन भेटी देणार्‍या या कडव्या धर्मप्रेमी अंधश्रद्ध मुख्यमंत्र्याला नॉयडाच्या शापीत भूमीची भिती वाटलेली नाही. तो बिनदिक्कत अवकृपेच्या आख्यायिका झुगारून नॉयडाला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे प्रतिगामीत्वाचे जगातील आजचे सर्वात मोठे उदाहरण. पण त्यांनीही नॉयडाच्या अवकृपेला दाद दिलेली नाही. असल्या कालबाह्य समजूतीना झुगारणे म्हणजे आजकाल प्रतिगामी अंधश्रद्धा झाली आहे. आणि अशा बिनबुडाच्या दंतकथांना शरण जाण्याचे शहाणपण म्हणजे पुरोगामीत्व झालेले आहे. तिच बुद्धीवाद झालेला आहे. अखिलेश यादव आता मोदी-योगी सत्ताभ्रष्ट होणार म्हणून नॉयडा देवावर खुश झालेले आहेत. त्यांनी पत्रकारांना त्या अपशकुनी शापित भूमीचा हवाला दिला असून, नजिकच्या काळात नॉयडाचा चमत्कार दिसेल अशी हमीच दिलेली आहे. एकूण २०१९ सालात नरेंद्र मोदी व भाजपा यांना परभूत करण्याचे साकडे बहुधा तमाम पुरोगामी मिळून नॉयडा नावाच्या देवालाच घालतील, याविषयी आता कोणी मनात शंका बाळ्गण्याचे कारण नाही. किंबहूना त्यासाठीच अखिलेशने उत्तरप्रदेशात भाजपा विरोधकांची बैठक बोलावली होती. पण तिकडे कॉग्रेस व मायावती फ़िरकले नाहीत. ह्याला कुठल्या देवाची कृपा समजावी? सध्या भारतातल्या कुठल्याही भाषेतील शब्दकोषांचे अर्थच खुप बदलून गेलेत, असे नक्की मानता येईल. अशी आहे नॉयडाची दंतकथा!

2 comments:

  1. साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सफल संपूर्ण.

    ReplyDelete
  2. नीटसं आठवत नाही पण असंच काहीसं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच वसईभेटी बाबत घडत होतं बहुतेक..

    ReplyDelete