Saturday, January 6, 2018

तो मोर्चा आणि हा एल्गार

maratha morcha के लिए इमेज परिणाम

भीमा कोरेगावच्या निमीत्ताने काही गोष्टी ठळकपणे पुढे आल्या. या निमीत्ताने दलित वा आंबेडकरवादी गटांनी आपले शक्तीप्रदर्शन घडवण्याचा प्रयास केला, तर त्यात काही गैर मानायची गरज नाही. कुठल्याही देशात व समाजात त्यातल्या एखाद्या घटकाला आपल्यावर अन्याय झाल्यासारखे वाटत असेल, तर त्याने त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. तसा त्याला अधिकारच असतो. पण असे आवाज उठवण्यासाठी जेव्हा मोठ्या लोकसंख्येने जमाव एकत्र येतो, तेव्हा त्यावर नियंत्रण राखणे त्याच्या नेतृत्वालाही अशक्य होऊन जाते. म्हणूनच जितका मोठा जमसमुदाय जमतो, तितकी त्याच्या नेतृत्वाची जबाबदारी वाढत असते. कायदा व सुव्यवस्था राखणे ही भले सरकारची जबाबदारी असली, तरी त्यात बाधा आणणे हा कुणा जमावाचा किंवा त्याच्या नेत्याचा अधिकार असू शकत नाही. त्यामुळेच अलिकडल्या घटनांमध्ये सरकार वा पोलिस तोकडे पडले, असा दावा करणे शुद्ध लबाडी आहे. खास करून जे बंद यशस्वी झाल्याचे श्रेय घेतात, त्यांना त्यात झालेल्या हिंसाचाराचीही जबाबदारी घेता आली पाहिजे. पण इथे तसे काहीही घडलेले नाही. हिंसेची जबाबदारी घेण्य़ाची वेळ आल्यावर शासन व पोलिसांकडे बोट दाखवणे, ही म्हणूनच लबाडी म्हणायला हवी. कुठलीही हिंसा म्हणजे शक्तीप्रदर्शन होऊ शकत नाही. त्यात भीमा कोरेगावच्या निमीत्ताने झालेला बंद तोकडा पडला, हे मान्यच करायला हवे. प्रामुख्याने त्यात पुढाकार घेतलेल्या नेतृत्वाचे ते अपयश मानावे लागेल. पण आजकाल अपयशात नैतिक यश सिद्ध करण्याचा जमाना असल्याने, असली अक्तव्ये येत असतात आणि युक्तीवादही चाललेले असतात. मोर्चा वा आंदोलनाचे म्होरकेपण करणार्‍यांची जबाबदारी किती व कशी असते, त्याचे म्हणूनच विवेचन व्हायला हवे. या पार्श्वभूमीवर मागल्या वर्षभर निघालेल्या मराठा मूकमोर्चाचे कौतुक सांगावे लागते. किंबहूना तोच एल्गार व मोर्चा यातला फ़रक आहे.

