Wednesday, May 16, 2018

आघाडीतली बिघाडी

mamta sonia rahul के लिए इमेज परिणाम

तेलंगणा प्रदेश कॉग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मल्लूभट्टी विक्रमार्क यांनी त्या राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावर एक गंभीर आरोप केलेला आहे आणि त्यासाठीचे एक पत्रच विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना धाडले आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी, ओडिशाचे नविन पटनाईक, तामिळनाडूच्या द्रमुकचे मुख्य स्टालीन इत्यादि नेत्यांना लिहीलेल्या पत्रार विक्रमार्क यांनी राव हे नरेंद्र मोदी व अमित शहांचे हस्तक असल्याचा आरोप केलेला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपा विरोधी एक भक्कम विरोधी आघाडी उभी राहू नये, म्हणून राव यांना भाजपाने पुढे केले असल्याचा गंभीर आरोप त्या पत्रात केलेला आहे. विक्रमार्क यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला होताच. पण राव यांच्या फ़ेडरल आघाडीत सहभागी व्हायला तयार असलेल्या नेत्यांना त्यांनी तसे पत्र लिहीले आहे. देशात मोदी विरोधातील महत्वपुर्ण आघाडी कॉग्रेसच्याच नेतृत्वाखाली उभी राहू शकते आणि तिलाच सुरूंग लावण्यासाठी भाजपाने राव यांना पुढे केले आहे, असा हा आरोप आहे. तसे विक्रमार्क यांना का वटते आहे? तर राव यांनी कॉग्रेस आणि भाजपा यांना वगळून फ़ेडरल आघाडी उभी करण्याचे प्रयास आरंभलेले आहेत. त्यांना उपरोक्त तीन प्रादेशिक नेत्यांनी उघड पाठींबा दिलेला आहे. तशा आघाडीला प्राधान्य दिले व त्यात राव यशस्वी ठरले, तर भाजपासाठी २०१९ लोकसभा सोपी होऊन जाईल, असा दावा आहे. थोडक्यात कॉग्रेस वगळून काहीही करणे म्हणजे मोदी-भाजपा यांचे हात बळकट करणे, असाच विक्रमार्क यांचा दावा आहे. लोकसभेत मोदीलाटेला रोखण्यासाठी सध्या दोन बाजूने प्रयत्न चालू आहेत. त्यात एका बाजूला राव-ममता असून दुसरीकडे खुद्द सोनिया गांधी युपीएचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नात आहेत. तोच संदर्भ घेऊन विक्रमार्क यांनी हा उपदव्याप केला आहे. ह्याला म्हणूनच आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घेणे म्हणतात.

विक्रमार्क यांचे राजकारण तेलंगणा या एका लहान राज्यापुरते मर्यादित आहेत. विक्रमार्क राव यांचे राज्यातील विरोधक आहेत. त्यामुळेच चंद्रशेखर राव यांच्या कुठल्याही भूमिकेला विरोध करणे त्यांच्यासाठी योग्य असले, तरी एकूण राष्ट्रव्यापी कॉग्रेससाठी तेच धोरण योग्य असेल असे नाही. किंबहूना विक्रमार्क हे तेलंगणापुरते कॉग्रेसचे नेते असून त्यांनी अन्य राज्यातील विविध पक्ष व नेत्यांशी राष्ट्रीय धोरणांसंबंधी संपर्क साधणे वा भूमिका घेणे, कितपत योग्य असू शकते? एकतर राहुल गांधींनी पक्षाचे नेता म्हणून त्यांच्यावर ती जबाबदारी सोपवलेली असू शकते. किंवा विक्रमार्क करीत आहेत, तो निव्वळ आगावूपणा ठरू शकतो. कारण कुठल्याही पुराव्याशिवाय त्यांनी राव यांना भाजपाच्या गोटात ढकलण्याचा उपदव्याप केला आहे. पण त्याचवेळी राव यांच्याशी हातमिळवणी केलेल्या ममतांनाही दुखावले आहे. आधीच ममताही कॉग्रेसला आघाडीत घेण्यास वा कॉग्रेसच्या आघाडीत जाण्यास उत्सुक नाहीत. अशावेळी सोनियाही ममतांना चुचकारत आहेत. त्याचवेळी विक्रमार्क यांच्या पत्राने ममता विचलीत होऊ शकतात. काही दिवसांपुर्वीच ममतांनी कॉग्रेसला जाहिरपणे इशारा दिलेला होता. आघाडीत यायचे असेल, तर आपणच नेतृत्व करण्याच्या गमजा कॉग्रेसला सोडाव्या लागतील. आघाडीत सहभागी होणार्‍या अन्य पक्षासारखा एक पक्ष म्हणून कॉग्रेसने फ़ेडरल आघाडीत सहभागी व्हावे. इतर राज्यात जिथे ज्या प्रादेशिक पक्षाचे बळ अधिक असेल, त्याच्या नेतृत्वाखाली काम करण्याची कॉग्रेसला तयारी दाखवावी लागेल असाही इशारा ममतांनी दिलेला आहे. म्हणजेच ममताही कॉग्रेसचे नेतृत्व पत्करून युपीए म्हणून कामाला राजी नाहीत. अशावेळी त्यांनाच शहाणपण शिकवण्याला उचापत म्हणावे लागते आणि तेही काम दुय्यम नगण्य कॉग्रेस नेत्याने करावे, ही म्हणूनच राजकीय आत्महत्या असते, राहुल गांधी त्यात कुशल झालेले आहेत.

