Monday, April 16, 2018

अमानुष माणूसकी


चि. आसिफ़ा,

बाळ तुझी एक चुक बाली बघ. तू माणसाच्या जातीत जन्माला आलीस. त्यापेक्षा मोठी घोडचुक म्हणजे मुलगी म्हणून जन्माला आलीस. यापेक्षा अन्य कुठल्याही पशू प्राणी जमातीत जन्माला आली असतीस, तर तुझ्या नशिबी असले भोग आले नसते. अर्थात माणूसही तितका वाईट नाही. पण तो विचारांनी प्रवृत्त झालेला असला, तर पशूपेक्षाही भयंकर हिंस्र होतो. दुर्दैवाने त्यातही तु फ़सलीस. तसा तुझ्या वाट्याला आलेला नरकवास शेकडो हजारो मुलींच्या वाट्याला येतच असतो. त्यात काही नवेही राहिलेले नाही. पण अधिक यातना कुठल्या असतील, तर त्या नरकवासानंतर होणारी त्याची बेशरम चिकित्सा! आता सुद्धा बघ ना, तुझ्यावर ते अनन्वित अत्याचार होत असताना कोणी तुझ्या मदतीला धावला नाही. पण तू मरून माती झाल्याची खातरजमा झाल्यावर कितीजण तुला न्याय देण्यासाठी टाहो फ़ोडून रडत आहेत. तुझी जन्मदाती आईसुद्धा इतक्या आरोळ्या ठोकून रडली नसेल, तुझा निष्प्राण मृतदेह बघून. पण आमच्याकडे बघ. वाहिन्या, सोशल मीडिया वा रस्त्यावर उतरलेले मेणबत्ती मोर्चे यांच्याकडे बघितले, तर तुझ्या जन्मदातीलाही शंका येईल, की असिफ़ा तिची मुलगी होती की आमची? हा तुझा खरा गुन्हा आहे. तू अशा पाखंडी दांभिक जनसमुहात जन्माला येऊनही जगायला धडपडत होतीस. आठ वर्षे जगलीस वा सुरळीत राहिलीस, हा सुद्धा एक चमत्कारच आहे. कारण तुझ्यासारख्या शेकडो आसिफ़ा आसपास चिरडल्या चुरगाळल्या जात असताना आम्ही तिकडे पाठ फ़िरवून साळसूदपणे वाट वाकडी करीत असतो. मात्र बोभाटा झाला मग कुठलाही धोका दिसत नसताना आम्ही आवेशात पुढे सरसावतो. आपल्या चारित्र्य पावित्र्यासाठी शोकमग्न होऊन टाहो फ़ोडतो. आज तुझ्या नावाची चलती आहे, म्हणून आसिफ़ा म्हणायचे. कधी आम्ही निर्भयासाठी असाच गळा काढला होता. चुक तुझी आहे आसिफ़ा! चुकीच्या प्रजातीमध्ये जन्म घेतलास तू!

आता काही काळ तुझ्या नावाची चलती असेल. निर्भयाची होतीच. मधल्या पाच वर्षात निर्भयाचे नाव कुणाला आठवले सुद्धा नाही. मग गुजरातच्या निवडणूका आल्या आणि अकस्मात कुणाला तरी निर्भयाची आठवण झाली. निर्भयाला कसा न्याय मिळाला, त्याची रंगतदार कथा तिच्याच आईने एका दिर्घ मुलाखतीमध्ये कथन केलेली वाचायला मिळाली. गुजरातच्या प्रचारात राहुल गांधी गुंतलेले होते आणि निर्भयाच्या आईने आपल्या सुपुत्राला राहुलमुळेच पायलट होता आल्याची गुढकथा उलगडून सांगितली होती. त्या माऊलीला आपला मुलगा पायलट झाल्याचा आनंद होता आणि म्हणून जाहिरपणे राहुलचे आभार मानण्य़ाची अतीव इच्छा झाली. पण त्यात कुठे आपल्या मुलीला चौघा नराधमांनी धावत्या वहानात दिलेल्या यातनांचा उल्लेख नव्हता. निर्भयाच्या यातनांचे विस्मरण तिच्या आईलाच झालेले असेल, तर बाकीच्या आम्हा लोकांची काय कथा? आम्ही मेणबत्या वा राजकीय प्रचारासाठी निर्भयाला वापरली. तिच्या आईला मुलगा पायलट होण्यासाठी निर्भयाने किंमत मोजल्यासारखे वाटले असावे. निवडणूकीच्या मुहूर्तावर आपल्या मुलाला राहुलमुळे पायलट होता आले, असले प्रमाणपत्र देण्यातून या माऊलीने निर्भयाने भोगलेल्या यातनांचा लिलावच नाही का केला? जिथे जन्मदाती माऊलीच आपल्या पोटच्या पोरीच्या यातनांचा असा बाजारभाव करत असेल, तर बाकीच्या बाजारू समाजाने तुझ्या यातना वेदनांचा प्रत्येकाने लचका तोडला तर नवल काय? आज तुझ्या न्यायासाठी प्रत्येकजण कसा आपापल्या परीने झटतोय, बघते आहेस ना आसिफ़ा? तुलाही ते दु:ख भोगताना जितकी न्यायाची ओढ लागली नसेल, त्यापेक्षा अधिक आज लाखो करोडो लोक व समाजातले नामवंत तुझ्या न्यायासाठी रणांगणात झेपावलेले आहेत. कसा न्याय मिळायचा ग पोरी अशा जगात? न्याय किती क्रुर असतो ना आसिफ़ा?