नगर जिल्ह्यात कोपर्डी येथे जी घटना घडली होती, त्यामुळे एकूणच मराठा समाजात अस्वस्थता होती. पण कोणीही मराठा जातीचा, कुठल्याही संघटनेतला नेता त्यावर आवाज उठवण्यासाठी पुढाकार घेत नव्हता. अशावेळी अकस्मात एका जागी संघटित मोर्चा निघाला. पण त्याला कुठल्याही ख्यातनाम नेत्याचे नेतृत्व मिळालेले नव्हते की कुणा पुढार्‍याचे त्यात भाषण झाले नाही. किंबहूना त्या मोर्चालाच मूक मोर्चा असे ना्व देण्यात आल्याने त्यात कुठे घोषणांची आतषबाजीही होताना दिसली नाही. मराठा जातीचे नाव घेऊन डझनावारी संघटना व संस्था उभ्या आहेत आणि त्यांनी आरक्षण मिळावे म्हणून अनेक कार्यक्रम आजवर योजलेले होते. पण कोपर्डीनंतरची घुसमट व्यक्त करण्याची वेळ आली, तेव्हा त्यातला प्रत्येक नेता वा संघटना राजकीय सक्तीमुळे अलिप्त राहिलेले होते. त्यांना झुगारून हा मोर्चा निघाला आणि त्यात सर्व गटातटाच्या नेत्यांना पुर्णपणे बाजूला ठेवण्यात आलेले होते. लाखोच्या संख्येने निघणारे विविध भागातील हे मोर्चे बघून, अनेकांच्या पोटात गोळा उठलेला होता. मराठे संख्येने अधिक आहेत आणि त्यांनीच रस्त्यावर उतरायचे ठरवले, तर इतर लहानमोठ्या लोकसमुहांचे काय होईल, अशी भिती दबल्या आवाजात व्यक्त केली जात होती. मोर्चा वा आंदोलन म्हणजे फ़क्त हिंसा, अशीच त्या भितीमागची प्रेरणा होती. पण लौकरच स्पष्ट झाले की त्या मोर्चात केवळ मराठा नव्हेतर इतर अनेक जाती समुहाचेही लोक मुक्तपणे सहभागी झालेले होते. पण त्यात कुठेही चुकून कुठल्या अन्य जातसमुह विरोधी वा राजकीय स्वरू्पच्या घोषणा दिल्या गेल्या नाहीत. सूडभावनेचा कुठलाही लवलेश त्यात नव्हता. म्हणून हा समाज व त्याचा मोर्चा अवघ्या महाराष्ट्राच्या सदिच्छा मिळवून गेला. नुसत्याच गांधीज़ींच्या नावाने जपमाळ ओढणार्‍यांना त्या मोर्चाने खराखुरा गांधी अवतरून दाखवला.

अहिंसा म्हणजे हिंसा करायची शक्ती नसताना पांघरलेले कवच नाही. तर हिंसेची कुवत असतानाही हिंसेपासून परावृत्त राहून केलेले शक्तीप्रदर्शन, असे गांधीजी म्हणत. शेळपट वा भित्र्याने अहिंसा बोलण्याने तिचे पालन होत नाही, असेच महात्म्याचे म्हणणे होते. आपल्या नुसत्या जमण्याच्या संख्येतूनच मराठा मूकमोर्चाने आपली शक्ती दाखवून दिली. इतक्या संख्येने कोणी हिंसा करायला सिद्ध झाला, तर त्याच्यासमोर बंदूका व हत्यारेही तोकडी पडतील असा त्यातला संदेश होता. परंतु नुसता मोर्चा निघणार म्हटल्यावरही अनेकांची धाबी दणाणली होती. त्याविषयी शंका कुशंका व्यक्त झालेल्या होत्या. जणू मराठ्यांनी आपल्या मनातला प्रक्षोभ व्यक्त करणेही गुन्हा असल्याचाच सूर लागला होता. कुठे त्या मोर्चाला गालबोट लागले नाही. कुठे हिंसा झाली नाही. त्याच्या तुलनेत कालपरवाचा एल्गार बघितला पाहिजे. मनातला राग वा विरोध व्यक्त करतानाही एकूण समाजाला ओलिस ठेवण्याचे कारण नसते. हिंसाचाराने भिती दहशत माजवली जाते. उलट नुसत्या संख्याबळावर शक्तीप्रदर्शन होऊन जात असते. हिंसेची गरज नसते. जेव्हा आपल्या शक्तीवर किंवा भूमिकेवर आपलाच विश्वास नसतो, तेव्हा त्याला पाठींबा मिळण्याची खात्री नसते आणि हिंसाचाराचा आश्रय घ्यावा लागतो. एल्गार पुकारणार्‍यांचा आपल्या शक्ती व भूमिकेच्या न्याय्य असण्यावर विश्वास असता, तर त्यांनी जमणार्‍या लोकसंख्येला नियंत्रणाखाली ठेवून हिंसा होऊ दिली नसती. जनजीवनाला भयभीत केले नसते. चुका झाल्या तर त्याची जबाबदारी उचलली असती. यापैकी काहीही झाले नाही. जमावाने धुमाकुळ घालण्याला कोणी समतेचे आंदोलन व यश समजत असेल, तर तो मुर्खांच्या नंदनवनात वावरत असतो. एक मात्र खरे आहे की या एल्गार पुकारणार्‍यांनी आंबेडकरवादी लोकांना पुढे करून बहुजन मराठ्यांच्या मनात नको त्या शंका संशय निर्माण करून ठेवले आहेत.