आपल्याला आठवत असेल तर त्रिपुराचे निकाल लागल्यानंतर एकूणच देशातील विरोधी पक्षांचे धाबे दणाणले होते. इशान्येकडे भाजपाला स्थान काय, असा प्रश्न नेहमी विचारला जात होता. पण तिकडच्या एका राज्यातच भाजपाने डाव्या आघाडीला उखडून टाकत सत्ता संपादन केली. इतकी मजल भाजपा मारू शकत असेल, तर इतर राज्यातही प्रादेशिक पक्षांना भाजपा हे आव्हान वाटू लागले तर नवल नाही. त्याच भयातून धावपळ सुरू झाली, तेव्हा तेलंगणा राज्य समितीचे संस्थापक मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी फ़ेडरल आघाडीचा प्रस्ताव ममतांसमोर मांडला. विविध राज्यातील प्रभावी प्रादेशिक पक्षांची राष्ट्रव्यापी आघाडी उभारावी आणि त्यात भाजपासहीत कॉग्रेसलाही दुर ठेवावे, अशी राव यांची भूमिका होती. तॊ गैरलागू मानता येत नाही. कारण आज मोदींना आव्हान देण्यासाठी उभ्या ठाकलेल्या बहुतेक नेते व प्रादेशिक पक्षांचा राज्यातला खरा प्रतिस्पर्धी भाजपा नसून कॉग्रेसच आहे. मोदी विरोधासाठी त्यांनी कॉग्रेसच्या सोबत हातमिळवणी करणे, म्हणजे राजकीय आत्महत्या ठरू शकते. या बहुतांश पक्षांचा पाया बिगरकॉग्रेसी राजकारणावर घातला गेला आहे. तिथे भाजपाला फ़ारसे स्थानही नाही. मग मोदी विरोधाच्या नावाखाली त्यांनी कॉग्रेसशी दोस्ती केली, तर कॉग्रेसविरोधी मतदाराने कोणाच्या तोंडाकडे बघावे? त्याला पर्याय म्हणून भाजपाकडेच वळावे लागणार ना? तीच चंद्रबाबू, स्टालीन, ममता वा डाव्यांची गोची आहे. किंबहूना त्याचाच लाभ घेत भाजपाने त्या राज्यांमध्ये आपले बस्तान बसवायला घेतले आहे. त्रिपुरा त्याचे उदाहरण आहे. बंगालमध्ये म्हणून भाजपा रुजू लागला आहे आणि कर्नाटकात वा अगदी महाराष्ट्रातही पुरोगामी पक्षांचा त्यातून बोर्‍या वाजला. त्यांचे बिगरकॉग्रेसी स्थान घेतल्यावर भाजपा अधिक विस्तारत गेला. आता तेच संकट इतर प्रादेशिक पक्षांसमोर आहे. युपीएत जाऊन संपावे की भाजपाप्रमाणेच कॉग्रेसला शत्रू मानून आपले अस्तित्व टिकावावे, हा पेच आहे.