तुला ठाऊक आहे असिफ़ा, या देशातल्या लाखो मुलांना आयुष्यात अनेक महत्वाकांक्षा असतात. कोणाला पयलट वा इंजिनीयर व्हायचे असते. त्यांच्याकडे राहुल गांधींनी कधी ढुंकून बघितले होते काय? मग याच मुलाकडे म्हणजे निर्भयाच्या भावाकडे राहुल गांधींचे लक्ष वेधण्यासाठी निर्भयाने त्या नरकयातना भोगल्या होत्या काय? त्या भोगल्या तेव्हा उठलेल्या वादळात राहुल गांधी कुठे होते? तेव्हा मेणबत्त्या बाजारात उपलब्ध नव्हत्या की निर्भयाच्या यमयातनांची खबर कोणी छापलेली नव्हती? पण तेव्हा तिकडे राहुल पाठ फ़िरवून बसलेले होते आणि हीच निर्भयाची माऊली पोरीच्या न्यायासाठी टाहो फ़ोडून रडत होती. अशा भावाकडे राहुलचे लक्ष जाण्यासाठी किती भयंकर किंमत निर्भयाने मोजली होती ना? निर्भयाचा भाऊ म्हणून राहुलनी त्याला मदत केली आणि ती किंमत तिच्याच माऊलीला आज आठवत नाही. तिला वाटते राहुलमुळे आपला मुलगा पायलट झाला. ह्याला निर्भयाच्या यातनांचा सौदा नाहीतर काय म्हणायचे ग आसिफ़ा? नेमकी हीच कैफ़ियत बडोद्याच्या बेस्ट बेकरी खटल्यात जाहिराच्या आईने मांडलेली होती. तिचीही एक मुलगी त्या जाळपोळीत मारली गेली. तर तिचे दु:ख आठवत नाही काय, असे न्यायाधीशांनी विचारले असता ती माऊली म्हणाली होती, मेली म्हणून लग्नाचा खर्च वाचला. तुम्ही भरणार होता तो खर्च? माणसातली आपुलकी किती आटून गेली आहे ना? जन्माला घातलेल्या मुलीच्या होरपळून मरण्यापेक्षा जन्मदातीला लग्नातला खर्च मोठा वाटतो. पोरीने भोगलेल्या यमयातनांपेक्षा दुसर्‍या माऊलीला पोरगा पायलट झाल्याचा परमानंद होतो. कुठल्या जगात जगतो आपण आसिफ़ा? त्यात तुझी खैरीयत कोण ठेवणार? कुठला कायदा तुला संरक्षण देऊ शकणार आहे? शेवटी कायदा माणसेच बनवतात आणि माणसेच त्याचा मुडदा पाडतात. मग न्याय म्हणजे काय उरते ग पोरी?

प्रत्येकाला याची पुर्ण जाणिव आहे. प्रत्येकाने चेहर्‍यावर मुखवटे चढवून ठेवलेले आहेत. अशी संधी मिळाली की प्रत्येकजण, आपण माणूस असल्याचे व संवेदनशील असल्याचे दावे करायला धावत सुटत असतो. जगात काय चालले आहे त्याची कोणाला फ़िकीर नसते. त्या उन्नावच्या मुलीची कथाच बघ. मागल्या जुन महिन्यातली घटना आहे आणि आज आम्ही सगळे तिच्यासाठी मातम करायला पुढे सरसावलेले आहोत. कारण माहिती आहे तुला? आपल्याकडे बोट दाखवले जाऊ नये, म्हणून ही केविलवाणी धडपड आहे. तुझ्यावर तो अत्याचार झाला, तेव्हा आमच्यातला कोणी तिथे जवळपास असता, तरी आम्ही अंग चोरून पळालो असतो. कोणी आपलाच जीव धोक्यात घालून तुला अजिबात वाचवले नसते. हे आमचे खरे चरित्र आहे. ते उघडे पडण्याच्या भयाने आम्हाला पछाडलेले असते. मग आपली नंपुसकता लपवण्यासाठी किंवा त्याच्या आडून आपली मर्दुमकी दाखवण्यासाठी, आम्ही शब्दाचे बुडबुडे उडवित असतो. त्यातही तुझी जात धर्म कोणता यानुसार आमची विभागणी होत असते. तु कोण वा तुझे आरोपी कोण, याला कवडीची किंमत नाही. आमच्या तमाशा वा नाटकात तुझा पात्र म्हणून कितीसा उपयोग असतो, त्याप्रमाणे आम्हाला उमाळे येत असतात. आमचे रक्त तापत असते वा आम्ही चवताळत असतो. आपण माणसे अशीच असतो ग! ढोंगी पाखंडी. विचारांनी विकृत केलेली आणि विकारांनी बरबटलेली. ते जंगलातले सिंह वाघ वगैरे श्वापदे असतात ना? ती पोट भरलेले असेल, तर कोणाची उगाच शिकार करत नाहीत. नाहीतर आपण माणसे! आपले पोट कधी भरत नाही की आपले हव्यास कधी संपत नाहीत. मर्दुमकी दाखवायला आपण पशूलाही लाजवण्याइतके क्रुर व हिंस्र होत असतो. कायम दबा धरून बसल्यासारखे टपलेले असतो, कुणा सावजावर झेप घ्यायला. आणि त्यातच कधीतरी शिकारही होऊन जातो.