मराठा मूकमोर्चाच्या ज्या मागण्य़ा होत्या, त्यातली पहिली वा प्रमुख मागणी अट्रोसिटी कायदा रद्द करण्याची होती आणि कालपरवाच्या हिंसाचारानंतर पुन्हा अट्रोसिटी कायद्यानुसार काही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ते समाजात वितुष्ट माजवणारे व आंबेडकरी समाजाला अलिप्त एकाकी पाडणारे आहेत. अर्थात त्याला आंबेडकरवादी नेते वा गट कारणीभूत नाहीत. ज्यांनी भीमा कोरेगाव विषयाचे अपहरण करून त्यालाच आपला राजकीय अजेंडा बनवला, ते खरे गुन्हेगार आहेत. त्यांनी उच्छाद केला व चिथावण्य़ा देऊन ते परस्पर निसटले आहेत. उमर खालिद वा मेवाणी इथे वास्तव्य करणारे नाहीत. पण त्यांच्या नादाला लागून ज्यांनी धुमाकुळ घातला, त्यांना मात्र इथेच जगायचे आहे. त्या जगण्यात आजवर जपलेल्या सदिच्छांना हरताळ फ़ासला गेला आहे. उपर्‍यांचा एल्गार साजरा करताना आपल्या भोवतीच्या विविध समुहांमध्ये असलेल्या सदिच्छांची होळी होऊन गेलेली आहे. मूक मोर्चाने नुसत्या संख्यात्मक व शांततापुर्ण वर्तनातून नव्या सदिच्छा निर्माण केल्या आणि एल्गारच्या नावाखाली आंबेडकरवादी मंडळींनी दिर्घकाल जमलेल्या सदिच्छांचा विध्वंस करून टाकला आहे. त्याचा आंबेडकरी चळवळीशी काहीही संबंध नाही की त्यातून त्या चळवळीला फ़ायदाही मिळणार नाही. पण मूकमोर्चा काढणार्‍या मराठा वा तत्सम बहुजन समाजातील विविध घटकांना मौन सोडण्याची वेळ आणली गेली आहे. ज्यांनी अशी आग लावली, ते आपला कार्यभाग सिद्ध करून पळाले आहेत आणि आंबेडकरवादी मात्र भोवतालाच्या सदिच्छा दोन दिवसात गमावून बसले आहेत. डिवचले गेल्यास मूकमोर्चा कितीकाळ मूक राहू शकेल? मुठभरांनी ब्राह्मणी आरोपांची आतषबाजी केली, पण दुखावला गेलेला बहुजन मराठा समाज आहे. हे अर्थात एल्गार पुकारणार्‍यांना माहितीही आहे. त्यांना जातीयुद्धाची हिंसाच हवी असेल, तर बाबासाहेबांच्या अनुयायांची जबाबदारी वाढत असते. हे विसरून चालणार नाही.

12 comments:

  1. Bhau kharay.kalach mi eka library madhe hich chrcha aikali.marathe lok mhanat hote ki apan lakhani morche kadhale pan eka rupayache nuksan nahi pan eka divsat kiti karod che nuksan kele yani

    ReplyDelete
  2. Bhau

    नक्कि काय झाले हे गावकर्‍याच्या पत्रकार परिषदेतुन पहा, तुम्हि आणि वाचक यास खालिल लिक

    https://youtu.be/4sjMb_dXG1Q

    ReplyDelete
  3. आणी प्रकाश आंबेडकर म्हणतात कि बंद शांततेत पार पडला , हिच जर शांतता असेल तर हिंसा कशी असते ? असे नेते असतानाही हा देश आणखी टिकून आहे, हा खरोखरच एक चमत्कार आहे. वर म्हणतात कि भिडे गुरुजी , मिलींद एकबोटेला मेमन सारखा न्याय लावा. मेवाणी , खालीदला भारत रत्न द्यावे अशीही शिफारस हे महाभाग करतील . सुधीर फडके नी गायलेले एक गाणे आठवते " पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा , वेश्येला मणीहार , उध्दवा अजब तुझे सरकार "