कॉग्रेसशी सोबत करून संपण्यापेक्षा कॉग्रेसलाही सारखाच शत्रू मानून आपले अस्तित्व टिकवावे व भाजपाला आव्हान द्यावे, ही भूमिका ओडीशाच्या नविन पटनाईक यांनी यशस्वी करून दाखवली आहे. मागल्या तीन निवडणूकात त्यांनी भाजपाशी समर्थपणे दोन हात करताना, कॉग्रेसलाही दुर ठेवले आणि त्यांना भाजपा संपवू शकला नाही. पण अन्य राज्यात कॉग्रेसच्या जोडीला जाऊन देवेगौडा वा मार्क्सवादी नेस्तनाबूत होऊन गेले. चंद्रशेखर राव यांना पुरोगामी राजकारणासाठी बळी जाऊन कॉग्रेस पक्षाला संजीवनी देण्याचा मुर्खपणा करायचा नाही. मोदीविरोध वा भाजपाला रोखण्याचा अर्थ कॉग्रेसच्या मागे जाऊन मरणासन्न पक्षाला जीवदान देणे, असा करायचे कारण नाही. इतर प्रादेशिक पक्षांपेक्षा कॉग्रेसचे बळ फ़ार मोठे नाही. चारसहा राज्यातला प्रादेशिक पक्ष हीच आजच्या कॉग्रेसची अवस्था आहे. त्यामुळे आपणच राष्ट्रीय पक्ष असल्याने बाकीच्या पक्षांनी निमूटपणे भाजपा विरोधातील लढाईत आपले नेतृत्व स्विकारावे, असली सक्ती चालणार नाही. ही ममता किंवा राव यांची भूमिका आहे. त्यांचा भाजपाला विरोध असला तरी फ़क्त कॉग्रेसच देशाला पर्यायी नेतृत्व देऊ शकते, हे राव यांना मान्य नाही. किंबहूना त्यातून आपला राजकीय पक्ष बळी द्यायला ते राजी नाहीत. त्यातून फ़ेडरल आघाडीची कल्पना पुढे आली आहे. ती बळकट होत गेली, तर कॉग्रेसला मोदीविरोधी आघाडीचे नेतृत्व मिळण्याची शक्यताच संपून जाते. म्हणून फ़ेडरल आघाडील सुरूंग लावण्यासाठी मग राहुलच्या पाठींब्याने हा नवा डाव टाकण्यात आला आहे. आपल्या मागे येणार नाही त्याला मोदी वा भाजपाचा हस्तक ठरवणारा आरोप त्यातूनच आलेला आहे. राव याच्यावर गंभीर आरोप करणारे पत्र त्यासाठीच असून आपल्याला नेतृत्व मिळणार नसेल, तर राहुल फ़ेडरल आघाडीच मोडायला सिद्ध झालेत, असा त्याचा अर्थ निघतो. इतक्या मुर्खपणाची गरज आहे काय?

२००४ सालात कॉग्रेसच्या पाठीशी सगळे पक्ष उभे राहिले नव्हते. सोनियांनी स्थापन केलेली युपीएही विस्कळीत आघाडीच होती आणि तिला पुर्ण बहूमतही मिळवता आलेले नव्हते. पण भाजपाने बहूमत गमावले आणि लोकसभा त्रिशंकू झाल्यावर आपोआपच सर्वात मोठा पक्ष म्हणून नेतृत्वाची सुत्रे सोनियांच्या हाती आली होती. इतर पक्ष मग भाजपाला सत्तेपासून दुर राखण्याच्या आमिषाने सोनिया वा कॉग्रेसच्या मागे उभे राहिले होते. हे शक्य असताना आधीपासूनच लहानसहान सर्व पक्षांना आपल्या गोतावळ्यात आणण्याचा अट्टाहास करण्याची काय गरज आहे? चंद्रशेखर राव व ममतांनी आपली आघाडी करावी आणि शक्य आहे तिथे भाजपाला त्या आघाडीने हरवावे. तिथे त्यांना त्रास होणार नाही अशी रणनिती कॉग्रेस व युपीएने ठेवावी. निकालानंतर असे पक्ष वा आघाडी भाजपाच्या सोबत जाणार नाही, इतकेही खुप झाले ना? मग आतापासून सर्व पुरोगामी वा बिगरभाजपा पक्षांना आपल्याच पंखाखाली आणण्याचा हट्ट कशाला हवा? पण हे समजण्याइतका मुरब्बीपणा राहुलपाशी नाही. म्हणूनच त्यांच्याभोवती कपील सिब्बल वा तत्सम दिवाळखोरांची गर्दी जमलेली आहे. विक्रमार्क त्यापैकीच एक असून असे लोक आपापल्या परीने कॉग्रेसचे राजकारण बुडवायला हातभार लावत असतात. २००४ सालात डावी आघाडी युपीएमध्ये नव्हती. तरीही त्यांनी सत्ता स्थापन करताना पाठींबा दिलाच ना? नविन पटनाईक भाजपाच्या गोटात गेले नाहीत की अण्णाद्रमुकने भाजपाला वाचवण्याचे प्रयास केले नाहीत. मग आताच फ़ेडरल आघाडीच्या विरोधात राहुलच्या सरदाराने तोफ़ा डागण्याची काय गरज आहे? पण त्यापासून कॉग्रेसची सुटका नाही. पायावर कुर्‍हाड पडणार नसेल, तर पाय कुर्‍हाडीवर मारण्याला शहाणपणा समजणार्‍यांचा गोतावळा जमवलेल्या नेत्याच्या वाट्याला यापेक्षा वेगळे काय येऊ शकते?

1 comment:

  1. भाऊ, काश्मिरमधील परिस्थितीबद्दल लेख लिहावा.

    ReplyDelete