आसिफ़ा, ऐकते आहेस ना? तुला विचित्र वाटले ना? तू मनुष्य योनीत जन्म घेतलास ही चुक म्हटल्यावर? खरेच सांगतो, माणसासारखा दगाबाज प्राणी नाही. त्यापेक्षा बाकीचे प्राणीमात्र बरे आणि भले. त्यांच्यात विचार करण्याची क्षमता नसेल, पण विवेक ठासून भरलेला असतो. त्यांच्यात प्रेमाचे नाटक नसते की मत्सराला जागा नसते. जननाची निसर्गदत्त कर्तव्ये पार पाडताना नरमादी एकत्र येतात. प्रेम, बांधिलकी, नातेसंबंध, आस्था आपुलकी असले कुठे ढोंग नाही. खाण्यापिण्यावरून एकमेकांच्या जीवावर उठणारी ही जनावरेही किती सभ्य असतात? वयात न आलेल्या वा जननक्षम नसलेल्या कुणावर आक्रमण होत नाही वा त्याच्यावर जबरदस्ती होत नाही. प्रणयाचे वा शृंगाराचेही नाटक नाही. विरहाचे वा प्रेमभंगाचा सिनेमा नाही की बलात्काराचे प्रसंग नाहीत. जे योग्य तितके करावे, हा विवेक त्यांच्यापाशी असतो आणि त्या लक्ष्मणरेषा कोणी आखून द्याव्या लागत नाहीत. कुठला कायदा वा घटनात्मक व्यवस्था नसते. पण सर्व कसे ठिकठाक चालते ना? न्यायालयांची गरज नाही की न्याय अन्याय यावर चर्चासत्रे करावी लागत नाहीत. माणसाला निर्सगाने बुद्धी देऊन त्याला सर्वात हिंस्र प्राणी बनवून ठेवलेले आहे. त्यातले श्वापद लपवण्याची अखंड केविलवाणी धडपड म्हणजे संस्कृती! म्हणून आपण सुसंस्कृत असतो, सभ्य असतो आणि म्हणूनच पशू वा राक्षसालाही लाजवणार्‍या गोष्टी करतो. किंबहूना या राक्षस पशू वगैरे कल्पनाही माणसाने जन्माला घातल्या. बाकी प्राणीमात्राला त्याचा गंध नाही. म्हणून सांगितले तुझी एक चुक झाली, ती मनुष्य योनीत जन्म घेण्याची आणि दुसरी चुक मुलगी म्हणून जन्म घेण्याची! जेव्हा माणूस म्हणून आपण जन्म घेतो ना, तिथेच आपण समाजाचे गुलाम झालेले असतो. तिथे प्रत्येक क्षणी हिंस्र प्रसंगाला सामोरे जाण्याचीच तयारी ठेवावी लागते. ज्यांच्या वाट्याला हे भोग येत नाहीत ते नशिबवान असतात. बाकी आपण सगळे दुर्दैवी असतो आसिफ़ा!

4 comments:

  1. भाऊ, काय म्हणावयाचे याला काळात नाही. तुमचा हा लेख सर्वाना आपली जागा दाखवून देईल हे नक्की.

    ReplyDelete
  2. भाऊ खरोखर विचार करायला लावणारा लेख आहे. न्याय मिळायला हवा या बद्दल दुमत नाही. पण एक गोष्ट लक्षात येत नाही ती म्हणजे हे सर्व आत्ताच एकदम कुठून सुरु झाले..

    ReplyDelete
  3. भाऊ प्रत्येक घटनेचे राजकारण करण्याचे व्यसनच लागले आहे भारतीय राजकारण्यांना व् इलेक्ट्रॉनिक मेडियाला

    ReplyDelete
  4. Khoop samarpak vishleshan. Pratekala lagu....congress,bjp etc. Etc.

    ReplyDelete