    ReplyDelete
  4. अश्या बंद च्या हाका देऊन जर हा दलित समाज हिंसाचारावर उतरणार असेल तर कोण ह्यांना समाजात आदर देईल?
    जो काही आत्तापर्यंत दुरावा होता दोन समाजांमध्ये तो गेल्या काही कालात बऱ्याच अंशी कमी झाला होता...
    मात्र आता हा दुरावा आधीपेक्षा अधिक जास्त वाढला आहे आणि कदाचित अजून वाढण्याची शक्यता आहे..वेळीच यावर सावध व्हायला हवं.
    दलित समाजाने आत्ता पर्यंत याचं-त्याचं ऐकून स्वतःच भरपूर नुकसान करून घेतलंय
    आता तरी सुधारा आणि एकोप्याने राहा

    जय हिंद।

    ReplyDelete
  5. Here in our country Dalit and Muslims have to come in main stream not by doing what they are doing today ( like what they have done on 2 AND 3 RD JAN ) but by their body language and attitude which they are lacking and because of which the gap bet bet higher casts and these communities is increasing day by day

    ReplyDelete
  6. मराठा मुकमोर्चा शांततेत व कुठल्याहि नुकसानाविना सर्व समाजामधील लोंकाच्या सहभागाने पार पडला हे तुम्हि म्हणत असल्याप्रमाणे सत्य व कौतुकास्पद व अनुकरणीयच आहे.

    पण सरसकट आंबेडकरी जनतेलाहि गुन्हेगार ठरवणे किंवा त्यांचा द्वेश करणेहि चुकिचेच आहे.

    ईथे एक गोष्ट ध्यानात ठेवणे गरजेचे आहे कि, मराठा मुकमोर्चाला सर्वांकडुन सहकार्य मिळाले.

    तर आंबेडकरी जनतेच्या दृष्टिने खुप महत्वाच्या आणी प्रेरणादायक अशा भीमा कोरेगाव येथील कार्यक्रमामधे हे सहकार्य तर नाहिच पण इतर उच्चवर्णीयांकडून विरोधच आहे असे सारखे दिसतच राहिले आणी अजूनहि बर्याच वेळेला तसेच दिसते
    आता हे असे मी का म्हणत आहे हे उदाहरणासह सांगतो

    1) १ जानेवारीला विजय दिवसावेळि जी दंगल घडली आंबेडकरी जनतेवर जे आक्रमण झाले त्याची बातमी दिवसभर कुठल्याहि न्युज चँनलने दाखवली नाहि. याचे समर्थनार्थ असे कारण देण्यात आले कि दंगल भडकु नये म्हणुन बातमी दाखवली नाहि. चला काहि वेळासाठि हे खरे मानू

    मग दुसर्या दिवशी जेव्हा बंद पाळला गेला त्याच्या बातम्या मात्र लाईव्ह दाखविण्यात आल्या

    यामुळे असा संदेश गेला कि आंबेडकरी जनता विनाकारण सर्व करत आहे. आणी आंबेडकरी जनता खलनायक आहे.

    2) तुम्हि दुसरा जो महत्वाचा मुद्दा मांडला तो आहे अँट्रोसीटि कायद्याच्या गैरवापराबात.

    ईथे लक्षात घेणे खुप महत्वाच्या आहे कि आज राज्यात अँट्रोसीटि कायदा अस्तित्वात असतानाहि आंबेडकरी जनतेवर उघड उघड हल्ला झालेला आहे, त्यामुळे गरज तो कायदा रद्द करण्याची नाहि अजूनहि मजबुत करण्याची आहे. आणी त्याच्या योग्य वापराबाबत प्रसार करण्याची गरज आहे.

    3) १ जानेवारीला ज्यादिवशी कोरेगाव विजयदिवस साजरा केला जात होता, देशभरातून लाखो लोक भिमाकोरेगावला आले होते. त्यावेळेला गावकर्यांन्नी बंद पाळला, त्याला कारण काय तर, गोविंद महार ज्यांन्नी संभाजी महाराजांवर अंत्यविधी केले त्याच्या समाधीवर त्यांच्या कार्यासंबंधीचा फलक लावला आणी समाधीवर छोटेसे शेड उभारले गेले, त्याला लोकांचा विरोध होता. दंगलीनंतर मात्र हा विरोध बंद झाला आणी ते काम करण्याचा निर्णय झाला. मग पहिल्यांदा झालेला विरोध हा काय सवर्ण समाजाच्या आंबेडकरी जनतेप्रती सदिच्छा होत्या.

    4) दंगलीनंत्तर जो बंद पाळण्यात आला त्यानंतर त्याविरोधात अजून एक बंद पाळण्यात आला, यावरून दलित लोंकाबद्दलच्या इतर उच्चवर्णीय लोकांच्या मनातील सदिच्छा चांगल्याच लक्षात आल्या.

    5) आता सर्वात महत्वाचा प्रश्न हिंसक प्रतिक्रियेबाबत.

    मराठा मुक मोर्चा पुर्णपणे अभूतपुर्व अशा शांततेत पार पडला, त्या जुन्या न्युज वाचताना अजुनहि खुप बरे वाटते. पण मराठा मोर्चावर कधी आक्रमण झाले नाहि कि दगडफेक झाली नाहि. उलटपक्षी अँट्रोसीटि कायद्यास हा मोर्चा विरोध करत असताना सुद्धा फक्त त्या चिमुकल्या मुलीसाठी म्हणून अनेक दलित लोक सुद्धा या मोर्चामधे हिरीहिरीने भाग घेत होते याची वेगळि आठवण करुन द्यावी लागता कामा नये.

    याउलट
    भिमाकोरेगावला १ जानेवारीला जे लोक अभिवादनाच्या कार्यक्रमाला आले होते त्यांन्ना सर्वप्रथम सामना करावा लागला बंद चा. ते वातावरण पाहिल्यानंतर हा समाज आजहि बहिष्कृतच आहे का असे वाटल्यावाचून रहात नव्हते.

    त्यानंतर अभिवादनासाठी आलेल्या लोकांच्या गाड्यांची मोडतोड करण्यात आली, टायरी टाकून वाहन जाळण्यात आली. त्याचा धूर आकाशात उंचच उंच दिसत होता. एवढ होऊनहि हा मोर्चा शांततेत अभिवादनासाठी जात होता.

    या मोर्चावर गच्चीवरून दगडफेक सुरू झाली तरीसद्धा लोक अभिवादनासाठी जात होते शांततेत.

    शेवटी काहि समाजकंटक स्वयंघोषीत देशभक्त लाठ्याकाठ्या घेऊन अभिवादन करावयास आलेल्या लोकांवर हल्ला करू लागले. अभिवादन करायला आलेल्या लोकांमधे बायका आणी मुले सुद्धा होती. त्यावेळिमात्र लोकांच्या संयमाचा बांध तुटला आणी त्यांनी त्या समाजकंटकांन्ना पकडून धुतले. युट्युबवर एक विडीयो आहे ज्यात एका हल्लावराला बायकांन्नी पकडून मारलय आणी मग त्याला मदत करावी असा सगळ्यांचा विचार चाललाय. यानंतर सुरू झाली हिंसक प्रतिक्रियां

    कुठल्याहि प्रकारच्या हिंसेच मला समर्थन नाहि करायच आहे, मला फक्त एवढच लक्षात आणून द्यायच होत कि हिंसा चालू करण्याआधी या समाजाला काय काय भोगाव लागल.

    आंबेडकरी समाज हा मुळातच सोशीत समाज आहे, त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टि सहन करण्याची क्षमता या समाजामधे आहेच. त्यामुळे हा समाज जर का विरोध करत असेल, तर त्यामागे काहितरी कारण हे असनारच ना?

    जसे झालेल्या हिंसेचे समर्थन करता येणार नाहि, तसेच आंबेडकरी जनतेला खलनायकहि ठरवता येणार नाहि. आणी झालेल्या नुकसानीचा हिशोब मागण्यापुर्वी झालेल्या हल्याचा आणी अन्यायाचाहि हिशोब द्यावा लागणार

    या विषयास योग्य शब्द व भाषेमधे हाताळल्याबाबत आपले धन्यवाद

    discover.sandesh1993@gmail.com

    ReplyDelete